एव्हरग्लेडस नॅशनल पार्क

Submitted by रायगड on 4 January, 2016 - 12:50

नुकतीच फ्लोरीडा राज्याची सफर करून आलो. दक्षिण फ्लोरीडमध्ये पसरलेल्या 'एव्हरग्लेडस नॅशनल पार्क'ला भेट दिली त्याची ही थोडक्यात सफर!

मध्य फ्लोरीडामध्ये असलेल्या 'ओकीचोबी' या प्रचंड मोठ्या तलावातून निघणारी नदी या पार्कातून अत्यंत धीम्या गतीने वहात फ्लोरीडा बे (समुद्राला) मिळते; त्या पाण्यात वाढणारी सॉग्रास (sawgrass) गवताची प्रचंड कुरणं असं या पार्केचं स्वरूप! १.५ million acres असा भव्य पसरलेला हा एकंदरीत पार्क म्हणजे वेटलँड, पाणथळीचा भाग आहे. पार्कचे वर्णन गवताची नदी असेही करतात. हे sawgrass म्हणजे पानांच्या दोन्ही बाजूला करवतीसारखे बारीक-बारीक दाते असलेली, लांब पानांची लव्हाळयाच्या जातीची वनस्पती.


great white egret in the sawgrass field


Sawgrass closeup - नेटवरून साभार

या नॅशनल पार्कला तीन- चार प्रवेशमार्ग आहेत. मायामिपासून साधारण तासभराच्या अंतरावर दोन आहेत. एक म्हणजे शार्क व्हॅली प्रवेशमार्ग आणि दुसरा 'होमस्टेड' प्रवेशमार्ग. 'शार्क व्हॅली' मार्गे आत शिरून शार्क व्हॅली व्हिजिटर सेंटरला जाऊन तिथली ट्रॅम टूर बूक केली. पार्क रेंजर या टूरवर माहिती देत ही ट्राम १५ मैलाचा लूप फिरवून आणतो. वाटेत अनेक पाणपक्षी , मगरी असं प्राणीजीवन आणि गंबो-लिंबो सारखी विविध झाडं, वनस्पती दिसतात आणि रेंजर/ रेंजरीण बाई त्यांची माहिती देतात.


Tram in Shark Valley

गंबो-लिंबो हे फ्लोरीडातील नेटिव्ह ट्रॉपिकल झाड. लाल रंगाचं सहज खरवडून निघणारं खोड हे याचं वैशिठ्य! झाडचं लाकूड हलकं, मऊ, सहजपणे कोरता येईल असं असलं तरी फ्लोरीडातल्या प्रचंड हरिकेन वादळांना तोंड देत हे भक्कमपणे उभं रहातं. क्षारयुक्त पाण्यात तगू शकण्याच्या याच्या वैशिठ्यामुळे किनारी प्रदेशात हे झाड आढळतं.


गंबो-लिंबो झाड - नेटवरून साभार


गंबो-लिंबो झाडाची माहिती

१५ मैलाच्या या गोलाकार फिरणार्‍या (loop trail) ट्रेलवर मध्यवर्ती एक observation tower आहे. त्यावरून आजू-बाजूच्या दलदलीच्या, गवताळ प्रदेशाचं विहंगम दृश्य दिसतं.


Shark valley observatory tower


observatory tower मधून दिसणारा परिसर

शार्के व्हॅलीहून मग गेलो ते गल्फ कोस्ट व्हिजिटर सेंटर पाशी. शार्के व्हॅलीपासून पश्चिमेला सुमारे ५० मैलावर गल्फ कोस्ट व्हिजिटर सेंटर आहे. या भागातून बोट टूर्स घेऊन खारफुटीची बेटं बघता येतात. खारफुटी (mangrove) ही या भागातली महत्वाची वनस्पती , खार्‍या पाण्यात वाढणारी! असंख्य जलजीवांना आणि वनस्पतींना निवारा, खाद्य देणारी ही वनस्पती जैविक साखळीत खूप महत्वाची आहे. अर्थात मुंबईककरांनाही खारफुटी नविन नाहीत. उरण, रेवस-मांडवा ई. ठिकाणी अनेक खारफुटी आहेत.

तर बोटीतून या बेटांच्या प्रणालीतून फिरणे, आजू-बाजूला दिसणारे पक्षी-प्राणी न्याहाळणे, ती मोहक शांतता न्याहाळणे हा फारच देखणा अनुभव होता. अर्थात हा भाग पाणथळीचा, दलदलीचा (swampy) असल्याने डासांचं प्रमाण भयंकर आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने डास तितकेसे नव्हते. पण रेंजरच्या सांगण्यानुसार उन्हाळ्यात काही-काही भागात लक्षावधींच्या झुंडींनी डास असतात. Sad रेंजरच्या शब्दात सांगायचं झालं तर - "If you encounter them in groups of millions, then may Lord save you!" ते ख्रिसमसचे दिवस असल्याने लॉर्ड साहेब तसेही जरा बिझी असणार ते कुठले आपल्याला वाचवायला येतायत...या विचाराने आम्ही जरा घाबरलोच. पण लॉर्डची कृपा होती म्हणायचं कारण फारसा डासांचा सामना करावा लागला नाही!

ऑस्प्रे हा पक्षी, त्यांची घरटी, वेगवेगळे पाणबदके, करकोच,पेलिकन्स, मगरी बघत ही दोन तासांची टूर संपली. पण या भागात आढळणतरी, प्रोटेक्टेड जलचर, मॅनॅटी आम्हाला दिसला नाही.


मगर


मगर - क्लोजअप


अन्हिंगा - मादि


खारफुटीची मुळे


ऑस्प्रे


खारफुटीच्या जंगलातून मार्गक्रमण

बाहेर येईपर्यंत पाच वाजून गेलेले. पार्क बंद होण्याची वेळ आणि सूर्यास्ताचीही वेळ. त्यामुळे निघालो पण पार्कचा दक्षिणेचा भाग बघायला परत दुसर्‍या दिवशी येण्याचं ठरवून.

दुसर्‍या दिवशी दक्षिणेच्या प्रवेशातून शिरून तिथल्या भागातल्या अन्हिंगा व गंबो-लिंबो ट्रेल्स केल्या. ह्या दोन तिथल्या मुख्य ट्रेल्स. अन्हिंगा ट्रेल ही लाकडाची पाणथळीवर बनवलेली (boardwalk) आहे तर गंबो-लिंबो ही गंबो-लिंबोच्या जंगलातून जाणारी. या ट्रेल्सच्या पार्किंग लॉटमध्येच आपले स्वागत करतात ते टर्की व्हल्चर्स हे तिथे प्रचंड संख्येने असणारे व्हल्चर्स - गिधाडं.


टर्की गिधाडं


गंबो- लिंबो ट्रेल


Great white egret

अन्हिंगा या या परिसरात आणि एव्हरग्लेडस मध्ये सर्वत्रच आढळणारा पाणपक्षी. सर्पपक्षी असेही त्याला म्हणतात. मासे हे त्याचं प्रमुख खाद्य. ते पकडायला पाण्यात जाऊन, पाण्याखाली पोहत केवळ ती लांब मान बाहेर काढून तो बघतो तेव्हा पाणसापच असावा असं वाटतं. पाण्यात पोहत असला तरी बदकांसारखे त्याच्या पंखाखाली तेल स्त्रवणार्‍या ग्रंथी नसतात. त्यामुळे पंख ओले होतात आणि बाहेर येऊन ते उन्हात सुकवावे लागतात तरच त्यांना उडता येऊ शकते. असे अनेक अन्हिंगे ठायी ठायी पंख पसरून सुकवत बसलेले दिसले.


अन्हिंगा - नर

इथून परत फ्लेमिंगो व्हिजीटर परिसरात संध्येचे रंग अनुभवण्यास गेलो.एक जादूभरी संध्याकाळ इथे अनुभवली. २५-३० च्या संख्येने बगळे पाण्यावरून त्यांच्या घरट्यात उडत जाताना दिसत होते. आकाशात गहिरे गुलाबी रंग आणि ती अदभुत शांतता!

रेंजर्सची माहितीपूर्ण लेक्चर्स, व्हिजिटर सेंटर मध्ये दाखवण्यात येणार्‍या पार्क, त्यातील ईकोसिस्टीमची माहिती देणार्‍या फिल्मस सारं पाहून-ऐकून वेगळ्याच अनुभुतीने बाहेर पडलो.


घरट्यावरील ऑस्प्रे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान माहिती दिलीयेस.. . तो ट्रेल खूप मस्त दिस्तोय.. अन्हिंगा,मगर छान आहेत.. टर्की वल्चर्स चा फोटो स्पष्ट नाही दिसत आहे.. सगळे फोटो जरा मोठे करून टाक ना.

मस्तच फोटो. आम्ही पण नाताळच्या सुट्टीत मायामी ला गेलो होतो तेव्हा एव्हरग्लेडस नॅशनल पार्क ला भेट दिली होती. पण फोटो एवढे चांगले नाही आले. कदाचित ढगाळ वातावरणा मुळे असेल.

आमच्या बोटीच्या गाईड नुसार, डासामुळे त्याना (म्हणजे त्याचा पुर्वजाना ) अमेरिकन ईडियन वर ह्या भागात विजय मिळवायला खुप त्रास झाला आणि ह्या उद्यानाचा काही भाग त्याचासाठी राखिव करावा लागला.

Sawgrass च्या पानाचे हिरवे साल काढल्यास आत बॅडेज सारखे फायबर निघते त्याचा उपयोग अमेरिकन इंडियन्स जखमेवर पट्टी म्हणुन वापरत होते.

वा! खुप छान आहे. अजून लेख मोठा हवा होता असे वाटले.
चित्रे अप्रतिम!

साहिल अधिक माहिती आवडली.