स्क्रीनसेव्हर

Submitted by घायल on 26 January, 2016 - 18:26

आरशात पाहताना
दिसते अनोळखी छबी
सताड उचकटलेली एक
काळाची डबी

पुष्कर आठवांच्या
झाडाने वाकावं
काळ्या आईच्या कुशीत
फांद्याफांद्यांनी टेकावं

सुसाट शहरांचा वेग
अंगावर वागवताना
कार्बनमधे करपलेल्या
चेह-याला बदलावं

गिअरच्या सायकली
आणि डोंगराची चढण
मेण्टेन राहतो उगाचच
तुझ्या भेटीच्या भीतीनं

धूराच्या वलयातून वेडावते
एक नाचरी बाहुली
बंद डोळ्यांपुढे पसरते
निळसर किरमिजी सावली

मंदअंधा-या क्षितिजापर्यंत
एकशे एक रात्रीतील स्वप्नाळू शहरं
उडत्या चटया, जादूचे ढग
सोनेरी घुमटांचे महाल
त्यातली लखलखती दालनं
चमचमते दागिने
तुझ्या गळ्यात हि-यांचा हार
आणि
मी केसात माळलेला शुभ्र गजरा
मोगरा नाही गं हा
स्वर्गीय फुलांचा नजारा
जोडीने पाहिलेला
तुझ्या माझ्या कवितेतला

सावरून बसताना माऊस हलतो
आणि स्क्रीनसेव्हर गायबावे तसा
आसमंत स्वच्छ होऊन जातो
रीडींग ग्लासेस आहेत डोळ्यांवर
आता बट येत नाही चुकून कपाळावर
केस मागे गेलेत, बरंका
तुझे गाणे अजून ओलेते
देतं माझ्या दारावर धडका
चष्म्यावरची धूळ पुसतां पुसता
भिंतीवरचं घड्याळ
कोरडे टोल देत राहते
निर्दयीपणे या क्षणाला
कसा उत्तर देऊ तुझ्या
न-कवितेला ?

- कवीकापोचे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! मला शेवटची दोन कडवी कविता म्हणून पुरेशी वाटली. कदाचित आधीची कडवी कळली नसावी वा त्यांच्या पुर्ण कवितेशी असलेला संबंध लक्षात आला नसावा. पण ३रे ४थे छानच.

रीडींग ग्लासेस आहेत डोळ्यांवर
आता बट येत नाही चुकून कपाळावर>>!!!!