आठवणींना उजाळा (जन्म कवितेचा)

Submitted by संतोष वाटपाडे on 2 November, 2015 - 04:37

या कवितेविषयी मला बरंच काही सांगायचंय खरं तर.....

माझे नाना म्हणजे माझे वडील खुप काटक आहेत अजुनही.....वय ६८ झालंय आता.... नाना आणि मी जेव्हा नांगरायला जायचो...चाबुक आणि बैलांच्या दोर्‍या त्यांच्या हातात असायच्या...लोखंडी नांगराच्या मुठी मी पकडायचो....जड होता नांगर त्यामुळे मला पेलता येत नव्हता...अहो मी जेमतेम दहावीला असेल ....अर्थात इतर भाऊबंदांची लहान लहान पोरंही नांगर वखर पाभर व्यवस्थित पेलायची पण मला सवय कमी होती त्यामुळे माझी अवस्था फ़ार बिकट व्हायची.... डोक्यावरून निथळणारा घाम....उन्हामुळे पांढरेफ़टक पडलेले नानांचे ओठ आणि चिडून लालबुंद झालेले डोळे पाहून मी आधीच टरकलेलो होतो...त्यात जर नांगराचा तास सरळ नाही गेला तर नाना बैलाला शिवी घालायचे(एकदम भयंकर शिवी)....ती माझ्यासाठीच असवी असे समजून मी कसाबसा पुन्हा तास सरळ करायचो.....दोन एकराचे वावर नांगरायचे म्हणजे खेळ नव्हता....बैलाच्या तोंडाला जितका फ़ेस येत होता तितकाच माझ्या आणि नानांच्या तोंडालाही होता.....कोरड पडलेला घसा आतून तीव्रतेने टोचत होता....

विसावा म्हणून औत थांबवून खाली ढेकळात बसलो तेव्हा पाहिले माझ्याकडून नांगराचा फ़ाळ थोडा नानांच्या पायाला लागलेला होता आणि त्यातून रक्त येत होते......माझे जखमेकडे लक्ष गेलेय हे पाहून नाना अगदी कुत्सित हसले ते आजही मला आठवते....मला रडू येत होते पण आई नव्हती जवळ....आई वरच्या वाटणीत मिरच्या तोडत होती..... पायजमा गुडघ्यापर्यंत फ़ोल्ड केलेला असल्याने नानांचा रक्ताने रक्ताळलेला पाय माझ्या डोळ्यासमोर सतत दिसत होता.... झुडुपाच्या आडोशाला ठेवलेल्या कळ्शीतले पाणी आंघोळीच्या पाण्यासारखे कडक तापले होते तरीही तेच प्यावे लागणार होते.... बिनचपलेचा ढेकळं तुडवत मी कळशीतून तांब्या भरुन आणला....तोवर नाना घामाने चिंब भिजलेले होते.....नांगरामागुन उडालेली धुळ केसांवर चेहर्‍यावर बसलेली होती...गुळण्या करुन नानांनी दोन चार घोट पाणी पिले...माझी इच्छाच झाली नाही इतके गरम पाणी प्यायची....तांब्या कळशीजवळ ठेवताना मी खिशातला काळा कळकट्ट झालेला लेमणगोळीचा तुकडा नानांच्या नकळत तोंडात टाकला....लंगडत कसातरी येऊन नांगराची मुठ धरुन उभा राहिलो....आग ओकणारे डोळे आणि वरुन आग ओकणारा सुर्य यांच्या बरोबर मधोमध मी भाजत होतो....

नानांची पाशष्टी झाली तेव्हा घरी बापू ताई आई वहिनी पोरं सगळे मिळून हॉटेलमधे गेले होते नानांना....चमचमीत जेवण आवडत नसून नाना त्यांच्या हट्टापायी गेले सोबत..... मी आणि माझा परिवार नाशिकमधे असल्याने मला काही जाता आले नाही..... बापूने मला फ़ोन केला....नानांचा पाशष्टावा वाढदिवस आहे म्हणून आम्ही जेवायला आलोय बाहेर....... बस्स्स एवढे कारण पुरेसे होते डोळे भरुन यायला आणि भुतकाळ आठवायला....एकेकाळी सारं गाव ज्यांना राजेश खन्ना म्हणायचे ते माझे नाना आज पाशष्ट वर्षांचे झाले.... समोर कंप्युटर होता...हातात किबोर्डचा कुंचला होता....अवघ्या पाच सात मिनिटात काहीबाही टाईप करायला सुरुवात केली....

>>माझा बाबा मांडीवरती वळता वळता दोरी
रटाळवाण्या एक दुपारी बसला होता दारी
समोर पसरवलेली होती जमीन काळी सारी
अंग जाळत्या उन्हात होती माती तळमळणारी....

हात थांबायला तयार नव्हते....पाझरणारे डोळ्यांना काही दिसत नव्हते समोर तरीही रेखाटायचे काम अविरतपणे चालू होते.... मी आईवडिलांपासून दूर असल्याची खंत अजूनच मला रडवेली करत होती.... खुप कष्टात दिवस काढले सर्वांनी पण तेव्हा कधी डोळ्यात पाणी आले ते आज येत होते....

>>खुरटे होते केस पांढरे त्याच्या दाढीवरती
दुरुन जाणवणारी थरथर होती मानेवरती
घाम निथळता अंगावरचा टोचत होता बहुधा
माशा भणभण करीत होत्या ओल्या डोक्यावरती...

आमचा द्राक्षाचा मळा एकदा प्रचंड भरुन आलेला होता....एका एका झाडावर किमान दिडशे किलो द्राक्ष निघतील असे अंदाज आमच्यातच सुरु झालेले होते....दुसरी डिपिंग चालू असताना द्राक्षाचे घड मागे काळसर पडताना दिसत होते पण अनुभव नसल्याने आम्ही वेगाने काम उरकत होतो....जसे जसे पुढे जात होतो तसतसे मागे सारे घड काळपट पडताना दिसले.... मोबाईल नव्हते ...एका ठिकाणाहून नानांनी आमच्या मामाला फ़ोन करुन बोलावून घेतले....मामा घाई घाई आले आणि लांबूनच ओरडले.."दाजीss बाग गेला....दाजीss खेळ संपला....बाग गेला"......हातातले पाण्याचे डब्बे खाली फ़ेकून आम्ही ढसाढसा रडत होतो...आई बापू माई....खुप आशेने सगळी कामं केली होती सर्वांनी....एका तासात डावणीमिल्ड्यु नावाच्या विषाणूजन्य रोगाने सगळे द्राक्षाचे घड गळून खाली पडले होते....नानांचा चेहरा अजुनही आठवतो त्यावेळचा....मोठं माणूस रडनार तरी कसं

>>मिचमिच डोळे ओठ कोरडे बोलत होता काही
यंदासुद्धा शेताची का झाली लाही लाही
गुरे लेकरे घरच्या बाया करती रोजंदारी
विहिरीमध्ये घागर भरण्याइतके पाणी नाही....
>>गुडघ्यावरती तळपायाला टिचरं भळभळणारी
तरीही डोळ्यामधे काळजी टपटप ओघळणारी
दिंडी गेली रित्या हाताने दारावरुन परतून
व्यथा मनाची हीच एकटी पुन्हा पुन्हा सलणारी.....

बनियनची अगदी जाळी व्हायची...पायजम्याच्या खालच्या चिंध्या पायात अडकायच्या तरी नाना नवीन कपडे घेत नसायचे..... पैसे नव्हते असा काही भाग नाही पण एक एक रुपया जोडून चार पोरांना मोठं करायचं होतं त्यांना.....

>>धोतर चिरले होते तेथुन चिंध्या लोंबत होत्या
उष्ण झळांच्या अधीर जळवा गाली झोंबत होत्या
बांधावरती नुसत्या फिरती गरीब काही शेळ्या
दारामधला बाबा पाहून उगाच थांबत होत्या....

नांगराच्या मागे विसावा घेणारे माझे गोरेपान नाना....त्यांची काळवंडलेली सुरकुतलेली त्वचा.... घामावर घोंघावणार्‍या निर्लज्ज माशा......माशांना झटकणारा नानांचा हात.... सगळे काही डोळ्यासमोर तरळत होते....खाली किबोर्डवर माझे हात चित्र रंगवत होते.....मदाचित मोजून दहा मिनिटात ही कविता तयार झाली...... इथे पाठ थोपटायची गरज नाही वाटली मला.... नाना आधीही काटक होते आजही काटक आहेत....आम्हा दोघा भावंडांपेक्षा जास्त काम करतात.....पण मनाची धाव रोखता येत नाही.....त्याने रंगवलेले चित्र अशा स्वरुपात साकारले गेले.....

>>परसामध्ये उरला सुरला कांदा वाळत होता
उदास झाडांखाली सारा शिवार लोळत होता
सोसाट्याचे वादळ मनात रिचवत माझा बाबा
खांद्यावरच्या पागोट्याने वारा घालत होता.....

-- संतोष वाटपाडे ( नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users