इंडियन पोएटिक्स, सम इनसाईटस सम क्वेश्चन्स - डॉ. सरोज देशपांडे

Submitted by अतुल ठाकुर on 31 January, 2016 - 07:36

Harshnath_Temple_sculptures_20.jpg

एशियाटीक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये २८ जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता पोहोचलो. डॉ. सरोज देशपांडे यांचे "इंडियन पोएटिक्स, सम इनसाईटस सम क्वेश्चन्स" या विषयावर व्याख्यान होते. जुन्याकाळात घेऊन जाणार्‍या त्या वास्तूत साधारण सहाच्या सुमारास महामहोपाध्याय काणे इन्स्टीट्युटच्या अध्यक्षा डॉ. परिणिता देशपांडे मॅडमनी वक्त्यांची ओळख करुन दिली आणि व्याख्यान सुरु झाले. विद्वात्ता म्हणजे काय, माणसाचे एखाद्या विषयावर प्रभुत्व असणे म्हणजे काय असते याचा प्रत्यय आला. अतिशय सहज, ओघवत्या भाषेत बाई काव्याशास्त्रातले श्लोक उधृत करत सुललित इंग्रजीत बोलत होत्या. त्याबरोबरच उत्तरराम चरीत, मेघदूतातली अवतरणे ही सहजपणे अवतरत होती. काव्यशास्त्र हा तसा तांत्रिक विषय. देशपांडे बाईंनी आपले म्हणणे मांडताना भरत, भामहा पासुन ते साहित्यदर्पणकार विश्वनाथापर्यंत सर्वांचा आढावा घेत अतिशय क्रांतिकारक विचार मांडले. डोक्यातुन अक्षरश: फायर ब्रश फिरल्यासारखे वाटले. या व्याख्यानात अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. सुरुवातीलाच मला त्यांचे जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भूमिका कुणालाही "डिफेन्ड" करण्याची नव्हती. पुर्वी जे काही काम झाले आहे ते सारे परिपूर्ण आहे. नवीन काही करण्याची आवश्यकता नाही. बदल करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही असा बहुधा आढळणारा अभिनिवेश त्यांच्या बोलण्यात नव्हता. आपले म्हणणे मांडताना आपला दृष्टीकोण हा "रिव्हावलिस्ट" नाही हे त्यांनी प्रथमच स्पष्टपणे सांगुन टाकले. त्यानंतर नाट्याव्यतिरिक्त इतर कलांचा विचार करताना भरताच्या रससूत्रांचा आढावा घेत नाट्यशास्त्रासाठीच लिहिल्या गेलेल्या रससूत्रांच्या मर्यांदावर बाईंनी बोलण्यास सुरुवात केली.

सर्वप्रथम त्यांनी भारतीय परंपरेतील प्राचिन टीकाग्रंथ आणि टीकाकार यांच्यावर टिप्पणी केली. मल्लिनाथाचे उदाहरण देत त्या म्हणाल्या कि आपल्या कलाकृतीत कविला काय म्हणायचे आहे याचा सुरेख उलगडा करुन काव्याचा पुरेपुर आस्वाद घडवुन देणार्‍या टीका संस्कृतात नाहीत असे नाही. मात्र त्यांचे प्रमाण फार कमी आहे. मेघदूतातील पहिल्याच श्लोकाचे मल्लिनाथाने केलेले रसग्रहण हे उत्कृष्ट टीकेचे उदाहरण आहे. कालिदासाने वापरलेला "कान्ता" हा शब्द नुसत्याच पत्नीचा नव्हे तर अतिशय प्रिय असलेल्या पत्नीचा निर्देश करतो. अशा तर्‍हेने काव्यातील रसाची अनुभुति घडवुन आणणार्‍या टीकांपेक्षा पांडित्याचे प्रदर्शन करणार्‍या टीका जास्त आहेत असे त्या म्हणाल्या. प्रत्येक श्लोकाचे व्याकरणाच्या दृष्टीने त्यात विवेचन केलेले आढळते. कुठला समास वापरला आहे, कुठला अलंकार वापरला आहे. व्याकरण दृष्ट्या शब्दांचे स्पष्टीकरण हे टीकांमध्ये जास्त आढळते असे मत त्यांनी व्यक्त केले. आधुनिक काळात नवीन साहित्यावर टीका लिहिताना प्राचिन अशा ध्वनि सिद्धान्तांचा वापर काही वेळा केलेला आढळतो. मात्र या टीकाही फार पुढे जात नाहीत. याचे महत्त्वाचे कारण त्यांच्यामते हे सिद्धान्त जुने आहेत आणि काळ बदललेला आहे. त्यामुळे आजच्या काळातील भाव, भावना, त्यांचे साहित्यात पडलेले प्रतिबिम्ब यांना सामावुन घेऊ शकेल असा आवाका प्रचिन काव्यशास्त्राच्या सिद्धान्तांचा असेलच असे सांगता येत नाही. त्या काळाशी सुसंगत असलेले, त्याकाळाला यथोचित असलेले सिद्धान्त नव्या साहित्याला लावल्यास त्याला मर्यादा या पडणारच असे प्रतिपादन करुन जुन्यासिद्धान्तांची आजच्या काळानुरुप काही भर घालुन नव्याने मांडणी केली पाहिले असा अतिशय परखड विचार त्यांनी मांडला.

बाईंनी आपले म्हणणे मांडताना बदलेल्या जगाची पार्श्वभूमि मांडली. प्राचिन काव्यशास्त्र जेव्हा उदयास आले त्यानंतर जगात अनेक बदल झाले. शहरीकरण झाले, औद्योगिकरण झाले, दोन महायुद्धे झाली. आणि या सर्वांचा अपरिहार्य असा परिणाम कलेच्या बाबतीत सुद्धा झाला. साहित्यात या बदललेल्या परिस्थितीचे पडसाद उमटले. या बदलांना सामावुन घेण्यासाठी सरोज देशपांडे यांनी भरताच्या रससूत्रांच्या दृष्टीने विवेचन करायला सुरुवात केली. रससूत्रे हि प्रामुख्याने नाट्यासाठी लिहिली गेली आहेत. त्यामुळे विभाव, अनुभाव, व्याभिचारी भाव या नाट्यामध्ये आढळणार्‍या घटकांच्या अनुषंगाने रसांचा उत्कृष्ट परिपोष रससूत्राच्या आधारे करता येतो. मात्र रससूत्रे ही एखाद्या पेंटिगचा आस्वाद घडवुन आणण्यास पुरेशी नाहीत. त्याच प्रमाणे संगीतासारख्या कलेसाठीदेखिल रससूत्रांच्या मर्यादा स्पष्ट होतात कारण विभाव अनुभाव हे त्यातुन आपल्याला नेहेमी जाणता येत नाहीत. विशेषतः इंस्ट्रुमेंटल म्युजिक बाबतीत हे जास्त जाणवते. हे झाले इतर कलेच्या बाबतीत. मात्र आधुनिक नाट्य किंवा साहित्याच्या बाबतीतही हे प्रश्न आता पडु शकतात. शक्यता अशी आहे कि रससूत्रांमध्ये प्राचिन काळापासुनच कालानुरुप भर पडत गेली असावी. उदाहरणार्थ भरताने फक्त आठच रसांचा उल्लेख केला. शांत रस आणि त्याचा स्थायीभाव जो निर्वेद यांचा अंतर्भाव नंतर झाला. त्याच प्रमाणे नंतरच्या काळात भक्ती, वात्सल्य, क्रान्ति असे नवनवीन रस उदयास आले. आजच्या काळाशी सुसंगत, ज्यात फ्रस्ट्रेशनची, एलियनेशची भावना दाखवता येईल असा रस रससूत्रामध्ये नाही. कदाचित त्याची निर्मिती करावी लागेल. बदललेल्या जगात नवी तत्वे आणि भावनांची नवी परिमाणे उदयास आली आहेत. माणसांची "सायकी" बदलली आहे. तदानुषंगाने त्यांना सामावुन घेणारे बदल रससूत्रांमध्ये करावे लागतील.

आपले विवेचन पुढे करताना बाईंनी बदललेल्या जगतात उदयाला आलेल्या स्त्रीवाद, मार्क्सवादासारख्या नवीन सिद्धांन्तांचा उल्लेख केला. आणि प्राचिन साहित्याचा त्या दृष्टीनेही विचार करता येईल असे मत मांडले. उदाहरणार्थ "शाकुंतल"चा आज विचार करताना फेमिनिझमचा विचार टाळता येणार नाही. नवीन रससूत्र कशा प्रकारे मांडता येईल याचा विचार सांगताना अशा प्रकारे त्यांनी देश आणि कालसापेक्ष आपली भूमिका स्पष्ट केली. कालसापेक्ष याचा अर्थ बदलत्या काळाला उचित अशा रसांची निर्मिती करणे आणि देशसापेक्ष याचा अर्थ सर्व कलाकृतींमध्ये विभाव, अनुभाव व व्याभिचारीभाव लक्षात येतील अशा तर्‍हेने त्या कलाकृतींसाठी विशेष अशा रससूत्रांची बांधणी करणे. सरोज देशपांडे यांनी या पार्श्वभूमिवर आता नवीन टीका ही कुठल्या सिद्धान्ताच्या आधारे लिहिता येईल याची मांडणी सुरु केली. आपले म्हणणे सविस्तर मांडताना त्यांनी सोशियोलॉजिकल, स्टायलिस्ट आणि रससूत्रांवर आधारित सिद्धान्त अशा तीन प्रकारांचा उल्लेख केला. यापैकी समाजशास्त्र आणि स्टायलिस्ट संकल्पनेचा थोडक्यात उल्लेख करुन रससूत्रावर आधारित नवीन सिद्धान्ताबद्दल त्या विस्तृतपणे बोलल्या. त्याकडे जाण्याआधी समाजशास्त्रिय संकल्पनेचे त्यांनी मार्मिक वर्णन केले. कलाकाराला त्याच्या "टाईम फ्रेम" मध्ये ठेऊन त्याचे आकलन केले पाहिजे असा सामाजिक दृष्टीकोण त्यांनी मांडला. त्याचे उदाहरण देताना त्यांनी भवभूतीचा उल्लेख केला. भवभूतीच्या काळात पुरुषसत्ताक समाजजीवन, सामाजिक विषमता या गोष्टी सर्वमान्य होत्या. त्यांना आव्हान दिले जात नसे. तरीदेखिल भवभूतीला ते पटले नव्हते. त्यामुळे त्याने काव्यगत न्याय सीतेला दिला. तरीही आजच्या काळातील त्यांच्या आधुनिक विद्यार्थ्यांना भवभूतीची भुमिका पटत नाही असे सांगुन बाई म्हणाल्या कि भवभूतीकडुन आजच्या काळातल्या स्त्रीवादी भूमिकेची अपेक्षा करता येणार नाही. तरीही तो त्याच्या काळाच्या पुढे होता हे मान्य करुन त्या परिप्रेक्ष्यामध्येच त्याला पाहावे लागेल.

स्टायलिस्ट संकल्पनेचा उल्लेख करताना त्यांनी रोनाल्ड बार्थ याच्या सुप्रसिद्ध "द डेथ ऑफ द ऑथर" या सिद्धान्ताचा मागोवा घेऊन आपले म्हणणे मांडले. या नुसार कलेचे परीक्षण करताना कलाकाराच्या दृष्टीकोनातुन मांडणी करण्याची परंपरा आहे. मात्र याला बार्थचा विरोध आहे. कलेला कलाकाराच्या चष्म्यातुन मुक्त करावं असे तो सांगतो. त्याच्या म्हणण्यानुसार कलेचे असंख्य "इंटर्प्रिटेशन्स" शक्य आहेत जे रसिकावर अवलंबुन असतात आणि तेच महत्त्वाचे आहेत. कलाकाराचा दृष्टीकोण आणि त्याची राजकिय, सामाजिक, धार्मिक मते यातुन त्याच्या कलेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला संकुचित असे एकसूरीपण प्राप्त होते. ती टीका बहुआयामी राहात नाही. हे मत मान्य करुन आजच्या काळात कलाकृतींवर दुसरी टीका ही या दृष्टीकोणातुन करता येईल असे प्रतिपादन त्यांनी केले. तिसरे रससूत्रांवरील आधारित नवीन सिद्धान्ताच्या बांधणीबाबत सविस्तरपणे बोलताना रसामुळेच कला ही रसिकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे रससिद्धान्तावर आधारित, आजच्या काळाला अनुरुप असा नवा सिद्धान्त निर्माण करण्याची आवश्यकता सांगुन सरोज देशपांडे यांनी आपला कल स्पष्ट केला. हा सिद्धन्त मांडताना भरताने दाखवलेल्या दिशेची आवश्यकता त्यांनी नाकारली नाही. त्याचे सांगीतलेले फ्रेमवर्क तसेच ठेऊन हा सिद्धान्त निर्माण करता येईल असे त्यांचे म्हणणे होते. याचाच अर्थ बदलत्या काळात एलियनेशन, एक्सप्लॉयटेशन हे भाव विभाव म्हणुन वापरता येतील असे त्या म्हणाल्या. रससूत्रामध्ये शृंगार आणि वीर रसासारख्या रसांना प्राथमिक स्थान दिले आहे. कदाचित आजच्या बदलत्या काळात हे स्थान रौद्र किंवा भयानक रसाला मिळु शकेल. भरताच्या ३३ संचारी भावांमध्ये मानसशास्त्रीय सिद्धान्तांचे प्रवाह दिसत असुन हे संचारी भाव आजच्या काळात कलाकृतींचे आकलन करताना महत्त्वाची भूमिका बजावु शकतात असेही त्या म्हणाल्या. प्रेमभावनेतुन उद्भवलेला क्रोध आणि क्रोधामुळेच उत्पन्न झालेला क्रोध यांच्या "टेक्स्चर" मध्ये फरक असतो आणि हे अनुभवातुन शिकावे लागते. शास्त्र सर्व काही शिकवु शकत नाही असे भरताचे मत त्यांनी उधृत केले.

पुढे रसाबद्दल आणखि बोलताना त्या म्हणाल्या कि भरताच्या रससूत्रात कलेमधील रसनिर्मिती बद्दल भरताने विवेचन केले आहे. सर्वसाधारणपणे रस किंवा इतर काव्यशास्त्रीय सिद्धान्त हे आस्वादाचा विषय आला कि सहृदय रसिकाला मध्यवर्ती ठेवतात. रस हा कलेत पाहण्यापेक्षा रसिकामध्येच पाहण्याची परंपरा आहे. मात्र कलेतला रस भरताने मांडल्यामुळे रससूत्र हे कलाकारांसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरले आहे. त्यामुळे रससिद्धान्ताचा वापर हा ऑब्जेक्टीव म्हणजे कलेच्या व्यापारात आणि सब्जेक्टीव म्हणजे सहृदयाच्या बाबतीत देखिल परिणामकारकरित्या करता येतो. अशा रससिद्धान्तात नवनवीन भावनाचा समावेश केल्यास काव्यातील प्रत्येक भावछटेच्या खोलात जाता येईल. शाकुंतलच्या पाचव्या अंकात दुष्यंत शकुंतलेला विस्मरणामुळे नाकारतो. त्यावेळी तेथे हजर असलेले सर्वजण, अगदी शकुंतलेसकट आपला राग व्यक्त करतात. मात्र प्रत्येकाच्या रागाचा प्रकार वेगळा आहे. हे सारे रससूत्राप्रमाणे "अमर्ष" या संचारी भावात येते. मात्र नवीन रससूत्रांमध्ये याबाबत जास्त सूक्ष्म आणि तांत्रिक माहिती उपलब्ध असल्यास या भावनेच्या प्रत्येक प्रकाराची, पातळीची आणि तिच्या पोताची ओळख होऊन आणखि खोल जाता येईल. शब्द आणि अलंकाराच्या बाबतीत बाईंनी अत्यंत मार्मिक विवेचन केलं. कालिदास आणि भवभूतीची तुलना करताना त्यांनी या दोघांनी वापरलेल्या शद्बांकडे लक्ष देण्यास सांगीतले. दोघांनी आपल्या काव्यात प्रेमभावना प्रकट केली. मात्र भवभूतीचे शब्द बंधुता, सौहार्द असे आहेत तर कालिदास हा तनु, वपु अशासारखे शब्द वापरतो. भवभूतीच्या तुलनेत कालिदासाचे प्रेम हे जास्त ऐहिक पातळीवरचे असावे असे वाटते. अशाच तर्‍हेने उपमा, उत्प्रेक्षा, श्लेष अशारखे अलंकार जरी काव्याचे बाह्य स्वरुप अलंकृत करीत असले तरी त्यामुळे कविचा "वर्ल्ड व्यु" काय आहे हे कळण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.

व्याख्यानाच्या समारोपाकडे येताना बाईंनी भारतीय समाज, त्याची मनोवृत्ती आणि त्याअनुषंगाने काव्यशास्त्रातील काही परंपरा यावर आपले मत मांडले. काव्यशास्त्रात व्याख्या दिल्या आहेत मात्र त्याचे स्पष्टीकरण नाही. याउलट पाश्चात्य काव्यशास्त्रात व्याख्यांचे सविस्तर विवेचन आहे. साहित्यदर्पणात "वाक्यं रसात्मकं काव्यम्" असे विश्वनाथ म्हणतो तेव्हा वाक्य याचा अर्थ विश्वनाथ कसा घेतो हे पाहावे लागते. सत्त्व आणि रज गुणाच्या दृष्टीने त्यांनी अनुक्रमे धीरप्रशान्त आणि धीर उदात्त हे सत्त्वगुणाचे आणि धीर ललित व धीर उद्धत हे रज गुणाचे नायक अशी मांडणी आधी केली होती. मात्र नायक हा धीर उदात्तच का हवा? धीर उद्धत का हवा? त्याच्या इतर क्वालिटीज कुठल्या हे आपल्या प्रचिन काव्यतज्ञांनी कुठेही सांगीतलेले नाही. या माणसांना त्यांच्या काही व्यथा असणारच. मात्र त्याचा उच्चार कुठेही झालेला नाही. धीर प्रशांत आणि धीर उदात्त भारतिय नायक आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करताना दिसत नाहीत. ते सत्त्वगुणी आहेत. हा पाश्चात्य आणि पौर्वात्य संस्कृतीतला फरक आहे काय? एकट्या माणसाच्या व्यथा, दु:खे ही भारतीय कविंना महत्त्वाची वाटत नाहीत काय? त्याऐवजी आपण आपली सारी दु:खे ही समाजाच्या परिप्रेक्ष्यातुनच का मांडतो? अशासारखे प्रश्न उपस्थित करुन डॉ. सरोज देशपांडे यांनी आपले झंझावाती व्याख्यान संपवले. अनेकानेक नवीन विचार त्यांनी दिले. जुन्या परंपरा आणि समजुतींना हादरा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्याख्यानात होतेच. मुशीतुन सोने तापवताना त्यातले हीण ज्याप्रमाणे बाहेर काढले जाते त्याप्रमाणे शूचिर्भूत करणारी त्यांची शैली आणि विचार होते. त्यांच्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. शेवटी प्रो.डॉ. जोशींनी आपले मनोगत सांगुन कार्यक्रमाचा समारोप केला. या व्याख्यानाचा विचार करताना डॉ.सरोज देशपांडे यांनी मला खुप श्रीमंत केल्याची भावना होते आहे.

डॉ. सरोज देशपांडेंच्या एकंदरीत विवेचनावरुन त्यांना काव्यशास्त्रातील इतर सिद्धान्तांच्या तुलनेत रससिद्धान्तामध्ये काव्य परिशीलनाच्या शक्यता बर्‍याच जास्त आहेत असे वाटत असावे माझे मत आहे. कारण त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या ओघात रसा खालोखाल वक्रोक्तिला महत्त्व दिले. अलंकाराला देखिल त्यांच्या प्रतिपादनात स्थान मिळाले. मात्र आनंदवर्धनाने जगन्मान्य केलेल्या ध्वनिसिद्धान्ताला त्यांच्या विवेचनामध्ये फारसे स्थान नव्हते. काव्याला अभिधेच्या आणि लक्षणेच्या मर्यादेतुन बाहेर काढुन व्यंजनेच्या अमर्याद क्षेत्रात प्रस्थापित करणार्‍या आणि त्यामुळे आस्वादाला अमर्याद करणार्‍या ध्वनिचा उल्लेख बाईंनी क्वचितच केला. त्यांचे ध्वनिसिद्धान्तावर काही आक्षेप असावेत आणि असल्यास ते वाचावे लागतील असे वाटले. रस सिद्धान्ताची विभाव, अनुभाव, व्याभिचारी भाव ही मांडणी त्यांना शास्त्रीय आणि सर्वसमावेशक वाटली असावी. कारण त्यांच्यानंतर समारोप करणार्‍या प्रो. डॉ. जोशी यांनी ध्वनिसिद्धान्त आज देखिल कालानुरुप आहे हे आग्रहाने सांगीतले. त्यामुळे मला पडलेला प्रश्न आणखिनच अधोरेखित झाला. कलेच्या आस्वादाला कलाकृतीच्या मर्यादेतुन बाहेर काढणारा ध्वनि हा मला सर्वसमावेशक सिद्धान्त वाटतो. आनंदवर्धनानंतर या सिद्धान्ताला कुणी आव्हान दिले नाही. जे काही आवाज या सिद्धान्ताविरोधी उमटले त्यांचे निराकरण अभिनवगुप्ताने आपल्या लोचन टीकेत केले. त्यानंतर मम्मट आणि पुढे साहित्यदर्पणकार विश्वनाथाने हे मत प्रस्थापितच करुन टाकले. सरोज देशपांडेंना तरीही रससिद्धान्त हाच आधुनिक काळासाठी निवडावासा वाटणे ही गोष्ट मला अतिशय महत्त्वाची वाटते. संचारी भावांमध्ये भरताने कालानुरुप नवनवीन भावनांचा समावेश करण्याची ठेवलेली सोय. रसांमध्ये आणि त्याच्या स्थायीभावांमध्ये सुद्धा नवनवीन गोष्टी समाविष्ट करण्याची शक्यता, रस संकल्पनेचे कला आणि रसिक किंवा ऑब्जेक्टीव आणि सब्जेक्टीव अशा दोन्ही अर्थाने रसाचा परिपोष करण्याचे सामर्थ्य या गोष्टी बाईंना अतिशय महत्त्वाच्या वाटल्या असाव्यात. आनंदवर्धनाच्या ध्वनिसिद्धान्ताचा या दृष्टीने अभ्यास करायला हवा असे आता मला वाटु लागले आहे.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा: उत्तम. भाषण तर उत्तम झाल्याचे दिसतेच आहे पण त्याचे अचूक शब्दांकनही आव्हानात्मक होते आणि ते तुम्ही उत्तम पेलले आहे.

खुपच सुंदर भाषण आणि त्याचा रसास्वाद. आजही या विषयांचा अभ्यास होतोय हे बघुन थोडेसे आश्चर्य वाटले.

मुळ भाषण युट्युबवर मिळेल काय?

साधनाताई, पादुकानन्द,

धन्यवाद.

युट्युबवर अजुनतरी नाही. काणे इन्स्टिट्युटने त्याचं विडियोशुटींग केलंय मात्र.

अभ्यासनीय लेख! धन्यवाद.

>>>डॉ. सरोज देशपांडेंच्या एकंदरीत विवेचनावरुन त्यांना काव्यशास्त्रातील इतर सिद्धान्तांच्या तुलनेत रससिद्धान्तामध्ये काव्य परिशीलनाच्या शक्यता बर्‍याच जास्त आहेत असे वाटत असावे माझे मत आहे. कारण त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या ओघात रसा खालोखाल वक्रोक्तिला महत्त्व दिले. अलंकाराला देखिल त्यांच्या प्रतिपादनात स्थान मिळाले. मात्र आनंदवर्धनाने जगन्मान्य केलेल्या ध्वनिसिद्धान्ताला त्यांच्या विवेचनामध्ये फारसे स्थान नव्हते<<<

ध्वनिसिद्धांत हा रससिद्धांत आणि वक्रोक्ती ह्यांच्या तुलनेत भिन्न प्रकृतीचा असणार ना? (म्हणजे माझी शंका अशी आहे की रससिद्धांताला व वक्रोक्तीला विवेचनात स्थान मिळाले ह्याचा अर्थ ध्वनिसिद्धांत काहीसा अमान्य केला गेला असे म्हणताच येणार नाही ना? निरसन व्हावे.)

बेफिकिरजी, प्रतिसादाबद्दल आभार.

रस, अलंकार. वक्रोक्ति आणि ध्वनि हे वेगवेगळे असले तरी हे सर्व सिद्धान्त "काव्याचा आत्मा काय?" याच प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. सरोज देशपांडे यांना ध्वनि सिद्धान्ताचे "ध्वनि हा काव्याचा आत्मा आहे" हे प्रतिपादन मान्य नसावे असे वाटते. इतकेच मला म्हणायचे होते.