पिन्कीची आई

Submitted by mrsbarve on 22 December, 2015 - 18:42

"धाड धाड धाड " स्वयपाक घरातले डबे खाली पडले,त्यातले लाडू जमिनीवर लोळायला लागले. आईची डुलकी मोडली आणि "कार्टे …."म्हणत आई स्वयपाक घरात आली. एक धपाटा पाठीत बसला ,पिंकीने लगेच भोकाड पसरले,मग वैतागून आईने आणखी एक धपाटा पिंकीला बहाल केला . सगळे लाडू डब्यात परत भरून ठेवले.
रात्री पिंकी तापाने फणफणली ,आईच्या लक्षात यायला उशीर झाला …. पिंकी हॉस्पिटलात पोचली ,तिची शुद्धही हरपली होति… झोपेत धपाटा बसला म्हणून रडत होति. आईच चित्त थार्यावर नव्हतं ,आणि पिंकी गेली …. सगळ्यांना सोडून …मेनिञ्जाय्टिस !

त्या धक्क्याने आई वेडी पिशी झाली , न रडायची न हसायची !जगणच बंद केलं तिने ! मृतवत दिवस ढकलत राहिली! पिंकीचे बाबाही !पिंकीच्या कुठल्याही मैत्रीणीना तिच्या घरी जायला बंदी होति. वर्षा मागून वर्षे गेली.

पिंकीचा भाऊ मोठा झाला ,त्याचे लग्न झाले ,त्याला एक गोड पोरगी झाली ,तिच्या साठी तिच्या आईने बेसनाचे लाडू केले, गेल्या कित्येक वर्षात तुपात भाजलेल्या बेसनाचा वास त्या घरात पसरला. पिंकीची म्हातारी आई अंथरुणातून उठून बसलि. उठून स्वयपाक घरात आली , खुर्चीत बसून एकटक त्या लाडुङ्कडे पाहत राहीली .

सुनेने लाडू डब्यात भरले आणि फडताळात ठेवले ,दुपार झाली ,स्वयपाकघरात साम सूम झाली. लहानग्या नातीने स्टूल घेतला ,त्यावर उभी राहिली ,लाडूंचा डबा हातातून निसटला ,सगळे लाडु जमिनीवर लोळायला लागले ….

आईची डुलकी मोडली ,तिने "कार्टे …",म्हणत मुलीला धपाटा घातला
त्या रात्री पिंकीची आई नातीला जवळ घेऊन कळवळून रडली ….

Group content visibility: 
Public - accessible to all site users