उन्मळून पडल्या झाडावर पक्षी परतत नाही

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 November, 2015 - 21:20

स्वैर भरारी पंखांमध्ये दिशा मोकळ्या दाही
उन्मळून पडल्या झाडावर पक्षी परतत नाही

फोडून उकल करण्याची तू नकोस घेवू तसदी
' नाही ' ह्या शब्दामध्ये कुठले जोडाक्षर नाही

विस्मरणाने थिजेल जेव्हा पार पार हा मेंदू
गोठवलेल्या आठवणी सरपणास वापर काही

अर्धामूर्धा लहरी श्रावण उर पेटवून जातो
शिंतोड्यांनी शमेल का धरणीची लाही लाही ?

प्रेमाचे तण समूळ उपटायाचे ठरवत बसते
त्वरीत होवून जावू दे हृदयावर कार्यवाही !

चंद्राविरहित लुकलुकत्या चांदण्यांस हसले होते
अता टोमणे मारत फिरती येता जाता त्या ही !

लांब-लांब सफरीवर गेला साजण आला नाही
पुन्हा पुन्हा धडकून परतल्या किनाऱ्यास लाटाही

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>विस्मरणाने थिजेल जेव्हा पार पार हा मेंदू
गोठवलेल्या आठवणी सरपणास वापर काही<<<व्वाह!

>>> चंद्राविण लुकलुकणाऱ्या चांदण्यांस हसले होते
अता टोमणे मारत फिरती येता जाता त्या ही<<<क्या बात!

सुरेख गझल...आवडलीच!

सुप्रिया सुंदर गजल. मस्त खयाल. श्रावण, लाटा, ह्या द्वीपदी आवडल्या.

'प्रेमाचे तण' वाचताना कुठेतरी यति-मात्रा मला व्यवस्थित घेता आल्या नाहीत.

छान...आवडली

लांब-लांब सफरीवर गेला साजण आला नाही
पुन्हा पुन्हा धडकून परतल्या किनाऱ्यास लाटाही

http://www.maayboli.com/node/60043

राजेंद्र देवी