दुष्काळ… (भाग २)

Submitted by विनित राजाराम ध... on 26 December, 2015 - 09:28

निल्याला सकाळी जाग आली ती पक्ष्यांच्या आवाजाने. खूप जणांचा घरोबा होता त्या झाडावर. पक्षी सकाळीच उडून जायचे दाण्या-पाण्यासाठी. त्यांना सुद्धा लांब जावे लागे. नाहीतर या गावात तसं काहीच नव्हतं खाण्यासाठी. निल्या जागा झाला, आज शहरात जायचे होते ना…. म्हणून त्याने जरा लगबग केली. घरी आला. आत हळूच डोकावून पाहिलं त्याने. सगळी मंडळी शांत झोपली होती. शहरात जायचं तर आंघोळ करावी लागेल म्हणून त्याने कालच जरा जास्तीच पाणी भरून ठेवलं होतं. तेच वापरणार होता तो. पण येश्या जागा झाला का ते बघायला गेला. येश्या नुकताच जागा झाला होता आणि मशेरी लावत बसला होता दाताला.

"येश्या…. तयारी झाली ना… निघूया ना… " येश्याने मान हलवून 'हो' म्हटलं. तसा निल्या आंघोळीसाठी घरी आला. थोडयावेळाने तयारी केली त्याने आणि आईला आवाज दिला. "ये आये… ". आवाजाने म्हातारी जागी झाली." ये आये…. मी जाऊन येतू गं… बाळाकडं… ", तशी ती लगेच बाहेर आली. "हा… रं … बघ….जमलं तर घेऊन ये इत बाळाला… लय बरिस झालं… तोंड बी दावल नाय त्यान… " डोळ्यात पाणी आलं म्हातारीच्या. निल्याला पण वाईट वाटलं. " येतो गं… जा नीज तू… "म्हणत निल्या निघाला. येश्याची जना भाकरी बांधून देत होती. " भावोजी… तुमाला बी दिली हाय भाकर… पोटभर खा… " येश्याने डब्बा घेतला आणि दोघे निघाले संगतीने. जाता जाता जरा लांबच्या रस्त्यानेच गेले. निल्याने एक नजर फिरवली शेतावर. तसं काही नव्हतं शेतात बघायला. तरीसुद्धा बघून निल्या निघाला पुढे. शहरात जाण्यासाठी तालुक्यात जाऊन गाडी पकडावी लागे. दोघे तिथेच निघाले होते.

वाटेत काही रिकामी घरे होती. उजाड मोकळी शेतं होती. त्याकडे बघत बघत दोघे चालले होते. इकडच्या बऱ्याचश्या जमिनी,घरं सरपंचाकडे गहाण ठेवलेली. त्यानंतर त्याच्या बायकोने ती स्वतः काढून घेतली लोकांकडून. पैसे नाहीतर जमीन,सरळ हिशोब. काही जमिनी पडीक होत्या अश्याच. त्या जमिनीचा मालकच नाही राहिला तर कोण बघणार त्या जमिनीकडे. निल्या सुद्धा खूप वर्षांनी गावाच्या बाहेर पडत होता. गावाच्या वेशीपर्यंत आले दोघे. " किधर जा रहे हो बेटा … ? " मागून आवाज आला तसे दोघे थांबले.

येडा चाचा… त्याने आवाज दिला होता. गावाच्या वेशीवर घर होतं त्याचं. पण गावात राहायचा नाही कधी. गावभर भटकत असायचा तो. गावात सगळ्याच्या ओळखीचा होता चाचा. त्याच्या घरात कोणी नव्हतं. मग घरात जाऊन काय करणार तो… कधी वाटलं तर त्याच्या घराच्या बाहेर बसून असायचा नाहीतर गावात फिरत बसायचा. जरा वयाने होता चाचा. निल्याचे वडील आणि येडा चाचा, लहानपणीची संगती. एकत्र वाढलेले. फक्त चाचा मुसलमान होता. म्हणून त्याचं घर गावाच्या वेशीवर होतं. पण चाचाच्या घरचे सगळे खूप चांगले होते, पहिल्यापासून. हिंदू -मुसलमान असा भेद केला नाही कधी त्यांनी. सगळ्या सणामध्ये आनंदाने भाग घेयाचे. निल्याचा म्हातारा आणि चाचा , घट्ट मित्र. चाचाचे घर जरी वेशीवर असलं तरी त्याचं शेत आत गावात होतं. दोघे एकमेकांना मदत करायचे शेतीत. चाचाचं शेतं तसं खूप मोठ्ठ होतं, त्यात राबणारे हात सुद्धा खूप होते. १०-१२ माणसं होती हाताखाली. चांगलं चालायचं चाचाचे. चाचाला एक मुलगा होता. तो पण निल्याच्या वयाचा. पण लहानपणापासून शहरात शिकायला होता. कधी कधी सुट्टी असली कि घरी यायचा. चाचाच्या घरात तेव्हा तिघेच जण होते. त्याचे आई-वडील म्हातारे होऊन मेले आधीच. आता फक्त चाचा,चाची आणि त्याचा मुलगा. गावात दोघेच राहायचे. मुलगा चांगला शिकला आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावात आला. चाचाचे खूप प्रेम त्याच्यावर. कोणताही हट्ट लगेच पुरवायचा. शेतावर कधी राबवला नाही त्याने त्याच्या मुलाला. थोडे महिने तो गावातच होता. नंतर म्हणाला, नोकरीसाठी शहरात जातो. तिथे पैसे लागतील. सेम निल्याच्या बाळासारखी गत. पण चाचानी त्याला पैसे दिले होते. गेला शहरात, ६ महिन्यांनी वापस गावाला. आणखी पैसे हवे म्हणून, चाचाला कळलं होतं कि त्याला शहरात वाईट संगत लागली आहे ते, तरी चाचाने पैसे दिले. गेला शहरात, यावेळी ३ महिन्यांनी आणखी पैसे मागायला दारात हजर. यावेळीस मात्र चाचाने पैसे दिले नाहीत. मोठ्ठ भांडण चाचा आणि मुलाचं. चाची मध्ये आली म्हणून भांडण थांबलं. मग काय करणार…. गावातच राहिला थोडे महिने. सुधारला गावात राहून . ६-७ महिने झाले असतील,चाचाला मदत करायचा कामात, चाचीला बरं वाटायचा.

एक दिवस कसलासा कागद घेऊन आला चाचासमोर, बोलला," शहरात नवीन ठिकाणी नोकरी भेटली आहे. त्यासाठी तुमचा अंगठा पाहिजे कागदावर." चाचाला केवढा आनंद, त्यात चाचा शिकलेला नाही. पेपर न वाचताच अंगठा दिला त्याने. चाचा,चाची खूष एकदम. पेपर आणि सामान घेऊन तो गेला शहरात. ५-६ दिवसांनी , शहरातून काही मानसं आली. आणि चाचाला त्याच्याच शेतातून बाहेर काढलं. काय चाललंय कळेना. भांडण, मारामाऱ्या सुरु झाल्या. सगळे गावकरी आले धावून मदतीला. पोलिस पाटील आला. तेव्हा सगळा खुलासा झाला. चाचाच्या मुलाने सगळी जमींन विकून टाकली होती आणि चाचाने ज्या कागदावर अंगठा दिला होता तो कागद जमीन विकायचा होता. आता सगळी जमीन कायद्याने त्यांची होती, चाचा काही करू शकत नव्हता, ना गावकरी. मुलगा फसवून कायमचा शहरात गेला होता पळून. मोठा धक्का चाचाला.एवढं प्रेम केलं त्याने मुलावर, त्याने असं केलं. चाचीने तर धसका घेतला. अंथरुणावर खिळली ती कायमची. तिच्या औषधावर किती पैसे गेले चाचाचे. शेवटी मुलाचं नाव घेत मेली बिचारी. चाचा एकटा पडला.

शेत तर राहिलं नाही. घरात कोणी नाही. काय करणार घरात राहून. बाहेरचं बसून राहायचा तासनतास. वाटेकडे डोळे लावून. भूक लागली कि गावात फिरायचा. सगळ्या गावाला चाचाची कहाणी माहित होती. कोण ना कोण देयाचे खायला. कधी कोणी बिडी द्यायचं फुकायला.… एवढंच. बाकी तो एकटा कूठेतरी बघत , काही बाही बडबडत असायचा. बिडी ओढत निघणाऱ्या धुराकडे बघत बसायचा. हिंदीत कि कोणत्या भाषेत कविता नाही तर एखादा 'शेर' म्हणायचं. काही समजायचे नाही. जुन्या लोकांना माहित होता चाचा. नवीन मुलांना काय माहित त्याचं दुःख… त्या मुलांनीच त्याचं नावं "येडा चाचा" ठेवलं होतं. आणि गावात आता त्याला सगळे तसंच म्हणायचे.

चाचा निल्याला ओळखायचा. म्हणून त्याने त्याला हाक मारली. " हा चाचा… जरा शहरात जातो आहे." चाचाला मराठी कळायचे, बोलता यायचे नाही. निल्या बोलला ते कळलं त्याला. " हा बेटा… जाओ शहर में… पर वापस जरूर आना… किसको छोड के मत जाना । " चाचा बोलला आणि आल्या पावली निघून गेला बडबडत. निल्या आणि येश्याला त्याच्या मुलाची आठवण झाली. " काय रे… काय करत असेल तो शहरात ? " ,"काय माहित पण नक्की सुखी नसणार तो… हाय लागते रे अशी. बिचाऱ्या आई-बाबाला फसवून कोणाचं बरं होतं नाही कधी." बोलता बोलता दोघे S.T. stand वर आले. निल्याने शहराची दोन तिकीट काढली. गाडीदेखील वेळेत निघाली. ३ ते ४ तासाचा प्रवास. संध्याकाळ पर्यत पोहोचू असा साधा हिशोब. पण ऐनवेळी गाडी बंद पडली. driver लागला कामाला. " आता अर्धा-एक तास तरी गाडी काही हलायची नाही." कोणी एक प्रवाशी बोलला." हा…. हा…,जरा इंजिनाचा प्रोब्लेम झाला आहे. वेळ लागेल… सगळ्यांनी उतरून घ्या. " गाडीच्या driver ने सांगितलं.

सगळी मंडळी खाली उतरली. दोघा-तिघांनी घोळके बनवून इकडच्या- तिकडच्या गप्पागोष्टी सुरु केल्या. निल्या-येश्या असेच एका आडोश्याला उभे होते. कोणीतरी हाक दिली निल्याला लांबूनच, निल्या मागे बघू लागला कोण ते… अरेच्या… हा तर किसन… हा… हो, किसनच तो, हा पण याचं गाडीत होता, दिसला कसा नाही मग. किसन धावतच जवळ आला. किसन… निल्या आणि येश्याचा शाळेतला मित्र, दुसऱ्या गावातला.… तालुक्याच्या शाळेत तिघे एकत्र होते, तेव्हाची ओळख. "काय रे… निल्या, येश्या… किती वर्षांनी भेटतो आहे ना." किसनने आनंदाने मिठी मारली दोघांना. त्यांनाही बरं वाटलं जरा. "काय करता रे दोघे… कामाला वगैरे कूठे आहात ? " त्यावर दोघे एकमेकांकडे पाहू लागले. किसनला कळलं कि काहीतरी गडबड आहे ते. "काय झालं रे… ?" निल्याने सगळी कहाणी सांगितली. येशाची गोष्ट मांडली त्याच्यासमोर. साहजिकच वाईट वाटलं त्याला.
" तू काय करतोस ? ",
" माझ्या वडिलाची अशीच गत झाली होती. मी नंतर शहरात गेलो शिकायला. तिकडेच असतो आता पण. इकडे वडिलांना शेतीची कामं जमायची नाही. सरळ जमीन विकून टाकली. आता इकडे काही नाही आमचं. आता सगळेच तिकडे राहतो आम्ही.",
"मग… आता इकडे कसा तू ? ".
"असाच येतो… कधी गावाची आठवण झाली कि.एक-दोन दिवस राहून पुन्हा शहरात जातो. काय ना… शहरात राहून गावपण विसरलो आहे… तेच जमवत असतो इकडे येऊन. " किसन हसत म्हणाला.
"तुम्ही कूठे निघालात ? ",
"याचा भाऊ राहतो शहरात, त्याला भेटायला जातो आहे.",
"छान…" निल्याला काही विचारायचे होते कधी पासून.
"किसन… विचारू का एक… ",
"विचार ना… ",
"शहरात जाऊन मानसं बदलतात का… ?",
"का रे… ",
"असंच.",
"बदलतात काही…. पण सगळी नाही बदलत… पण जास्त वर्ष राहिला एकदा तर काही सांगता येत नाही." तेवढयात गाडी सुरु झाल्याचा आवाज झाला. तसे सगळे गाडीत जाऊन बसले.

जरा उशिराच पोहोचली गाडी शहरात. निल्या आणि येश्याचा निरोप घेऊन किसन त्याच्या वाटेने निघून गेला. निल्या त्याच्या विचारात.
"काय झालं निल्या ? " निल्या विचारात अजून.
" तुला काय वाटते, आपला बाळा… बदलला असेल का शहरात जाऊन ",
" आणि असं का वाटते तुला ? ",
"जवळपास दोन वर्ष झाली. कितीवेळा त्याला फोन लावला मी, एकदाही त्याने उचलला नाही. सहा महिन्यांनी पैसे येतात तेवढेच… इकडे येऊन किती वर्ष झाली त्याला." येशाने त्याच्या खांदयावर हात ठेवला.
"नाही रे…. असं काही वाटून घेऊ नकोस तू… चल पटकन जाऊ बाळाकडे, नाहीतर अंधार होईल." तसा निल्या तयार झाला.

पत्ता होता त्यांच्याकडे, विचारत विचारत पोहोचले एकदाचे. मोठी सोसायटी होती ती. मोठया इमारती. इमारतींकडे बघत बघत ते गेटच्या आत शिरले. तसा watchman ने अडवलं दोघांना.
" कूठे… आत नाही जायचं… चला बाहेर…. " watchman ने त्यांना बाहेरंच ढकललं.
" अहो… थांबा… थांबा, याचा भाऊ राहतो इथे." येश्या म्हणाला. तसं watchman ला हसायला आलं.
" हो… का, बरं… कूठे राहतो इथे तो…झोपडी नाही, सोसायटी आहे ही… ",
"अहो… खरंच याचा भाऊ राहतो इथे, रोहित पाटील… इकडेच राहतो ना… " ते नाव ऐकताच watchman ला आठवलं.
"हा… हा, रोहित साहेब… त्यांच्याकडे आलात का तुम्ही… पण तुमच्याकडे बघून वाटत नाही कि ते तुमचे भाऊ आहेत असं…" निल्याला जरा वाईट वाटलं.
"मग आम्ही जाऊ का तिथे… कूठे राहतात या इमारती मध्ये… " watchman ने समोर इमारतीकडे बोट दाखवत म्हटलं,"त्या इमारतीत,६ व्या मजल्यावर, दुसरी रूम… " जसे दोघे निघाले तेव्हा परत watchman ने अडवलं. " थांबा जरा… तिथे आता पार्टी सुरु आहे. त्यांना मी फोन लावून सांगू का… तुम्ही आलात ते. " तसे दोघे थांबले. त्याने वर रोहितच्या flat वर call लावला. " थांबा हा… रोहित साहेब येत आहेत खाली, स्वतः… "

(पुढे वाचा.
http://vinitdhanawade.blogspot.in/2015/12/blog-post.html
आवडली तर नक्की share करा. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की वाचा

" मला आलेला अनुभव "
दिनांक : २८/१२/२०१५, वेळ : संध्याकाळ ……….

नेहमीचा रस्ता. दादर स्टेशनला उतरून सरळ घरी निघालो. नेहमीचीच गर्दी, तीच तीच धक्का-बुक्की, अर्थात गर्दी कोणाला आवडते. म्हणून जरा बाजूला उभा राहून गर्दी कमी होण्याची वाट पाहतो नेहमी. तसाच आज उभा राहिलो होतो बाजूला. ५ मिनिटे झाली असतील… गर्दी कमी झालेली बघून मी निघालो. तसं एक बाई माझ्याकडे बघत आहेत असं वाटलं. मी निघालो तरी त्या माझ्याकडे बघत होत्या.…. मला वाटलं कोणीतरी Fan असतील माझ्या ( आता Fan's ची सवय झाली आहे, तसं म्हणावं तर). मी चालायला लागलो तश्या त्या एकदम पुढे आल्या माझ्या. " तुम्ही विनित धनावडे ना… ब्लॉग लिहिता ना तुम्ही… " ३०-४० च्या आसपास वय असेल त्याचं… या Fan आहेत आणि sign वगैरे पाहिजे असेल ( तीही सवय झाली आहे आता ) मी " हो " बोललो. " मला काही बोलायचे आहे तुमच्या बरोबर… वेळ आहे का ? "…. वेळ होता… बघूया काय बोलतात ते. म्हणून पुन्हा एकदा बाजूला येऊन उभा राहिलो आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. "नमस्कार … मी मंजुषा कराडे.… मी गिरगावात राहते. मिस्टर आणि २ मुली असा परिवार आहे माझा. पण ते महत्वाचं नाही. मला सांगायचं आहे ते माझ्या आईबद्दल… माझ्या आईला T.B. झाला आहे. ६६ वर्षाची आहे ती. आता वडाळ्याच्या T.B. हॉस्पिटलमध्ये admit आहे ती, गेल्या २ वर्षापासून… सुरुवातीला तिची अवस्था एकदम चिंताजनक होती… औषधांना response देत नव्हती. औषधं सुद्धा वेळेवर घेयाची नाही. डॉक्टर बोलले होते कि काही लोकांचे वय झाले कि जगण्याची इच्छयाच मरून जाते. त्यात ती एकटी रहायची घरी. वडिलांना जाऊन १२-१५ वर्ष झाली आता. मी तरी कूठे लक्ष देणार…. माझं घर कि आई… पण मला माझी पाहिजे होती. डॉक्टर बोलले कि त्यांच्या मनातल्या इच्छ्येवर त्यांचे पुढंच जीवन अवलंबून आहे… काय करायचे कळत नव्हते. डॉक्टर पुढे म्हणाले कि त्यांना ज्याचा छंद आहे असं काहीतरी मध्ये मन गुंतवा तुमच्या आईचे… आईला वाचनाची आवड खूप… गेली किती वर्ष म्हणजे बाबा गेल्यापासून तिने वाचन जवळपास सोडून दिलं होतं …शिवाय आता तिला लहान अक्षरे वाचता येत नाहीत. "

" मग काय केलं तुम्ही… ? " मला interesting वाटलं… " मग मीच काहीबाही पुस्तकं घेऊन जायचे हॉस्पिटलमध्ये आणि आईसमोर वाचत बसायचे.… त्यात सुद्धा आईला काही interest नव्हता. कोणतं पुस्तक आणावं ते कळत नव्हतं. कारण आईने खूप पुस्तके वाचली होती आधीच.… म्हणून माझ्या मैत्रिणीला मी नवीन पुस्तकाविषयी विचारलं. तेव्हा ती म्हणाली कि नवीन books माहित नाहीत पण एक ब्लॉग आहे… त्यात खूप छान story असतात. त्या वाचून दाखव आईला. तिने मला ब्लॉगची लिंक पाठवली.… "थोडंसं कधीतरी… " मी वाचलेला पहिला ब्लॉग… माझ्या Tab वर open केला ब्लॉग आणि पहिली कथा वाचून दाखवली आईला ती… " त्याचा पाऊस… " त्यानंतर दोन कविता वाचून दाखवल्या. आता मी काही एवढी वाचत नाही काही… आईसाठी वाचले. महत्वाचं म्हणजे आईला आवडलं ते. दुसऱ्या दिवशी, मी भेटायला गेल्या बरोबर तिने विचारलं कि अजून कथा आहेत का… छान वाटलं ऐकून… अजून एक कथा वाचून दाखवली… आणि मग हे रोजच सुरु झालं. तुमच्या सगळ्या कथा,कविता वाचून झाल्या…. दुसऱ्याच्या कथा सुद्धा वाचून दाखवल्या मी तिला, पण ती बोलते कि तुमच्याच कथा जास्त मनाला भिडतात. यात ऐक गोष्ट सांगायची झाली कि ती औषध वेळेवर घेऊ लागली. शिवाय आता response चांगला आहे तिचा. तुमच्या कथा वाचल्यापासून आनंदी असते… पुन्हा पुन्हा त्याचं त्याचं कथा वाचून दाखवायला लावते… आता तर सगळ्या कथा माझ्या आणि तिच्या तोंडपाठ झाल्या आहेत… आता बरी सुद्धा होते आहे हळूहळू… "

ऐकून किती बरं वाटलं मला. " Thanks… " म्हणालो त्यांना… " मी एक clear सांगते तुम्हाला… मी तुमची Fan वगैरे नाही, पण माझी आई तुमची खूप मोठी Fan आहे. तिचा एक दिवस जात नाही तुमची एखादी कथा वाचल्याशिवाय. अर्थात मीच वाचून दाखवते Tab वर.… तर मला तुम्हाला भेटायचे होते एकदा तरी… Thanks म्हणायचे होते तुम्हाला. " आणि त्यांनी माझ्या पायाला हात लावला. मी दचकलो जरा." अहो… काय करत आहात तुम्ही " मी बाजूला झालो. " हे यासाठी कि… तुमच्यामुळे मला माझी आई परत भेटते आहे. आता चांगली बरी होत आहे. फक्त तुमच्यामुळे… जे औषधांनी केलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. माझ्यासाठी तरी तुम्ही 'देव' आहात. त्यासाठी पाया पडले. पैसे खूप आहेत माझ्याकडे… तरीसुद्धा काहीतरी चमत्कार घडावा लागतो तो असा. बाकी काही म्हणणं नाही माझं. फक्त तुम्ही लिहिणं थांबवू नका.कधी…. आईच्या जगण्याला त्यातून अर्थ मिळाला आहे. ती बोलते सुद्धा कि यासाठी मी जगते आहे आता. तर …. माझ्या आईसाठी पुन्हा एकदा मनापासून Thanks… येते मी… "

क्षणात त्या पायऱ्या उतरून निघून गेल्या आणि आलेल्या गर्दीत नाहीश्या झाल्या. नक्की काय घडलं ते कळलं नाही मला. फक्त एवढ कळलं कि कोणीतरी माझ्यामुळे पुन्हा एकदा जगण्याचा विचार करत आहे. देव तर खूप मोठा आहे…. त्याच्या आसपास सुद्धा नाही मी… पण जे होते आहे ते खूप छान आहे. असंच प्रेम असू दे माझ्यावर…. अशी देवाकडे प्रार्थना.

( थोडसं ........कधीतरी ............ http://vinitdhanawade.blogspot.in/ )

संकेतस्थळावर वाचली. हृदयस्पर्शी कथा. काही प्रसंगी तर खरचं डोळे पाणावले. शेवट छान केलात.