स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 5 January, 2016 - 21:46

स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल

पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल

खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल

शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव
तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल ?

आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा
म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा
स्वदेशीचे ढोंगधतूरे; खातोस विदेशातली दाल

छल कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता
'अभय' जाहली जर भूमिकन्या, मरशील लाथा खाता
तुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल

- गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वदेशीचे ढोंगधतुरे : नागपुरी तडका
काव्यवाचन : श्री राजीव खांडेकर, मुख्य संपादक, एबीपी माझा
कवी : गंगाधर मुटे

फ़ेसबूकवर VDO बघण्यासाठी लिंक

https://www.facebook.com/gangadharmute/videos/1202161426475210/