सिनेमा रिव्हीव्ह - नटसम्राट

Submitted by अजय चव्हाण on 2 January, 2016 - 10:50

आजपर्यंत कित्येक सिनेमे पाहीले, अनुभवले, कथेच्या खोल डोहात मनाला बुडवले...पण नटसम्राट पाहील्यानंतर या सिनेमावर काहीतरी लिहावं असं पहिल्यांदाचं वाटलं म्हणून हा छोटासा प्रयत्न....

एखादा भग्न झालेला किल्ला जसा आपला भुतकाळ जगतो, त्याचा तो भारदास्तपणा, बाणेदारपणा, रूबाब, त्या काळी असलेला त्याचा मानमुराद तो अजुनही अनुभवतोय...पण आता त्याला भग्न अवस्था आलीय..
त्याचा तो रूबाब नामशेष व्हायच्या वाटेवर आहे....
काळाने घाला केला नि सारंच काही हिरावून घेतलयं...
पण तो छातीठोकपणे अजुनही आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देतोय...

अशीच काहीशी "नटसम्राट" अशी पदवी कमावलेल्या श्रीयुत गणपत रामचंद्र बेलवलकर (नाना पाटेकर)
यांची ही शोकांतिका...
गणपतराव रंगभुमीला अखेरचा नमस्कार करून थोडं आयुष्य कुंटुंबाबरोबर जगायचं ठरवतात,
सरकाराच्या ( पत्नीच्या, मेधा मांजरेकर) यांच्या भाषेत सांगायचं झालं तर गणपतरावांनी नाटक सोडलं नाही तर ते घरी घेऊन आले..आणि सुरू होतो नवा खेळ, उभ्या आयुष्यात साकारलेल्या, जगलेल्या, अंतरंगात ओतप्रोत भरलेल्या भुमिका नि त्यांच्या खर्या आयुष्यातली खरी भुमिका...यांचा मेळ साधता साधता झालेली फरफट..
नात्यांत असलेली ओढ, त्यातला तो किळसपणा, अहंकार, प्रेम, विनोद, विक्षप्तपणा, आचरटपणा,फटकळपणा, आतातायीपणा, भांडखोरपणा ( नटसम्राट यांच्या भाषेत सांगायचं झालं तर भाडखाऊपणा), दुःख, शल्य, भीती, स्वार्थ, पश्चाताप, राग, मिश्किलपणा, या सार्यां मानवी भाव भावना आणि त्यांचे स्वभाव म्हणजे हा सिनेमा...

एका कलाकाराला आपली कला नेहमीच प्रिय असते..
त्यांनी ती सोडली तरी कला तर त्याच्या नसानसात असते ती नाही सोडून जात त्याला कधी, जाते ती फक्त ती फुलवण्याची ओढ..रंगभूमी आणि कर्मभुमी यांत खुप फरक आहे..रंगभुमीवर झालेल्या चुका सुधारता येतात पण कर्मभुमीवर कदाचित नाहीच...व्यासपीठ ते घराचा उंबरा यातलं अंतर फारसं नसलं तरी ते ओलांडण अवघड आहे...व्यासपीठावर उभं राहून जमलेल्या लोकांच्या मनावर राज्य करता येतं...पण आपल्याच घराच्या उंबरावर उभं राहून आपल्याच माणसाची मन राखायला अवकाश लागतो..

दोष कुणाचा? आपल्याच ओठांना नकळत चावलेल्या दातांचा?? ओठही आपलेच नि दातही आपलेच..
सिनेमा सरकत जातो, नव्हे आपल्याला त्यात तो अजुनच गुंतवून ठेवतो आणि जेव्हा संपतो तेव्हा काहीतरी अप्रतिम पाहल्याच, भासरूपी जगात स्वतःच्या मनाला हरवून देण्याचा आनंद देऊन जातो ...

नाना पाटेकर यांच्या अभिनयाचं कौतुक करायला शब्द सापडणार नाहीत, त्यांनी उभा केलेला "नटसम्राट" मनाच्या खिडकीतून ह्रद्याच्या गाभार्यात अलगद शिरतो...
विक्रम गोखले यांनी साकारलेला रामभाऊ मस्तच..
मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, यांनी साकारलेली व्यक्तीमत्वेही अगदी जिवंत वाटतात..
छायाकंनही जबरजस्तच....
" नात्याला नाव आपुल्या"
"मिठूनि लोचने"
ही दोन्ही गाणी अप्रतिम तर आहेच पण त्याचबरोबर त्या कथानकाच्या प्रसंगाला चपखल बसली आहेत..

पात्रे -

नटसम्राट ( गणपत बेलवलकर) : नाना पाटेकर
रामभाऊ : विक्रम गोखले
नटसम्राट पत्नी (कावेरी): मेधा मांजरेकर
नटसम्राटाची मुलगी (विद्या) : मृण्मयी देशपांडे
सुन (नेहा) : नेहा पेंडसे
जावई : सुनिल बर्वे
मुलगा (मकरंद) : अजित परब

का पाहावा :

नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी,
एक खरी अजरामर कथा अनुभवण्यासाठी..

नामांकन : ******

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users