बाजीराव-मस्तानी

Submitted by समीरपाठक on 21 December, 2015 - 12:53

बाजीराव-मस्तानी

बाजीराव मस्तानी या दोघांवर सोशल साईट्सवर इतकी चर्चा घडलेली आहे कि या सिनेमाचा इतिहासाशी, ब्राह्मणांशी संबंध हे सोडून फक्त एक कलाकृती म्हणून याच एनालिसिस होण कठीण वाटते आहे पण तरीही संजय लीला भन्साळीला या अप्रतिम कलाकृतीबद्दल श्रेय हे विरोधकही देतील याचा भरवसा वाटतो.
बाजीराव पेशवे हे शूर योद्धे होते हे मान्य पण त्यांच्याबद्दल महाराष्ट्राबाहेर त्यांचा उल्लेख शूर म्हणून न होता मस्तानी प्रकरणामुळे होतो. मी स्वत: गुजरात मध्ये काही वर्ष काढलेली आहेत आणि हे अनुभवलेलं आहे. त्यांची ब्राह्मण जात आणि मस्तानी या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांच्या शुरत्वावर कडी करतो हे मी बघितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी संजय लीला भन्साळी यांचे या मराठी मानसिकतेला अवघड विषयाला हात घातल्याबद्दल कौतुक कारण त्यांनी पूर्ण सिनेमात बाजीरावांचे मस्तानीवर प्रेम होते ती त्यांची रखेल-अंगवस्त्र नव्हती या वास्तविकतेवर भन्साळींनी फोकस केलेला आहे. बाजीरावांची मस्तानीशी झालेली पहिली भेट इथपासून सुरवात करून त्यांचे रंगलेले प्रेम इत्यादी अवघड विषयाला अप्रतिमरीत्या भन्साळीने हाताळलेल आहे.
बाजीराव पेशवे यांची झालेली मस्तानी या नर्तकीशी भेट अन त्या मस्तानीला तिच्या वडलांनी बाजीरावांना केलेले नजर. तिचा पुण्यात/त्यांच्या घरात प्रवेश आणि शेवटी दोघांचाही झालेला (वेगवेगळा) मृत्यू या धाग्याभोवती विविध अंगाने फुलणारी कहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानी.नागनाथ इनामदार यांच्या "राऊ" या पुस्तकावर बेतलेली कहाणी असा उल्लेख पहिल्यांदाच आहे. मला अपेक्षा होती कि आधी घडलेला गदारोळ बघता भन्साळी "काल्पनिक कथा वास्तविकतेशी संबंध नाही" अशी सूचना आधी देईल. पण तसे काहीही घडले नाही.
काशीबाई साहेबांचा या कहाणीत आपोआप प्रवेश होतो कारण त्या श्रीमंतांच्या प्रथम पत्नी. त्यांचे आगमन कथेत झालावरही कथा मस्तानी आणि मस्तानीवर भाळलेला बाजीराव अशी न झुकता बाजीरावांचे शौर्य या गोष्टींवर फोकस करते या साठी भन्साळीचे खरोखर कौतुक.

बाजीरावांनी अवघ्या चाळीस वर्षांच्या जीवनात जवळपास सगळ्या प्रकारचे युद्धकौशल्य आत्मसात केले होते. मैदानी युद्धकलांत तर ते निपुण होतेच पण राजकारणी बाजूनेहि ते तरबेज होते. कथेत ओझरताच उल्लेख असला तरी निजामावर त्यांनी मिळवलेला विजय हा त्यांच्या कुटनिति अन कावेबाज डावपेचामक राजकारणाचा अप्रतीम नमुना होता/आहे. अश्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला पडद्यावर उभे करणे हि निश्चितच एक कठीण गोष्ट होती. पण रणवीर सिंग कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या अभिनयात्मक कारकिर्दीतील अप्रतिम कामगिरी यात करून गेलाय. मस्तानीच्या प्रेमात पडलेला पण स्त्रीलंपट नसलेला अशी त्यांची योग्य अशी प्रतिमा रणवीर सिंग मुळे निर्माण होण्यास मदत होईल हे नक्की.

मस्तानीच्या भूमिकेत आहे दीपिका पदुकोण. मस्तानी हि रखेल नव्हती पण तिचा आणि श्रीमंतांचा विवाह झालेला होता असा उल्लेख भन्साळीला कदाचित इतिहासात सापडला नसावा. कारण त्या दोघांचा विवाह झाल्याच्या उल्लेख/प्रसंग सिनेमात नाही. पण श्रीमंत ज्या व्यक्तिमत्वावर भाळले असतील असे व्यक्तिमत्व पडद्यावर उभे करण्यात मात्र दीपिका पदुकोण यशस्वी होते हे नक्की. आपल्या सौंदर्याचा अभिमान असलेली एक स्त्री, युद्धकलानिपुण पण श्रीमंतांच्या रूपावर/व्यक्तिमत्वावर भाळलेली स्त्री उभे करणे हे एक कठीण काम होते, नानासाहेबांचे व्यक्तिमत्व कथेत आल्यावर त्यांच्या रूपाने त्यांच्यासकट सगळ्या पेशवे घराण्याचा विरोध सहन करताना श्रीमंतांवर असलेली निष्ठा डळमळीत न होऊ देणारी स्त्री असल्या छटा फक्त तीन तासांत एका अभिनेत्याने पडद्यावर उभ्या करणे हे किचकट काम होते. पण दीपिका पुरून उरली दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर हे नक्की.
काशीबाई राणीसाहेबांच्या भूमिकेत आहेत प्रियंका चोप्रा. काशीबाईंची भूमिकाही एक कठीण भूमिका होती. घरात नवर्याला होत असलेला विरोध कमी करण्याचा प्रयत्न करत नवर्याच्या चुका पोटात घालून त्याला तोलामोलाची साथ देणारी एक कुलीन भार्या प्रियंकाने शब्दश: पडद्यावर उभी केलेली आहे. मस्तानीला समजून घेणारी पण तिने तिच्या मोठ्या बहिणीचा दर्जा देताच त्या दर्जाला नाकारणारी अन फक्त पतीपेमाने तुला आपलंस करते आहे हे तिला जाणवून देणारी राणी अप्रतिम रित्या प्रियंकाने उभी केलेली आहे.
पिंगा अन मल्हारी या गाण्याला विविध कारणाने विरोध झाला. या गाण्यामुळे प्रतिमा खालावतेय या अन अश्या आशयाच्या पतिक्रिया मी तथाकथित पेशव्यांच्या वंशजांकडून वाहिन्यांवर बघितल्या. हे दोन गाणे अन माननीय काशीबाई साहेबांची प्रतिमा उभारण्यात दिग्दर्शकाने घेतलेली cinematic लिबर्टी आपण दुर्लक्षित करू पण तीन तासांची एक अप्रतिम ऐतिहासिक कथा विनादोष निर्माण करण्यात संजय लीला भन्साळी हे यशस्वी झालेत याचा आनंद होऊन मी चित्रपट ४१/२* (साडेचार) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी चित्रपट ४१/२* (साडेचार) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
>>>>
हे या चित्रपटाला कोणत्याही परीक्षकाने दिलेले सर्वाधिक स्टार असावेत Happy

दहापैकी नाहीत ना Wink