रेशीमगाठ..

Submitted by आवारा on 17 December, 2015 - 06:32

विजयसाठी मुलगी बघायला जायची चर्चा त्याच्या घरि चालली होती. विजय माझा मित्र, त्याच्याबद्दल सांगायचं तर " टाईम्सऑफ इंडिया " माणूस ( वेळेवर कुठलच काम न करणारा, TOI (Times of India) ह्या त्याच्या नविन नावाचा शोध गावातीलच टवाळ कारट्ंयाच्या एका ग्रृपने संगनमताने साधारण दोन ते तीन वर्षापूर्वीच लावला होता) आता त्याच्यासाठी मुलगी बघायला जायचं म्हणजे मी आणि माझ्या सारखाच त्याचा अजून एक जिवलग मित्र अशोक त्याच्या सोबत असणं त्याला गरजेचं वाटलं आणि म्हणुन त्याने आम्हांला अगदी "अगत्यांचे येणे करावे"असं तातडीचं आमंत्रण गावातीलच " आज तक" नावाच्या मुलाला सांगून पाठवलं. याचही आज तक हे नाव ठेवण्यामागे गावातीलच त्या कुख्यात टवाळ गँगचाच हात होता म्हणे. आजतक ची पण एक वेगळीच ओळख आहे. म्हणजे पंचक्रोशीत त्याला ओळखलं जातं ते त्याच्या बातमी प्रसारण करण्याच्या कलेवरून, एकवेळ आज तक न्यूज चँनल मागे पडेल हो पण याच्या बातमी प्रसारणात कधी उशिर झाला असेल तर शपथ...! म्हणजे गावातील कोणाच्या घरि काय चाललय हे ह्याला पक्क ठाऊक असतं. आणि गावतील भांडणात, राजकारणात याचा विषेश असा प्रभाव पडतो. तर असा हा आजतक विजयचं आमंत्रण घेऊन आमच्या घराच्या दारावर धडकला. आणि विजयची विषेश आमंत्रणाची बातमी मला सांगून पुढील बातम्या गोळा करण्यासाठी व प्रसारणासाठी रवाना झाला. सध्याकाळी विजयच्या घरि एक विषेश सभा आयोजित करण्यात आली होती. विषय होता लग्नासाठी मुलगी पाहायला बॉडीगार्ड कम सोबती कोण कोण घ्यायचे . मी आणि अशोक येणार हे ठरलेलं होतं . पण सोबत अजून एका अनुभवी माणसाची गरज होती आणि ती गरज भरून काढली ती गावातील एक सभ्य समजल्या जाणा-या नानाभाऊनी. नानाभाऊ आजपर्यंतच्या इतिहासातले एक विख्यात लग्न जोडणारे मध्यपी म्हणून प्रसिध्द होते. गावातील थोडेफार सोडले तर जवळपास सगळ्याच पोरांची लग्न यांनी जुळवली होती. दुस-या दिवशी आम्ही चौघे दोन मोटारसायकलीवर स्वार होऊन मुलीच्या गावाकडे कुच करणार तोच विजयच्या आज्जीने आवाज दिला तो एक मुलमंत्र देण्यासाठी. आमच्या इकडे एक प्रथा प्रचलीत होती की जर मुलगी पसंत पडली तर आणि तरच मुलीच्या हातात 501 रू. द्यायचे. नाहीतर कुठल्याही अटी किंवा शर्थीवर मुलीला 50- 100च्या वर पैसे द्यायचे नाहीत. (यात मला नेहमी वाटायचं, जर मुलाला मुलगी पसंत पडली नाही तर मुलीकडच्या लोकांना किती तोटा होता, म्हणजे आलेले पाहूने आमच्या सारखे 4-5 लोकं असले तर आमच्यावर खर्च केलेल्या पोहे,चहा सारख्या तस्सम गोष्टीचाही खर्च त्यात निघत नसेल पण यावर माझ्याकडे एक युक्तीही आहे जर समजा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम अगोदर केला आणि समजा मुलाने 50- 100 रूपये दिले तर अर्धा प्लेटच पोहे द्यायचे चह ही एका कपात दोघे म्हणजे एका दगडात दोन पक्षी नाही बरं मग जशास तसे ) विज्याच्या आज्जीने त्याला त्या परंपरेची आठवण करून दिली व विजयनेही एखाद्या विजयी विराप्रमाणे आज्जीला आश् वासन दिलं आणि आमचा ताफा दक्षिणेला विजयसाठी गड काबीज करण्यायाठी निघाला.
मुलीच्या घरच्यांनी आमचं स्वागत केलं आणि आम्ही घरात घुसणार तोच शेजारच्या घरात काही बायकांची गर्दी आम्हाला न्याहाळत असल्याचं आणि गोंधळात असल्याचं मला जाणवलं. कदाचित गोंधळ यासाठी असेल की आमच्या तिघा मित्रामध्ये नवरदेव मुलगा नेमका कोणता हे त्यांना कळलं नसेल असा अशोकने अंदाज व्यक्त केला. अशोक म्हणजे अंदाज व्यक्त करायचं जणू वरदानचं देवाघरून घेऊन आलेला होता. म्हणजे समजा महाराष्ट्रात दुष्काळ पडला तर या सरकारचाच यात काहीतरि हात असेल असे बिनचुक अंदाज व्यक्त करणं हे त्याच्यासारख्या एखाद्या कुशल व्यक्तीलाच जमेल. आणि त्याची शंका खरी निघाली जेव्हा मुलीच्या वडिलांनी "तुमच्या पैकी मुलगा कोण?" असा प्रश्न केला तेव्हा... अहो अस कसं आम्ही सगळेच मुलं आहोत म्हणजे मी तेवढा लग्न झालेला मुलगा आहे इतकचं. अस उत्तर ओठांपर्यंत आलं पण मी स्वतःला सावरत विज्याकडे बोट करून हा आहे मुलगा म्हणून सांगीतलं. मग इकडच तिकडच थोडीफार बोलचाल झाली ते सारं सांभाळून घेण्याचं श्रेय नानाभाऊनींच निभावलं. नानाभाऊ तसे बोलण्यात पटाइतच होते. थोड्या वेळाने चहा आला. त्यानंतर मुलीच्या बापाने पोहे आणायचे सांगीतले. सगळ्यांना एक- एक छोटी प्लेट पोहे मिळाले. त्यात अाशक्याने एका दमात मोठ मोठे घास घेत संपूर्ण प्लेट वेळेच्याही अगोदर संपवून टाकली ( एका ठरावीक वेळेतच पोहे झाले पाहीजे असा नियम असतो कदाचित म्हणजे खुप लवकरही नाही आणि खुप उशिराही नाही. त्यातल्या खुप लवकर या प्रकारात आशक्यान चक्क पहीला नंबरच पटकावला ) आणि कोपराने मला खुणावत म्हणाला मला अजून पाहीजे. अरे आशक्या पोटभर खायचे नसतात रे ते मी अगदी हळू आवाजातच त्याला म्हणालो. आरे पण मला भुक लागलीय??? त्याचा परत प्रश्न... कसं होईल बाबा म्हणजे मुलीकडच्याचा पण विचार कर त्यांनाही भागायला हवयं... तेवढ्यात मुलीच्या बापाने आमच्यातली चुळबूळ पाहून ओळखलचं आणि विचारलं. अजून पाहीजेय का??? मी नम्रपणे नाही म्हणालो (स्वभावगुण हो नाहीतरि मलापण भुक लागलेलीच होती ) पण आशक्यानं लगेच प्लेट पुढे करत "हो मला पाहीजेय " म्हणून माझ्या डोक्यातील अर्थव्यवस्थेचे तीन तेरा केले. विज्या मात्र हळू-हळू दळत बसला होता. कदाचित त्याला "खुप उशिरा "या प्रकारात मेडल मिळवायचं होतं. आमच होत आलं. आशक्यानं तर आमच्याच इतक्या वेळात डबल डाव हाणला. तसा मी विज्याला खुणावलं की लवकर आवर आणि त्यानेही दोन मिनटांत आशक्याची कॉपी केल्यागत सारं संपवलं. मग सारं आवरा आवर झाल्यावर ती वेळ आलीच ज्या वेळेची विज्याला जाम प्रतिक्षा होती. मुलीला बोलावण्यात आलं आणि नानाभाऊच्या पुढे मुलीला बसवलं.... ( म्हणजे लग्न करणारा मुलगा वेगळाच आणि ह्या मधल्या माणसासमोर मुलीला का बसवतात देव जाणे मला तर आजपर्यंत काही कळलं नाही ब्वा) मग नानाभाऊचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चालू झाला. त्यातला पहिलाच प्रश्न होता. तुझं नाव काय बाळ ? (एक क्षण तर वाटलं मुलीने उत्तर द्यायला हवं तुला काय करायचय माझं नाव.. आणि इथ काय माझं नाव माहित नसतांनाच आलाय काय रे) पण मुलगी लाजत लाजत बोलली. शुभांगी ... शिक्षण किती झालयं? पुढचा प्रश्न...१०वी उत्तर. वाटलं नाही मुलगी असेल म्हणून पण लगेच मुलीच्या बापाने स्पष्ट करून दिलं की दहावीपर्यंत शिकवलं नंतर काही जाऊ दिलं नाही शाळेत. (हो ना नंतर शाळा नसतेच त्याला कॉलेज म्हणतात. वाचली बिच्चारी नाहीतर परत शाळेत) त्यानंतरचा नानाभाऊ पुढचा प्रश्न विचारणार तोच विज्याला काय झालं काय माहीतं तो नानाभाऊंना मध्येच थांबवत म्हणाला की मला मुलीशी एकांतात बोलायचय. घरातल्या दरवाजातुन डोकाउन पाहणा-या बायकांत कुजबूज चालू झाली... त्यावर मुलीच्या बापाने जरा निराश मनःस्थितीतच परवानगी दिली आणि विज्याला व त्या मुलीला घराच्या गच्चीवर पाठवलं गेलं जातांना विज्या मलाही सोबत येण्यासाठी बोलला पण मी आल्यावर तो एकांत राहणार नाही म्हणून स्पष्ट नकार दिला. जेमतेम १०-१५ मिनिटांत विज्या जरासा आनंदी मुद्रेनेच खाली आला. त्या पाठोपाठ मुलगीही खाली आली आणि तिच्या हातातील ५००ची नोट पाहून मलाही अर्थव्यवस्थेचा कणा टिकून राहील्याचं समाधान झालं आणि मुलीलाही मुलगा पसंत असल्याचं लवकरच कळलं. पुढची बोलणी लवकर करू अस आश्वासन नानाभाऊंनी मुलीच्या बापाला देऊन निरोप घेतला.

क्रमशः..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्न जोडणारे मध्यपी
>>

मी चुकून मद्यपि वाचलो Rofl

दक्षिणेला विजयसाठी, . हो ना नंतर शाळा नसतेच त्याला कॉलेज म्हणतात, अर्थव्यवस्थेचा कणा, मस्त जमलेय.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

ढुंकून पाहणा-या बायकांत कुजबूज चालू झाली.. >>>> डो़कावून हो.. Lol

ती माझ्याकडे ढुंकूनही पहात नाही ... असे नकारार्थी वापरतात. Happy

छान. आवडले. Happy

सस्मित>>>>>>>

आमच्या इकडे एक प्रथा प्रचलीत होती की जर मुलगी पसंत पडली तर आणि तरच मुलीच्या हातात 501 रू. द्यायचे.