कपार ओली कशी मनाची?

Submitted by निशिकांत on 30 November, 2015 - 00:51

वठलेल्या वृक्षास लागली, आस कशाला पर्णफुटीची?
शुष्क नांदती भेगा जेथे, कपार ओली कशी मनीची?

"अंधाराशी हात मिळवणी" जगावयाची रीत असोनी
एक कवडसा बनून आली शुक्रतारका निलांबरीची

फक्त खयालानेही तुझिया, सर्व दुरावे दुरावले अन्
चकोर, चंद्राच्या भेटीची प्यास भागली युगांतरीची

मुल्यांचा स्तर जाणण्यास का उगाच सर्वे कुणी करावा?
राजकारण्यामधे बघू या भ्रष्ट कहानी गिरावटीची

शमा पेटल्यावर येणारे पतंग लंपट मजनू सारे !
कशी कळावी गोडी त्यांना मैफिलीतल्या सुरावटीची?

कुणी अंतरी कसेही असो, दिसावयाला सभ्य असावे
चांगुलपण अन् इमानदारी, बाब जाहली सजावटीची

द्वंद्व सारखे चालू असते , काव्यामधुनी काय लिहावे?
चित्र सुखाचे अभासी की व्यथा मनीची खरोखरीची?

पाठ फिरवता पर्जन्याने. शेतकरी चिंतेत परंतू
खुशीत नेते, मदतनिधीतुन, सोय जाहली खिरापतीची

आयुष्याचा हिशोब करता, "निशिकांता"च्या ध्यानी आले
सर्व उडाले, एकलकोंडी सांज भोगतो वजावटीची

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail --- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users