आणि मी चोरांना पळवून लावले …(सत्य घटनेवर आधारीत) .

Submitted by कविता क्षीरसागर on 24 January, 2016 - 06:53

आणि मी चोरांना पळवून लावले ….

पहाटे ४ वाजता कसल्याशा आवाजाने जाग आली .खडखड , खटखट असा आवाज होत होता . आमच्या सोसायटीच्या पाण्याच्या मीटरचा, पावसाळ्यात नेहमी असा आवाज होतो . कोणीतरी येउन मग बटण बंद करते, तसे आताही कोणीतरी येईल असे वाटले . कारण त्या मीटरपर्यंत माझा हात पोचत नव्हता आणि नक्की कोणते बटण बंद करायचे ते ही मला माहित नव्हते त्यामुळे मी तिकडे फार लक्ष दिले नाही . पण नंतर आमच्या दाराची कडीही वाजल्यासारखी वाटली . मी तशी झोपेतच होते . एकदा तर वाटले भूकंप झाला की काय ? पण आमचा बेड तर हालत नव्हता , मग हा काय प्रकार आहे ? हा कसला आवाज होतोय ते पाहायला म्हणून मी पहाटे ४.१५ च्या सुमारास दार उघडून पाहते तो काय …… !!

आमच्या दारासमोर तीन अनोळखी माणसे … मुंडासे बांधलेली, डोळे तांबारले … साधारण २५ ते ३० वयोगटातले. प्रथम मला जाणवला तो दारूचा उग्र भपकारा … एकदम तिडीक आणणारा . नंतर जाणवले, त्यापैकी एक शेजारच्या काकूंच्या दाराशी काहीतरी करतोय . मला क्षणभर वाटले त्यांच्याकडे कोणी त्यांचे नातेवाईक आले असतील . पण त्या तर गावाला गेल्यात. मग त्या ह्या लोकांना किल्ली देऊन गेल्यात की काय ? आणि यांना दार उघडायला जमत नाहीये . म्हणून मी त्यांना कोण आहे ? काय पाहिजे ? असे विचारले . तसे ते घाबरले . हाताने गप्प राहा , मारू का ? अशा खुणा करू लागले .

तशी मी झोपेतून खाड्कन जागी झाले . काय चाललेय ते माझ्या लक्षात आले . त्यांच्यातील एक जण काकुंचे दार खाली बसून लोखंडी हत्याराने तोडू पाहतोय . ते पाहताच मी खवळले . त्यांच्यावर जोराने ओरडले " ए , काय चाललेय ? कोण आहात तुम्ही ? चला निघा इथून ? " मी जोर जोरात ओरडत होते . त्या आवाजाने माझी मुलगीही जागी झाली . तिने पण डोकावले . तो पर्यंत घाबरून ते तिघे आमच्या दाराला जोरात रागाने लाथा मारून, हताशपणे पळून गेले . त्यांना पळताना आम्ही दोघींनी पहिले. मग मी ही आमचे लोखंडी सेफ्टी दार उघडू लागले तेव्हा कळले की त्या लोकांनी आमचे दार बाहेरून बंद केलेय . मग तर मी खूपच जोराने ओरडू लागले . चोर , चोर …

थोड्या वेळाने वरच्या मजल्यावर राहणारे एक कपल खाली आले . त्यांना मी हे सर्व सांगितले . त्यांनी आमच्या दाराची कडी काढली आणि त्यांनी आमच्या वरती राहणा-या वकिलांना बोलावून आणले . मग आम्ही सर्व हकीकत परत त्यांना सांगितली . त्यांनी पोलिसांना फोन केला आणि कोणत्याही वस्तूला हात लावू नका, कुलुपावर त्यांचे ठसे असतील असे सांगितले . १५ ते २० मिनिटात पोलिस आले . त्यांनी स्थळाची तपासणी केली. दाराला लावलेली दोनही कुलुपे तोडलेली . बाहेरच्या लोखंडी दाराचे कुलूप होते तसेच होते पण त्यांनी त्यांच्या कडे असलेल्या gas कटरने कडी कोयंडाच कापला होता . आतील कुलूप तोडून एक त्यांच्याकडचे पितळी कुलूप लाकडी दाराच्या सापटीत अडकवून ठेवले होते व ते आता पहारीने त्यांचे लाकडी दारही तोडणार इतक्यात मी दार उघडले आणि त्यांना पळवून लावले होते त्यामुळे त्यांना चोरी काही करताच आली नव्हती .

पोलिसांनी माझ्याकडे चौकशी केली . त्यांचे वर्णन करायला सांगितले , माझा नंबर लिहून घेतला . तोपर्यंत मुलीने शेजारच्या काकुंना जळगावला फोन लावला . त्यांचे वडील आजारी होते म्हणून त्या तिकडे आपल्या माहेरी गेल्या होत्या . मी त्यांना झालेली सर्व घटना सांगितली . " तुम्ही घाबरू नका , चोरी झालेली नाही पण घरफोडीचा प्रयत्न झाला आहे आणि तुमचे बाहेरचे दार फोडलेय त्यामुळे ते बंदच करता येत नाहीये . जमेल तेवढ्या लवकर येथे आलात तर बरे होईल " असे सांगितले . त्या पण लगेच निघते म्हणाल्या .

पोलिस सर्व चौकशी करून , सूचना देऊन थोड्या वेळाने निघून गेले . जाताना एक पोलिस मला म्हणाला " ९९% घर फोडलेच होते त्यांनी . तुम्ही अगदी वेळेवर त्यांना अडवले, नाहीतर ते घरात घुसलेच असते. आता यापुढे काळजी घ्या . जीन्यालाच खाली लोखंडी दार बसवून घ्या . अनोळखी व्यक्तींना एकदम घरात घेत जाऊ नका . तसे आमचे आता लक्ष असेलच " असा दिलासा देऊन तो निघून गेला . नंतर सोसायटीमध्ये सर्वानाच कळले तसे चर्चांना उधाण आले . आठ वाजेपर्यंत हाच विषय चालू होता .

पेपर मध्ये इतके दिवस चोरी , घरफोडी वगैरे गोष्टी आपण वाचत आलोय . पण तीच गोष्ट आता शब्दशः दारापर्यंत येउन पोचल्याचे पाहून मनात धडकी भरली. मुलगी दुपारी घरी एकटीच असते त्यामुळे जास्तच काळजी वाटू लागली . नंतर मला वरच्या वहिनी म्हणाल्या " तू फारच धाडसी आहेस बाई. मी असते तर चोर पाहून बेशुद्धच पडले असते … ओरडणे तर दूरच . आणि अगं त्यांच्याकडे चाकू , gas कटर होते … त्यांनी तुला काही केले असते तर ते केवढ्यात पडले असते … बाप रे "

पण मला खरेच अजिबात भीती वाटली नव्हती . त्याक्षणी शेजारच्या काकुंचे घर वाचवणे , आलेल्या संकटाला तोंड देणे एवढेच डोक्यात होते . नशीब बलवत्तर म्हणून त्या चोरांनी आम्हाला काही न करता तिथून पळ काढला , नाहीतर … या गोष्टीची जाणीव मला आता व्हायला लागली .

संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर कळले की आमच्या समोरच्या दोन बिल्डींगमध्ये पण घरफोडी झाली होती . त्यांच्याकडचे सोने, पैसे सारे काही त्या चोरांनी पळवले होते . त्यादिवशी म्हणे आमच्या एरियात ५ ठिकाणी चो-या झाल्या होत्या आणि एकूण ८ ते १० जण चोरी करायला आले होते . मी सकाळी जेव्हा चोर, चोर ओरडत होते तेव्हा आमच्या खालची एक दहावीतली मुलगी अभ्यासासाठी उठली होती . तिने बाल्कनीतून ७ ,८ जणांना पळताना पहिले होते .

खरेच हे सर्व ऐकून मी देवाचे शतशः आभार मानले . आमचा जीव आणि काकुंचे घर वाचवल्याबद्दल …

रात्री काकुंनी घरी आल्या आल्या,रडत रडत मला कृतज्ञतेने मिठीत घेतले .त्यांच्या त्या न बोलता आभार व्यक्त करण्यानेच मी अगदी भरून पावले ….

कविता क्षीरसागर
(सत्य घटनेवर आधारीत- जून २०१३ )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे.. गॅस कटर वगैरे.. प्रोफेशनल घरफोड्यांचा डाव उधळलात .. अनुभवही चांगला मिळवलात.

सॉल्लिड.

एवढं धाडस नाही बरं आपल्यात. मी गपचूप आत येऊन १०० वर फोन केला असता.

मध्यंतरी आमच्याही सोसायटीत अशीच चोरी झाली होती. घर बंद होते. गॅस कटरने कडी कापून दार उघडले. घरात काय चांदीची भांदी होती लहान लहान आणि सोन्या चांदिचे दागिने ते गेले. आजूबाजूच्यांना वॉचमनला समजलेच नाही. मग सी सी टीव्ही मध्ये कळले की त्या चोरांकडे तलवारीही होत्या.

असं काही त्या लोकांकडे असतं तर आणि त्यांनी तुमच्या वरच हल्ला केला असता तर? पण इथे तुमच्या सेफ्टी डोअरने वाचवलं तुम्हाला.

पण खरच तुमचं खूप कौतुक.

प्रत्येकाने सजग राहिलं पाहिजे, आपल्या बिल्डिंगच्या आसपास कोणी संशयास्पद रितीने फिरताना दिसले तर हटकले पाहिजे.

अभिनंदन.. धाडस केलेत हे खरे पण त्यात धोकाही होता. कारण तूमच्यावरही हल्ला झाला असता. फोन करून पोलिसांना, शेजार्‍यांना बोलावता अले असते.

सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार ...

खरे आहे ... खूप मोठा धोका होता ... पण त्या क्षणी जाणवला नाही एवढे खरे .... आता वाटते कसे काय आपण हे करु शकलो ...

छान धाडस केलेत. जरा जपुन.
मला स्वतःला वाटतं की घरातील स्रीने एक पेपरस्प्रे हाताशी येईल असा ठेवावा अश्या अडचणीला अतिशय कामात येवु शकतो. निदान तिखटाचे पाणी तरी.

माफ करा , हा लेख वाचताना मला दोन तीन ठिकाणी जाम हसू आलं.

हाच सेम लेख जर मुपी ला गेला असता (including Tital हा Happy ) तर काय जाम चिरफाड होईल Lol

अवांतर : आत्मप्रौंढी हा शब्द कुठेतरी वाचल्याचे आठवले आणि पुन्हा एकदा Lol

(दिवा घ्या)

न घाबरता चांगलंच मोठं धाडस केलत! अभिनंदन!

आपल्या घरांची खरी सिक्यूरिटी म्हणजे आपले शेजारीच असतात.

बायकांनी Pepper Spray जवळ ठेवावा. अतिशय परिणामकारक. मिरचीची पूड, तिखटाचं पाणी वगैरे शब्द वाचायलाच बरे असतात. प्रसंग आल्यावर कोणाहीलाही ते इफेक्टिव्हली वापरता येत नाहीत. पेप्पर स्प्रे एकदम सोपा!

चोरांनी डुख धरून ठेवला नाही हे बरे झाले अश्या वेळेस ही लोक पलटवार करतात. या काहीदिवसांमधे तर नक्की. आता ही घटना २०१३ची आहे त्यामुळे असे काही झाले नाही हे फार चांगले पुढच्या वेळेस सरळ पोलिसांना फोन लावून बोलवून घ्या. म्हणजे मुद्देमालासह चोरांना अटक ही होईल आणि आपली ओळख ही लपून राहिल

आलेल्या प्रसंगाला धाडसाने तोंड दिलेत आणि शेजार्‍यांचे घर वाचवलेत हे जरी अभिनंदनीय असले तरी इतर सर्वांनी म्हटल्याप्रमाणे त्यात तुमच्या जीवाला धोका होऊ शकला असता.

निनाद १ यांच्या प्रतिसादाला पुर्ण अनुमोदन.