युरुगुचे पुस्तक : भाग १३ (अंतिम)

Submitted by पायस on 17 January, 2016 - 00:30

सगळ्यांच्या डोक्याचा भुगा करणार्‍या युरुगुच्या पुस्तकाचा हा अंतिम भाग! ही कादंबरी इथे प्रकाशित करू दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आभार. वेळोवेळी प्रतिसादांतून हुरुप वाढवणार्‍या माबोकरांचे विशेष आभार.
साधारण वर्षाभरापूर्वी मरिम्बा अनि या लेखिकेचे युरोपियन संस्कृतीवर टीकात्मक विवेचन असलेले एक पुस्तक वाचनात आले, त्याचे नाव युरुगु! या नावाने माझी उत्सुकता चाळवली आणि मी युरुगुची आख्यायिका गुगलून वाचली. का कोणास ठाऊक मला तेव्हा असे वाटले कि या आख्यायिकेभोवती एक कथा गुंफली जाऊ शकेल आणि मी लिहायला सुरुवात केली. त्याचीच परिणीती म्हणजे युरुगुचे पुस्तक! आशा आहे कि कथेचा शेवटही तुम्हाला आवडेल. जर अजाणतेपणी काही चुका राहून गेल्या असतील तर मी दिलगीर आहे.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/57041

"सॉरी माझी ओळख नाहीच करून दिली मी. मी रुट, वन्स अगेन नाईस टू मीट यू प्रज्ञा!"
असे म्हणतात कि माणसाची फेस मेमरी चांगली असो वा नसो, एक चेहरा असा असतो जो कि त्यांच्या लक्षात तरी राहत नाही किंवा तो जर अचानक समोर आला तर पटकन ओळखला जात नाही आणि एकदा ओळख पटली कि ४४० व्होल्टचा झटका बसतो. एक असा चेहरा जो आपण लहानपणापासून पाहत आलेला असतो, दररोज उठल्या उठल्या मुखमार्जन करताना आपण तो पाहतो, अनेकजण त्या चेहर्‍याच्या प्रेमात असतात पण तरीही प्रत्येकाच्या बाबतीत वर म्हटल्याप्रमाणे घडतेच! अर्थात हा चेहरा म्हणजे स्वतःचा चेहरा जो रोज तुम्ही आरशात पाहता पण तोच चेहरा अवचित समोर आला कि.........
प्रज्ञाने स्वतःला आरशात अनेकदा बघितले होते. मैत्रिणींच्या नादाने पाऊट काढत फोटोही काढले होते पण आयुष्यात ती प्रथमच स्वत:ला अशी प्रत्यक्षात समोरासमोर पाहत होती.
"नाही, नाही नाही नाही" ती हसण्याचा प्रयत्न करत स्वतःलाच म्हणाली "हे सगळं स्वप्न असणार आणि मी आता उठणार. कॉफीचा चटका देईल आई आणि मग मला जाग येईल. हो, हो हे असंच घडेल."
रूटचे ते मंद स्मित तसेच राहिले. तिने प्रज्ञाकडे कॉफीचा मग पुढे केला आणि हलकेच त्याचा स्पर्श प्रज्ञाच्या हाताला केला, इतपतच कि प्रज्ञाला तो कप गरम आहे याची जाणीव होईल पण भाजेल इतका चटका बसणार नाही. कॉफी अर्थातच वाफाळती होती. प्रज्ञाने तो चटका बसायची वाट पाहत डोळे मिटून घेतले होते. येस्स, आली आई असे म्हणत तिने डोळे उघडले आणि,
"नाही ना बाळा, हे स्वप्न असतं तर किती बरं झालं असतं! पण नाहीये तसं. असो कॉफी घे म्हणजे तुला जरा हुशारी येईल आणि शांतपणे मी जे काही बोलणार आहे त्यावर विचार करता येईल.
~*~*~*~*~*~

थोड्या वेळापूर्वी (आता काळ या संकल्पनेला काही अर्थ उरला नाही आहे खरेतर)

जॉनी आणि प्रज्ञा त्या दारासमोर उभे होते. त्या दोघांना एकमेकांकडे बघितल्यावर कल्पना आली होती कि वारस म्हणून सिद्ध करण्याची आणि या अचाट शक्तिची मालकी मिळवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे तर समोरची व्यक्ति ही प्रतिस्पर्धी आहे. ते दारही दार म्हणायचे म्हणून दार! कारण त्याला ना बिजागर्‍या ना भिंत ना ते जमिनीशी जोडलेले. तसं बघायला गेले तर त्यांच्या पायाखाली जमिन होतीच कुठे! स्कायडेकमध्ये उभं राहिलो तरी पायांना किमान ती काच जाणवते, इथे ते हवेत तरंगत होते. तो दरवाजा अदमासे ७ फूट उंच ५ फूट रुंद आणि पायांच्या लेव्हल पासून अर्धा फूट वर असावा. त्याच्यावर अनेकविध रेघांनी कसल्या कसल्या आकृत्या काढलेल्या होत्या. सर्व रेघांच्या शेवटी छोटी वर्तुळे होती व त्या करड्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर त्यांचा सोनेरी रंग खुलून दिसत होता. मधूनच एक तेजोगोल त्या रेषांना ट्रेस करत कुठे गायब होई कळत नव्हते. अचानक ते दार दुभंगल्यासारखे झाले. मोझेसने समुद्र दुभंगल्याचा सीन प्रज्ञाने प्रिन्स ऑफ इजिप्तमध्ये पाहिला होता;
तिला अगदी त्या सीनची आठवण झाली. त्या दारातून एक किशोरवयीन मुलगी बाहेर आली. तिने अंगाला घट्ट असा स्लीव्हलेस काळा टॉप घातला होता तर खाली काहीशी ऑफव्हाईट लेगिम घातली होती. त्या टॉपवर एकच कुठलेतरी अक्षर काढलेले होते पण ती लिपि प्रज्ञाला ओळखीची वाटली नाही. तिच्या डोक्यावर कसलेसे शिरस्त्राण होते त्यातून तिच्या चंदेरी केसांची काही झुलपे बाहेर डोकावत होती. तिचे डोळे चेहर्‍याच्या मानाने अ‍ॅबनॉर्मली मोठे होते व त्या चेहर्‍यावर एक मंदसे स्मित खेळत होते.
"तर सुरुवात करायची?" हा तोच आवाज होता जो त्यांनी त्या चक्रीवादळात ऐकला होता.
"पण तू कोण आहेस?" जॉनीने विचारले.
"मी? मला तुम्ही इंटरफेस म्हणू शकता. असो ते फारसे महत्त्वाचे नाहीये. रूट फार वेळ वाट बघणार नाही. तुमच्यापैकी एकाला ऑफिशियली सुपर युजर बनवून मला त्याला (प्रज्ञाकडे बघत) किंवा तिला आत सोडायचे आहे. मग तयार?"
फार प्रश्न विचारायला संधी नव्हतीच. जॉनीतर पार्श्वभूमि नसल्याने पुरता गोंधळला होता.
"काय करणं अपेक्षित आहे आम्ही?"
"अगदी सोप्पा खेळ खेळायचा आहे तुम्हाला. जॉनी तुमच्यासाठी हे एक प्रकारचं गॅम्बलिंग आहे."
जुगाराचा उल्लेख होताच जॉनी खुलला तर प्रज्ञा चिंतेत पडली. तिने आयुष्यात रमीसुद्धा क्वचित खेळली होती. आता इथे काय करायला लावत आहेत काय माहित! त्यात हा जॉनी अट्टल जुगारी आणि याला त्या रक्षकामुळे जबरदस्त लक प्राप्त झालं असं किलर सांगत होता. पण तिचाही नाईलाज होता.
"तर खेळ असा आहे," तिने एक फासा कुठून तरी काढला. त्या फाश्याला ८ पृष्ठभाग होते पण सर्व पृष्ठभाग कोरे होते. "एक स्टँडर्ड डाईस विथ एट फेसेस. मी हा फासा फेकेन मग कुठला तरी आकडा वरच्या पृष्ठावर दिसू लागेल. अर्थातच इतर पृष्ठांवरही आकडे आहेत पण ते अदृश्य राहतील. तुम्हाला वर आलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला आकडा आहे हे गेस करायचं आहे. ज्याचा गेस सर्वात जवळ तो जिंकला."
"४" जॉनी बेदरकारपणे उत्तरला.
इंटरफेसने आपल्या चेहर्‍यावरचे स्मित जराही न ढळू देता जॉनीच्या नजरेला नजर भिडवली.
"मी अजून फासा टाकला नाही आहे जॉनी."
"मला फरक नाही पडत. जॉनी कायमच ब्लाईंडमध्ये खेळतो. तसंही गेल्या काही दिवसांपासून माझं लक अनबीटेबल आहे. मी सांगतो तसा ४च येणार त्या खाली लपलेल्या फेसवर."
"फायनल?"
"फायनल!"
तिच्या चेहर्‍यावर अजिबात बदल दिसून आले नाहीत. तिने प्रज्ञाकडे बघत फासा टाकू का अशा अर्थाची खूण केली. प्रज्ञाने मान डोलावून होकार दिला. फासा फेकला गेला.
"८. प्रज्ञा यू हॅव अ मिनिट टू मेक युवर गेस!"
प्रज्ञाने जॉनीकडे पाहिले. तो तिच्याकडे बघून कुत्सितपणे हसला. "बी माय गेस्ट!"
प्रज्ञाला तो रिपोर्टरबरोबरचा प्रसंग आठवत होता. ते एका कॅसिनोमध्ये सूरदासच्या शोधात गेले असता तिने पहिल्यांदा तसा आठ पृष्ठभागांचा फासा पाहिला होता. रिपोर्टरचे शब्द तिच्या कानात वाजत होते.
"विशेष काही नसतं ग. ६च पाहिजे असं काही नाही, जरा लक फॅक्टर वाढवतात बाकी काही नाही. नंबर ऑफ सरफेसेस इव्हन ठेवतात फक्त कारण मग एक पॅटर्न बनवता येतो आणि अगदीच लक राहत नाही मग."
"पॅटर्न?"
"हो. ६, ८, १२ थोडक्यात सम संख्या असेल टोटल फेसेस तर मग विरुद्ध पृष्ठभागांवरच्या आकड्यांची बेरीज नंबर ऑफ फेसेस + १ असते. म्हणून आपल्या नेहमीच्या फाशाच्या बाबतीत तो आकडा ६+१ = ७ येतो."
म्हणजे इथे ८+१ = ९. सो हवा असलेला आकडा असला पाहिजे.
"१"

..........
..........

जॉनी आता त्या पुस्तकाच्या एका अज्ञात कोपर्‍याकडे फ्लोमध्ये वाहत जात होता. तो काही केल्या ते सौम्यपणे उच्चारलेले शब्द विसरू शकत नव्हता.
"सॉरी जॉनी. मला माहित आहे कि प्रज्ञापेक्षा तुझ्यात गॅम्बलिंग स्पिरिट जास्त आहे जी प्राथमिक चाचणीचा निकष आहे. पण आम्हाला केवळ नशीबावर विसंबून खेळणारा जुगारी नकोय. तू खूप प्राथमिक दर्जाची टेस्ट फेल झाला आहेस. सॉरी जॉनी बट युअर लक एन्ड्स हिअर!"

~*~*~*~*~*~

"इलेगुआ तर कित्येक शतकांपूर्वी मेला असणे अपेक्षित आहे ना? मग हा कोण आहे?" किलरने कुजबुजत जाधवांना विचारले. जाधवांनी उत्तरादाखल खांदे उडवले. त्यांच्यासाठी हे तितकंच रहस्यमय होते जितके किलर किंवा आलोकसाठी. आलोकने धीर करून अखेर इलेगुआला विचारलेच
"तू खरंच इलेगुआ आहेस?"
"हो. का?"
"नाही म्हणजे... हे जग वेगळं आहे अ‍ॅन्ड ऑल इज फाईन. पण मेलेला माणूस असा अचानक समोर येतो म्हणजे.... यू नो..."
इलेगुआ मनमोकळेपणाने हसला. "खरं आहे तुझं. पण समजा, समजा मी किंवा गोरो मेलोच नसलो तर?"
हा प्रश्न त्या तिघांना चक्रावून गेला. हा जिवंत आहे?
"पण गोरोचा मृत्यु तर डॉक्युमेंटेड आहे ना?" किलरने शंका काढली.
"मृत्यु म्हणजे नक्की काय? आता जरा स्वत:ला डेटाप्रमाणे समजा. कंप्यूटरवरची फाईल मरते असं म्हणायचं झालं तर तुम्ही तसं केव्हा म्हणाल?"
"जेव्हा ती कायमची डिलीट होईल."
"मग समजा ती फाईल शेअर्ड आहे म्हणजे क्लाऊड स्टोरेजवर तिची एक कॉपी आहे. तुम्ही तुमच्या संगणकावरून ती उडवता आणि क्लाऊड स्टोरेजची लिंकही डिलीट करता. तेव्हा ती तुमच्यासाठी लॉस्ट फाईल आहे पण अजूनही ती फाईल अस्तित्त्वात आहे कारण अजून ती क्लाऊडवर तशीच आहे. तसंच काही माझं आणि गोरोचं झालं."
०००

"ओह ओके. म्हणून त्या दिवशी जेव्हा तू गेनासेयराला जखमी केले तेव्हा त्याने क्षणार्धात त्या जखमा भरल्या कारण त्याने बेसिकली बॅकअप फाईल्स मधून तिथला डाटा रिस्टोर केला. पण मग तो हवेतून इकडे तिकडे मूव्ह कसा झाला?" सायरसने गोरोला विचारले.
"डायमेन्शनल स्पेस! आपण व्हिज्युअलाईज करू शकत नसलो तरी डेटा कितीही डायमेन्शनल असू शकतो कारण स्टोर होताना त्याचे प्रोजेक्शन मात्र स्टोर होते. गेनासेयराच्या डेटाला आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक मिती आहेत."
"पण मग अजूनही काही गोष्टी सुस्पष्ट होत नाहीयेत. गेनासेयरा नक्की कोण आहे? आणि त्याचा या पुस्तकाशी काय संबंध? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही दोघं इथं आहात, तर इलेलगी कुठे आहे?"
०००

"खरंच कि इलेलगी कुठे गेली तो प्रश्न मला आधी पडलाच नाही" प्रज्ञा लक्षात आल्यावर चटकन बोलून गेली.
रूटने क्षणभर तिच्याकडे रोखून पाहिले. प्रज्ञाला त्या नजरेत पहिल्यांदा काहीतरी वेगळे जाणवले. तिथे आल्यापासून रूटच्या चेहर्‍यावरचे गूढ हसू देखील नाहीसे झाल्यासारखे वाटले. पण एक क्षणभरच!
"प्रज्ञा आता तुला हे समजलं कि या जगात अस्तित्व हे डेटाशी संलग्न आहे. आता त्यावरून तुला अजून निष्कर्ष काढता आलेले दिसत नाहीत. म्हणजे उदा. मी रूट तुझ्यासारखी का दिसते? मला सांग जर रूट हा संपूर्ण संगणकाचे प्रातिनिधिक अस्तित्व आहे तर जो कोणी यूजर असेल त्याच्या डेटा द्वारेच रूट यूजरला अ‍ॅक्सेस करेल, नाही का?"
"म्हणजे जर माझ्या जागी इतर कोणी असतं तर तू त्या व्यक्तिसारखा दिसला असतीस, आय मीन असतास आय मीन.... अवघड आहे रे हे सगळं!"
रूटचे हसू रुंदावले. "तुमच्या अस्तित्वाला डेटाप्रमाणे वागवता येणं ही एक शक्तिशाली देणगी आहे खरी जी तुमच्या जगात, पृथ्वीवर डिझाईनरने दिलेली नाही. तुम्ही ज्या संकल्पनेला देव संबोधता तिला आम्ही डिझाईनर संबोधतो. अशी अनेक जगं आहेत आणि त्यांचे वेगवेगळे देव, डिझाईनर."
"ओह म्हणजे हे बिग बँग अ‍ॅन्ड ऑल आहे का? म्हणजे ही एक पॅरलल पृथ्वी आहे का?"
"नाही. समांतर विश्व तेव्हा येतात जेव्हा एका घटनेचे दोन वेगवेगळे परिणाम असतात आणि त्या दोन्ही परिणामांच्या शक्यतांची अनेक विश्वे! पण ही सर्व विश्वे काय प्रकारे ऑरगनाईज केली असावीत?"
प्रज्ञाने विचार करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्हच आले.
"हरकत नाही. खरं सांगायचं तर मीही सांगू शकत नाही. तुम्ही त्रिमिती अवकाशात अस्तित्वात आहात आणि काळ ही चौथी मिती मानता. युरुगुचे जग सप्तमिती आहे - ५ मिती, काळ आणि डेटा लेयर!"
प्रज्ञाने यावर आ वासला! "म्हणजे?"
"होय. समांतर विश्व म्हणजे तरी काय त्या अफाट पसार्‍यात तुम्हाला समांतर प्रतलातले एक विश्व. पण या प्रतलांच्याही पलीकडे अजून बरेच काही आहे. असो, तर आता इलेलगीचे काय झाले? तुला हे कळले कि या जगात डेटा बॅकअप असणे हे किती महत्त्वाचे आहे कारण जर तुमच्या डेटाचा रेफरन्स गेला तर तुम्ही मरता. पण जर या जगात कोणी बाहेरून आले असेल आणि त्याचा रेफरन्स क्रिएटच झाला नाही तर?"
"एक मिनिट! म्हणजे इलेलगी?"
"होय. गोरो आणि इलेगुआप्रमाणे इलेलगी पण इथे आली. गोरो आणि इलेगुआचा डेटाचा रेफरन्स पृथ्वीच्या दृष्टीने उडाला असेल पण किमान युरुगुच्या जगात तरी राहिला. त्यामुळे भलेही ते पृथ्वीवर जाऊ शकत नसले तरी इथे जिवंत, म्हणजे जे काही असेल ते, राहिले. त्यांचे अस्तित्व शाबूत राहिले. इलेलगीचा डेटा केवळ नावाला अस्तित्वात आहे. पण तो कोणी अ‍ॅक्सेसच करू शकत नाही. ती फक्त आहे, कुठे तरी निद्रिस्त! कुठे ते मात्र कोणी सांगू शकत नाही"
~*~*~*~*~*~

"पण मग गोरो म्हणजे तू परत कसा आला? कबिल्यात तर तुझ्या इलेगुआ वरच्या विजयाची दंतकथा मोठ्या थाटामाटात सांगितली जाते."
"ला नाही का तुझं नाव? तू म्हणतेस त्यात तथ्य आहे. जेव्हा माझ्या आणि इलेगुआच्या लक्षात आले कि आम्हाला गेनासेयराने वापरून घेतले तेव्हा इलेगुआने इथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि इलेलगीचा या अफाट पसार्‍यात शोध घेण्याचे ठरविले. रूटच्या म्हणण्यानुसार तो सफल होण्याची शक्यता शून्य होती पण तरीही त्याने प्रयत्न करायचे ठरवले. मी मात्र माझा डेटा सेव्ह न करता त्याऐवजी माझा डेटा सेव्ह होऊ शकेल इतकी जागा राखीव करून घेतली म्हणजे मी पृथ्वीवर परत गेलो कि माझा डेटा इथे बॅकअप करता येईल."
"आणि मग तू परत आलास?"
"अर्थात! परत येणं भागच होतं. त्या प्रवेशद्वाराचं म्हणजे त्या इलेगुआने बनवलेल्या पुस्तकाचं नीट संरक्षण होणं गरजेचं होतं! नाहीतर काय पुन्हा गेनासेयरा टपून बसला होताच कोणाचा तरी वापर करण्यासाठी! मग त्या पुस्तकाची सगळी संरक्षणव्यवस्था, त्यविषयीच्या दंतकथा पसरवणे इ. कामे मी उर्वरित आयुष्यात केली. मग माझा डेटा हळू हळू इकडे रिस्टोर होऊ लागला आणि मी या जगात हळू हळू जिवंत झालो. तोवर मी इलेगुआशी माझी मेमरी जशी जशी परत येई तसा तसा वागे. कधी शांत, कधी त्याच्यावर चिडलेला. आम्हाला वाटलेलं कि आतातरी गेनासेयराला कोणाचा वापर करण्यात यश येणार नाही. दुर्दैवाने तो आमचा गैरसमज होता असं दिसतंय." शेवटचा इशारा अर्थातच लाकडे होता.
०००

"आता तुझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर! गेनासेयरा कोण आहे? मला सांग हे कंप्यूटर सदृश जग कशावर चालत असेल?"
प्रज्ञाने काही क्षण विचार करून उत्तर दिले " एखादा प्रोग्राम, ओएस असेल. ओके मे बी तो कोअर सेंट्रल प्रोग्राम असेल."
"करेक्ट! आता जिथे उजेड असतो तिथेच अंधारही असतो तसेच जर कंप्यूटर आहे, प्रोग्राम आहेत, डेटा आहे तर ...."
"व्हायरसही आहेत!!" प्रज्ञा उद्गारली.
०००

"व्हॉट?" ते तिघेही एकसाथ ओरडले.
"हळू! थोडं ऑब्व्हियस झालं होतं नाही का या पॉईंटला. इतकी दचकलेली प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती मला." इलेगुआ करंगळीने कान साफ करत म्हणाला.
"पण मग तो हे असं का करतोय? तो कुठून आलाय? का त्याला कोणी पाठवले आहे?" आलोकने प्रश्नांचा धडाका लावला.
"एकावेळी एक नाही का! गेनासेयराविषयी तशी मर्यादितच माहिती उपलब्ध आहे. रूटला बहुतेक थोडी कल्पना आहे तो कुठून आला असावा पण त्याचा उद्देश्य स्पष्ट आहे - हे जग करप्ट करणे! त्यासाठी ही नीड्स टू हॅक इन्टू द वर्ल्ड! पूर्वी म्हणे या जगात कोणीही कधीही प्रवेश करू शके पण नंतर हे असे व्हायरसेस आहेत याचा शोध लागला. त्यामुळे अर्थातच सर्व दरवाजे बंद करण्यत आले. एका विश्वातून दुसर्‍या विश्वात प्रवेश करणे निषिद्ध करण्यात आले. या सर्व युद्धाला - हो रूट व या विश्वाचे उरलेले मूळ रहिवासी यांच्यासाठी हे युद्धच आहे - अनेक पदर आहेत, मोठा इतिहास आहे जो कदाचित फक्त रूटच सांगू शकते."
"ओह आता बर्‍याच गोष्टी क्लिअर होत चालल्यात!" बराच वेळ विचारमग्न असलेल्या किलरने अखेर तोंड उघडले.
"थोडक्यात ते पुस्तक पाहिल्यानंतर रँडम गोष्टी घडतात ते सर्व म्हणजे तुम्हाला अनॉथराईज्ड अ‍ॅक्सेस केल्याबद्दल मिळणारी शिक्षा होत्या?"
"अर्थात! म्हणून तर काहीही झाले तरी तुमच्या बरोबर वाईटच गोष्टी घडतात. आफ्टर ऑल देअर इज ऑलवेज सम ऑर्डर इव्हन इन मॅडनेस!"
०००

"आता यावर मार्ग काय?"
"ये माझ्याबरोबर"
"पण कुठे? तू तर त्या डायमेन्शनल स्पेस मधून लीलया जाशील, माझं काय?"
"प्रज्ञा मालक आहेस ना आता तू या जगाची! तुझी निवड झाली आहे म्हणजे तुझी सिग्नेचर स्टोर झाली! तुझा सुद्ध मल्टी डायमेन्शनल बॅकअप तयार झाला! चल माझ्याबरोबर."
प्रज्ञाला काही विशेष जाणवले नाही रूटच्या मागोमाग चालताना. नाही म्हणायला तिला ती सरळ चालत आहे हे केवळ तिने कुठेही वळण घेतले नाही म्हणून लक्षात आले कारण तिने जर आजूबाजूला बघून आपण सरळ चालतोय का वाकडेतिकडे हे ठरवले असते तर निश्चित तिने वाकडेतिकडे असंच उत्तर दिले असतं. एकदा तर तिला आपण खोलीला गोल प्रदक्षिणा घातली कि काय असं वाटत होतं. अखेर त्या दोघी एका वेगळ्याच खोलीत प्रवेश करता झाल्या. त्या खोलीच्या मध्यभागी एक मेज होते आणि त्यावर एक कागदी वस्तु होती.
"हे काय आहे?"
"कोअर! अंह, हसण्यावारी नेऊ नकोस. त्या गोष्टीवर हे जग चालू आहे. अफाट प्रकार आहे तो, अ ट्रायम्प्फ ऑफ डिझाईनर!"
"मग अडचण काय आहे? रादर आपण इथे का आलो आहोत?"
"ते मॉडेल नीट उचलून बघ."
प्रज्ञाने ती कागदी वस्तु उचलली. तिने ओरिगामीच्या वस्तु पाहिल्या होत्या पण ही जरा सुपिरीअर ओरिगामी होती. त्या कागदाचे थरांवर थर रचले होते. किती कागद एकत्र करून ती वस्तु बनवली होती हे सांगणे कठीण होते. स्पर्श केल्यावर तिला जाणवले कि हा कागद काही वेगळाच आहे. असं टेक्श्चर तिने आत्तापर्यंत कधी अनुभवले नव्हते. ती मानवसदृश आकृती होती पण तिच्या प्रत्येक हाताला चार बोटे होती, तोंड अर्थात कोल्ह्याचे होते. जर तो पुतळा असता तर एखाद्या इजिप्शियन देवतेचा म्हणून सहज खपला असता. पण त्या आकृतीत व्यंग होते. ते थर, लेयर्स नीट लावलेले नव्हते. घड्या सुबक नव्हत्या.
"तू बरोबर विचार करत आहेस. यातली प्रत्येक चुकलेली घडी एक अ‍ॅनोमली आहे. मला माहित आहे तुला हे बघताना थोडा त्रा होईल पण तरी डावा डोळा जो किंचित सुजल्यासारखा दिसतोय तिथे हात फिरव."
प्रज्ञाने त्या घडीवरून हात फिरवला - आणि तिला अनिरुद्धच्या मृत्युचे दृश्य पुन्हा एकदा पाहावे लागले. ती ते टाळूही शकत नव्हती कारण डोळे मिटल्यानंतरही तिला ते दिसतच होते.
"मला माफ कर पण तुला याची गंभीरता पुरती समजायला हे करणे आवश्यक होते. तो डोळा सुजल्यासारखा दिसतोय कारण ती घडी बिघडली आहे. अनिरुद्ध त्या दिवशी मरणे अपेक्षित नव्हते, त्याने त्या दिवसापर्यंत घेतलेल्या निर्णयांनुसार त्याच्या भविष्यकालीन घटनांच्या स्पेसमध्ये त्या दिवशी मृत्यु नव्हता. पण दुर्दैवाने तो ला आणि नोम्मोच्या जाळ्यात अडकला. कोअरला युरुगुच्या जगाचे नियम पाळण्यासाठी त्याच्या स्पेसमध्ये ढवळाढवळ करावी लागली आणि त्या मालफंक्शनिंगची खूण म्हणून ती घडी विस्कटली."
"थोडक्यात तुझी अपेक्षा आहे कि मी कोअरच्या सर्व बिघडलेल्या, विस्कटलेल्या घड्या दुरुस्त करू. हे आवश्यक आहे यात दुमत नाही पण मला जमेल? मी लहानपणी साधी कागदी होडी सुबक कधी बनवली नाही. अगदी वहीच्या कागदांची विमाने वगैरे तर ओबडधोबडच म्हणावी लागतील या मॉडेलपुढे!"
"मान्य! पण तेव्हा तू प्रज्ञा होतीस, एक सामान्य मुलगी. बट नाऊ रँडमनेस हॅज चोजन यू. उलट एखादा कसलेला ओरिगामीस्ट देखील हे मॉडेल दुरुस्त करू शकणार नाहे पण तू करू शकतेस!"
प्रज्ञाने त्या आकृतीकडे पुन्हा एकदा पाहिले. त्या कागदानेही जणू तिला सकारात्मक प्रतिसाद दिला, ते टेक्श्चर तिला अचानक सॉफ्ट वाटू लागले. तिच्यात आत्मविश्वास परत आला. तिने रूटकडे बघून होकार भरला.
"तत्पूर्वी, म्हणजे मला माहित आहे तुझं उत्तर पण टू अ‍ॅक्टिव्हेट द प्रोसिजर, त्या सर्व इतरांना कुठल्याही परीक्षेशिवाय सोडायचे ना बाहेर?"
प्रज्ञाला काही क्षण लागले त्याचा संदर्भ लागायला. "ओह, हो ते सर्व अजूनही पुस्तकातच आहेत नाही का? होय अर्थात. त्या सर्वांना बाहेर जाऊ देत; अर्थातच कोणतीही परीक्षा आणि तत्सम भानगडी न होता!!"
~*~*~*~*~*~

"अ‍ॅन्ड दॅट ब्रिंग्ज अस टू अ‍ॅन हॅप्पी एन्डिंग फोल्क्स! ओह हे बघा गोरोदेखील आलाच त्या दुसर्‍या ग्रुपला." इलेगुआ एकदम मजेत, रिलॅक्स्डली हे सगळे बोलत होता खरे पण त्याजागी पोचल्यावर एकप्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. किलरने हळूच जाधवांना "आय स्टिल डोन्ट हॅव अ गुड फीलिंग अबाऊट धिस" असे बोलूनही दाखवले. आलोकला मात्र आपण सगळे सुटतोय हे कळल्यावर सायरसही सुटणार हे लक्षात आले आणि त्याला ती कल्पना फारशी रुचली नव्हती. जाधव मात्र या घटनाक्रमाने संतुष्ट होते. एव्हाना रिपोर्टरने त्या इतर दोन बदमाशांचे काहीतरी केले असेलच आणि मग त्यांच्या कबुलीने आणि त्या तळघरात जे पुरावे मिळतील त्यांच्या मदतीने आपण या विकृत डॉक्टरला चांगला धडा शिकवू असे त्यांचे स्वप्नरंजन चालले होते. किलरच्या डोक्यात एकाच वेळी बाहेर पडल्यानंतर कसे निसटायचे याचे प्लॅनिंग सुरु होते, अखेरीस पोलिसावर तो कसा काय विश्वास टाकेल? तसेच तो समोरच्या ग्रुपचे निरीक्षण करत होता. लाच्या चेहर्‍यावर काहीशी निराशा होती. साहजिक आहे कारण एवढे कष्ट घेतल्यावर जर पदरी अपयश आले तर कोणीही निराश होईल. त्याला बुचकळ्यात पाडून गेली ती सायरसची नजर! त्या नजरेत निराशेपेक्षाही काही अधिक होते. ती नजर भिरभिरत होती, एका आत्मविश्वास गमावलेल्या माणसाची नजर होती ती. काहीतरी लोचा आहे खास, किलर मनाशीच म्हणाला.
"आता काय?" लाने प्रश्न विचारला.
"वाट बघणे! नवीन मालक, वारस किंवा सुपर युजर, जे काय म्हणायचे आहे ते म्हणा. तर त्या प्रज्ञाने आवश्यक दुरुस्त्या केल्या कि तिच्या कमांडनुसार बाहेर जाणारा एक सुरक्षित दरवाजा उघडेल आणि आम्हा दोघांना.... मुक्तीच शब्द योग्य म्हणावा लागेल." गोरो उत्तरला.
............
............
............

"गुड आयडिया! मग का नाही तोवर एक गेम खेळूया?"
सर्वांनी चमकून त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. एक मनुष्याकृती त्या धवल अवकाशाला छेदत त्यांच्या दिशेने येत होती. गेनासेयरा!!
"दोस्तांनो कसं आहे ना, सगळं सुरळीत पार पडेल अशी नायक-नायिकेने कितीही खबरदारी घेतली तरी खलनायक एक ना एक ट्रिक क्लायमॅक्स साठी वाचवून ठेवतोच!
०००

प्रज्ञा शांतपणे एक एक घडी सुधारत होती. रूट सिद्धासनात बसून हवेत तरंगत होती. तिची समाधी अचानक भंगली.
"प्रज्ञा!"
"अं?"
"तुझ्या शक्ति किती जागृत झाल्यात माहित नाही पण गेनासेयरा....."
"मला जाणवले ते."
"मग?"
प्रज्ञाने हातातले मॉडेल धरून एक जागा दाखवली. तिथे कागद फाटलेला होता.
"ओह्ह. इथून तो आत घुसला कि काय?"
"असं दिसतंय खरं. आता त्यांना गेनासेयराचा सामना करावाच लागेल. अर्थात मी त्यांना इथून शक्य तितकी मदत करेन पण तो खेळ खेळणे भाग आहे. फक्त एक आहे कि गेनासेयराने ही रिस्क घेऊन एक मोठी चूक केली आहे. आता काही तो वाचत नाही."
०००

"हा खेळ अब्जावधी वर्षांपासून चालू आहे. हूं, म्हणा तुमच्यासाठी तो मोठा काळ आहे तर आमच्यासारख्यांसाठी या कल्पनांना काही अर्थच नाहीत. अखेर मी जेव्हा इतक्या जवळ आलो, रूटपर्यंत पोहोचून कोअरचा ताबा घेणे आणि या जगाला पूर्णपणे आपल्या काबूत घेणे हे स्वप्न सत्यात उतरणार होते. आणि तू (सायरसकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत) तू सगळं, सगळं धुळीला मिळवलेस. आणि तू ला! तुझ्यावर मी इलेगुआपेक्षा जास्त विश्वास दाखवला. याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी."
त्याने हवेतच काही हातवारे केले. लाच्या संपूर्ण शरीराचे छोट्या छोट्या चौकोनी ठोकळ्यांत रुपांतर झाले आणि ते हवेत विखुरले. सायरस ते दृश्य बघून काहीसा भानावर आला.
"एक मिनिट! आपण काहीतरी खेळ खेळणार आहोत ना? त्याविषयी सांग" सायरस हे म्हणत असताना त्याच्या आवाजात झालेले हलके बदल किलरच्या नजरेतून सुटले नाहीत.
गेनासेयराच्या चेहर्‍यावर हिंस्त्र भाव होते. त्याने एवढ्या मेहनतीने मांडलेला डाव फिस्कटल्याचा राग त्याच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होता. त्याने आपल्या अफाट डेटा बँकमधून दोन मातीचे घडे बाहेर काढले.
"तुम्ही २ गट आहात. सायरस तर अर्थातच एकटा खेळेल पण तुम्हाला एक प्रतिनिधी निवडावा लागेल. जस्ट टू बी फेअर विथ सायरस तुमचा प्रतिनिधी हरला तर तुमचा अख्खा गट हरेल. खेळ आधी समजून घ्या. मी तुमची एक्झिट हॅक केली आहे आणि त्याच्या २ किल्ल्या बनवल्यात. या गेल्या त्या या २ घड्यांमध्ये." असे म्हणून त्याने त्या २ किल्ल्या एक एक करून त्या २ घड्यांमध्ये टाकल्या. दोन्ही भांड्यांची तोंडे तशी चिंचोळी होती. जेमतेम एक हात आत जाऊ शकेल इतपतच मोठी होती.
"आणि आता आत जात आहेत हे दोघे." हवेतून दोन साप, दोन्ही वेगवेगळ्या प्रजातींचे, एका एका घड्यात जाऊन पडले.
"तुमचं काम एकदम सोप्पं आहे. हे घडे थोड्या दूरवर ठेवलेले असतील. एक घडा प्रत्येकाने निवडायचा, तिथपर्यंत पळत जायचं, निवडलेल्या घड्यातून किल्ली बाहेर काढायची आणि येऊन दरवाजा उघडायचा."
यामागचा भयंकर अर्थ लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही. ते काही बोलणार इतक्यात जाधव, किलर आणि आलोकला प्रज्ञाचा आवाज ऐकू आला.
"प्रिपरेशन टाईम मागून घ्या. माझ्याकडे या कटकटीवर एक इलाज आहे. आपण बघूयात काय करता येतंय."
~*~*~*~*~*~

"बोल प्रज्ञा काय प्लॅन आहे तुझा?"
"लूक, मी जेव्हा पासून इथे कंट्रोल सांभाळलाय मला बर्‍याच डेटाला अ‍ॅक्सेस मिळाला आणि त्या सर्व अफाट माहितीमधून भरभर जायची क्षमताही मला प्राप्त झाली. तर महत्त्वाचा मुद्दा असा कि गेनासेयरा इतकी वर्ष निसटत आला, पुस्तकाच्या सुरक्षा यंत्रणांना फसवत आला याचे कारण त्याने कायम एक फेलसेफ डोअर तयार ठेवले - 'त्याचे' सो कॉल्ड पुस्तक! आत्ता सुद्धा ते कुठेतरी आहे. प्रचंड धूर्तपणे तो दरवेळी त्या पुस्तकातून निसटतो. यावेळी आपण हे होऊ द्यायचं नाही. आपल्या सुदैवाने बुसुली आणि कुणाल बाहेर आहेत व गेनासेयरा तुमचा खेळ चालू असताना त्या दाराकडे दुर्लक्ष करेल, त्याला करावेच लागेल कारण त्याला एकाच वेळी पुस्तकाच्या आत त्याने हॅक करून उघडलेला हा पॅसेज उघडा ठेवायचा आहे आणि हा जीवघेणा खेळ चालू ठेवायचा आहे. किलर तू कदाचित या खेळासाठी सर्वोत्तम प्रतिनिधी असू शकतोस. काहीही करून तुम्ही हा खेळ खेळा. मी तुम्हाला त्या दोन्ही सापांविषयी माहिती मिळवता येईल असा अ‍ॅक्सेस देते. बाकी गेनासेयराला अडकवण्याचे काम माझ्यावर सोडा."
प्रज्ञाने अ‍ॅक्सेस दिल्यानंतर आलेली माहिती शॉकिंग होती. गेनासेयराने निवडलेले दोन साप होते
१) रसेल्स व्हायपर अर्थात घोणस
२) यलो बेलीड सी स्नेक
दोन्ही विषारी!!
~*~*~*~*~*~

एकाग्रता! वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दांपैकी एक! किती सहज असतं म्हणणं कि तुझं लक्ष केंद्रित होत नाही रे किंवा एका जागी बस बरं इत्यादि. प्रत्यक्षात मनुष्यप्राण्याची इतकी क्षमताच नसते कि तो ठराविक काळापेक्षा अधिक वेळ लक्ष केंद्रित करू शकेल. अगदी असाधारण माणसे देखील काही तासांपेक्षा अधिक वेळ एकाग्रचित्त राहू शकत नाहीत. कुणाल तर एक सामान्य युवक होता. या आधी त्याने सामना केलेली जास्तीत जास्त तणावपूर्ण परिस्थिती म्हणजे 'उद्या या पेपरची डेडलाईन आहे!" अर्थात पीएचडीचे विद्यार्थी कदाचित म्हणतील कि आम्ही त्यापेक्षा एकवेळ हे पोर्टल उघडं ठेवण्याचे काम घेऊ, कुणालच्या डोक्यात नसत्या वेळी नसते विनोद चालू होते. ही पण एक स्टेज असते ना, जेव्हा तणाव इतका वाढतो कि शरीर आणि मेंदू यांचा ताळमेळ राहत नाही.
"कुणाल? तुला माझा आवाज ऐकू येतोय कुणाल?"
"प्रज्ञा?"
"हो येतोय, पण तू... तुला माझ्याशी.....ओह शिट. नाही ही प्रज्ञा नसणार, कॉन्सन्ट्रेट कुणाल!"
"कुणाल!! माझ्याजवळ फार वेळ नाहीये. मला माहिती आहे आपण जे बोलतोय ते डॉक्टर नाडकर्णी आणि मोदिबोला पण ऐकू जातंय. आता मी काय सांगत आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. सर्वात आधी, मला इकडे जे काही जाणवतंय त्यानुसार तिथे एकजण कोणीतरी मेलंय. प्लीज डोन्ट टेल मी इट वॉज बुसुली."
"अं नाही. ती कोण सायरसची साथीदार, रेश्मा, तिला काय झालं कोणास ठाऊक पण तिने अचानक स्वतःचाच गळा.... प्रज्ञा आत नक्की काय चालू आहे? मी तुमचा हा सेफ पॅसेज फार वेळ उघडा ठेवू शकणार नाही."
"तू उघडा ठेवला तरी काही उपयोग नाही."
"म्हणजे?"
"गेनासेयराने..... ओफ्फ टू मच टू एक्सप्लेन अ‍ॅन्ड नो टाईम. असं समज कि भले तू हे दार बाहेरून उघडं ठेवत असला तरी आतून त्याला गेनासेयराने कडी घातली आहे."
"व्हॉट? मग आता?"
प्रज्ञाने एकदा रूटकडे बघितले. रूटच्या चेहर्‍यावरचे भाव बोलके होते. कधी कधी तुमच्यापुढे पर्याय राहत नाहीत. तुम्हाला निष्ठूर व्हावे लागते. प्रज्ञाने मूक होकार दिला. ती घडी दुरुस्त करता करता तिने तिला समांतर अशी एक मॉडेलमध्ये नको असलेली घडी विरुद्ध दिशेने मुडपून कागदाच्या त्या भागाला शक्य तितके सपाट केले.
"तू ते दार उघडं ठेवण्याचा प्रयत्न बंद कर. मोदिबो, नाडकर्णी तुम्ही तुमच्या क्रिया चालू ठेवा. आपल्याला काही वेगळं करायचं आहे. कुणाल तुला बुसुली आणि रिपोर्टरची पण मदत मिळेल आता."
कुणाल अजून काही बोलणार इतक्यात बुसुली आणि रिपोर्टर धावत खाली आले.
"अरे कुणाल नक्की काय झालं माहित नाही पण तो अल्बर्ट तिकडे........... ओफ्फ आम्हाला उशीर झाला??"
"बुसुली!!" प्रज्ञाचा धीरगंभीर आवाज बुसुलीच्या कानातही घुमला. रिपोर्टरलाही तो ऐकू गेला. आता ती प्रज्ञा राहिली नव्हती. त्या आवाज भारलेला होता. त्या दोघांना पॅनिक स्टेटमधून बाहेर काढण्यासाठी तो पुरेसा होता.
"नीट ऐका! गेनासेयराने आपल्या मंडळींना या पोर्टलमधून बाहेर पडता येणार नाही अशी व्यवस्था केली आहे. किमान त्याचे प्रयत्न तरी असे चालू आहेत. यावर उपाय खूप सोपा आहे. आपण त्याने उघडलेल्या दारातून बाहेर पडू आणि तो या जगात कायमचा अडकेल."
~*~*~*~*~*~

"सायरस" गोरोने सायरसला भानावर आणले.
"काय रे? मी तुला तुझ्या बालपणीच्या आठवणी परत मिळवून दिल्या त्याचा एवढा परिणाम व्हावा तुझ्यावर?"
सायरस खिन्नपणे हसला. "माझ्या कुतुहलाने घात केला गोरो! जेव्हा तू मला सांगितलेस कि तुझा पृथ्वीबरोबर अप्रत्यक्ष संपर्क तुझ्या शरीरामुळे राहिला आणि मी अगदी लहान बाळ असतान माझ्या सबकॉन्शियस मेमरीत जे काही असेल ते तू मला दाखवू शकतोस तेव्हा मी आधी खूप आनंदलो. माझ्या परिवाराबरोबर काय झाले? मी हा असा का आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मला मिळणार होती ना."
"मग? मिळाली ना तुला ही सर्व उत्तरे?"
"कधीतरी ऐकलं होतं कि अज्ञानात सुख असतं. मी आजपर्यंत समजायचो कि माझी पहिली आठवण माझी सर्वात भयंकर आठवण आहे. पण खरं तर ती माझी पहिली त्यातल्या त्यात बरी आठवण होती. कॅन यू इमॅजिन माझ्या सबकॉन्शसने आधीच्या आठवणी यापेक्षा भयंकर समजून सप्रेस केल्या होत्या?"
"पण मग आता काय करणार आहेस तू? तू बाहेर पडलास इथून तरी मी बाहेरची जी परिस्थिती गॉज केली आहे त्यावरून मला नाही वाटत तू तुमच्या समाजाच्या कायद्याच्या कचाट्यातून सुटशील."
"सुटायचं तर आहे पण सुटका फक्त इतकी ढोबळ नको आहे."
"सायरस?" गोरोने त्याच्याकडे रोखून पाहिले. किलरने जे निरीक्षण नोंदवले तेच गोरोचेही होते. हा चेहरा ना एका खुन्याचा राहिला आहे ना एका पश्त्तापदग्ध माणसाचा! हा चेहरा एक ठाम निर्धार दाखवतोय.
"तुला त्यासाठी हा खेळ हरावा लागेल सायरस आणि त्याच वेळी त्यांना जिंकावा लागेल. मला नाही वाटत गेनासेयरा तुमच्यापैकी कोणालाही जिंकू द्यायच्या मूडमध्ये आहे. इट्स नॉट अ फेअर गेम!"
सायरस परत हसला पण यावेळचे हसू निराळे होते. "त्यालाही या जगाचे नियम चुकले नाहीयेत. मी सर्जन असलो म्हणजे मला सापांविषयी काहीच माहिती नाही अशातला भाग नाही. जर हा गेम रँडमनेसच्या वर आधारित असायला हवा असेल तर आय अशुअर यू देअर इज अ वे टू विन धिस गेम!"
०००

"मी" आलोक दुसर्‍या ग्रुपचा प्रतिनिधी म्हणून पुढे झाला. साहजिक होते किलर स्वतःचा जीव धोक्यात घालणार नव्हता. आलोकचा मात्र प्रज्ञावर पूर्ण विश्वास होता.
"गुड गुड. आता आपण काय चीटिंग करत नाही ब्वा. त्यामुळे हे नाणं उडवून फैसला होईल कि कोणाला स्वतःच्या आवडीचा साप आय मीन घडा निवडायला मिळेल." गेनासेयरा दात विचकत म्हणाला.
आलोकने सायरसकडे एक नजर टाकली, तो शांतपणे आलोककडेच बघत होता. "आलोक, इन केस तू जर हा टॉस जिंकलास तर लक्षात ठेव कि हे सर्व रँडम असण्यासाठी बांधील आहे."
आलोक त्या गूढ शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता. तोवर सायरसने कौल मागितला "हेड्स". "हेड्स, सायरस बोल काय पाहिजे तुला?"
"मला रसेल्स व्हायपर"
किलर हा घटनाक्रम पाहून त्याला त्या दोन सापांवरच्या डेटाशी ताडून पाहत होता. "ओह नो, " तो जाधवांकडे वळत म्हणाला. "बहुतेक मला कळले कि सायरस असे का म्हणाला."
"का?"
"हे दोन्ही साप विषारी असतात बरोबर आहे पण समुद्री साप घोणसपेक्षा जास्त विषारी असतो."
जाधवांनी एक तिरस्कारपूर्ण कटाक्ष सायरसकडे टाकला.
"किलर, तुला काय वाटतं या जगात माझं पिस्तूल काम करेल?"
"मे बी. पण मला वाटतं या सगळ्याला अजून एक पदर आहे जो आपल्या अजून लक्षात आलेला नाही. लेट्स वेट अ‍ॅन्ड वॉच!"
०००

"३.... २.... १.... पळा"
आलोक व सायरस पळत पळत आपापल्या घड्यापाशी आले, त्या चिंचोळ्या तोंडातून आत हात घातला आणि किल्ली शोधायला सुरुवात केली. दोघांच्या तोंडातून जवळपास एकाच वेळी साप चावल्याचा निदर्शक असा 'आह' आवाज आला. जेव्हा त्यांचे हात बाहेर आले तेव्हा दोघांच्या हातात किल्ली होती. दोघांनी पळायला सुरुवात केली. ते अंतर जाताना फारसे वाटले नव्हते पण आता परत येताना प्रचंड वाटत होते. सायरसला थोडी आघाडी मिळाली. सायरस थकल्यासारखा वाटत होता. मधून मधून तो हात झटकत होता. आलोक मात्र त्या जखमेकडे दुर्लक्ष करत धावत होता. तो अंतिम रेषेच्या जवळ आला अन्..
तो धाडकन कोसळला. त्याच्या तोंडातून थोडा थोडा फेस बाहेर पडत होता. तेवढ्या वेळात आलोकने शर्यत पूर्ण केली. आता गेनासेयराने अडवून ठेवलेला दरवाजा त्यांना मोकळा करणे भाग होते.
ते तिघे सायरसकडे बघत होते. सायरस मोठ्या कष्टाने बोलू लागला
"ड्राय बाईट! साप दरवेळी चावला कि दंशावाटे विष सोडेलच असे नाही, आफ्टर ऑल इट्स अ प्रेशस रिसोर्स फॉर इट. तो समुद्री सर्पाचे विष व्हायपरच्या विषापेक्षा अधिक घातक असते हे खरे आहे पण त्याची ड्राय बाईटची शक्यता जवळ जवळ ५०% असते. त्यामानाने घोणसची ड्राय बाईटची शक्यता २५% पेक्षा कमी असते. त्यामुळे अर्थात जो सी स्नेक निवडेल त्याला बिनविषारी दंश मिळण्याची शक्यता जास्त होती. आलोक, जर तुझ्या जखमेत पुरेसे विष असते तर तू इथपर्यंत सलग धावूच शकला नसतास, न्युरोटॉक्सिन्सने तुझ्या मसल्सना कधीच नष्ट केले असते आणि ती जखम प्रचंड दुखत असती. अर्थात तरी प्रिकॉशन म्हणून तिथे आवळून एखादी गाठ बांध. सो गाईज, इट्स माय लास्ट गुड डीड. इट्स माय टिकिट टू पर्मनंट एस्केप!"
"असं का केलं असेल? याच्यात कसा आणि काय बदल झाला?" जाधव निपचित पडलेल्या सायरसकडे बघत म्हणाले.
"वी मे नेव्हर नो. दॅट्स अ मिस्टरी फॉर अनदर डे!" किलर उद्गारला. "ओह अ‍ॅन्ड येस, लव्हर बॉय! इट्स युअर व्हिक्टरी!"
०००

"तुझा खेळ आम्ही खेळला गेनासेयरा. आता बाजूला हो. तू हरला आहेस."
"बरोबर. मला अजिबात अपेक्षा नव्हती कि कोणाला यातला ड्राय बाईटचा कॅच समजेल आणि त्याहून अपेक्षा नव्हती कि त्याचा असा वापर होऊन कोणीतरी जिवंत सुटेल. युरुगुचे जग या बाबतीत खरंच अमेझिंग आहे. किती शक्यता आणि त्यातून असे कित्येक चमत्कार! तुम्हाला नाही वाटत कि असे चमत्कार अजून बघायला पाहिजेत, अशा आणखी अनेक चमत्कारांमध्ये भाग घ्यायला तुम्हाला नाही का आवडणार? मला माहित आहे तुम्हाला आवडेल त्यामुळे मी तुम्हाला या जगात सोडून जातोय. या किल्लीचा तुम्हाला काहीच उपयोग नाही कारण तुमचं दार ऑलरेडी बंद झालंय, कायमचं! बाय बाय, परत कधी मी आलोच तर नक्की भेटू."
असे म्हणत गेनासेयराने स्वतःच्या पुस्तकाचे दार उघडले आणि त्यात पहिले पाऊल टाकले. तत्क्षणी तो रिबाऊंड होऊन मागे फेकला गेला.
"हॅलो गेनासेयरा." प्रज्ञाचा आवाज त्यालाही ऐकू आला.
"हॅलो. तू नवीन वारस आहेस नाही का? तुला हे दार यांच्यासाठी वापरायचं आहे का? काही फायदा नाही. तू काही करू शकणार नाहीस. मला एक दोनदा आत खेचून घेशील ना? तुझ्या आधी देखील अनेकांनी माझा डेटा रेफरन्स मॅनिप्युलेट करण्याचे असे टुकार प्रयत्न अनेक केलेत पण काही उपयोग होणार नाही."
"पण तुला कोणी सांगितलं कि मी तुझा डेटा रेफरन्स मॅनिप्युलेट करत आहे." प्रज्ञा अचानक तिथे प्रकट झाली. तिच्या हातात ते मॉडेल होते. ते जवळपास दुरुस्त झाले होते. गेनासेयराने ते बघून आपला ओठ चावला.
"गुड, व्हेरी गुड! म्हणजे माझी सर्व मेहनत तू रिसेट केलीस. या जगाच्या कोअर प्रोग्रॅममधल्या सगळ्या अ‍ॅनोमलीज, सगळे एरर्स तू रिसेट केलेस. गुड! पण मी परत येईन. तू माझं काही वाकडं करू शकत नाहीस."
"पण गेनासेयरा, परत यायला आधी तुला इथून जावं लागेल ना?"
गेनासेयराच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटले. "म्हणजे? तुला म्हणायचंय काय?"
"सोप्पं आहे गेनासेयरा. त्या दारातून तू बाहेर पडणार होतास बरोबर? पण फक्त तूच का? रादर अशा दारातून तू ये जा का करू शकतोस किंवा इलेगुआने किंवा अजून कोणी त्याचे स्वतःचे पुस्तक, पोर्टल, दार व्हॉटेव्हर बनवले म्हणजे काय? त्यांना या जगात ये जा करण्याच्या एका मार्गाचा परवाना, अ‍ॅक्सेस राईट मिळवला. मी तुझा रेफरन्स मॅनिप्युलेट किंवा डिलीट करू शकत नाही कारण तुझा व्हायरस मला तसे करण्याचा अ‍ॅक्सेस देत नाहीये आणि तो अ‍ॅक्सेस मिळेपर्यंत तू दुसर्‍या जगात पळून जातोस. याच जोरावर इतकी वर्षे वाचलास ना? व्हॉट इफ मी तुला बाहेर जायचा हा फ्री वे काढून घेतला? त्या दाराचा अ‍ॅक्सेस आता तुला नाहीये गेनासेयरा, तो अ‍ॅक्सेस या तिघांना आणि ऑफ कोर्स मला आहे."
गेनासेयरा थोडा वेळ शॉक होऊन तिच्याकडे बघत राहिला. मग तो वेड लागल्यासारखा हसू लागला. हसता हसता तो गडाबडा लोळत होता. त्याला खरेच वेड लागले होते, तो मधूनच मी फसलो, माझ्याकडून चूक झाली कसं शक्य आहे असे ओरडत अजूनच मोठ्याने हसू लागायचा.
"तू काही करू शकत नाहीस गेनासेयरा. तू कितीही हुशार असलास तरी तू या जगात कुठल्याही बॅकअपशिवाय फार काळ टिकणार नाहीस. तुझ्याकडून एकच चूक झाली, तू या सर्वांच्यामागे लागलास. तुला तुझा पराभव मान्य झाला नाही. तेवढ्या वेळात बाहेर थांबलेल्या आमच्या मित्रांनी तुझ्या दाराचा अ‍ॅक्सेस मिळवण्यात माझी मदत केली. तू संपला आहेस गेनासेयरा, कायमचा!" हे म्हणता म्हणता प्रज्ञाने शेवटची, डोळा शेप अप करण्याची घडी नीट केली.
~*~*~*~*~*~

***उपसंहार***

प्रज्ञाने मध्ये प्रवेश केला. तिला कॉफीची खरंच गरज होती. "वन आयरिश कॉफी प्लीज." तिने ऑर्डर दिली. खरं बघायला गेले तर तिला आयरिश कॉफीची चव फारशी आवडतही नसे पण रूटला समोर बघून तिला स्वतःचाच नॉशिआ यायला लागला होता. अशा वेळी ती मुद्दाम काहीतरी वेगळं करून आपली स्वतःची पर्सनॅलिटी आहे हे स्वतःवरच ठसवत असे. याची गरज कितपत होती माहित नाही पण तिला हे केल्यावर बरे वाटे. तिच्या हातात अर्थात ते पुस्तक होतेच. तेच तिचा फोन, वर्तमानपत्र आणि सर्व काही होते पण ते फक्त तिला दिसेल अशी तिने व्यवस्था करून घेतली होती. असाच काही वेळ गेला. तिने डाव्या अनामिकेतल्या अंगठीकडे बघितले आणि तशीच नजर खाली घेत वेळ पाहिली. तोंड वाकडे करीत तिने हात खाली घेतला आणि तिच्या दृष्टीक्षेपात आलोक आला. त्याने स्मित करून लॅटेची ऑर्डर दिली आणि तो तिच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसला.
"अरेच्चा, आता ट्रॅफिकमुळे होतो कि उशीर कधी कधी. कट मी सम स्लॅक नाऊ, वुड यू?" आलोक तिच्या चेहर्‍यावरची नाराजी निरखत म्हणाला.
"कधी कधी? आलोक असंच चालू राहिलं ना तर मला ही अंगठी डाव्या हातातून उजव्या हातात न्यायची का याचा फेरविचार करावा लागेल."
"आईशप्पथ!! आधीच मी तुला इतका घाबरून असतो आणि त्यात तू असं काही बोलायला लागलीस की...."
"आलोक!!" प्रज्ञाने त्याला दटावले.
"बघू इकडे." त्याने तिच्या हनुवटीला स्पर्श करून हलकेच तिचा चेहरा आपल्याकडे वळवला. मग हसून त्याने भुवया उडवत विचारले "आजही काम करत होतीस?"
प्रज्ञाने एक उसासा सोडला. "सगळं स्थिरस्थावर व्हायला खूप वेळ जाईल रे. कोअर दुरुस्त झाला म्हणजे सगळं नीट होत नाही ना. आणि त्या जॉनीकडून मुंबईवर पडलेला प्रभाव ओसरला असला तरी त्यामुळे तयार झालेल्या अ‍ॅनोमलीज खूप आहेत. पण होईल सगळं ठीक! आता अवघड कामे सगळी संपली आहेत, उरलेली कामे वेळखाऊ असली तरी होतील. अशक्य कोटीत नाहीत ती. असं माझ्या डोक्याला सगळं टेन्शन आणि त्यात तू हा असा ताटकळत ठेवतोस." तिने हलकेच त्याला एक चापटी मारली.
"आता काय करू मी? उठाबशा काढू का?"
"नाही तेवढं नको, माझ्या आणि तिच्या कॉफीचं बिल भर" कुणाल मागून येत उत्तरला.
एक खुर्ची ओढून तो बसला. "बरं ते जाऊ दे. माझं थीसिस प्रपोजल अ‍ॅक्सेप्ट झालं. सो लेट्स सेलिब्रेट!"
त्यांचे अभिनंदन स्वीकारून कुणाल पुढची ऑर्डर देऊन वॉशरूममध्ये गेला. तेवढ्यात टीव्हीवर आनंदमहाराजांची अ‍ॅड सुरु झाली तिच्याकडे या दोघांचे लक्ष वेधले गेले.
"मुंबईवरचं संकट दूर करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणार्‍या निश्चितानंदाचे पट्टशिष्य आणि अधिकारी पुरुष आनंदमहाराजांचे दर्शन घेण्याची संधि सोडू नका ............."
पुढची जाहिरात त्यांनी ऐकलीच नाही. त्या दिवशी जे झाले ते आठवून त्यांनी खांदे उडवले आणि कॉफीचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली.
०००

ते सगळे गेनासेयराच्या पुस्तकातून बाहेर पडले ते थेट निश्चितानंदाच्या यज्ञस्थळाच्या अगदी जवळ! इतका वेळ पॉज असलेला त्या स्थळाचा अवकाश पुन्हा सुरु झाला आणि तिथला गोंधळ जणू रिबूट झाला.
"ओह शिट!" प्रज्ञाने कपाळाला हात लावला.
"काय झालं?"
"या रक्षकाचा सेक्युरिटी प्रोग्राम मी टर्मिनेट केलाच नाही. मी रूटच्या इथून या ढोंगी बाबाचे चाळे पाहिले. त्या कोल्ह्याला काहीतरी नशा दिला गेला आहे. तशी त्यात आता काही अतिमानवी शक्ति राहिलेली नाही पण अजूनही त्याचा आकार बघता तो सहज काही जणांना लोळवेल."
"मग आता?"
.............
.............
.............

निश्चितानंद अचानक भानावर आले. त्यांच्या समोर अजूनही तो कोल्हा होता. पण आता खूप उशीर झाला होता. त्यांना काही आवाज ऐकू आला. त्यांनी वळून बघितले तर त्यांना इन्स्पेक्टर शिंदे धावत येताना दिसले. ते काहीतरी हातवारे करत होते. शिंदे जीव खाऊन पळ पळ ओरडत होते पण निश्चितानंदाचा स्वतःच्या शरीरावर ताबा राहिला नव्हता. तो भीतिने एकाच जागी थिजला त्याला शेवटी फक्त २ गोष्टी लक्षात राहिल्या. एक शिंदेनी कोल्ह्यावर झाडलेल्या गोळ्यांचा आवाज आणि दुसरे म्हणजे स्वतःच्या गळ्यापाशी जाणवलेली तीव्र वेदनेची जाणीव!
०००

"पण मानलं पाहिजे हा या आनंदला. रिपोर्टनुसार तो सामान्य कोल्हा होता असं प्रसिद्ध होऊन देखील याने निश्चितानंदाचं नाव मस्त एन्कॅश केलं! " कुणालने आपलं मत दिलं
"अरे हे बाबा लोक यातच तर एक्सपर्ट असतात. मध्ये फेसबुकवर एक आर्टिकल शेअर केलं होतं कोणीतरी, त्यात या लोकांची आणि मॅनेजमेंट गुरुंची तुलना केली होती."
"असं नका बोलू रे. चांगले साधू, बाबा इ. असू शकतात. शक्यता अर्थातच असते ना"
कुणाल आणि आलोकने एकमेकांकडे बघितले. "बोलला हिच्यातला युरुगु!"
प्रज्ञा अजून खट्टू व्हायच्या आत आलोकने विषय बदलला. "जाधव किंवा शिंदेंशी भेट झाली नंतर?"
"मानसीला घेऊन गेले होते नंंतर एकदा तेव्हा शिंदे भेटले होते. सगळ्या खुनांच खापर शेवटी जॉनीवर फोडायचं ठरवलं त्यानंतर अनिरुद्धच्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वस्तु मिळवण्यासाठी गेलो होतो. जॉनी अप्रत्यक्षपणे जबाबदार असला तरी सायरसला शिक्षा व्हायला हवी होती असं मला तेव्हाही वाटलेलं आणि आत्ताही वाटतं. पण गोरोने नेमकं त्याला काय दाखवलं असेल कोणास ठाऊक? त्याला अचानक पश्चात्ताप वगैरे झालेला दिसत होता."
"काय माहित? पण सरांमुळे मी त्या दिवशी वाचलो हे मात्र खरं! बाय द वे, इलेगुआ आणि गोरो..."
"त्यांचा डेटा क्लिअर केला मी. त्यांना तशीही आता मुक्ती हवी होती आणि इलेलगीला सुद्धा मी ती सापडेल तेव्हा त्याच पद्धतीने सोडवेन."
"हम्म. दॅट रिमाईंड्स मी, बुसुलीचा मध्ये नाडकर्णींना फोन आला होता. त्याच्या कबिल्याची या शापातून सुटका करून देणार्‍या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा त्याने आफ्रिकेत यायचे आग्रहाचे निमंत्रण दिलं आहे"
"मग फक्त तो उरला."
प्रज्ञा आणि कुणाल आलोककडे बघू लागले. "काऊंट द बॅड गाईज. जॉनी, सायरस, रेश्मा, अल्बर्ट, ला, नोम्मो, रसूल, निश्चितानंद ऑल डेड. गेनासेयरा लॉस्ट फॉरेव्हर. इलेगुआला मुक्ती मिळाली. राहिला फक्त किलर!"
प्रज्ञाने एक उसासा सोडला. "किलर. किलर एक कोडं बनून राहिला आहे आता जाधवांसाठी. त्या दिवशीच्या धांदलीत तो निसटला तो निसटलाच. रिपोर्टरने जंग जंग पछाडले पण किलरचा पत्ता लागला नाही. रसूल गँगची अनेक शकले झाली. एक नक्की कि तो कुठल्याच गँगशी संबंधित नाही पण तो काय करतोय हे कळायलाही मार्ग नाही. त्यात तो प्रचंड हुशार आहे. चांगली बाब इतकीच कि तो अविचारी नाही. पण हो तो निसटला."
याच वेळी कॉफीशॉपमधून एक तरुण बाहेर पडला. त्याने हलकेच त्या तिघांची मनात नोंद घेतली होती. त्यांनी आपल्याला ओळखले नाही याची खात्री करण्यापुरता तो सिगारेट ओढत बाहेर काही मिनिटे थांबला. मग टॅक्सीत बसून तो आपली फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळाच्या दिशेने निघाला. किलर खरंच निसटला होता.
०००

गेनासेयराची फ्री लाईफलाईनही एकदाची संपलीच. त्याचा डेटा तो व्हॅलिड म्हणून कोअरला पटवून देऊ शकला नाही आणि त्याची रवानगी गार्बेज कलेक्टर मध्ये झाली. तिथे पोहोचताच तो एका लोखंडी फळीवर आपटला आणि त्याचे हात पाय पोलादी कड्यांनी आवळले गेले. मग ती फळी उभी झाली आणि त्याच्या समोर ते दोघे होते.
"इलेलगी? जॉनी?"
"तर जॉनी हा आहे गेनासेयरा. मी सुद्धा याला ओझरताच पाहिला होता इलेगुआ बरोबर."
"ए ए तुम्ही दोघे इथे काय करत आहात? दूर व्हा माझ्यापासून, दूर व्हा. तुम्हाला माहिती नाहीये मी कोण आहे."
ते दोघेही यावर खदाखदा हसू लागले. "अरे आम्हाला माहितीये रे तू कोण आहेस. म्हणूनच तर तू इथे आला आहेस. तुझ्या कृपेने मी या जगात हरवून गेले. ना धड मृत्यु ना धड जीवन अशा अवस्थेत पोचवलंस तू मला. तेव्हा कोअरमध्ये पण तू खूप गडबडी करून ठेवल्या होत्यास त्यामुळे हा असा लॉस्ट डेटाचा पसारा कोण आवरणार? मग माझी मुक्तीची वेळ येईपर्यंत इकडे येणार्‍या ऑब्जेक्ट्सची विल्हेवाट लावण्याचं काम माझ्याकडे आलं. या जॉनीची कोअर बरोबर कंपॅटिबिलिटी जबरदस्त आहे त्यामुळे त्याला उडवणं शक्य नव्हतं. मग रूटने याला पण माझ्यासारखंच काम द्यायची व्यवस्था कोअरकडून करवून घेतली. आम्ही हे काम खूप एंजॉय करतो."
"अगदी! तर मि. गेनासेयरा तुम्हाला आम्ही इथे काय करतो याच एक नमुना दाखवतो."
गेनासेयराची नजर त्या फळीवर टांगलेल्या इसमाकडे गेली. चिंध्यांची बाहुली उसवून टाकावी तशी अवस्था झाली होती त्याची. मोठ्या कष्टाने त्याची ओळख पटली.
"निश्चितानंद?"
"ओह तू ओळखतोस याला? फॅन्टॅस्टिक! खरं तर आता रक्षकाची गरज उरली नाही म्हणून रक्षक इथे येणार होता क्लिनअप साठी पण त्या ठिकाणी काय झालं कोणास ठाऊक, याचा डेटा रक्षकाबरोबर मिसळला गेला. आता सुपर युजरने म्हणजे प्रज्ञाने ते बाहेरचे शरीर सामान्य कोल्हा वाटावा म्हणून सगळा डेटा इकडे पाठवला. हा पण आला. असो मग इलेलगी...."
"तू काम सुरु ठेव जॉनी. मी गेनासेयराकडे बघते."
गेनासेयराला आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याचा विचार करण्याची देखील भीति वाटू लागली. इलेलगीने दोन्ही हातात धरून काहीतरी खेचले. हवेतच ० आणि १ ची मालिका दिसू लागली.
"तर गेनासेयरा. तुला वेगळं सांगायला नकोच कि हा तुझा डेटा आहे. यातले ० आणि १ एकमेकांवर डिपेंडंट आहेत. आम्ही खूप सोप्या पद्धतीने हे क्लिन करतो. एक एक बिट उडवतो आणि त्याच्याशी रिलेटेड बिट्स आपोआप उडतात. म्हणजे समजा मी हा १ उडवला." असे म्हणत तिने टिचकी मारत त्या मालिकेतला एक '१' उडवला. तो धूर होऊन हवेत विरला.
पुढच्या क्षणी गेनासेयरा किंचाळला. पुळकन वस्तु बाहेर येणे हा म्हणायला मजेशीर वाक्यप्रयोग आहे पण त्याच्या उजव्या खोबणीतून अलगदपणे बाहेर आलेला डोळा पुळकन बाहेर आला असे म्हणणे योग्य नाही. हो ना?"
~*~*~*~*~*~

आलोकने आपली गाडी थांबवली. तो आणि प्रज्ञा दोघेही बाहेर आले. प्रज्ञाने काही पावले गेटच्या दिशेने टाकली असतील तोच तिला काय वाटले कोणास ठाऊक ती मागे वळली. आलोक गाडीच्या दाराला टेकून उभाच होता.
"माझ्याबरोबर काही शेअर करायचंय?"
प्रज्ञा परत फिरली. त्याच्या शेजारी गाडीला टेकून उभी राहिली.
"कधी कधी ना आलोक मला कळत नाही मी हे कसं मॅनेज करणार आहे. म्हणजे रूटच्या मदतीने इमिजिएट इम्पॅक्ट सगळा आता क्लिअर केला मी पण अजूनही युरुगुच्या जगात आणि त्याच्या आपल्याशी असलेल्या कनेक्शनमध्ये सुधारणा करायला खूप वाव आहे. पण कसं आहे ना काहीही बघितलं कि शक्यताच शक्यता आ वासून उभ्या राहतात. मी काय स्टॅटिशियन आहे का? म्हणजे मी पण माणूस आहे. आत मला हे जमेल अशी पण शक्यता आहे, मला हे जमणार नाही अशी पण शक्यता आहे. म्हणजे जमायला हवं हे खरं आहे पण जमणार नाही असं पण आहे म्हणजे काय आहे ना कि म्हणजे......... म्हणजे तुला कळतंय ना मी काय म्हणते आहे?"
आलोक दोन्ही हात जीन्सच्या खिशात घालून तिची मजा बघत होता. त्याने आपली जागा बदलली आणि तो तिच्या समोर उभा राहिला. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि हलकेच दाबले. मग हात तिच्या खांद्यावर ठेवून तो बोलू लागला.
"ऐक आता. जर तू म्हणतेस तशा २ शक्यता आहेत तर तू हे का बघत नाही कि किमान तुला जमेल अशी शक्यता तरी आहे. अशक्य नाहीये ते. आणि जरी मीही स्टॅटिशियन नसलो तरी मला एवढं कळतं कि जोवर प्रोबॅबिलिटी ० नसते तोवर अशक्य असं काही नसतं. कदाचित मानसीने तुला ही डिटेक्टिवगिरी करायला सांगणं योगायोग नव्हता. तुला ती केस जमण्याची शक्यता तर अजून नगण्य होती ना? बट सी व्हेअर वी आर! प्रज्ञा, मी तुला प्रपोज केलं तेव्हा जे सांगितलं तेच तुला पुन्हा सांगतो. शक्यता वगैरे मला कळत नाही पण मी कायम तुझ्याबरोबर असेन. आय प्रॉमिस. तेव्हा प्लीज ती अंगठी उजव्या हातात घालण्याचं मनावर घे बरं का."
आलोक, प्रज्ञाने लाजत त्याला बाजूला सारले. आलोकने तिचा हात धरत तिला अडवले. ती जागीच थांबली आणि तो तिच्याजवळ आला. आधी त्यांच्या नजरा लॉक झाल्या आणि काही क्षणांतच ओठ!

कुठल्याही गोष्टीच्या अंताच्या २ शक्यता असतात - एक सुखान्त आणि दुसरी........ पण एकंदरीत सुखान्त होण्याचे प्रमाण जास्त आहे दो आयडियली स्पीकिंग दोन्हींच्या शक्यता समान पाहिजेत. याचा अर्थ इदर धिस वर्ल्ड इज नॉट फेअर किंवा काहीजण म्हणतात तेच खरं,

अनियमिततेतही एक प्रकारची नियमितता असते.

(समाप्त)

(कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक! माबोव्यतिरिक्त ही कथा सध्यातरी कोठेही नसेल. जर तसे निदर्शनास आले तर कळवणे ही विनंती!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पायस,
तू अशक्य आहेस..
मी आज स्वप्नात पुस्तकात असण्याची प्रॉबॅबिलिटी खुप जास्त आहे..
सलग ९ ते अंतिम वाचुन काढली लेखमाला.. जिथे शेवटी थाम्बली होती त्या लेखापासुन न थांबता सलग..
मॅट्रिक्स..मायाजाल.. मज्जा आली पन..खतरनाक..

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! आधी थोडा बिचकलोच मी कि फसला कि काय शेवट पण मग समजले कि कॉम्प्लेक्स झालाय पण ठीक झालाय Happy
बाकी पियू यांच्या प्रतिक्रियेवरून हे सुचले (हलके घ्या कृपया) -> आता मी ठामपणे म्हणू शकतो कि मी वाचकांना 'वेड' लावणारा लेखक आहे Lol

_/\_

निवांत वाचनासाठी ठेवला होता हा भाग! मस्त जमलाय..सुंदर मालिकेचा सुयोग्य शेवट! हा भाग वाचताना यात मला एका हॉलीवूडपटाचा भास झाला! एकदम छान सिनेमा होईल ह्या मालिकेवर!

भन्नाट...जबरदस्त...लई भारी...सुपर्ब..म्हण्जे अजुन काय लिहु मी ????? -----/\-----
ह्याच पुस्तक काढायच तेवढ मनावर घ्याच

झक्कासच, दोन दिवसात सलग दोनदा वाचली. दुसर्‍यांना वाचताना एक दोन तुटके लटकवलेले धागे जाणवले पण एकंदर कथानकाची शक्याशक्यतेची थीम बघता ते मुद्दामहून ठेवले असण्याची शक्यता खरी असण्याचे प्रमाण जास्त आहे. दो आयडियली स्पीकिंग दोन्हींच्या शक्यता समान पाहिजेत. याचा अर्थ इदर धिस वर्ल्ड इज नॉट फेअर वगैरे वगैरे .... Wink

Complicated but an interesting read!!!
वाचायला मजा आली..

नवीन प्रतिसादकांचे (आणि रोमातल्या वाचकांचे) आभार!

दुसर्‍यांना वाचताना एक दोन तुटके लटकवलेले धागे जाणवले पण एकंदर कथानकाची शक्याशक्यतेची थीम बघता ते मुद्दामहून ठेवले असण्याची शक्यता खरी असण्याचे प्रमाण जास्त आहे. >> सही पकडे है Wink पण अगदी खरं सांगू का, अहो सीक्वेल/स्पिनऑफची सोय ठेवायला नको का? Happy

देवा.. हे वाचून मी वेडी झाले.. >>> मी पण Happy

मॅट्रिक्स..मायाजाल.. मज्जा आली पन..खतरनाक.. >>>> अगदी

हॉलीवूडपटाचा भास झाला! एकदम छान सिनेमा होईल ह्या मालिकेवर! >>>> खरोखर Happy

Speechless ahe me......Khupch Sundar..........Me tumchi varas ani ata hi katha vachli khupch sundar lihita tumhi mhanje suruvatila jara gondhalayla hota pn katha jashi pudhe jate tasa khupch interest vadhto......Pudhe kay honar yachi utsukta lagun rahte....... ani shevat tr agadich superb hoto....,.. me jam fan zaley tumchya kathanchi.....Khupch chhan

Superb... खुपचं सुंदर लिहिले आहे.,. एवढ्या गुंतागुंतीमध्ये तुम्ही कुठे अडकला नाही पण आम्ही चांगले अडकलो..पण शेवटी कथा उलगडत गेल्यावर खुपचं छान वाटले

Superb... खुपचं सुंदर लिहिले आहे.,. एवढ्या गुंतागुंतीमध्ये तुम्ही कुठे अडकला नाही पण आम्ही चांगले अडकलो..पण शेवटी कथा उलगडत गेल्यावर खुपचं छान वाटलेथ

अप्रतिम लेखन.
......... मात्र सर्व भाग एकत्र टाकू शकाल का??

Pages