कालका मेल १५० वर्षांची झाली...

Submitted by पराग१२२६३ on 28 December, 2015 - 06:44

१ जानेवारी २०१६. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय रेल्वेच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना होत आहे. या दिवशी हावडा आणि कालका यादरम्यान सुरू झालेली 'मेल' रेल्वेगाडी आपल्या सेवेची १५० वर्षे पूर्ण करत आहे. भारतीय रेल्वेवरील ही सर्वांत जुनी आणि अजूनही धावत असलेली ही गाडी ठरावी. दक्षिण आशियातील आहेच पण आशियातीलही सर्वांत जुनी प्रवासी रेल्वेगाडी ठरण्याचा मान कदाचित हावडा-कालका मेलला मिळू शकेल. अलीकडेच या गाडीने कालका ते दिल्ली असा प्रवास करण्याचा योग आला होता. या गाडीचा इतिहास आधीपासून माहीत असल्यामुळे या प्रवासासाठी या गाडीची निवड जाणीवपूर्वक केली होती.
IMG_2780.jpg (18.36 KB)

तो काळ ब्रिटीश राजवटीचा होता. भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे बस्तान चांगले बसले होते. भारताच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरही या कंपनीने पूर्ण नियंत्रण मिळविलेले होते. भारत ब्रिटनसाठी कच्च्या मालाचा महत्त्वाचा पुरवठादार ठरला होता. त्यामुळे भारताच्या विविध भागांमधून कच्चा माल गोळा करून तो ब्रिटनला निर्यात करणे आणि तेथून आलेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत वितरीत करणे यासाठी देशातील बंदरे अंतर्गत भागांशी सुलभ आणि जलद वाहतुकीच्या साधनाने जोडण्याची गरज कंपनीला वाटू लागली होती. सुरुवातीला आणीबाणीच्या काळात लष्कराच्या वेगवान तैनातीसाठी तसेच भारताच्या अंतर्गत भागांमधून बंदरांपर्यंत कच्च्या मालाची ने-आण करण्याच्या हेतूने भारतात लोहमार्गांचे जाळे विणण्याचा विचार कंपनी सरकारने केला होता. त्याला अनुसरूनच कंपनीने १६ एप्रिल १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई) ते ठाणे वाहतुकीसाठी सुरू केला. त्या पाठोपाठ देशाच्या अन्य भागांमध्येही लोहमार्गांची उभारणी वेगाने होऊ लागली. १५ ऑगस्ट १८५४ मध्ये हावडा आणि हुगळी यादरम्यान धावलेल्या पहिल्या आगगाडीने पूर्व भारतातील लोहमार्ग सेवेची सुरुवात केली होती. ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीने ती सेवा सुरू केली होती.

हावडा हे तत्कालीन ब्रिटीश भारताच्या राजधानीच्या (कोलकाता) शेजारी वसलेले असल्याने १८५४मध्ये हावड्याहून लोहमार्ग सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर तीनच वर्षांनी उत्तर भारतात पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाला सुरुवात झाली आणि त्यामुळे हादरलेल्या ब्रिटीश सम्राज्ञीने भारताचा कारभार कंपनीकडून काढून स्वतःकडे घेतला. ब्रिटीश राजमुकुटातील ताज असलेल्या भारतीय वसाहतीवर आपले नियंत्रण कायम ठेवण्यासाठी हे करणे भागच होते. या स्वातंत्र्ययुद्धाने भारतीय उपखंडात सक्षम आणि वेगवान वाहतुकीच्या साधनाची आवश्यकता अधिकच ठळक केली. म्हणूनच पुढील काळात वेगाने लोहमार्गांचा विस्तार करण्यास सुरुवात झाली.
IMG_2780.jpg

भारतीय उपखंडातीलच नव्हे तर जगातील सर्वांत सुपीक प्रदेश म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या गंगेच्या मैदानावर आपले नियंत्रण अजिबात कमी होऊ नये या हेतूने हावड्याहून दिल्लीच्या दिशेने आणि पुढे वायव्य सीमांत प्रांतापर्यंत लोहमार्ग झपाट्याने पुढे विस्तारत गेला. दिल्लीचे भारतीय राजकारणात महत्त्व असल्यामुळे पहिल्या टप्प्यात हावडा ते दिल्ली या मार्गावर लक्ष केंद्रीत केले गेले. हावडा-वर्धमान-आसनसोल-पाटणा-मुगलसराय-अलाहाबाद-कानपूर असे करत दिल्लीला पोहचलेला लोहमार्ग १ ऑगस्ट १८६४ रोजी वाहतुकीसाठी खुला झाला होता. मात्र तोपर्यंत १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाने भारतात राजकीय उलथापालथ घडवून आणली होती. देशातील संस्थाने ब्रिटिशांच्या शक्ती पुढे हरली होती. अखेरचा मुघल सम्राट बहादूरशाहला रंगूनला हद्दपार करण्यात आले होते. ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी कायम राहिली असली तरी भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची राजवट जाऊन १८५८ च्या जाहीरनाम्याने भारताचा कारभार थेट ब्रिटीश सम्राज्ञीच्या हातात आला होता. भारतात १८६१ मध्ये भारतीय कायदे मंडळ कायदा, भारतीय पोलीस कायदा, भारतीय उच्च न्यायालय कायदा अस्तित्वात आले होते. भारताचा गव्हर्नर-जनरल आता व्हाईसरॉय म्हणूनही ओळखला जाऊ लागला होता. मात्र या उलथापालथींमुळे सामान्य जनतेच्या हलाखीच्या जीवनमानात काहीच सुधारणा झाली नव्हती.

हावडा दिल्ली दरम्यानचा लोहमार्ग बांधून तयार झाल्याबरोबर लगेचच ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी या मार्गावर मेल सेवा सुरू करण्यावर विचार करू लागली. अर्थातच ही सेवा ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या सुविधेसाठीच असणार होती. म्हणूनच तिला ‘मेल’चा दर्जा देण्यात येणार होता. त्यावेळी कोलकाता ही अखंड भारताची राजधानी होती. त्यामुळे भारताच्या गव्हर्नर-जनरलचेही तेथेच वास्तव्य होते. त्याच्यासाठीही ती नवी मेल रेल्वेसेवा उपयुक्त ठरणार होती. अखेर १ जानेवारी १८६६ रोजी हावडा-दिल्ली मेल सुरू करण्यात आली. गंगेच्या मैदानात उन्हाळ्यामध्ये तापमान ४५ अंशांच्याही वर जाते. अर्थातच हा उन्हाळा ब्रिटिशांना सहन होणाऱ्यातील नसतो. त्यामुळे त्या काळात भारताची राजधानी उन्हाळ्यात कोलकात्याहून हिमालयातील शिवालिक रांगांवर वसलेल्या थंड हवेच्या सिमल्याला हलवली जात होती. त्यावेळी गव्हर्नर-जनरल, त्याचे कुटुंबीय आणि त्याच्या कार्यालयासकट भारत सरकारचे सर्व महत्त्वाचे दफ्तर सिमल्याला आणि नंतर परत कोलकात्याला हलविले जात असे. ही सर्व प्रक्रिया हावडा-दिल्ली मेलमुळे सोपी झाली होती. ही रेल्वेगाडी भारतातील त्यावेळच्या सर्व रेल्वेगाड्यांमधील सर्वांत विशेष गाडी मानली जात होती. म्हणूनच तिला नंबरही १ डाऊन/२ अप असे देण्यात आले होते.

सुरुवातीच्या काळात ही मेल आठवड्यातून एकदाच धावत होती. तिच्या वेळाही तशा सोयीच्या ठेवण्यात आल्या होत्या. म्हणजे हावड्याहून संध्याकाळी निघालेली मेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिल्ली जंक्शनवर (पुरानी दिल्ली) पोहचत असे. १८६४ मध्ये हावड्याहून लोहमार्ग दिल्लीत आला होता, तेव्हा हे स्थानक जाणीवपूर्वक लाल किल्ल्याच्या समोरच उभारण्यात आले होते. कारण १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचे लाल किल्ला हे मुख्यालय बनले होते आणि पुन्हा असा प्रसंग उद्भवलाच तर तातडीने दिल्लीत सैन्य पाठविता यावे हा त्यामागील एक महत्त्वाचा उद्देश.

हावडा-दिल्ली मेल दिल्ली जंक्शनवर आली की, सिमल्याला जाणारे गव्हर्नर-जनरलपासून सर्वच प्रवासी आणि सामानसुमान पर्यायी वाहनात चढविले जात असे. पुढे दोनच वर्षांनी दिल्ली आणि अंबाला या दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला तरी हावडा-दिल्ली मेलची सेवा पुढे वाढविण्यात आली नाही. १८९१ मध्ये अंबाला आणि कालका या दरम्यानचा लोहमार्ग सुरू झाला. कालका हे शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे. तेथूनच पुढे सिमल्याला जाण्याचा मार्ग आहे. १८९१ नंतर हावडा-दिल्ली मेल तातडीने कालक्यापर्यंत वाढविण्यात आली आणि ती हावडा-कालका मेल म्हणून ओळखली जाऊ लागली. यानंतर सिमल्याला जाणाऱ्या गव्हर्नर-जनरलसह सर्वांनाच थेट कालक्यापर्यंत येण्याची सोय झाली. मात्र तेथून पुढचा प्रवास रस्त्याने करावा लागे. हे असे १९०३ पर्यंत सुरू होते. १९०३ मध्ये कालका-सिमला हा नॅरोगेज मार्ग सुरू झाल्यानंतर सिमल्याला जाणाऱ्यांसाठी कालका येथे गाडी बदलून नॅरोगेज रेल्वेगाडीने पुढचा प्रवास करण्याचा एक पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे ब्रिटिशांच्या सोयीसाठी कालका-सिमला मेलही लगेचच सुरू करण्यात आली. ही गाडीही अजून धावत आहे. कालक्यापर्यंत येण्या-जाण्याचा हावडा-कालका मेलच्या वेळाही अशा ठेवण्यात आल्या होत्या की, सिमल्याहून निघणे किंवा तेथे पोहचणे सोयीचे होईल आणि मधल्या वेळेत कालक्याला गाडी बदलण्यासाठी, सामानाची स्थानांतर करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध असेल.

१२ डिसेंबर १९११ रोजी ब्रिटनचा सम्राट जॉर्ज (पाचवा) याने दिल्ली दरबारात अखंड भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले होते. त्यानंतर गव्हर्नर-जनरल आणि त्याचे कार्यालय दिल्ली ते कालका यादरम्यानच कालका मेलमधून प्रवास करत असे. दरम्यानच्या काळात हावडा-दिल्लीदरम्यान गया मार्गे नवा मार्ग सुरू झाल्यावर कालका मेल त्यावरून धावू लागली.

स्वातंत्र्यापर्यंत कालका मेल सात डब्यांची होती. पुढे तिची प्रतिष्ठा कमी होत गेली, मात्र डबे वाढत गेले. आज कालका मेल २४ डब्यांची झालेली आहे. पण आज एवढ्या डब्यांची गाडी सामावून घेण्याची क्षमता कालका स्थानकात नाही. म्हणून कालका ते चंदिगड या टप्प्यात ही गाडी १५ डब्यांचीच असते. लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी द्वीतीय कुर्सी यानची सोय असलेली ही आज भारतीय रेल्वेवरील एकमेवच गाडी आहे.
---०००---

माझ्या प्रवासाचा दिवस नोव्हेंबरच्या अखेरीचा होता. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कालका स्टेशनवर थंडी चांगलीच जाणवत होती. कालका रेल्वे स्थानक पाहिल्यावर कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकाची आठवण झाली. इथून लांबपल्ल्याच्या गाड्या सुटत असल्या तरी कोल्हापूरसारखेच छोटेखानी स्थानक आहे ते. अगदी तीनच फलाटांचे. म्हणूनच कोल्हापूरप्रमाणे तेथेही मेन लाईनवरील इंजिनांनाच शंटींग आणि मार्शलिंगचे कर्तव्य पार पाडावे लागते. माझी गाडी फलाट क्र.-२ वरून सुटणार होती. मात्र हजरत निजामुद्दीनवरून आलेल्या सवारी गाडीने तो फलाट अडवून ठेवला होता. रात्री साडेदहानंतर ती सवारी गाडी यार्डात घेऊन जाण्यासाठी हावड्याचे डब्ल्यूएपी-७ इंजिन (क्र. ३०३२९) त्या गाडीला जोडण्यात आले. हाच कार्यअश्व आमच्या हावडा मेलचेही सारथ्य करणार होता. मुख्य प्रवासाला निघण्याआधी वॉर्म-अप करण्याच्या हेतूनेच जणू तो कार्यअश्व आधीपासूनच कामाला लागला होता.

कालका मेल बघण्याची, तिचे फोटो काढण्याची बरेच दिवस इच्छा होती. त्यामुळे असे वाटत होते की, गाडी फलाटावर आणण्यासाठी किती वेळ लावत आहेत हे लोक. सवारीला इंजिन जोडल्यावर एअर प्रेशर पुरेसे आले की पुढच्या तीनेक मिनिटात ती गाडी पुढे सरकेल वाटत होते. पण जरा वेळच लावला त्या गाडीने. कारण त्याचवेळी फलाट क्र. १ वरून दुरंतो एक्सप्रेसच्या रंगात न्हायलेल्या गाझियाबादच्या डब्ल्यूएपी-७ (क्र. ३०२४५) बरोबर १४८८७ कालका-बाडमेड एक्सप्रेस सुटण्याच्या तयारीत होती. तिला स्टार्टरही मिळाला होताच. त्याआधी नवी दिल्लीहून आलेली १२००५ शताब्दी एक्सप्रेस फलाट क्र.-३ वर विसावलेली होती. याचे डब्ल्यूएपी-७ जरा विशेष होते. कारण त्याला एचओजी तंत्रज्ञानाने युक्त बनविण्यात आलेले होते. या तंत्रज्ञानामुळे संपूर्ण गाडीला विजपुरवठा करण्यासाठी वेगळ्या जनरेटरच्या डब्यांची आवश्यकता भासत नाही. इंजिनाला वीज पुरविणाऱ्या तारांमधूनच (ओएचई) मिळणाऱ्या विजेला ११० व्होल्टस् मध्ये परावर्तित करून संपूर्ण गाडीत वीज पुरविली जाते. भारतीय रेल्वेवरील अशा पहिल्या यंत्रणेचे यशस्वी रोपण याच कालका शताब्दीमध्ये करण्यात आलेले आहे.

शताब्दी वेळेत आलेली असल्यामुळे कालक्याहून वेळेत निघण्यातील बाडमेड एक्सप्रेसचा मार्ग मोकळा झाला होता. बाडमेड एक्सप्रेससाठी एक्सिट रूट सेट केलेला असल्यामुळे फलाट क्र.-२ वरील हालचालींना मर्यादा येत होत्या. कारण त्या दोन्ही मार्गांचे सांधे पुढे एकमेकांना छेदत होते.

रात्री ठीक ९.३० वाजता बाडमेड एक्सप्रेस कालक्याहून सुटल्यावर फलाट क्र.-२ चे सांधेही मुक्त झाले आणि सवारी गाडी तेथून हलू शकली. यादरम्यान मी कालका-हावडा मेलच्या फोटो सेशनच्या तयारीसाठी फलाटाच्या अगदी पुढे गेलो. सवारी गाडी फलाट क्र. २ वरून बाहेर नेऊन यार्डात ठेवल्यानंतर हावड्याचा तो कार्यअश्व एकटाच पुढे येऊन थांबला आणि पॉईंट्समनने रिव्हर्स पॉईट सेट केल्यावर तो पुन्हा मागे कालक्यातील ए.सी. कोचिंग डेपोजवळ गेला. कारण तेथून त्याला कालका मेलचे पाच वातानुकुलित डबे (वातानुकुलित प्रथम श्रेणीचा १, वातानुकुलित द्वीतीय श्रेणीचे २ आणि वातानुकुलित तृतीय श्रेणीचे २) घेऊन पुन्हा पुढे यायचे होते. ते डबे घेऊन पुन्हा हा कार्यअश्व सांध्याच्या पुढे येऊन थांबला आणि सांधा साधल्यावर मागे जात पलीकडच्या रुळांवर उभे असलेले एक जनरल (यातील अर्धा डबा टपालासाठी राखीव असणार होता) आणि गार्डचा (एसएलआर) एक हे डबे त्या वातानुकुलित डब्यांच्या मागे जोडण्यासाठी निघून गेला. दरम्यान थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला होता. ईशान्य मान्सूनच्या काळात भूमध्य सागरावरून वाहत आलेले वारे हिमालय ओलांडून आले की किती थंड असते याचा पहिलाच अनुभव मी तिथे कालकाच्या स्टेशनवर घेत होतो.

मग ते सात डबे घेऊन मग डब्ल्यूएपी-७ अगदी पुढे जाऊन पुन्हा मागे येत फलाट क्र.-२ वर आले आणि त्याने ते डबे फलाटाच्या अगदी शेवटी नेऊन ठेवले. पुन्हा एकटेच पुढे येऊन ते डब्ल्यूएपी-७ यार्डात गेले. तिथे आधी एक जनरल आणि एक गार्डचा डबा बरोबर घेतला. त्यानंतर पुढे येऊन तेथील पॉईंटच्या मदतीने रुळ बदलून एस-६ ते एस-११ हे त्याने त्या डब्यांच्या मागे जोडून घेतले. कपलिंग आणि ब्रेक पाईप जोडल्यावर तेथून पॉईटस्मनने हिरवा कंदील दाखवत पुढे जाण्याचा संकेत लोको पायलट (शंटर) ला दिला. हा संकेत मिळताच लोको पायलट (शंटर) ने त्या डब्यांना पुन्हा फलाट क्र.-२ वर आणण्यासाठी स्टेशनच्या अगदी पुढे नेले. त्यानंतर आधीच्या डब्यांशी त्यांची जुळणी करून १२३१२ कालका-हावडा मेलचे कालक्यातील मार्शलिंग पूर्ण झाले आणि ती सुटण्यासाठी सज्ज झाली. गाडी सुटण्याआधी टपालाच्या डब्यात सर्व टपाल चढवून झाले होते.

कालका तसे शांत स्थानक असल्यामुळे या सर्व घडामोडींच्यावेळी सांध्यांचा खट्याक-खट असा टिपिकल आवाज स्पष्ट ऐकू येत होता. याच्या दरम्यान ३ नंबरवर उभ्या असलेल्या शताब्दीच्या पुढे येऊन एक डब्ल्यूएपी-४ बराच वेळ वाट पाहत होते. मला वाटलं की, ते गाडी यार्डात घेऊन जाणार आहे. जवळ जाऊन पाहिलं, तर त्या इंजिनाचे सीबीसी (कपलिंग) आणि ब्रेक पाईप शताब्दीला जोडलेले नव्हते. बऱ्याच वेळाने पाईंट्समनने रजिस्टरवर लोको पायलटची सही घेतली आणि थोडासा सुस्कारा सोडत ते डब्ल्यूएपी-४ एकटेच चंदिगडच्या दिशेने निघून गेले.

हावडा मेल प्रस्थानासाठी तयार करण्याच्या रेल्वेच्या या धावपळीत मी शांतपणे तिचे फोटो सेशन केले आणि नंतर माझ्या जागेवर जाऊन बसलो. तिथे गेल्यावर - ही सीट आमची आहे - हे नेहमीचेच टिपिकल प्रसंग आणि तुम्ही उठा इथून वगैरेवगैरे वादरुपी संवाद पाहायला मिळाले. माझ्या आसपास बिहारला जाणारे बरेच तरुण होते. नेहमीप्रमाणे त्याचे सामानसुमानही प्रचंड होतेच. त्यांनी स्वतःला आणि आपल्या प्रचंड सामानाला प्रामाणिकपणे आपले आरक्षण आहे, त्याच सीटवर सामावून घेतले होते. पण काहीच वेळात तिथे एक जण आला. अगदी सुशिक्षित दिसत होता आणि स्वतःला तसे समजतही होता तो. त्या बिहारी प्रवाशांच्या इथे येऊन सीटसाठी भांडत होता. ते म्हणत होते आमची सीट आहे, हा म्हणत होता माझी सीट आहे, उतरवा तुमचे सामान. एकमेकांना तिकीटे दाखवून झाली तरी घोळ कायम होता. ते बिहारी युवक बरोबर सांगत असूनही तो ऐकत नव्हता. त्याच्याबरोबर असलेला मेव्हणा त्यांना वाट्टेल तसे बोलत होता. शेवटी माझ्या पलीकडे बसलेल्या तरुणाने सीट नंबरवरून चाललेला हा घोळ सोडविण्याचा अपयशी प्रयत्न करून पाहिला. तोही त्यांना त्यांचा खरा सीट नंबर काय आहे ते तिकीट पाहून सांगू लागला, तर त्या दोघांनी त्यालाही वाट्टेल तसे बोलायला सुरुवात केली. शेवटी एकाचा सल्ला त्या सुशिक्षितांनी ऐकला आणि बाहेरच्या चार्टवर आपले नाव वाचले, तेव्हा त्यांना लक्षात आले की, आपला सीट क्रमांक २ आहे. तिकिटात डबा आणि सीट क्रमांकाच्या पुढे लिहिलेले एम-३८ म्हणजे त्यांना एम कोचमध्ये ३८ क्रमांकाची सीट असे त्या सुशिक्षितांना वाटत होते. ते दोघे आपल्या खऱ्या सीट क्रमांकावर जाऊन बसल्यावर ते बिहारी मला सांगू लागले - आम्ही बिहारी दिसतोय म्हणून आम्हाला हे काय मूर्ख समजतात काय? आम्ही बिहारी असलो म्हणजे काय मागासलेले, अशिक्षित असतो काय? अरे आम्हीही सारी दुनिया फिरत असतो. आम्हालाही अक्कल असते. मी त्यांना म्हटले मलाही त्या सुशिक्षितांचा काय घोळ चालला आहे ते लक्षात आले होते. पण त्यांची भाषा ऐकून मी मध्ये पडण्याचा मोह टाळला.

गाडीची सुटण्याची वेळ रात्री ठीक ११.५५ वाजता होती. त्यावेळी लोको पायलट (मेल) डॉक्यूमेंटेशनवर सह्या करण्यात गर्क होताच, पण असिस्टंट लोको पायलट मात्र इंजिनाचे ब्रेक, त्याचे प्रेशर, गाडीशी जोडणी व्यवस्थित आहे ना याची बाहेर जाऊन खात्री करून घेत होता. तोपर्यंत पलीकडच्या कॅरेज अँड वॅगन विभागाकडून आलेले ब्रेक पॉवर सर्टीफिकेटवर गार्ड आणि लोको पायलटचे रिडींग आणि सह्या घेऊन झाल्या होत्या. त्याचवेळी गाडी सोडण्यासाठीची पूर्वतयारी म्हणजेच अंबाल्याला बसलेल्या सेक्शन कंट्रोलरची परवानगी घेऊन कालक्याच्या स्टेशन मास्टरनेही गाडीला पिवळा सिग्नल दिला होता. हाच सिग्नल मागे रिपिटरच्या रुपात गार्डला दिसत होता. यानंतर नियोजित वेळी गार्डने हिरवा कंदील दाखवत निघण्याचा संकेत दिल्यावर डब्ल्यूएपी-७ ने त्याच्या टिपिकल स्टाईलमध्ये कालका मेल निघत असल्याची दीर्ध गर्जना केली आणि कालक्याहून आमच्या या ऐतिहासिक मेलने हावड्याच्या दिशेने कूच केले. अर्ध्या तासातच आमची मेल चंदीगडला आल्यावर तिथे या गाडीला आणखी ९ डबे जोडले जाणार होते. एस-१ ते एस-५, एक जनरल, रसोई यान, दोन वातानुकुलित, एक जनरल. तेथे पोहचल्यावर एका इंजिनाने आमच्या मेलच्या शेवटच्या दोन डब्यांना आमच्या गाडीपासून आधी वेगळे केले. त्यानंतर ते ९ डबे मूळच्या गाडीला जोडले गेल्यावर आधीचे २ डबे त्यांच्यामागे जोडले गेले. हे सर्व चालू असताना आमचे मूळचे हावड्याचे डब्ल्यूएपी-७ शांतपणे पुढच्या बाजूला उभे होते. कालका मेलसाठी चंदिगडमधील या ९ डब्यांची काढणी-जोडणी हे रोजचेच काम आहे. या सर्व कामासाठी या गाडीला चंदिगडमध्ये ४५ मिनिटांचा थांबा देण्यात आलेला आहे. डबे जोडून झाल्यावर पुन्हा डॉक्यूमेंटवर सह्या झाल्या आणि गाडीच्या ब्रेकींग यंत्रणेत आवश्यक एअर प्रेशर आल्यावर मेलला सिग्नल मिळून आम्ही अंबाल्याच्या दिशेने कूच केले. मजल-दरजल करत हावडा मेल अखेर सकाळी ६.३० ला दिल्ली जंक्शनवर पोहोचली. माझे तिकीट इथपर्यंतच होते. दिल्लीमध्ये खाली उतरल्यावर पुन्हा - चंदिगडमध्ये नव्याने घडविलेली कालका-हावडा मेल पाहण्याचा मोह झाला. त्यामुळे तिसऱ्या डब्यापासून २४ व्या डब्यापर्यंत पुन्हा एक चक्कर मारून आलो आणि विचार केला. थंडी आहेच, तर जरा चहा घेऊनच बाहेर जावे. म्हणजे तोपर्यंत कालका-हावडाही सुटेल.

अशा प्रकारे छोटासा का असेना पण हावडा-कालका मेल १५० वर्षे पूर्ण करत असताना तिचा प्रवास घडला यामुळे खूप आनंद झाला.
---०००---

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालका मेलचा फोटो अुलोड केला आहे. कालका मेलच्या मागे कालका सिमला शिवालिक एक्सप्रेसचा डबा दिसत आहे. ब्रॉड गेज मालगाडीच्या सपाट वाघिणीवर (बीआरएन प्रकारची वाघीण) ठेवलेला आहे.

मस्त लेख. Happy पहिला इतिहासपण सांगितला आहे, त्यामुळे आणखी भारी वाटलं वाचताना. यातलं काहीही बघितलं नसताना तुम्ही इतकं डीटेल लिहिलंय की एक छान चित्र तयार झालं डोळ्यापुढे.
पुलेशु Happy

कालका मेलची समयोचित गोष्ट वाचायला मजा आली. सुरस असतात तुमच्या रेल्वेच्या कहाण्या. त्यातले तांत्रिक तपशीलही रोचक वाटतात, रटाळ होत नाहीत. वाचताना तिथं फलाटावर रेंगाळत स्वतःच सगळी निरिक्षणं बघत असल्याचं फिलिंग येतं.

खुप गॅपने लिहिता तुम्ही, नियमीत लिहित जा की.

पराग जी , रेलवे मलाही प्रचंड आवडतात अजुनही रेलवे जाताना पाहणे किंवा रेलवे प्रवास अत्यंत जिव्हाळ्याचा विषय पण हे विनामाहीती प्रेम आहे तुम्ही जर एक लेखमाला ह्या अंगाने काढली तर मस्त मजा येईल वाचायला उदाहरण म्हणजे सिग्नल्स त्यांचे प्रकार त्यांची कार्यशैली वगैरे सगळे काही, तुमची शैली जबरदस्त आहे हे सहर्ष नमूद करतो

(वयानुरूप आज वय नसताना ही चोरून "कार्टून नेटवर्क" वर "थॉमस एंड फ्रेंड्स" पाहणारा) बाप्या

(वयानुरूप आज वय नसताना ही चोरून "कार्टून नेटवर्क" वर "थॉमस एंड फ्रेंड्स" पाहणारा) बाप्या
>>>

लगे रहो बापूसाहेब.
प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा बाणा कवीचा असे.

रैलवेचे आकर्षण सुप्तपणे मनात दडून असतेच. आज हजारदा रेल्वे पाहूनही लोकलच्या प्रवासातही स्टेशनात हळू हळू एखाद्या महाराजासारखा प्रवेश करणार्‍या गाडीचा तोरा औरच वाटतो. प्रत्येक वेळेला नित्यनूतन वाटतो . अगदी बाअदब, होशिय्यार वगैरे वाटते. आणि त्या ठेसनावर न थांबणारी आणि धाडधाड करीत तुमच्या उरावरून जाणारी एखादी बेमुर्वतखोर लांब पल्ल्याची गाडी, तुच्छतेने तुमच्याकडे तु .क,( तुच्छ कटाक्ष) टाकीत जाते असे वाटते.

सोन्याबापूंना अनेकानेक अनुमोदक! Happy

पराग१२००१, तुम्हाला नियमित लिहायला आणि आम्हाला वाचायला आवडेल, मग देर किस बात की? बादवे, ही १२००१ कोणती 'अप' आहे? तुमची आवडती ट्रेन वगैरे आहे का?

पादुकानन्द, अगदी Happy प्रत्येकीचा आपापला रुबाब असतो! मग ती लोकल असो, पॅसेंजर असो नाहीतर राजधानी. ऐटीत असतात.

भोपाल शताब्दी ने प्रवास करायचा योग २०१३ साली आला होता तेव्हा ग्वालियर ते नई दिल्ली रेलवे स्टेशन असा प्रवास केला होता त्या गाड़ी ची ताकद जाणवते राव पुर्ण प्रवासात काय ती ताकद काय तो तोरा

सई जी, तुमचा अंदाज बरोबर आहे. पराग १२००१ मधील १२००१ हा डाऊन हबीबगंज (भोपाळ) -नवी दिल्ली शताब्दीचा क्रमांक आहे. माझ्या आवडत्या गाड्यांपैकी ही एक गाडी आहे.

दक्षिण आशियातील सर्वांत वेगवान असलेल्या हबीबगंज (भोपाळ)शताब्दीलाही आता ३० वर्षे होत आलेली आहेत.

पराग तुमचे लेख छानच आहेत. पुढील प्रवासाची वाट पहात आहे

>>>> म्हणूनच तिला नंबरही १ डाऊन/२ अप असे देण्यात आले होते.

यात थोडा बदल आवश्यक आहे. १ डाऊन/२ अप हा मुंबई हावडा मेलचा नंबर होता तर कालका मेलला १ अप / २डाऊन असा क्रमांक दिला होता. (एकाच क्रमांकामुळे हावड्याला गोंधळ होऊ नये म्हणून)