बेचिराख

Submitted by जव्हेरगंज on 2 December, 2015 - 11:01

मृगजळ :

भुंड टेकाड आज एकाकी पडलयं. त्याचा वैरान माथा ऊन्हात तळपतो. ऊन्हाच्या झळयात डोळे दिपून जातात. मुसळधार पावसाचा एखादा थेंब त्याच्या वाट्याला येतो. पालवी फुटते आणि कोमेजुन जाते. अस्तित्वाच्या पाऊलखुणा सांगत केवळ एक वाळलेलं पातं मागे ठेवते. टेकाडावर गवताच्या काड्यांचा खच पडलाय. वाऱ्याचा एखादा झोत त्यांना तितर बितर करतो. धुळदान पाती दगडा धोड्याखाली चिरडली जातात. कुण्या एकेकाळी फुललेलं जंगल असंच अशक्त होत मातीत गेलं. ही मातीच तेवढी अस्तित्व दाखवत शिल्लक राहिली. मातीलाही अस्तित्व असंतचं तर.
कुठुन एखादा कोंब या मातीत फुटतो. भुंडं टेकाड टवकारुन त्याच्याकडं बघतं. दबा धरुन त्याच्या भोवती सुख दु:खांचा फेर धरतं. त्याच्या ईवल्याश्या पानात अनादीकाळाचा पसारा बघतं. टेकाडावरचं एकमेव जिवंत अस्तित्व त्या कोंबाऱ्यात लपतं. मात्रं ते ही एके दिवशी मान टाकतं. भुंड टेकाड हळहळ करत मातीत जातं. ऊरली सुरली माती आपलं अस्तित्व दाखवते. 'माती' हेच 'अस्तित्व' आहे तर!

==============

पराभव :

संगीतही कधी कधी बेसुरं वाजतं. निरागस प्रेमाला कर्णमधुर वाटतं. आलापांचा रिवाज होत राहतो. गवसलेला सूर निसटून जातो. आणि तळाला शेवटी दु:ख उरतं.
दु:ख पचवायचं कशाला, लुटायचं आनंदासारखं! ही दु:खाची नशा काही औरचं असते. अलगद घेत गेल्यास चढत जाते. झिंग! झिंगच असते ती एक सुखासीन! जो या दु:खाच्या गर्तेत बुडाला नाही त्याला कसलं आलयं 'सुख'!
अंधाऱ्या रात्री दु:ख मला येऊन कवटाळते. आणि माझे जग बनुन जाते. कुठूनतरी येणारा आनंदाचा कवडसा या दु:खात केविलवाणा वाटतो. आणि मी तो ही झिडकारुन लावतो. दु:ख मला आपलसं वाटतं.
दु:ख किती गुढ आहे. अनाम आहे. मिट्ट काळोखात दु:खाच्या जंगलात बघत राहण्याचा आनंद(!) कित्ती अवर्णनीय आहे.
साला या दु:खाची चटक लागते. सुटता सुटत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users