बथ्थड चेहऱ्यांची रद्दड स्टोरी (Movie Review - Hate Story - 3)

Submitted by रसप on 6 December, 2015 - 04:15

शाळेत प्रत्येक वर्गात काही वात्रट, द्वाड पोरं असतात. त्यांना सगळे शिक्षक 'वाया गेलेले' म्हणत असतात. इतर 'सभ्य' मुलांपैकी कुणी मेहनती मुलगा जर त्या द्वाड मुलांच्यात रमताना आढळला, तर त्याची एक प्रेमळ कानउघाडणी होत असे. 'तू हुशार आहेस, मेहनती आहेस. अभ्यासाकडे लक्ष दे. त्या पराडकरच्या नादाला लागू नकोस.' असे डोस दिले जात असत. शर्मन जोशीचीही अशी प्रेमळ कानउघाडणी कुणी तरी करायला हवी. 'तू चांगला अभिनेता आहेस. मेहनती आहेस. विचारपूर्वक सिनेमे कर. त्या विक्रम वगैरेच्या नादी लागू नकोस. ते लोक तुला कधी 'ओम् भट् स्वा:' करतील, ह्याचा काही नेम नाही !

खरंच. का केला असेल शर्मन जोशीने हा 'हेट स्टोरी - ३' कळत नाही ! कुठे ते फेरारी की सवारी, रंग दे बसंती, थ्री इडियट्स वगैरे आणि कुठे हे 'सॉफ्ट पॉर्न' ! बरं असंही नाही की त्याच्या भूमिकेत काही विशेष आव्हानात्मक असावं. मग तिथे हा आपला वेळ का वाया घालवतोय ? बाकीच्या लोकांचं ठीक आहे. Beggars are no choosers. (भिखारी को भीख, जितनी मिलें ठीक !) झरीन खान, करण सिंग ग्रोवर, डेजी शाह वगैरेंना असंही कुणी चांगला दिग्दर्शक एखादी चांगली भूमिका देऊन एखाद्या चांगल्या चित्रपटाचं मातेरं कधीच करणार नाही. त्यामुळे हे ठोकळे जर एखाद्या बंडल चित्रपटात तितक्याच बंडल भूमिका मनापासून बंडल अभिनय करून सादर करत असतील, तर करोत बापडे ! तो एक क्रिकेटर मध्यंतरी झळकला होता. 'जोगिंदर शर्मा.' ट्वेंटी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिसबाह उल हकने एक सपशेल मूर्खपणा केला आणि फालतू शॉट मारून आपली विकेट जोगिंदर शर्माला आणि विश्वचषक भारताला बहाल केला. जोगिंदरला क्षणभर वाटलं असावं की तो 'सुपर स्टार' झाला. पण आज त्याला पाणी नेऊन देण्याच्या कामापुरतासुद्धा संघात घेत नाहीत. हे झरीन, करण, डेजी इत्यादी लोक्स म्हणजे चित्रपटातले 'जोगिंदर शर्मा' आहेत. शर्मन जोशीसारख्याने ह्यांच्यात किती रमावं, हे त्याला समजून आलं असावंच. नसलंच तर मात्र 'अल्लाह मालिक !'

चित्रपटाची बकवास कहाणी थोडक्यात अशी -

आदित्य दीवान (शर्मन जोशी) हा एक तरुण व प्रचंड यशस्वी उद्योजक आहे. विविध क्षेत्रांत त्याच्या 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' ची जोरदार घोडदौड सुरु आहे. त्याची सुविद्य व बलदंड पत्नी सिया (झरीन खान) त्याच्या ह्या प्रवासात त्याच्या सोबतीने नेहमीच एका आदर्श सहचारिणीसारखी उभी राहत आली आहे. (हे तिचं उभं राहणं सहचारिणीपेक्षा अंगरक्षकासारखं वाटतं मात्र.) आदित्यसोबत काम करणारी काया (डेजी शाह) ही एक मेहनती व हुशार व्यवस्थापक आहे. 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' च्या यशात तिचाही हातभार खूप मोलाचा आहे. अचानक एक दिवस एक अनोळखी व्यक्ती आदित्यकडे मैत्रीचा हात पुढे करते. ही व्यक्ती म्हणजे सौरव सिंघानिया (करण सिंग ग्रोवर). सौरव 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' मध्ये आदित्य म्हणेल तितके पैसे विना व्याज, विना तारण गुंतवायला तयार असतो. मात्र त्याची एक अशी विचित्र मागणी असते, जी एक आदर्श पती कधीच पूर्ण करू शकणार नसतो. सौरवच्या येण्याने 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज', आदित्य, सिया आणि कायाचा पुढील प्रवास कोणकोणती वळणं घेतो आणि कुठे जाऊन संपतो ही झाली 'हेट स्टोरी ३'.

गळक्या छत्रीतून पाणी हळूहळू ओघळत आत येतं. पण ह्या कथानकाच्या छत्रीला तर भोकंच भोकं आहेत. ही भोकं लगेचच अजून वाढत जातात, कथानक नावाचं कापड फाटून उडून जातं. आणि मग दिग्दर्शकाच्या हातात फक्त मूठ आणि छत्रीचा दांडा राहतो. चिंब होऊन कुडकुडणाऱ्या मनोरंजनात जरा 'ऊब' आणण्यासाठी मग तो भरपूर गरमागरम दृश्यं पेरतो.
पण 'हेट स्टोरी' ला 'हॉट स्टोरी' करायचा त्याचा हा प्रयत्न केविलवाणाच ठरतो.
कारण मुख्य स्त्री भूमिकेतली झरीन खान म्हणजे सतत एक मैद्याचं पोतं वाटत राहते. तिला सुंदर बनवण्याच्या प्रयत्नात वापरलेला सगळा मेक अप तिला सुंदर न बनवता भयावह बनवतो. तर डेजी शाहला पाहूनही आनंद होण्यासारखं काही वाटत नाही ! चारही मुख्य पात्र पुरुषीच वाटतात. त्यांतल्या दोघांनी पुरुषाची आणि दोघांनी स्त्रीची वेशभूषा केली आहे, असंच वाटतं.

ह्या बंडल चित्रपटाचं श्रेय सुमार पटकथेसाठी विक्रम भट्टना द्यावं की झोपाळू दिग्दर्शनासाठी विशाल पंड्याना हे सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे आपण हे श्रेय दोघांना विभागून देऊ !
'संगीत म्हणजे ढणढणाट' हे सूत्र पाळणारे अनेक फुटकळ संगीतकार अचानकच भूछत्रांसारखे गेल्या काही वर्षांत उगवले आहेत. कधी कधी वाटतं की ह्यांच्या कामाला अनुल्लेखानेच मारावं. आपलं काम पाहून 'हे कुणी केलं आहे' अशी उत्सुकताही कुणाला वाटू नये, ही एखाद्या कलाकारासाठी एक अतिशय शरमेची बाब आहे. आताशा बहुतांश हिंदी चित्रपटांचे संगीत ऐकताना खरोखर 'संगीतकार कोण?' ही उत्सुकताच वाटत नाही. (आणि जर वाटलीच तर 'शिव्या नेमक्या कुणाला घालायच्या' ह्यासाठीच वाटत असावी !)

'हेट स्टोरी - ३' मधून टवाळांच्या हाती काही लागणार नाही आहे आणि रसिक तर अश्या चित्रपटांकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाहीतच. ह्या चित्रपटाला जर श्रेय द्यायचंच झालं तर एकच देता येईल. ते म्हणजे, 'शर्मन जोशीने काय करू नये', हे ह्या चित्रपटाने प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे.

रेटिंग - *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/12/movie-review-hate-story-3.html

हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्ह मध्ये आज ०६ डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशित झालं आहे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मन जोशी बद्दल अगदी सहमत रसप. मलाही त्या चित्रपटाच्या पोस्टर वर त्याला बघून हा ईथे कुठे असेच झाले होते.

'हेट स्टोरी' ला 'हॉट स्टोरी' करायचा त्याचा हा प्रयत्न केविलवाणाच ठरतो. >>> या हॉट स्टोरी कोटीला +७८६. कारण प्रोमोज बघून मी पटकन या चित्रपटाचे नाव हॉट स्टोरी असेच वाचले होते Happy

खरंच, फेरारी तर शर्मनचाच चित्रपट होता, पण रंग दे बसंती आणि ३ इडीयट्स मधेही त्याने आपला ठसा सोडला होता.. हे असे चित्रपट का करतो तो ? मूळात भट्ट मंडळी चित्रपट्च का काढतात ?

शर्मनला ट्रेलरमधे बघुन मीही क्षणभर दचकले होते ... पण चान्गल्या भुमिका मिळण तितक सोप नसाव, शर्मन तसाही
फेरारी की सवारी सोडला तर साइड हिरोजचे रोल प्ले करत होता, लिड मधे जाण्याची सन्धी सोडाविशी नसेल वाटली.

तुम्हास हा पिक्चर परीक्षणासाठी का होईना, बघावा लागला ...
फार वाईट वाटलं Sad

मूळात भट्ट मंडळी चित्रपट्च का काढतात ?
>>>
पोटापाण्याचा व्यवसाय. यामागे पैश्याचे गणित असणारच.
हेच कारण बहुधा शर्मनने हा चित्रपट करण्यामागे असावा.
ईथे चरितार्थासाठी काम मिळायला, टिकून राहायला, एखादा कॅम्प जॉईन करणे गरजेचे असावे. बिचारा ईथे न अडको आणि त्याला चांगल्या भुमिका ऑफर होवो..

परिक्षणासाठी का होईना असले रद्दड चित्रपट पहावे लागतात म्हणून सहानुभुती दर्शवावी की असली चमचमीत गाणी पहायला मिळतात म्हणून हेवा करावा?
Rofl
Light 1

जबरी लिहिलंय परिक्षण. टिव्हीवर लागला तर नक्की पाहणार Lol
बाकी शर्मन जोशी च्या बाबतीत सहमत.

शर्मन जोशीने "चांगल्या" भूमिका करायच्या म्हणून गोलमार सीरीज सोडली. (त्यासाठी रोहित शेट्टीनं धम्माल पंचदेखील मारला आहे - बहुतेक दुसर्‍या गोलमालमध्ये) आणि आता करतोय काय तर ते दादी की नानी टाईप आणि हे हेट्स्टोरी टाईप पिक्चर!!

"जबरी लिहिलंय परिक्षण. टिव्हीवर लागला तर नक्की पाहणार" ह्या दक्षिणेच्या पहिल्या वाक्याला +१०१, रसप अ‍ॅज युज्वल भारी परिक्षण, पण दक्षिणे....टिव्हीवर लागला तर नक्की पाहणार ??? बरी आहेस ना ? Lol

अरे काल एक गाण लागलं होतं ह्या शिनेमातलं. ती झरीन बाई बघुन मी अवाक. हॉट गाणं आहे म्हणे. मागे कुणीतरी सोनाक्षीसाठी दंडोबा हे विशेषण वापरलेले ते हिला अगदी फिट्ट.

चारही मुख्य पात्र पुरुषीच वाटतात. त्यांतल्या दोघांनी पुरुषाची आणि दोघांनी स्त्रीची वेशभूषा केली आहे, असंच वाटतं. >>> Lol मलाही सेम असच वाटलेलं प्रोमो बघुन.

शर्मनला ट्रेलरमधे बघुन मीही क्षणभर दचकले होते ..+१११११

रसप.. अर्र्र्र्र्र्र.. तुला कसे कसे सिनेमे पाहावे लागतात... पण तुझ्यामुळे आमच्यासारख्यांचं खूप भलं होतंय..

वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद रे.. टी वी वर ही बघणार नाही Happy