विमा कंपनीविरुद्ध यशस्वी लढा

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 2 January, 2016 - 03:25

विमा कंपनीविरुद्ध यशस्वी लढा

" माझे व माझ्या पतीचे दोन विमा कंपन्यांचे स्वतंत्र मेडिक्लेम विमे आहेत . दोन्ही विम्यांमध्ये आमची दोघांची नावे घातलेली आहेत . माझ्या पतीची बायपास शत्रक्रिया एशिअन हार्ट institute येथे दि. ८ ऑगस्ट २००८ रोजी झाली . या शस्त्रक्रियेचा खर्च रु. ३ लाख २६ हजार ७४८ इतका झाला . आम्हाला दोन्ही विम्याचे मिळून रु. ३ लाख , २० हजार रु. मिळायला हवे होते . त्यापैकी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने ताबडतोब विम्याचे पैसे रु. एक लाख ७० हजार हॉस्पिटलकडे पाठवले . मात्र न्यू इंडिया अशुअरन्स कंपनीकडे सर्व कागदपत्रे पाठवूनसुद्धा हॉस्पिटल सोडेपर्यंत पैसे आले नाहीत . त्यामुळे कंपनीच्या टी . पी .ए. कडे माझे हेलपाटे सुरु झाले . प्रथम उत्तर देण्याची टाळाटाळ , नंतर अगदीच खनपटीला बसल्यावर रु. तीस हजार मिळतील असे उत्तर मिळाले . शेवटी आम्ही विमा कंपनीच्या चर्चगेट येथील मुख्य कार्यालयात गेलो . तेथील अधिकारी आम्हाला सांगू लागले की "आता टी . पि. ए . जेव्हडे पैसे मंजूर करत आहे तेव्हडे पदरात पाडून घ्या . बाकीच्या पैश्यांचे आपण नंतर बघू . " परंतु आंम्हाला हे मान्य नव्हते . अधिक चौकशी केली असता , विमा लोकपाल अशा तक्रारी स्वीकारतात अशी माहिती मिळाली .

आम्ही विमा लोकपालांच्या विलेपार्ले येथील कार्यालयात गेलो तेव्हा त्यांनी प्रथम आमचा कंपनीशी झालेला पत्रव्यवहार व इतर कागदपत्रे तपासली . नंतर त्यांनी कंपनीला एक नोटीस पाठवली . ७ जानेवारी २०१० रोजी लोकपालांनी त्यांच्या कार्यालयात आम्हाला व कंपनीला सुनावणीसाठी बोलावले . कंपनीने होस्पिटलकडून खोलीचे भाडे , इतर सेवाचे दर इ. माहिती घेतली नाही असा आक्षेप लोकपाल यांनी त्यांच्या प्रतिनिधीकडे घेतला . त्यावर कंपनी आम्हाला रु. ८५००० /- द्यायला तयार आहे असे प्रतिनिधीने सांगितले . पण ही रक्कम लोकपाल यांनाच मान्य झाली नाही . " विम्याची योग्य रक्कम देण्यास तुम्ही उशीर केला असल्याने तक्रारदाराला बराच त्रास झाला आहे . त्यामुळे सात दिवसांच्या आत त्याना रु. एक लाख पन्नास हजार द्यावेत व तसे आमच्या कार्यालयास कळवावे " असा आदेश लोकपाल यांनी दिला . यावरही कंपनीने खोडसाळपणा करून पूर्वी आम्हाला देऊ केलेले रु. २७,१०५ /- दिले आहेत असे समजून उरलेल्या रकमेचा धनादेश आम्हाला पाठवला. परंतु ही बाब लोकपाल यांना समजल्यावर त्यांनी कंपनीकडे स्पष्टीकरण मागवले . यातून योग्य तो बोध घेऊन कंपनीने त्या रकमेचा धनादेश आम्हाला पाठवला . अशा रीतीने तब्बल सोळा महिन्यांच्या कायद्याच्या लढाईनंतर आम्हाला न्याय मिळाला .
सौ. कल्पना गोखले यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात आपण वर वाचला . वकील किवा अन्य कोणाचीही मदत न घेता त्यानी हे यश मिळवले हे केवळ कौतुकास्पदच नाही तर अनुकरणीयही आहे . त्यांनी उल्लेख केलेल्या विमा लोकपाल यांच्याबद्दल थोडी पूरक माहिती अशी की खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांविरुद्धच्या रु. २० लाखापर्यन्तच्या तक्रारी लोकपाल यांच्या कडे करता येतात . मात्र त्यापूर्वी विमाधारकाने कंपनीकडे तक्रार करणे बंधनकारक आहे . तसेच कंपनीने विमाधारकाची तक्रार नाकारल्याचे पत्र मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे . तक्रार विहित नमुन्यात करावी लागते . त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही . वकील देण्याचीही गरज नाही . अर्जाचा नमुना व अधिक माहिती bimalokpal .mumbai@gbic.co.in येथे उपलब्ध आहे .
आभार --सौ. कल्पना गोखले मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभाग

विशेष सूचना ---मुंबई ग्राहक पंचायत प्रथमच पुण्यात ग्राहक पंचायत पेठ आयोजित करत आहे . या पेठेत मुंबई व पुणे येथील उत्पादकांची दर्जेदार ग्राहकोपयोगी उत्पादने रास्त दरात उपलब्ध असतील . प्रत्येक खरेदीची पावती मिळेल . वस्तूबद्दल काही तक्रार असेल तर त्याच्या निवारणाची व्यवस्था असेल . ग्राहकांच्या प्रबोधनाचा 'जागो ग्राहक जागो ' हा कक्ष , विद्यार्थ्यान्साठी जाहिरातींबाबत नीरक्षीरविवेक करण्यास प्रवृत्त करणारी स्पर्धा , पथनाट्य , पैठणी विणण्याचे प्रात्यक्षिक इ. या पेठेची वैशिष्ट्ये अनुभवण्यासाठी पेठेला भेट देण्याचे हे आग्रहाचे आमंत्रण !
स्थळ : लोकमान्य सभागृह , केसरीवाडा, नारायण पेठ , केळकर मार्ग , पुणे
कालावधी : ७ ते ११ जानेवारी २०१६ : वेळ
: सकाळी ११. ३० ते रात्री ८. ३०

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users