तिथली मी....इथली मी

Submitted by बेफ़िकीर on 5 February, 2016 - 10:48

मनाली शेवटचे आरश्यात बघून चपला घालून 'येते मी' असे म्हणत घराबाहेर पडते तेव्हा तिच्या मनावर एकच विचार व्यापून उरलेला असतो. 'आपण सुंदर आहोत' हेच आपल्याला दिवसभर आठवत नाही. केव्हापासून सुंदर आहोत आपण! वयात आल्यापासून ते आज दोन्ही मुले शाळेत जाऊन मोठी झाली तरीही! पुरुषांच्या जाऊदेत, बायकांच्याही माना एकदातरी वळतातच आजही आपल्याकडे! पण आपण बहुधा एक अशी दुर्मीळ स्त्री आहोत जी पुरेशी सुंदर असूनही तिचे सुंदर असणे दिवसभरच्या व्यापात आणि रात्रीसुद्धा तिच्या खिजगणतीतही नसते. काय फरक पडतो? किंबहुना, काही फरक पडत नाही हेच किती चांगले आहे. हे निसर्गदत्त सौंदर्य हा आपला क्षणोक्षणी परिचय ठरण्यापेक्षा आपल्याला आपली धड ओळखच होत नाही आहे ही अवस्था कितीतरी धुंद आहे.

पण मनालीच्या मनातील विचार अक्षरशः क्षणभरही टिकत नाहीत असे म्हणावे लागेल. हात उंचावून स्कूटीच्या आरश्यात बघत चेहर्‍याला आणि डोक्याला स्कार्फ बांधत असताना समोरची विद्या प्रजापती आपल्याकडे असूयेने पाहत असेल ह्या विचाराचे ढग तिच्या मनावर व्यापतात. विद्याला अजूनही घराबाहेर पडून नोकरी करायची परवानगी मिळत नाही आणि तिचा नवरा आपल्या नवर्‍याला 'तुमचे काय, डबल इंजिन आहे, मजा आहे बुवा' असे म्हणून चेष्टेच्या नावाखाली हिणवत असतो हे तिला सहन होत नसूनही विनोदावर हसल्याप्रमाणे हसावे लागते हे मनालीला आठवते.

इग्निशन ऑन केल्यावर रिझर्व्हकडे कलू पाहणारा काटा पाहून 'आज पुन्हा त्या पेट्रोल पंपवाल्याशी उगाचच बोलावे लागणार' ह्याची जाणीव होते. अनेक गिर्‍हाइके असताना आणि काहीही कारण नसताना आपण पेट्रोल भरायला गेलो की तो केबीनमधून बाहेर येऊन उगाच सगळ्यांना शिस्त लावतो आणि 'ए, मॅडमला दिडशे घाल' असे म्हणत आपल्याकडून एका कृतज्ञ नजरेची नजरेतूनच याचना करतो आणि हे सगळे आपल्याला आवडत नाही हे माहीत असूनही त्यात सातत्य राखू शकतो ह्याचा मनालीला उबग येतो.

पेट्रोल भरून मनाली रस्त्याला लागते तेव्हा तिच्या मनात विचार असतात आपण वेळेवर पोचू शकू की नाही ह्यापेक्षाही प्रतीक्षा डबा विसरली नसेल ना ह्याचा! उगीचच मधे थांबून मनाली सासूबाईंना फोन करून विचारते की दोन्ही मुलांनी डबे बरोबर घेतले की नाही. सासूबाई सवयीने 'हो' म्हणतात आणि मनाली सवयीने 'बरे' वाटून घेते.

एकदाचा सलग रस्ता सुरू झाला की मनालीची विचारगंगा जोमात पण न खळाळता वाहू लागते. त्या विचारगंगेत चढउतार नसतात पण वेग असतो. रात्री दहाला घोरायला लागणार्‍या मिहिरला नेमका पहाटे साडेपाचला मूड येतो येथपासून ते शाळेला नेहमीच आवश्यक असणार्‍या डोनेशनच्या विषयाचे कारण पुढे करून आजही सोपान जाधव 'डिस्कशन' वगैरेसाठी बोलावतो की काय येथपर्यंत काहीही!

पुढच्या वळणानंतर पोलिस उभे असतात हे लक्षात येताच मनाली घाईघाईत स्कूटी थांबवून दोन पायांमध्ये ठेवलेले हेल्मेट डोक्यावर घालते आणि उजवा कान पुन्हा दुखू लागला ह्या जाणिवेने क्षणभर तोंड कसनुसे करते. मात्र वळण पार करून नेहमीच्या पोलिसांसमोरून मोठ्या ताठ्यात जाते.

सोळा किलोमीटर्स! त्या सोळा किलोमीटर्समध्ये वाहतुक मुरंबे येतात, लोण्यासारखा रस्ता येतो, हिरवीगार टेकडी येते, चढउतार येतात आणि मागच्या पुढच्या अर्ध्या किलोमीटरवर कोणीही नसलेला सुनसान रस्ताही येतो.

तेथून जाताना मनालीच्या मनात रोज विचार येतो की ह्या टप्प्यात आपल्याला कोणीही नडू शकते. 'आपल्याला नेहमी चांगलीच माणसे भेटतील' ह्या अंधविश्वासावर आपण हा टप्पा पूर्ण करतो हा विचार ती मनातून झटकून टाकताना दहा वेळा स्कूटीच्या आरश्यात पाहत राहते.

हा सुनसान रस्त्याचा टप्पा आणि आपले अख्खे संसारी, अब्रूदार आयुष्य ह्यात केवळ एका दुर्जन माणसाचे अंतर आहे ह्याची तिला जाणीव असते. विशेषतः अंधार पडल्यानंतर येथूनच परत जाताना ती जाणीव प्रखर होते. ती वेग वाढवते आणि परिस्थितीपासून पळ काढण्याचा हमखास सुदैवी प्रयत्न करते. 'कोणीच जात नाही ते रस्ते सहसा स्मूथ असतात' ह्या नियमाचा जो फायदा ती मिळवते तो ना मिहिरला माहीत असतो ना समोरच्या विद्याला ना सासूबाईंना ना शाळेतील कर्मचार्‍यांना!

पावसाळ्यात उडते ती त्रेधा तिसरीच! गाडी घसरू नये म्हणून आटापिटा करताना हा आटापिटा 'डबल इंजिनसाठीचा' आहे असे मिहिरचे म्हणणे आहे हेच ती विसरते. त्याक्षणी तिच्या मनात तो पगार नसतो जो सात तारखेला तिच्या खात्यात भरला गेला की नाही हे मिहिर जातीने तपासतो. तिच्या मनात असतो एक ससा जो टिचकीचा आवाज आला तरी भेदरून इकडे तिकडे पाहून पळत सुटतो.

पण एवढे सगळे करून तिच्या मनावर व्यापलेली असते शाळा! एक शाळा! एक साधी, गरीब, शासकीय अनुदान असलेली शाळा!

एक दुर्लक्षित आवार, त्यातील एक घसरगुंडी, त्यावर संस्कृतीसारखे अव्याहतपणे घसरणारे बाल्य, एक पाण्याची टाकी, तिचा तो नळ जो पूर्ण बंद करावा हे मनालीशिवाय कोणालाही समजत नाही, एक गेट, एक रंग उडालेली बैठी इमारत, वर्गांबाहेर असलेले विविध नकाशे आणि सुविचार, ते सुविचार जे आचरणात आणायचे झाले तर ह्या जगात जगताच येणार नाही, ते नकाशे जे सिक्कीमसुद्धा भारतात आहे असा मूर्ख दावा करतात, एक भयंकर कलकलाट जो एखादा बिबट्या शाळेत घुसला तरी थांबणार नाही, ते स्वच्छतागृह ज्यातील एकाही नळाला कधीही पाणी येत नाही, एक झोपाळा ज्यावर कोणत्यातरी कुटुंबांमध्ये अपघाताने जन्माला आलेली आणि त्यामुळे नंतर स्वप्ने ठरलेली बालके झोका घेतात, त्या शिक्षिका ज्यांना रोज हाफ डे हवा असतो, ते शासकीय अन्न ज्यात प्रोटीन्सचा भरणा असतो असा समज सगळ्यांनी करून घेतलेला असतो, ते मुख्याध्यापक ज्यांना टेबलवरची बेल दाबली की सेवक येतो ह्यात ब्रह्मानंद मिळतो आणि तो सेवक जो छातीचे उभार वाढलेल्या मुलीला 'जरा अधिकच प्रेमाने' 'जा बाळा वर्गात बस' म्हणतो.

मनाली एकदाची शाळेच्या आवारात स्कूटी लावते. धावत जाऊन मस्टरवर सही करताना आठवड्यातून दोनदा तरी मुख्याध्यापक म्हणतातः

"सोपानरावांनी चर्चेला बोलावले आहे आज"

स्वतःचीच थुंकी स्वतःच्याच खालच्या उजव्या दाढेवर जोरात मारत मनाली वर्गाकडे धावते आणि बघते तर चव्वेचाळीसपैकी सहा मुले वर्गात असतात आणि त्यातल्या पाच मुली असतात.

"बाई, तुम्ही पार सांघवीहून हितं यून प्वारांना शिकवताय आन् ही भाडखाव प्वारं शिकीनात! आता तुमचा सत्कार ठिवायचा का ह्यांना फटके लावायचे? आ? आवो बाराबोड्याचे आस्तात ह्ये आदिवासी! आमची प्वारं शिकत हायेत ना? मी काय म्हन्तो? संख्येकडं बघूच नका तुमी! जो समोर आला त्याला जे वाटलं ते शिकवलं! क्काय? आता तुमचंच बघा! तुमी शिकून श्येवटी हितंच आय घा ....... आपलं ............हितंच येता ना शिकवायला? क्काये! आमची ग्रामीन भाषा येगळीय! तुमच्यासंगं तसं न्हाई बोलता येत! देनगी म्हन्लात तं आमी अजून हजार दोन हजार द्येतो. तुमची तळमळ समजते वो! पन त्ये रक्तात असावं लागतंय! क्काय?"

सोपान जाधवाचं 'हपापलेलं' भाषण ऐकल्यासारखं करून पदरात, म्हणजे शाळेच्या पदरात, पडेल ते घेऊन निघावं लागतं! निघताना तोंडभर हसून आभार मानावे लागतात. त्यातल्यात्यात 'वहिनी कश्य आहेत' असे विचारून 'मी भावाचं नातं जोडतीय' हे अप्रत्यक्षपणे सांगावं लागतं! त्या प्रश्नाचे उत्तर देताना सोपानरावाचा चेहरा पिळपिळा होतो हे पाहून क्षणभर आसुरी आनंद किंवा सात्विक आनंद मिळतो इतकाच!

मदत म्हणून सोपानराव शासकीय निधीतून अडीच हजार देणार आहेत असे सांगून जवळपासच्या वस्त्यांमधून पोरे ओढून शाळेत आणावी लागतात. मनाली दमत नाही. तिला माहीत असते. भारतात आणि महाराष्ट्रात कोठे कोणते पीक पिकते हे शिकवण्यापेक्षा 'तुम्ही शिकण्याची गरज आहे' हे गळी उतरवणे अधिक महत्त्वाचे आहे. उगाच नाही तिला गेली दोन वर्षे आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळालेला! एकदा शासनाकडून आणि एकदा मतदारसंघातून!

मिहिरला ह्यातले काय माहीत आहे?

हा विचार ती करत नाही. जाड भिंगाच्या चष्म्याआडून पर्यवेक्षकांची नजर पदरातून दिसणार्‍या तिच्या गोर्‍या पोटावर 'सहज स्थिरावली' असे दाखवत स्थिरावते ह्याचा विचार ती करत नाही. एकही मुलगा किंवा मुलगी तिचे म्हणणे पूर्णपणे ऐकत नाही ह्याचा विचार ती करत नाही. कोण कोण रजेवर गेलेले आहे ह्याचा विचार ती करत नाही. काही अबोध बालके आपल्याला आईसारखे समजून येऊन बिलगतात तेव्हा तिच्यातील आई क्षणात जागी होते. असे वाटते की त्यांना उचलून घेऊन त्यांचा पापा घ्यावा. पण त्यांच्या शरीरावर असलेली माती आणि शेंबडाने भरलेले तोंड पाहून ती इच्छा मरते.

चार वर्ग घेऊन मग मनाली जवळपासच्या वस्त्यांमधून हिंडू लागते. तिला ते कामच देण्यात आलेले आहे. त्या एरियात हिरॉईनसारखी दिसणारी एक बाई एकटी फिरून मुलांना शाळेत पाठवा सांगू पाहते हेच खूप काही ठरते.

मग माणसे सांगू लागतात.

"शाळंत व्हय? धाडू की? खायला मिळंन ना?"

"शाळंत? योक मुलगा जातो आमचा! ह्या बाकीच्या प्वारी न्हाई जात! इचारा त्यांनाच काय त्ये"

"आवो खायला दाना न्हाई आन् साळंत घालू प्वारांना?"

"रस्ता वलांडावा लागतो ना? मी श्येतावं जाते. ह्याला कोन रस्ता वलांडून द्येनार?"

"आवो हा लै म्हन्तोय साळं जायचं! ह्याला जा घ्यून!"

"हा साळा म्हनं! कामाला हात कोन द्येनार! माजी प्वारगी काम करत्ये!"

शाळा शिकून काहीतरी भले होईल ह्या विचारापासून योजने दूर असलेल्या समाजाला मनाली काहीबाही सांगत राहते. काहीवेळा तिला स्वतःच्याच सांगण्यात काही दम वाटत नाही. काहीवेळ त्या लोकांच्या विचारसरणीचा तिरस्कार वाटतो. काहीवेळा सोपान जाधवाने देऊ केलेल्या अडीच हजारांचे आमीष कामी येते. काही वेळा एखादी महिला अशी नक्की असते जी तिच्या चार सहा मुलांपैकी एक दोघांना किंवा सगळ्यांना शाळेत पाठवायची इच्छा नुसती व्यक्तच करते.

रोज दुपारी मनाली चार, दोन पोरे शाळेत ओढत आणते आणि आल्यावर तिला कोणीतरी सांगते की दोन, चार पोरे शाळा सोडून गेली.

मनालीला काहीही समजत नाही की ती काय करत आहे. क्षणभर तिला वाटते की शासन दरबारी आदर्श शिक्षिका ठरणे हेच पुरेसे आहे. नंतर वाटू लागते की सोपान जाधवाशिवाय आणि कोण देणगी देऊ शकेल ते बघावे. मग वाटते की देणगीचा उपयोग काय! मग वाटते की शाळेचा उपयोग आहे हे कुठे कोणाला मान्य आहे? मग वाटू लागते की आपण जे करतोय त्याचा उपयोग काय?

हा विचार मनात येताना मनाली अनेकदा सुविचार लिहिलेल्या भिंतींपुढे असते. मग ती सुविचार वाचते. मग तिला तिचे कर्तव्य पुन्हा एकदा समजते.

मग मिहिर, सोपान जाधव, समोरची विद्या, सासूबाई, प्रतीक्षा, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सेवक, रजेवर गेलेल्या शिक्षिका हे सगळे सगळे विचारांमधून फेकले जातात.

आणि नेमकी तेव्हाच घंटी वाजते.

सोहम घरी आला असेल.

प्रतीक्षा पोचतच असेल.

सासूबाईंनी भाजी निवडायला घेतली असेल.

मिहिर निघाला असेल.

मुले घरी निघाली आहेत.

घंटा वाजल्यामुळे आपले कोणीही ऐकणार नाही आहे.

शाळा निदान आजच्यापुरती संपली आहे.

मधे सुनसान रस्ता आहे.

अंधार लवकरच पडेल.

कसे जायचे?

तो सोपान जाधव!

आणि कोणीकोणी!

ते ट्रॅफीक जॅम्स!

मिहिरच्या कपाळावरील आठ्या!

तो संसार!

तिथली मी!

इथली मी!

========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पोचले तिथे, त्या शालेत, त्य सुन्सान रस्त्यावर आणि मनालीच्या मनातही. खुप छान.
विद्या.

स्त्री जीवनातील अडचणी रेखाटताना त्यातील बारकावे अचूक चिमटीत पकडण्याचे कसब गजब आहे .

क्लास !

आवडली कथा . दिवसभरातल्या वेगवेगळ्या प्रहरात आपण किती तुकड्यांत विभागलेलो असतो ... त्यातले किती क्षण आपण फक्त आपल्यासाठी असतो. असही काहीसं जाणवुन गेलं

मी पोचले तिथे, त्या शालेत, त्य सुन्सान रस्त्यावर आणि मनालीच्या मनातही. खुप छान. >> +१
छान लिहिलयं बेफी..
आई, मावश्या, बाई ( आईची आई ), माम्या, मामा सगळे शिक्षक शिक्षीका.. त्यांची घरच्या आणि दारच्या जबाबदारी मधली ओढाताण पाहुन आहे म्हणुन जरा जास्तच रिलेट झालं..

"बाई, तुम्ही पार सांघवीहून हितं यून प्वारांना शिकवताय आन् ही भाडखाव प्वारं शिकीनात! आता तुमचा सत्कार ठिवायचा का ह्यांना फटके लावायचे? आ? आवो बाराबोड्याचे आस्तात ह्ये आदिवासी! आमची प्वारं शिकत हायेत ना? मी काय म्हन्तो? संख्येकडं बघूच नका तुमी! जो समोर आला त्याला जे वाटलं ते शिकवलं! क्काय? आता तुमचंच बघा! तुमी शिकून श्येवटी हितंच आय घा ....... आपलं ............हितंच येता ना शिकवायला? क्काये! आमची ग्रामीन भाषा येगळीय! तुमच्यासंगं तसं न्हाई बोलता येत! देनगी म्हन्लात तं आमी अजून हजार दोन हजार द्येतो. तुमची तळमळ समजते वो! पन त्ये रक्तात असावं लागतंय! क्काय?">>>>>>>

असे बोलणारे खरोखरच असतात का? आणि असतिल तर त्यांना दिसत नाही का रोहित वेमुला सारखे शेकडो मुले अशाच ठिकाणी शिकुन पिएच डी पर्यन्त पोहंचतात आणि घाणेरड्या व्यवस्थेचे बळी ठरुन जिव गमावुन बसतात.

काल्पनिक कथा असेल तर ठिक आहे तरी मनात विचार उरतोच शिक्षणाचे महत्व नाही कळत तर तो देनगी तरी का देतोय

टीना, +१.

सकुराताई , असे खरेच चिक्कार असतात.
गावातल्या वतनदारांना/राजकारण्यांना गावातली जनता शिकली नाही तर उलट बरेच असते.
स्वस्तात राबवायला आणि लुबाडायला मनुष्यबळ मिळते.
आणि असं असतानाही उगाच चवली पावली खर्च करणं किंवा सरकारी अनुदानातून मिळवून देणं यामागचे हेतू वेगळे असतात.
त्यातील एक कथेत दाखविलाय तसा 'शाळेतल्या बाईंच्या पोटाकडे बघायची संधी मिळणे' हा ही असू शकतो दुर्दैवाने!

बेफिजी, एकदम मस्त कथा.

दिवसभरातल्या वेगवेगळ्या प्रहरात आपण किती तुकड्यांत विभागलेलो असतो ... त्यातले किती क्षण आपण फक्त आपल्यासाठी असतो. असही काहीसं जाणवुन गेलं.>>>>> +१

आई, मावश्या, बाई ( आईची आई ), माम्या, मामा सगळे शिक्षक शिक्षीका.. त्यांची घरच्या आणि दारच्या जबाबदारी मधली ओढाताण पाहुन आहे म्हणुन जरा जास्तच रिलेट झालं..
>>>>>>
+११११११११११११

आवडली

छान कथा. माझी मैत्रीण समाज सेवा म्हणून मुळशीच्या पुढे रोज जाते . शिकवायला. शाळा सुरू होण्या आधी मुलांचे विज्ञानाचे क्लासेस घेते. प्रयोग करून दाखवतात. घर संसाराच्या गुलामगिरीतून
बाहेर पडल्यावरच स्त्रीचा खरा प्रवास सुरू होतो. आत्मभान नसलेल्या अश्या किती तरी रोज घुसमटत असतात. मग येते चाळीशी.

ते डबल इंजीन वगैरे किती १९७० मधले आहे. पण अजून असतात अशी लोक्स. सॅड.

Pages