महिमभट्ट, ध्वनि सिद्धान्त खंडन

Submitted by अतुल ठाकुर on 14 December, 2015 - 20:58

art.jpg

प्रास्ताविक

पी.वी काणे यांनी एकाठिकाणी म्हटलं आहे कि संस्कृत जगतात जे स्थान वेदान्तात शंकराचार्यांचे, जे व्याकरणात पाणिनीचे ते स्थान काव्यालंकारशास्त्रात आनंदवर्धनाचे आहे. भरतमुनिंनी रसाची अभिव्यक्ती, निष्पत्ती आणि उहापोह हा नाट्यशास्त्राच्याच संदर्भात केला. आनंदवर्धनाने मात्र हे रसशास्त्र नाट्यशास्त्राच्या प्रभावातुन नुसतं बाहेरच काढलं नाही तर त्याने स्वतःचा ध्वनि सिद्धान्त प्रस्थापित करुन काव्यशास्त्रच नव्हे तर कुठल्याही कलेच्या आकलनाच्या अगणित शक्यता निर्माण केल्या. पारंपरिक भारतीय सौंदर्यशास्त्रात काव्यशास्त्राची मिमांसा करताना आनंदवर्धनाच्या उदयापर्यंत फक्त दोनच शक्यता गृहित धरल्या जात असत. शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ आणि त्यानंतर लक्षणेने सांगीतला गेलेला अर्थ. यापलिकडे टीकाकार इतर शक्यतांचा विचार करीत नसत. आनंदवर्धनाने मात्र या दोन अर्थांमध्येच काव्यानुभुती संपते हे मान्य केले नाही. शब्दार्थ, लक्ष्यार्थ आणि त्यापलिकडे आणखि एक अर्थ ज्याला त्याने व्यंग्यार्थ म्हटले तो त्याने महत्त्वाचा मानला. त्यालाच त्याने ध्वनि हे नाव दिले. एखाद्या सुंदर स्त्रीचे सर्व अवयव सुंदर असल्यानंतर त्या एक एक अवयवाच्या सौंदर्याची वेगवेगळी अनुभुती न येता एकत्वाने आणि परिपूर्ण अशी जी सौंदर्यानुभुती येते आणि जो भाव मनात निर्माण होतो त्याला त्याने ध्वनि म्हटले. आनंदवर्धनाच्या मतानुसार हा ध्वनि, जो कुठल्याही कलेच्या थेट आणि लक्ष्यार्थाच्या पलिकडला आहे हा कलेचा, काव्याचा आत्मा आहे. त्यामुळे आनंदवर्धनाच्या ध्वनिसिद्धान्ताचा जो टीकाकार, महिमभट्ट, त्याच्या बद्दल, त्याच्या मताबद्दल उहापोह करताना आधी आनंदवर्धनाबद्दल विवेचन करणे अपरिहार्य आहे.

काश्मिरनिवासी असलेल्या आनंदवर्धनाचा काल इ.स. ८५५ ते ८८३ दरम्यानचा मानला जातो. त्याच्या लेखनात काश्मिरच्या राजा अवन्तिवर्म्याचा उल्लेख येत असल्याने त्यावरुन हा निष्कर्ष विद्वानांनी काढला असावा. आनंदवर्धनाचे ध्वन्यालोक या ग्रंथाव्यतिरिक्त देवीशतक, विषमबाणलीला आणि अर्जुनच्छल हे देखिल ग्रंथ आहेत. मात्र ध्वनिसिद्धान्ताचा निर्माता म्हणुन प्रसिद्ध असलेला अनंदवर्धन हा ध्वन्यालोक या ग्रंथामुळेच ओळखला जातो. आनंदवर्धनाच्या ध्वनिसिद्धान्तामुळे संस्कृतसाहित्य सौंदर्यशास्त्र जगत हे ढवळले गेले आणि संस्कृत अलंकारशास्त्र हे पूर्वीप्रमाणे शब्दार्थ आणि लक्षणेच्या बंधनात राहिले नाही. ते त्या पलिकडे निघुन त्याचा बाज कायमचा बदलुन गेला. आनंदवर्धानाच्या पूर्वसूरींनी काव्याचा आत्मा शोधण्याचे अथक प्रयत्न केले. वामनाने काव्याचा आत्मा काय असा प्रश्न उपस्थित केला होता. भामह, दण्डी यांनी देखिल आपापल्या परिने अलंकारशास्त्रात मौलिक भर घालुन काव्याचा आत्मा शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र एकमेव आनंदवर्धनाने रस आणि भाव यांच्या गुढप्रदेशात प्रवेश करुन त्यातील गुढत्वाला शास्त्राच्या परीघात आणि परीभाषेत आणण्याचे कार्य केले. आनंदवर्धनाने काव्याच्या किंवा कुठल्याही कलेच्या वरवर थेट दिसणार्या अर्थातच अडकण्यास नकार दिला. त्याने शब्दार्थाच्या पलिकडे जाणार्या लक्षणेने दाखवलेल्या अर्थापर्यंत थांबण्यासही नकार दिला. तर त्याहीपलिकडे जाऊन ध्वनि हा व्यंग्यार्थ हा कुठल्याही कलेचा आत्मा आहे हे सांगुन आनंदवर्धनाने कलेमागे असलेले सामाजिक, सांस्कृतीक आणि भावनिक धागेदोरे शास्त्राच्या कक्षेत आणले.

आनंदवर्धनाचा ध्वनिसिद्धान्त सर्वमान्य झाला. स्विकारला गेला. महिमभट्ट या विद्वानावर मात्र या सिद्धान्ताचा प्रभाव पडला नाही. त्याला ध्वनिसिद्धान्त मान्य झाला नाही. आणि या सिद्धान्तासाठी आनंदवर्धनाचे अगोदर ज्या तर्हेची गृहितकं प्रमाण मानली ती देखिल महिनाभट्टाला मान्य नव्हती. आनंदवर्धनाने ध्वनिसिद्धान्त सांगण्याआधी पारंपरिक काव्यशास्त्रावर काही आक्षेप घेतले त्यालाही महिमभट्टाचा विरोध होता. महिमभट्टाच्या म्हणण्यानुसार भाषा ही बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामधील संपर्काचे साधन आहे. या दोघांमध्ये काही विशिष्ठ रीतीरिवाज, संकेत हे गृहीत धरलेले असतात. या संकेतांव्यतिरिक्त भाषेला स्वतःची अशी शक्ती नाही आणि या संकेतांची माहिती असल्याशिवाय भाषेचा व्यवहार चालणार नाही. त्यामुळे शब्दात अथवा भाषेत व्यंग्यार्थ सुचविण्याची कसलीही गुढ शक्ती नसुन ती ऐकणार्याच्या या संकेतांच्या ज्ञानावर भाषेचे आणि त्यामधुन निर्माण होणार्या अर्थाचे सामर्थ्य अवलंबुन असते. भाषेमुळे अथवा काव्यामुळे जे भाव निर्माण होतात ते कितीही गुंतागुंतीचे असले तरी त्याचे तार्किक स्पष्टीकरण करता येते. अशातर्हेने महिमभट्टाने काव्याच्या गुढ अशा परिणामाचा पायाच काढुन घेतला. त्यातील गुढवाद शास्त्राच्या चौकटीत आणुन त्याचे तर्कवादाने विवेचन केले. महिमभट्टाच्या विधानाची सांगोपांग चर्चा करताना आधी आनंदवर्धनाच्या ध्वनिसिद्धान्ताबद्दल थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे.

आनंदवर्धनाचा ध्वनि सिद्धान्त

आनंदवर्धनाने ध्वन्यालोकात असे म्हटले आहे कि तत्त्वज्ञानी, विद्वानांनी अर्थाच्या ज्या मर्यादा सांगीतल्या आहेत, त्याच्या पलिकडे, काव्याची, कलेची भाषा निघुन जाते. परंपरेने भारतीय भाषा तत्त्वज्ञांनी भाषेचा वाच्यार्थ हा पहिला प्रकार मानला याला "अभिधा" हे नाव दिले. शब्द म्हणुन उच्चारल्यानंतर सर्वप्रथम जो अर्थ लक्षात येतो तो शब्दाचा अर्थ. काहीवेळा शद्बार्थापेक्षा वेगळा अर्थ सांगण्याची प्रक्रिया शब्दांच्या विशिष्ठ वापराने घडते, तेव्हा निव्वळ शद्बार्थापेक्षा हा दुसरा अर्थ महत्त्वाचा ठरतो. यास तत्त्वज्ञांनी "लक्षणा" म्हटले. आनंदवर्धनाच्या मते काव्याचा अर्थ हा अभिधा किंवा लक्षणा येथेच संपत नसुन तो त्याही पलिकडे अनेक शक्यता दर्शवत असतो. आनंदवर्धनाच्या या विवेचनाचा अर्थ कालिदासाच्या सुप्रसिद्ध "मेघदूत" खण्डकाव्यातील पुढील उदाहरणाने स्पष्ट होऊ शकेल. मेघदूतातील हा पहिलाच श्लोक आहे.

कश्चित कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात् प्रमत्तः
शापेन अस्तंगितमहिमा वर्षभोग्येण भर्तु:|
यक्षः चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु||

या श्लोकात कान्ता हा शब्द ध्वनि दर्शवतो. याचे कारण म्हणजे कान्ता या शब्दाने नुसतीच स्त्री, अथवा पत्नी दर्शविली नसुन यक्षाची लाडकी पत्नी हा ध्वन्यार्थ येथे आहे. लाडक्या पत्नीचा विरह झाला असल्याचे सांगुन यक्षाचा विरह कालिदासाने जास्त गडद केला आहे. यक्ष या योनीची योजना सुद्धा काही कारणासाठी केली गेली आहे. यक्ष हे उपभोगासाठी प्रसिद्ध असतात. त्यामुळे प्रेमाचे मुर्तीमंत प्रतिक असलेला हा यक्ष आपल्या प्रिय पत्नीपासुन वर्षभर दूर राहणार आहे असे कालिदासाने सूचित केले आहे. हे पुन्हा यक्षाचे दु:ख गडद करणारे आहे. ही दोन्ही उदाहरणे अनुक्रमे कान्ता आणि यक्ष या शब्दामुळे उत्पन्न होणार्या ध्वनिची आहेत. या शब्दाऐवजी इतर कुठलाही शब्द येथे चालणार नाही, कारण त्यामुळे तो विशिष्ठ ध्वनि निर्माण होणार नाही. शब्दाच्या या शक्तीमुळे या ध्वनिला शब्दशक्त्युद्भव ध्वनि असे म्हणतात. त्याचवेळी कालिदासाने रामगिरी पर्वताचे माहात्म्य सांगताना "जनकतनयास्नानपुण्योदकेषु" म्हटले आहे. येथे असे ध्वनि होते कि वनवासात प्रभुरामचंद्रांना सीतेचा सहवास होता. त्या सीतेने येथील तलावात स्नान केले आहे. वनवासात देखिल साथ देणारी सहधर्मचारिणी रामाला मिळाली होती. आणि त्याच ठिकाणी पत्नीच्या विरहाग्नीने यक्ष पोळला जात आहे. ही ध्वनिची उदाहरणे यक्षाचे विरहाचे दु:ख जास्त दाहक करतात. "जनकतनयास्नानपुण्योदकेषु" यातुन उत्पन्न होणारा ध्वनि अर्थशक्त्युद्भव ध्वनि आहे कारण येथे शब्द बदलला तरी अर्थामुळे तोच ध्वनि निर्माण होतो.

आनंदवर्धनाने ध्वनिचे महत्त्व सांगताना ज्या काव्यात व्यंग्यर्थ आहे, म्हणजे ध्वनि उत्पन्न होतो आणि ध्वन्यार्थ प्रमुख महत्त्वाचा असतो ते काव्य उत्तम काव्य मानले असुन ध्वनि हा ज्यात प्रमुख नाही ते काव्य मध्यम दर्जाचे मानले आहे. ध्वनि नसलेले काव्य हे आनंदवर्धनाने अधम काव्य मानले असुन त्यास चित्रकाव्य म्हणजे हुबेहुब वर्णन असलेले, कसलाही व्यंग्यार्थ नसलेली रचना मानले आहे. पुढे ध्वनिच्या प्रकारांचे सांगोपांग वर्गिकरण करताना, अभिधामूल म्हणजे जेथे शद्बाचा वाच्यार्थ महत्त्वाचा असतो आणि लक्षणामूल म्हणजे जेथे वाच्यार्थाला महत्त्व नसुन त्यातुन निघणार्या सूचितार्थावर ध्वनि अवलंबुन असतो असे दोन महत्त्वाचे प्रकार सांगीतले आहेत. त्यानंतर "अत्यन्ततिरस्कृत" हा लक्षणामूल ध्वनिचा उपप्रकार सांगितला आहे जेथे मूल शद्बार्थ योग्य अर्थ सांगत नाही. "अर्थान्तरसंक्रमित" हा दुसरा उपप्रकार आनंदवर्धन सांगतो जेथे शब्दार्थ ध्वनिमध्ये संक्रमित होतो. आनंदवर्धनाने ध्वनिबरोबरच भाव आणि रसाचा विचार देखिल केला आहे. मुलावरील प्रेम, गुरुवरील प्रेम आणि परमेश्वरावरील प्रेम यात जरी रती सदृश्य भाव वाटला तरी ती रती नसुन त्यास भावध्वनि असे म्हणतात. त्याचप्रमाणे अनैतिकतेमध्ये जरी रतीभाव असला तरी तो रती न मानला जाता त्यास रसाभास असे आनंदवर्धन म्हणतो. आनंदवर्धनाच्या ध्वनिसिद्धान्ताची ही फक्त तोंडओळख आहे. मात्र ती या विवेचनासाठी पुरेशी आहे.

प्रस्तुत लेखकाच्या मते आनंदवर्धनाने ध्वनि सिद्धान्ताच्या योगे कवीच्या प्रतिभेतीचा गुढ परिणाम हा शास्त्राच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. शब्द आणि त्याची शक्ती यांचा परिणाम हा फक्त त्याच्या अर्थापुरताच सिमीत नसुन त्यातुन ध्वनित होणारा अर्थ हा अगणित शक्यता निर्माण करु शकतो हा अत्यंत क्रांतिकारक सिद्धान्त आनंदवर्धनाने मांडला. या मुळे रसास्वादाला कसल्याही मर्यादा उरल्या नाहीत. त्याला कसलिही बंधने उरली नाहीत. ध्वन्यार्थ हे अगणित असु शकतात त्यामुळे कलेला वेगळे परिमाण लाभले. आनंदवर्धनाच्या कालात त्यावेळी प्रचलित असलेल्या कलांसाठी जरी ध्वनि सिद्धान्त वापरला गेला असला तरी आधुनिक काळात संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या साहाय्याने जे काही बदल चित्रपटात झाले आहेत ते लक्षात घेता आनंदवर्धनाच्या ध्वनिसिद्धान्तचे महत्त्व अपरिमित आहे असे वाटतें. नुसते जगभर निर्माण होणारे विविध भाषांतील निरनिराळे चित्रपट जरी पाहिले तरी ध्वनिसिद्धान्त हा त्याकाळाच्या फार पुढे झेप घेणारा होता असेही लक्षात येते. कलाकाराची कला आणि त्यातील सामर्थ्य सर्वार्थाने जगासमोर मांडणारा हा सिद्धान्त आहे असे प्रस्तुत लेखकाला वाटते. ध्वनिसिद्धान्ताचे असे महत्त्व असले तरी महिमभट्ट ते मान्य करीत नाही. त्याच्या मते या सिद्धान्तात काहीही नवीन तर नाहीच पण आनंदवर्धनाने जे मांडले आहे त्यावरही त्याचे आक्षेप आहेत.

महिमभट्ट

महिमभट्टाबद्दल बोलताना त्याचा उल्लेख फक्त आनंदवर्धनाचा टिकाकार म्हणुन करणे योग्य ठरणार नाही. महिमभट्ट हा भाषाशास्त्रातील मानसशास्त्राचे पदर उलगडणार्‍यामधला संस्कृत साहित्यातील पहिल्यावाहिल्या विद्वानांमधील अग्रणी म्हणुन गणला जातो. आपल्या "व्यक्तिविवेक" या ग्रंथाने महिमभट्टाने संस्कृत साहित्यशास्त्रात अढळ स्थान मिळवले आहे. प्राचिन संस्कृत विद्वानांप्रमाणेच महिमभट्टाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याच्या नावाबरोबर "राजनक" ही पदवी जोडली जाते. राजनक म्हणजे "जवळपास राजासारखाच". ही उपाधी काश्मिर प्रान्तातील अनेक विद्वानांसाठी लावली जाते. ही सन्मानाची पदवी राजाच्या सेवेप्रित्यर्थ देण्यात येते. कदाचित काश्मिरनिवासी महिमभट्ट हा कुठल्यातरी राजाच्या पदरी असावा. महिमभट्टाच्या कालाबद्दलही फारशी माहिती मिळत नाही. मात्र त्याने अभिनवगुप्ताच्या ध्वन्यालोचन मधील उतारा उधृत केला आहे. अभिनव गुप्ताचा काल हा इ.स. ९५० ते १०५० हा मानला जातो. महिमभट्टाने अभिनवगुप्ताबद्दल फार काही आदरोद्गार काढलेले नाहीत. त्यामुळे महिमभट्ट हा अभिनवगुप्त याचा समकालिन असण्याची शक्यता आहे. कारण नंतरच्या विद्वानांनी डोक्यावर घेतलेल्या अभिनवगुप्ताला महिमभट्टाच्या काळापर्यंत फारसे महत्व प्राप्त झाले नव्हते असे म्हणण्यास वाव आहे.

महिमभट्ट स्वतःबद्दल सांगताना असे म्हणतो कि तो श्रीधैर्याचा पुत्र असुन महाकवी श्यामलाचा शिष्य आहे. महिमभट्टाने "व्यक्तीविवेक" रचताना से म्हटले आहे कि त्याने हा ग्रंथ आपल्या नातवांच्या शिक्षणासाठी लिहिला आहे. ही भीम याची मुले होत. हा भीम महिमभट्टाचा पुत्र नसुन जावई आहे असे मत डॉ. काणे यांनी व्यक्त केले आहे. हे पाहता "व्यक्तीविवेक" रचण्याच्या कालात महिमभट्ट हा वृद्ध झाला होता हे मानण्यास वाव आहे. महिमभट्टाच्या बुद्धीची उत्तुंग झेप दाखवणारा "व्यक्तीविवेक" हा दुर्दैवाने एकमेव ग्रंथ आज उपलब्ध आहे. मात्र त्यातदेखिल महिमभट्टाच्या काव्य, काव्यशास्त्र, व्याकरण आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने आपण दिपुन जातो. महिमभट्ट हा व्यास, वाल्मिकि, कालिदास, भारवी, माघ, भल्लट, यशोवर्मन, बाणभट्ट, भवभूति, भट्टनारायण, आणि राजशेखर अशांसारख्या विद्वानांच्या साहित्याशी परिचित होता. त्याचे धैर्य आणि स्वतःच्या बुद्धीवरचा आत्मविश्वास इतका आहे कि यांच्यापैकी बर्याचशा विद्वानांची उदाहरणे त्याने त्यांच्या साहित्यातील दोष दाखवण्यासाठी दिली आहेत. महिमभट्ट हा काव्य, नाट्यशास्त्र, व्याकरण, शैव सिद्धान्त, बौद्ध तत्त्वज्ञान आणि पूर्वमिमांसा यात पारंगत असावा असे तो करीत असलेल्या चर्चेवरुन लक्षात येते.

महिमभट्टाचा व्यक्तीविवेक हा ग्रन्थ गद्यात लिहिलेला असुन त्यात अधुनमधुन श्लोकांची योजना केलेली आहे. गद्याने पूर्वपक्ष मांडलेला असुन जेव्हा त्याचे खण्डन मण्डन केले आहे त्याचा सारांश श्लोकात सांगितला आहे. या सारांश देणार्या श्लोकांना लेखकाने संग्रह श्लोक किंवा संग्रह आर्या असे म्हटले आहे. अशातर्हेचे एकशे सेहेचाळीस श्लोक व्यक्तीविवेक ग्रन्थात असुन त्याव्यतिरिक्त काही श्लोक ज्यांना अन्तरश्लोक किंवा अन्तरआर्या म्हटले आहे असे आहेत ज्यामध्ये चर्चेसाठी काही नवीन कल्पना उधृत केल्या आहेत. व्यक्तीविवेका व्यतिरिक्त महिमभट्टाने "तत्त्वोक्तिकोश" या आणखि एका ग्रन्थाची निर्मिती केल्याचे म्हटले आहे जो सध्या उपलब्ध नाही.

महिमभट्टाचे आक्षेप

आनंदवर्धाची भूमिका अशी आहे कि सहृदय रसिकाला उत्तम काव्यातील सूचितार्थामुळे काव्यातील सुप्त अर्थाचे ज्ञान होते आणि त्याचा आस्वाद रसिक सर्वार्थाने घेतो. उत्तम काव्यात सूचितार्थ हा आनंदवर्धाने गृहित धरला आहे. कारण ज्यात सूचितार्थ प्रमुख नाही ते काव्य आनंदवर्धन उत्तम काव्य मानत नाही. याउलट महिमभट्टाचे म्हणने असे आहे कि काव्याचा अर्थ लक्षात येणे हे संपूर्णणे रसिकाच्या बौद्धीक क्षमतेवर अवलंबुन आहे. तथाकथिक सूचितार्थाचा जर बारकाईने तपास केला तर असे दिसुन येते कि त्यात तर्काच्या निरनिराळ्या गुंतागुंतीच्या पायर्या रसिक पार करत असतो. या प्रक्रियेमध्ये रसिकाची काव्याची समज, साहित्यपरिशिलनाचा अनुभव आणि जगताना आलेल्या शहाणपणाचे सामर्थ्य यांचा महत्त्वाचा वाटा असतो. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे कि महिमभट्टाचा आनंदवर्धनाच्या काव्यातील सौंदर्यविषयक सिद्धान्तावर फारसा आक्षेप नाही. त्याचे स्वतःचे म्हणणे असे आहे कि सौंदर्यानुभव हा कुठल्याही उत्तम साहित्याचा आत्मा असतो. त्याचा आनंदवर्धनाला विरोध या मुद्द्यावर आहे कि आनंदवर्धन म्हणतो त्याप्रमाणे काव्यात कुठलाही सूचितार्थ अंतर्भूत नसुन महिमभट्टाच्या मते हा सूचितार्थ रसिकाच्या तर्क करण्याच्या क्षमतेवर अवलंबुन असतो.

महिमभट्टाने आपले म्हणणे भाषाशास्त्रातील तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने मांडले आहे. त्यानुसार भाषाबोलली जात असताना ती ऐकणार्यावर काहीएक परिणाम घडवुन आणते. किंबहुना तो परिणाम घडवुन आणण्यासाठिच भाषा ही संपर्काचे साधन म्हणुन वापरली जाते. आपले म्हणने पटवुन देण्यासाठी जी व्यक्ती भाषा बोलत असते ती काही तर्क त्यात वापरत असते. जेव्हा ऐकणार्याला हा तर्क समजतो किंवा जेव्हा ऐकणार्याची हा तर्क समजण्याची क्षमता असते तेव्हाच समोरच्याला काय म्हणायचं आहे हे त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे ऐकणार्याची क्षमता महत्त्वाची असते. सांगणार्याच्या फक्त भाषेवर काही अवलम्बुन नसतं. याशिवाय महिमभट्टाचे असेही म्हणणे आहे कि आनंदवर्धनाने सांगितलेला सूचितार्थ हा "अनुमाना" मध्ये अनुस्युत आहे. याचे उदाहरण देताना महिमभट्ट म्हणतो कि टेकडीवरील धूर पाहुन तेथे अग्नी असेल हे ओळखणार्या माणसाला अग्नि आणि धूराचे सहचर्य माहित असणे आवश्यक आहे. आणि आपल्या आयुष्यात त्याने स्वयंपाकघरात किंवा इतरही ठिकाणी हे सहचर्य पाहिलेले असते. त्यामुळे भाषेमुळे आपल्याला प्रत्ययास येणार्या सौंदर्यबोधासाठी मुळात आपली तेवढी तयारी असणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे लागते.

आनंदवर्धनाला शद्बार्थ आणि लक्षार्थावर थांबणे मान्य नव्हते. शब्दार्थ बाजुला झाल्यावर लक्ष्यार्थावर माणुस लक्ष केंद्रित करतो आणि तेथेच सारे संपत नाही. महाकवि वाल्मिकि हे धुक्यातल्या चंद्राची तुलना आरशावर पडलेल्या निश्वासाशी करतात. त्यावेळी आपण निश्वास पडलेला आरसा हा कुठलेही प्रतिबिंब दाखवु शकत नाही या लक्षणेने दाखवलेल्या अर्थावरच थांबत नाही. तर त्यापुढे जाऊन रसिकाला एकुणच अंधत्वाची, दु:खाची कल्पना ध्वनित होते. महिमभट्टाने मात्र शब्दार्थ, लक्ष्यार्थ आणि ध्वन्यार्थ हे प्रकार मान्य नाहीत. त्याचे म्हणणे असे कि आगी मध्ये उष्णता आणि प्रकाश या दोन्ही शक्ती एकाचवेळी एकत्र नांदतात. त्या एकामागोमाग एक अशा प्रत्ययास येत नाहीत. त्याच प्रमाणे शब्दाचे शब्दार्थ, लक्ष्यार्थ आणि ध्वन्यार्थ हे प्रकार एकामगोमाग एक असे प्रत्ययास येत नसुन ते जर खरोखरीच शब्दात असतील तर ते एकाचवेळी प्रत्ययास येणे आवश्यक आहे. शिवाय लक्षणेने दिलेला अर्थ हा हुशार रसिकाने अनुमानाने काढलेला अर्थ असतो असे महिमभट्ट म्हणतो. याचे उदाहरण देताना असे म्हणता येईल कि लांब मान असलेल्या माणसाला जेव्हा कुणी उंट म्हणतो तेव्हा ऐकणार्याच्या मनात उंट आणि लांब मानेचे सहचर्य आधीच सिद्ध झालेले असते त्यामुळेच त्याला या म्हणण्यामागील खरा अर्थ लक्षात येतो.

आनंदवर्धनाने शब्दाने दाखवल्या गेलेल्या सूचितार्थाची तुलना दिव्याने उजळल्या गेलेल्या वस्तुशी केली आहे. अशा तर्हेने शद्बाने सूचितार्थ प्रकाशित होतो असे आनंदवर्धन म्हणतो. अभिव्यक्तिच्या बाबतीतील आनंदवर्धनाचे हे म्हणणे महिमाभट्टाला मान्य नाही. त्यात रसिकाच्या आकलन शक्तीचा समावेश नाही. एखादे भांडे जेव्हा दिव्याच्या प्रकाशाने उजळते तेव्हा त्यात पाहणार्याच्या आकलन शक्तीचा समावेश नसतो. शिवाय दिव्याने भांडे उजळणे हे एकदम घडते. मात्र ध्वन्यार्थ हा एकदम कळत नाही. रसिकाला आधी शब्दार्थ, लक्षणार्थ आणि शेवटी ध्वन्यार्थ अशा पायर्यांनी त्याच्याकडे यावे लागते. त्यामुळे ही शब्दाची ताकद नसुन ही ऐकणार्याच्या तर्कवितर्काची शक्ती असते. महिमभट्टाने घेतलेला महत्त्वाचा दुसरा आक्षेप हा आहे कि जर ध्वन्यार्थाची शक्ति फक्त शब्दातच असती तर ऐकणार्या कुठल्याही रसिकाला साहित्याचा सारखाच आस्वाद घेता आला असता. मात्र असे दिसुन येते कि काही बुद्धीमान माणसेच साहित्याच्या खाचाखोचा जाणुन घेऊन त्यातुन योग्य तो अर्थ काढण्याच्या सामर्थ्याचे असतात. हे सर्वांना साधत नाही. आनंदवर्धनाने हे सामर्थ्य शब्दांनाच बहाल केलेले दिसते.

समारोप

आनंदर्धनाने शब्दाच्या गुढ शक्तिबद्दल आपल्या ध्वनिसिद्धान्तात विवरण केले. तर महिमभट्टाने शब्दात सूचित करण्याची कसलिही गुढ शक्ति नसते. किंबहुन तथाकथित सूचितार्थ हा रसिकाच्या क्षमतेवर असतो असे म्हटले. यावर आनंदवर्धनाच्या धन्यालोकावर लोचनटिका लिहिणार्या अभिनवगुप्ताने वाद्याचे उदाहरण दिले आहे. हळुवार वाजणार्या वाद्यातुन जे संगीत निर्माण होते ते प्रेमभावनेसारख्या हळुवार भावना माणसात निर्माण करते. याउलट जोरजोरात वाजणार्या वाद्यसंगीतामधुन बरोबर याविरुद्ध भावना निर्माण होतात असे उदाहरण दिले आहे. महिमभट्टाने यावर आक्षेप घेताना असे म्हटले आहे कि यात वाद्याच्या जोरात किंवा हळु वाजण्याचा संबंध नसुन सांस्कृतिक दृष्ट्या माणसाची घडण अशी झालेली असते कि कुठलीही हळु आवाज करणारी गोष्ट ही मृदु मुलायम भावनेशी निगडित झालेली असुन त्याउलट कठोर आवाज हा कठोरतेशी निगडीत केलेला असतो. त्यामुळे तशा भावना उत्पन्न होतात. महिमभट्टाच्या स्पष्टीकरणातला हा कच्चा दुवा आहे असे प्रस्तुत लेखकाला वाटते. काव्यातील गुढ प्रतिभेला शास्त्र कसोटीवर घासण्याच्या नादात महिमभट्टाने ओढुन ताणुन शब्दाची सारी जादु नाहीशी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला दिसतो.

अतुल ठाकुर

संदर्भ - Rajendran C., 2000, Mahimabhatta (Makers of Indian Literature), New Delhi, Sahitra Akademi.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users