फुसके बार – १७ जानेवारी २०१६ - साहित्य संमेलन कसले? – शोभेला दाखवण्यापुरते साहित्यिक, बाकी सगळा राजकारण्यांचा अड्डा

Submitted by Rajesh Kulkarni on 16 January, 2016 - 14:41

फुसके बार – १७ जानेवारी २०१६

साहित्य संमेलन कसले? – शोभेला दाखवण्यापुरते साहित्यिक, बाकी सगळा राजकारण्यांचा अड्डा

साहित्य संमलेनाच्या उद्घाटनाला व्यासपीठावर कोण असावेत अशी अपेक्षा आहे? उदाहरणार्थ पुढील नावे पहा. शरद पवार, देवेन्द्र फडणवीस, आढळराव, बारणे, जगताप, बापट, चाबुकस्वार, उल्हास पवार, महेश लांडगे, महापौर शकुंतला धराडे, महापौर धनकवडे, माजी राज्यपाल डी वाय पाटील, वगैरे. प्रमुख पाहुणे, उद्घाटक आणि महापौर यांच्याखेरीज तेथे बसलेल्यांना तरी प्रश्न पडायला हवा की नको का, की हे साहित्य संमेलनाचे व्यासपीठ आहे, आपण येथे का बसलेलो आहोत?

तीन-चार बिगरमराठी ज्ञानपीठ विजेत्यांना ठोंब्यासारखे व्यासपीठावर बसवले होते आणि त्यांचा दाखला देत हे संमेलन जणु काही आंतरभारती संमेलन आहे असा उदोउदो करून घेतला जात होता.

आपल्या खुसखुशीत वक्तव्याने सभा गाजवणारे पालकमंत्री अशी बापटांची ओळख करून देताच सगळीकडे हशा पिकला.

सबनीस हे केवळ नावापुरतेच अध्यक्ष आहेत असे वाटावे इतका स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांचा उदोउदो चालला होता. वर उल्लेख केलेल्या राजकारण्यांच्या पिलावळीचे सत्कार करताना मध्येच एक तरूण इसम येऊन फोटो काढण्यापुरता तेथे उभा रहायचा. पाटील परिवारापैकी कोणी असावा. असा केविलवाणा प्रकार चालू होता.

स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांनी सहा-सात पानी भाषण वाचून दाखवले. एक पान संपले की दुसरे पान कोठे चालू होते हे लक्षात न आल्यामुळे वेळ जात होता. असो. हा सोपस्कार एकदाचा पार पडला. पैसे मोजायची तयारी ठेवून संमेलन मिळाले, म्हणजे स्वागताध्यक्षपद मिळाले की मग हे मिरवायला मोकळे असा साहित्याच्या नावाखाली किळसवाणा प्रकारचालू झाला आहे. घुमानलाही हाच प्रकार झाला होता. बिनकण्याचे साहित्य महामंडळ असल्यावर वेगळे काय होणार? पिंपरी चिंचवड ही ज्ञानोबा-तुकाराम यांची भूमी हा एक सर्व राजकारणी वक्त्यांचा आवडता मुद्दा.

पी. डी. पाटील यांनी वैयक्तिकपणे एक कोटी रूपयांचा धनादेश नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनला दिला, याचा साहित्य संमेलनाशी काही संबंध होता का?

शरद पवाराचे भाषण सुरू होताच सातआठ लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांच्याकडचे बॅनर्स काढून घेतले. सलग चार संमेलनांना हजर राहण्याचा एक प्रकारचा विक्रम मी केला आहे असे पवार म्हणाले. तुमच्या उपकारापुढे उतराई होणारेच लोक असल्यावर तुम्हाला न बोलावून चालेल कसे, हा विचार त्यांना पडला कसा नाही? या न्यायाने ही चारच काय, पुढची आणखी दहा संमेलनेही त्यांच्या नावावर जमा होतील की! त्यांनीही ही संतभूमी असल्याचा दाखला दिला. हीच माझी कर्मभूमीही आहे असे ते म्हणाले. यांचे तेथील कर्म काय, तर पुतण्याच्या मदतीने तिथली महापालिका लुटून खिळखिळी करून टाकली. गुंडगिरी चालू केली.

सबनीसांना मी अध्यक्ष केले नाही. मी त्यांची निवड झाल्यावर त्यांना प्रथमच भेटलो. महाराष्ट्रात काहीही झाले, अगदी तो कोयनेचा किंवा किल्लारीचा भूकंप झाला तरी काही लोक ते मीच केले असे म्हणतात, असा पाचकळ विनोदही करून झाला. यावरून ते किती बदनाम झालेले आहेत हेदेखील त्यांच्या लक्षात आले नाही.

आम्ही राजकारणी मते कशी मिळवतो हे साहित्यिकांनी पाहू नये असा सल्ला शरद पवारांनी दिला. उपस्थित यावर खिदळले तरी यातून या राजकारण्यांचा निर्लज्जपणाच दिसून येतो, तेव्हा आपण काय बोलत आहोत हेही पवारांच्या लक्षात आले नाही. पाच माजी संमेलाध्यक्षांपैकी कोणाची समिती नेमून नवीन अध्यक्षाची निवड करावी व सध्याची मतदानाने करण्याची पद्धत बंद करावी असा सल्ला त्यांनी दिला. साहित्याच्या क्षेत्रात शुचिता हवी, पण यांच्या राजकारणाचे क्षेत्र यांनीच जे बाटवले, राज्य लुटण्याच्या अभिनव कल्पना तयार करून भ्रष्टाचाराचे नवनवीन विक्रम करणारी व गुंडांची मोट बांधणा-यांना साहित्य संमेलनात प्रवेश मिळतो, एवढेच नव्हे तर त्यांना व्यासपीठावर बसायला मिळते, आणि वर तेच साहित्यिकांना उपदेश करण्याची हिंमत करतात, यातही कोणाला काही वावगे वाटत नाही शिवाय उठसुट त्या देवी सरस्वतीचा अशा प्रसंगी जयघोष केला जातो, तिची विटंबना होते याचीही चाड कोणाला राहिलेली नाही.

डी. वाय. पाटील यांनी शरद पवारांनी त्यांना दोन कॉलेजेस कशी एका मिनिटात मंजूर करून दिली याची आठवण सांगितली. मध्ये पवारांनी दीनानाथ हॉस्पिटलचा भुखंड कसा असाच एका मिनिटात मंजूर केला होता याचीही कोणीतरी आठवण सांगितली होती. पवारांनी असे करून कोणाकोणाला मिंधे करून ठेवलेले आहे, म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी आणखी दहा संमेलनाना सहज हजेरी लावू शकतील ते.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण मात्र प्रभावी झाले. सर्वांच्या भल्यासाठी सकारात्मकतेची गरज आहे असे ते म्हणाले. साहित्यात मतभेद झाले तरी त्यातून सकारात्मकता निर्माण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विवेकानंदांचे नाव त्यांनी घेताच ‘ब्रदर्स अँड सिस्टर्स’चा उल्लेख करतात की काय असे वाटले. मात्र ते म्हणाले, की एकच सत्य आहे असे प्रत्येक धर्म सांगतो. फक्त त्या सत्यापर्यंत नेण्याचा प्रत्येक धर्माचा मार्ग वेगवेगळा आहे तर मग त्यासाठी धर्माधर्मात संघर्ष कशासाठी? प्रत्येक संमेलनात आमची सीमावासियांशी बांधिलकी आहे हे बोलून दाखवायचे असे. तशी पद्धत आहे. मात्र नंतर त्याबाबतीत काही केले नाही तरी चालते हे सीमावासियांनाही माहित आहे व महाराष्ट्र सरकारलाही. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्र्यांनीही त्याचा उल्लेख केला. पण त्याचे महत्त्व तेवढेच.

मुळात कार्यक्रम चालू होण्यास उशीर झाल्यामुळे व नंतरही हारतु-यांमध्येच भरपूर वेळ लागल्यानेच बहुधा मुख्यमंत्र्यांना अध्यक्षांचे भाषण होण्यापूर्वीच पूर्वनियोजीत कार्यक्रमापूर्वी निघावे लागले. मात्र त्यावरून मुख्यमंत्र्यांनी सबनिसांवरची नाराजी दाखवली असा प्रचार केला जात आहे.

संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेवर नजर टाकली तर भरगच्च साहित्यिक कार्यक्रम वगैरे अजिबात दिसत नाहीत. अगदी तुरळक कार्यक्रम आहेत. तेव्हा चार दिवसांचे संमेलन असले तरी साहित्यिक देवाणघेवाण किती होते हा कळीचा मुद्दा राहतोच आणि तो कोणी विचारायचाच नाही असे दिसते. एवढेच नव्हे तर प्रेक्षकांमध्ये साहित्यिक किती हे तर कधी सांगितले जातच नाही. मधु मंगेश कर्णिक, विश्वास पाटील यांची नावे घेण्यापुरतीच उपस्थिती असावी असे वाटण्यासारखी परिस्थिती आसे.

थोडक्यात हे साहित्य संमलेन नाहीच. खरे तर सांस्कृतिक संमेलन व राजकारण्यांचे संमेलन आयोजित करून मध्येच एखादा साहित्यावरचा कार्यक्रम चुकून टाकला आहे की काय असे वाटावे.

नंतर मग स्वत: श्रीपाल सबनीस यांचे भाषण. ते शंभरपेक्षा अधिक पानांचे असल्याचे आधी वाचले होते, त्यामुळे खरे तर मनात धडकी भरली होती.

पण येथे तर त्यांचे उत्स्फूर्त भाषण होते. त्यांनी सुरूवातच इसिस वगैरेंच्या दहशतवादापासून केली. ते चुकीच्या जागी तर भाषण करत नाहीत ना असे क्षणभर वाटले. त्यांच्या बोलण्याचा सूरच रेकण्याचा होता. ते थोडेही शांत – निश्चिंत दिसत नव्हते. एवढेच नाही तर त्यांचे हात थरथरत होते. इतके की त्यांनी मधून पाणी पिले, पण थरथरत्या हातांमुळे त्यांना ते धड पिताही आलेही नाही. कदाचित अशा मोठ्या व्यासपीठावरून भाषण करण्याच्या कल्पनेमुळेच ते भांबावले असावेत.

संतांना जातीच्या चौकटीत बांधण्याचे उद्योग, सगळेच ब्राह्मण नथुरामी मनोवृत्तीचे असतात का. कितीतरी ब्राह्मणांनी चांगली कामे केली, तर त्यांनाही प्रस्थापितांमध्येच मोजणार का, वगैरे प्रश्न त्यांनी विचारले, पण मी म्हटले तसे ते अतिशय अस्वस्थ वाटत होते, त्यामुळे त्यांच्या भाषणाला प्रभावी वगैरे म्हणता येणार नाही. त्यात आक्रस्ताळेपणा फार होता. त्यांनी अध्यक्षीय म्हणावे त्या भाषणाच्या प्रती वाटायला किंवा विकत घ्यायला ठेवल्या असल्याने हे धड ना अध्यक्षीय भाषण, ना काही असा थोडा प्रकार झाला.

भाषणाच्या सुरूवातीला पवारांना लोकनेता, जाणता राजा वगैरे विशेषणे लावून काही इतर अध्यक्षांपेक्षा आपण वेगळे नाही हेदेखील त्यांनी दाखवून दिले. बिनकण्याचे अध्यक्ष असले, की स्वागताध्यक्षांसारख्याचे फावते व त्यांना मोकळे रान मिळते हेच या व मागच्या संमेलनापासून दिसू लागले आहे.

नेमाडेंचे साहित्य संमेलनाचे मत सर्वांनाच परिचित आहे. या उदाहरणामुळे त्यांचे म्हणणे बरोबर आहे हे पटावे.

या सगळ्या दलदलीत एकच चांगली गोष्ट झाली ती म्हणजे गुलजार यांचे सुरूवातीचे भाषण व नंतरची अंबरीष मिश्र यांनी घेतलेली तेवढीच छान मुलाखत. गुलजार यांचा त्यांच्या कविता वाचण्याचा मुड होता. त्यामुळे खरोखर बहार आली. पण त्याबद्दल वेगळेच लिहायला हवे.

एवढे मात्र खरे, त्यांच्याकडून इतक्या कविता ऐकल्यावर असे झाले की परतताना समोर लेन कटिंग करणा-यासाठी गाडीचा हॉर्न वाजवण्याऐवजी त्यावरही कविता करावीशी वाटली. ती करता येत नाही ते वेगळे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"सन्तान्ची जात- निहाय वाटणी यामुळे राज्याचे झालेले नुकसान. मीडिया हा लोकशाहीचा चौथा खाम्ब आहे की तिरडीचा ? " - असा सवाल श्री. श्रीपाल सबनीस यान्नी केला.

मला भाषण आवडले.

उदय,
त्यांनी तिरडीबद्दलचा सवाल सर्वच घडामोडींना उद्देशून केला असता तर अधिक योग्य ठरले असते. ते वास्तवही आहे. पण त्यांनी 'एका माणसाला धरून' असे म्हणत ते विधान केल्यामुळे ते वैयक्तिक पातळीवरचे झाले. त्यांच्या संदर्भातील वादाला तेच जबादार आहेत.

भाषण आवडले.सबनिस प्रभावि वक्ते नाहित मात्र तळमळ आवडली.नथुरामी विचारसरणीबद्दल बोलले तेही पटले.

राजकार्ण्यांवाचुन पान अडते पावलोपावली तरीही अशा निमित्ताने राजकारण्यांवर दुगाण्या झाडायची खोड काही जात नाही.
संमेलनाची व्यवस्था खूप चांगली आहे. खर्चिक आहेच पण त्याकरता कुणी नाके मु रडायचे काय कारण?

कुलकर्णी लेख छान! इथे फक्त नथुरामी विचारसरणीबद्दल (?) बोलले गेल्याची स्तुती होत आहे हेही अपेक्षितच. त्यापलीकडे जाऊन विचार करण्याची कुवत किती दशकांनंतर येणार कोण जाणे.

बेफि, नथुरामी विचारसरणीच्या अलिकडे कोणता विचार करतात त्याबद्दलही बोलणार का जरा दोन शब्द तुमच्या कुवतीनुसार ?
ते झालं, की जाऊ त्यापलिकडे.

मागेच मि एका लेखावर प्रतिसाद दिला होता की सारे हिंदु एक आहेत असे बोलले जाते. मग एखादे जातदर्शक चिन्ह का दर्शवावे लागते. सबनिस साहेबांनीही तसाच मुद्दा उचललाय त्यांनी ते जानवे घालत नाही असे सांगितले.सबनिसांचे पुरोगामि भाषण व समोर साक्षात जाणता राजा पवार साहेब हा दुग्धशर्करायोग ह्या संमेलनाच्यि निमित्ताने जुळुन आला.

एक मुद्दा राहिलाच. यापुढे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांनी निवडणुक होउ नये त्या ऐवजी पाच माजीसंमेलनाध्याक्षांची एक कमीटी नेमून निर्णय व्हावा असे मा शरद पवार म्हणाले. मते मिळवणे आमचा प्रांत आहे अशीही पुस्ती त्यांनी जोडली. यासाठी जे काय प्रकार करावे लागतात त्याच आमची मास्टरी आहे म्हणुन मी इतके वर्ष राजकारणात आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.

मागे एकदा आधीच्या तारखेला लावलेली शाई पुसुन पुढच्या तारखेला दुसर्या मतदार संघात जा हे विधान त्यांनी माथाडी कामगारांच्या सभेत केले होते. नंतर तो विनोद असल्याचे त्यांनी निवडणुक आयोगाला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हणले होते.

या साहित्य संमेलनात पिट्या निवडुन आणायला खुपच कष्ट झाले असावेत म्हणुन पवार साहेबांनी अचानक नेहमीची निवडणुकीची प्रथा बदलुन पाच माजी संमेलनाध्यक्ष यांच्या समितीचा प्रस्ताव दिला. वयही वाढते आहे. ही दगदग करण्या ऐवजी हा प्रस्ताव त्यांना सोयीचा वाटला असेल.

ते पाच अध्यक्ष कोण हे मी ठरवणार ( हे वाक्य पवार साहेब बोलले नाहीत पण लोकांना समजले असावे ) सबनिसांसारखे मिंधे पाच अध्यक्ष त्यांच्या कडे असणारच. दर वेळेला सत्ता असो की नसो बोलता येवो वा ना येवो मी साहित्य संमेलनाला हजेरी लावणार असा साहेबांचा निर्धार आहे असे दिसते.

साहित्यीक बरे असतात. फुगवले की फुगतात. नुकतेच झालेले असहिष्णुता आंदोलनात बरेच योगदान त्यांचे आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे आता लोकांना समजले आहे.

त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे आता लोकांना समजले आहे. >> व्वा काय निष्कर्ष आहे. आवडले बुवा. म्हणजे ही तर कबुली सरकार निष्क्रिय आहे याची. अजुन ही सरकारवर वर्चस्व कुणाचे आहे आणि कोण चालवणारे आहे हे लोकांना कळून येते Wink

राहिले दोनदामतदान करण्याचे उदाहरण ते तर भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सुध्दा दिले आहे. त्यांचे बरे नाव आठवले नाही. असो चालायचे.

सबनिसांसारख्या धडाडीच्या परिवर्तनवाद्याला
>>
हो हो, त्यांच्या बोलण्या वागण्यात सतत परिवर्तन होत असते. बिन बुडाच्या गाडग्यासारखे.

सबनिसांनी जानवेशाही नाकारलीय किती जणांमध्ये इतके धैर्य असेल? साहित्य संमेलना सारख्या कार्यक्रमात नथुरामी प्रव्रुत्तिवर शरसंधान, मी तर सबनिस साहेबांचा फँन झालोय.