द बूक थीफ - इंग्रजी चित्रपट

Submitted by दिनेश. on 3 January, 2016 - 06:23

द बूक थीफ हा २०१३ सालचा चित्रपट. मी सिडीवर बघितला. मला खुप आवडला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळातला, जर्मनीमधला असूनही या हिंसाचारापेक्षा भर आहे तो नातेसंबंधांवर, निखळ प्रेमावर. या नात्यांवर तत्कालीन परिस्थितीचे सावट नक्कीच आहे, पण तरीही त्यात हि नातीच, तीदेखील रक्ताची नसलेली जास्त दृढ होत जातात.

याचे कथानक थोडक्यात लिहितो..

हि कथा आहे लिझेल या मुलीची. तिच पुस्तकचोर पण तिच्या मते ती चोरी करत नसून पुस्तके उसनी घेत असते.
पण तिचे आयूष्य खासकरुन चित्रपटाच्या काळातले अक्षरशः मृत्यूच्या छायेखाली आहे. आणि प्रत्यक्ष मृत्यूलाच
तिचे कौतूक वाटते. चित्रपटाचे निवेदनही मृत्यूच्याच तोंडचे आहे.

कम्यूनिस्ट असल्याच्या संशयावरून एका स्त्रीला ताब्यात घेतलेले आहे. तिला आगगाडीतून नेले जात आहे. तिच्या कुशीत तिचा लहान मुलगा आहे आणि तिच्या शेजारी तिची मुलगी म्हणजेच लिझेल आहे. लिझेलचे आपल्या भावावर खुप प्रेम आहे आणि तिची नजर त्याच्या चेहर्‍यावर खिळलेली आहे आणि अचानक..

अचानक तिला जाणवते कि तिचा भाऊ मृत झालेला आहे. त्या परिस्थितीत रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच त्याचे दफन केले जाते. आणि तो खड्डा खोदणार्‍याच्या खिश्यातून एक पुस्तक तिथे पडते. लिझेल ते उचलते. हि तिची
पहिली चोरी.

तिच्या आईचे पुढे काय होते ते कळत नाही, पण तिला मात्र एका कुटुंबाकडे सोपवले जाते. त्यांना अशी मुले
संभाळण्यासाठी सरकारतर्फे भत्ता मिळणार असतो. आणि त्याच कारणासाठी बहुदा ते जोडपे लिझेलचा
संभाळ करण्यासाठी तयार असते. खरं तर ती आई, दोन मुलांच्या जागी एकच मिळाले म्ह्णून नाराज असते.

ती फार कठोरपणाचा आव आणत असते. बाबा मात्र फार प्रेमळ असतात. आई च्या बोलावण्याला लिझेल दाद
देत नाही, पण बाबांनी, उतरावं राणीसाहेब असं आर्जव केल्यावर मात्र खुदकन हसते.

त्यांच्या घरी नवीन मुलगी आलीय हे शेजारचा लहानगा रुडी बघतो आणि धाडकन तिच्या प्रेमात पडतो. दुसर्‍या दिवशी आईने सांगितलेय तूला शाळेत न्यायला, असे सांगत तिच्या घरी येतो. मग लगेच आईने नै कै सांगितलेले, मीच आलो, असेही सांगून टाकतो.

शाळेत बाई तिला फळ्यावर नाव लिहायला सांगतात. आता आली का पंचाईत. कारण लिझेलला मुळी अक्षरओळखच नसते. ती काही नाव लिहू शकत नाही, शाळेतली मुले तिला चिडवू लागतात. लिझेल अर्थातच
खट्टू होते. त्यातून एक मुलगा जरा जास्तीच चिडवतो पण आपली लिझेल काही कमी नसते, त्याला शाळेबाहेर चांगला बुकलून काढते. मग काय ती शाळेची हिरॉईन ठरते आणि रुडी तर तिच्यावर आणखीनच लट्टू होतो.

तिला अक्षरओळख नाही पण वाचायची ईच्छा आहे हे तिच्या बाबांना कळते. ते तिला त्यांच्या घराचे तळघर
आंदण देतात. तिथे भिंतीवर तिने नवीन शिकलेले शब्द लिहायचे, अशी योजना होते. लिझेल भराभर
शब्द शिकत जाते.

हिटलरचा विखारी प्रचार चालूच असतो. सर्व लहानग्यांनाही भरती केले जाते. लिझेल आणि रुडी देखील त्यात
ओढले जातात. या प्रचाराचा भाग म्हणून पुस्तकांची होळी केली जाते. आपल्याला प्रिय अश्या पुस्तकांची होळी
होताना लिझेलला खुप त्रास होतो, पण तिचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी ते तिने केलेच पाहिजे
असा तिच्यावर दबाव आणला जातो. ती नाईलाजाने पुस्तक होळीत टाकते खरे पण गर्दी पांगल्यावर त्यातले
जळके पुस्तक उचलून घेते. तिला पुस्तक उचलताना तिथल्या मेयरची बायको बघते.

हिटलरच्या काळात ज्यूंना वेचून वेचून पकडले जात असते. एका घरात एक आई आणि तिचा तरुण मुलगा, मॅक्स रहात असतो. दोघांपैकी एकजण पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवू शकणार असतो. आई अर्थातच मॅक्सला बळजबरीने पळायला भाग पाड्ते. त्याचे बाबा आणि लिझेलचे बाबा मित्र असतात. तो त्यांच्याकडेच आश्रयाला येतो. त्या काळात एखाद्या ज्यूला घरात आश्रय देणे म्हणजे जीवावरचा धोका तरी लिझेलचे आईबाबा ते धाडस करतात.

त्याची रवानगी तळघरात होते आणि अर्थातच लिझेलला एक नवा संवगडी असतो. मॅक्स त्यांच्याघरी येतो त्यावेळी उपासमारीने खंगलेला असतो. लिझेलला त्याच्यात आपला छोटा भाऊ दिसतो. आपल्याकडचा भावाचा फोटो ती त्याला देते आणि त्याची मनापासून सेवा करत्ते. तो पण तिला आपल्याकडचे एक पुस्तक देतो.

त्याला तळघरातून बाहेर येणे शक्यच नसते. शाळेतून आली कि लिझेल धाड धाड जिने उतरत तळघरात येते.
आणि त्यांच्या गप्पा सुरु होतात. आजचा दिवस कसा आहे, असे तो तिला विचारतो तर ती म्हणते ढगाळ आहे. तो म्हणतो तसे नाही, तूझ्या शब्दात सांग.. ती त्या दिवसाच्या हवामानाचे आपल्या शब्दात सुंदर वर्णन करते.

मग तो पण एक खेळच होतो. बाहेर बर्फ पडल्यावर ती आणि बाबा बादल्या भरून बर्फ तळघरात नेतात. मॅक्स, ती आई आणि बाबा तळघरातच बर्फाने खेळतात. त्या बर्फाचा ते तिथेच स्नो मॅन करतात.. तो बर्फ वितळणार नाही असे त्यांना वाटते पण होते भलतेच, तो वितळतो आणि मॅक्सला सर्दी बाधते. अगदी वाचेल का नाही,
अशी शंका यायला लागते. आपल्यामूळे मॅक्स आजारी पडला असे लिझेलला वाटत राहते. आणि तो मेला तर काय करायचे, याची आईबाबांना काळजी वाटते.

पण सुदैवाने मॅक्स वाचतो. त्याच दरम्यान त्यांचे तळघर शोधायला पोलिस येतात. मॅक्स कसाबसा वाचतो, पण आपल्यामूळे या कुटुंबावर कधीही गदा येऊ शकेल अशी रास्त भिती वाटल्याने घर सोडून जातो. त्याला निरोप देणे लिझेल आणि तिच्या आईबाबांना खुपच कठीण जाते.

एका मित्राला पोलिस पकडायला आल्यावर लिझेलचे बाबा, तो ज्यू नाही जर्मन आहे असे सांगत मधे पडतात. तर पोलिस त्यांना ढकलून देतात, इतकेच नव्हे तर त्यांचे नाव नोंदवून घेतात. असे नाव नोंदवून घेणे म्हणजे काय हे त्यांनाही कळते.

काही काळानंतर त्यांना सैन्यात भरती व्हायचा आदेश येतो. आधीच थकल्यामूळे ते फार काम करू शकत नसतात आणि त्यात त्यांना असे भरती व्हावे लागते. आता घरात लिझेल आणि आईच उरतात.

पुढे लहानग्या रुडीलाही सैन्यात शिक्षणासाठी भरती होण्याचे फर्मान येते. त्याला तर अजिबात जायचे नसते.
तो आणि लिझेल पळून जायचा प्लान करतात पण जाणार कुठे ? मग नदीकाठच्य निर्जन जागी जाऊन,
हिटलरच्या नावे बोंबा मारून येतात.

बाबा काम करत नसल्याने लिझेलच्या आईलाच वरकड कामे करावी लागतात. ती लोकांच्या कपड्यांना इस्त्री
करून द्यायची कामे करते. असे इस्त्री केलेले कपडे पोहचावायला ती लिझेलला मेयरच्या घरी पाठवते. याच मेयरच्या बायकोने तिला पुस्तक उचलताना बघितलेले असते. ती तिला आपल्या लेकाची लायब्ररी उघडून देते आणि कधीही पुस्तके वाचायला ये असे आमंत्रण देते ( या लेकालाही सरकारने गायब केलेले असते. )

पण पुढे काही कारणाने मेयरच तिच्या तिथे येण्याला हरकत घेतो. पण तिला तर पुस्तकांची अनावर ओढ असते, मग अर्थातच ती खिडकीतून शिरून पुस्तके " उधार " घ्यायला सुरवात करते.

रुडी अर्थातच तिच्या मागावर असतो, आणि त्या गडबडीत त्याच्या हाती, मॅक्सने लिझेलला दिलेले पुस्तक लागते. त्याच्या मनात भयंकर असूया निर्माण होते. हा तूझा नवा मित्र का ? असे तिला विचारतो तो. पण शेवटी लिझेलला त्याला खरे सांगावे लागते आणि ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकते, अशी खात्री तोही
तिला, एक दिव्य करून पटवून देतो.

युद्धाचे दिवस असल्याने रात्री अपरात्री बॉम्ब हल्ला होणे हे नित्याचेच. सायरन वाजला कि सर्व रहिवाश्यांनी
बंकरमधे जायचे हेही नित्याचेच. अश्याच एका प्रसंगी लिझेल एक उस्फुर्त कथा रचून सर्वांना ऐकवते आणि
त्या वेळचा ताण हलका करते.

पण सायरन नेहमीच वाजतो असे नाही. एका रात्री तो वाजतच नाही. चुकून लिझेलच्या गल्लीवरच बाँब हल्ला होतो. सर्वजण गाढ झोपेत असतानाच.. सर्वकाही उध्वस्त होते...

पण नाही, चित्रपट इथे संपत नाही.. पुढच्या काही मिनिटात अशी काही दृष्यमालिका पडद्यावर येते कि तूम्ही एकाचवेळी अश्रुही गाळता आणि हसतही राहता.

मी इथे फारच त्रोटक लिहिले आहे. पडद्यावरचा प्रत्येक प्रसंग कलाकारांनी जिवंत केलेला आहे.
तरी वानगीदाखल एकदोन प्रसंग लिहितो.

सायरन वाजल्यावर सगळेजण बंकरमधे जातात. लिझेलला मॅक्सची काळजी वाटते, पण तो म्हणतो मी
तसाही तळघरातच आहे, माझी काळजी करु नकोस. सगळे बंकरमधे गेल्यावर तो हळूच निर्जन रस्त्यावर येतो आणि चांदण्या रात्रीचा आस्वाद घेतो. असा मोकळ्या आभाळाखाली तो कित्येक दिवसात आलेला नसतो..

आणखी एक प्रसंग,

मरणासन्न मॅक्स अचानक शुद्धीवर येतो.त्यावेळी नेमकी लिझेल शाळेत असते. ही आनंदाची बातमी तिला
लगोलग कळवायलाच हवी म्हणून आई शाळेत जाते पण सगळ्यांसमोर हे कसे सांगणार म्हणून वर्गात जाऊन तिच्यावर डाफरते, लिझ्रेलचा चेहरा हिरमुसला होतो. मग वर्गाबाहेर घेऊन तिला हळूच ही बातमी देते. लिझेलचा चेहरा उजळतो. पण मग अश्या हसर्‍या चेहर्‍याने ती वर्गात परत कशी जाणार ? म्हणून तिच्यावर परत डाफरते. त्यापुर्वी तिची मनापासून माफिही मागते. या प्रसंगात दोघींनी जान ओतली आहे.

तांत्रिक बाजू म्हणाल तर यातले म्यूझिक पीसेस पुरस्कार प्राप्त ठरले आहेत. चित्रीकरण बहुतांशी अंधारातले असले तरी सुखद आहे. खरे तर ते फार नैसर्गिक आहे.

जॉफ्रे रश आणि एमिली वॅट्सन हे थोडेफार ओळखीचे चेहरे लिझेलच्या आईबाबांच्या भुमिकेत आहेत.
बार्बरा ओर, मेयरच्या पत्नीच्या भुमिकेत आणि निको लेर्श रुडीच्या भुमिकेत.. बेन शेनेत्झर मॅक्सच्या भुमिकेत... खरं तर भुमिकेत असा चुकीचा शब्दप्रयोग मी करतोय. हे सर्वजण अगदी चित्रपटभर त्या त्या व्यक्तीच वाटत राहतात.

आणि लिझेल झालेली..सोफी नेल्सी.. लाजबाब आहे. खरं तर तिला बघून तूम्हाला तूमची लेक, मैत्रिण, बहीण आठवत राहते.. तिचे निळेशार गहीरे बोलके डोळे खुप काही सांगून जातात. खरे तर ती शब्द फारसे उच्चारतच नाही, डोळ्यातूनच बोलते..

मिळाल्यास हि सिडी अवश्य बघा. अगदी लहान मुलांनीही बघावा असा चित्रपट आहे हा. भाषा समजण्यास कठीण नाही ( काही जर्मन शब्द आहेत पण तेही सहज कळतात. )

art-Book-Thief-4-620x349.jpg

फोटो, नेटवरुन साभार

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त.. पुर्ण पिक्चर डोळ्यासमोर उभा राहीला.. तसेच पिक्चर ईथेच संपत नाही म्हणत सस्पेन्सही राहीला..

आवडला होता चित्रपट, तुम्हीही छानच लिहिलं आहे.
मला खरंतर पुस्तक आधी वाचायचं होतं पण ते अजून राहून गेलंय

आमच्याकडे आहे हे पुस्तक. फारच रडू येइल म्हणून मी चित्रपट बघितलेला नाही. ते मुलांचे हाल, वाइट परिस्थिती, मृत्यू चे
तांडव सहन होत नाही. मुली ने पुस्तक वाचून मग सिनेमा ही बघितला आहे. छान आहे ह्या बद्दल अगदी सहमत.

आभार सर्वांचे. हि सिडी भारतात उपलब्ध आहे.

अमा, चित्रपटात हिंसाचार तसा येत नाही. लहान मुलांनी जे बघितलं किंवा त्यांच्या बालमनाला जे वाटलं तेवढेच. ( तो फार सौम्य केलाय असाही आक्षेप आहे दिग्दर्शक ब्रायन पर्सिवल वर ) पण हे खरेय कि बघताना असह्य ताण येतो मनावर, त्या सगळ्या पात्रांना कवेत घ्यावेसे वाटते.

वाचु कि नै वाचु कि नै झाल होतं..
आता शोधून बघण आलं.. बरं झाल जास्त डिटेलवार नै लिहिल दा.. थांबु का थांबु म्हणत दबक्या पावलानं आपल हे डोळ्यांनी वाचत होती मी Wink

मी पुस्तक वाचलेले नाही, अमा ने लिहिल्याप्रमाणे कदाचित त्यात उपासमारीचे वर्णन असेलही. चित्रपटात मात्र हा उल्लेख निव्वळ ओझरत्या संवादातून येतो.

हो, मस्त लिहीलय दिनेशजी.:स्मित: पण सध्या पिक्चर बाजूला. कारण निवान्त २ ते ३ तासाचा वेळ हवाय आणी तोच मिळत नाही.

पण सेविन्ग प्रायवेट रायन बघीतल्यापासुन युद्धपटाची भीतीच बसलीय. पण ती मुलगी काय सुन्दर आहे!

'माझ्या अवतीभवती मृत्यू वावरतोय पण त्याने अजून मला स्पर्श केलेला नाहीये; म्हणजे मी जीवंत आहे' ज्याला जीवनाची इतकी रोकडी ओळख होते त्याच्याकरता जगणे म्हणजे काय होते याचे मृत्यूलाही कुतुहल असते.

She was one of the few souls for whom I wanted to know what it was to live असे जेंव्हा नरेटर म्हणतो तेंव्हा अंगावर काटा येतो.

इतकी मृत्यूची सावली आहे पण चित्रपट जराही डिप्रेसींग वाटत नाही.

काही काही प्रसंग खूप सुंदर घेतले आहेत.

१. नायिका जेंव्हा पुस्तकांनी भरलेले कपाट बघते तेंव्हा तिच्या चेहर्‍यावरचे भाव अफाट सुंदर व्यक्त झालेत.
२. रुडी वडीलांना विचारतो की तुम्ही माझ्या १४व्या वाढदिवसापर्यंत परत यालच ना?
३. मॅक्स त्यांच्या घरातून बाहेर पडतो

दिनेश, आत्ताच बघितला हा चित्रपट. खूप म्हणजे खूप आवडला. म्हणून लगेच लिहितोय. इतक्या सुंदर चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

माधव,

खरेच, या लिझेलमधे खुप गुंतायला होते. डोळ्यासमोर सारखा तिचा चेहरा दिसत राहतो. हा चित्रपट आहे, ते कलाकार आपापली भुमिका करताहेत..यावर विश्वास ठेवणे कठीण जाते... ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य बघाच.