भीमाशंकर ट्रैक स्टोरी पार्ट 1

Submitted by किरण भालेकर on 31 October, 2015 - 04:38

खुप दिवसांत घराबाहेर पडणे जमले नाही त्यामुळे स्वभाव थोडासा चिडचिडा बनला होता.महिन्यातून एक वारी सह्याद्रीत झाली नाही तर आमच्यासारख्या गिरीमित्रांना चैन पडत नाही. रोज इंटरनेटवर गड़कोटांची माहिती जमा करणे आणि मोहिमांची आखणी करणे हा आमचा नित्याचा उद्योग.10 ते 12 ट्रेकिंगचे प्लान अगदी हिशोबासकट पाठ.यापैकी प्रत्यक्षात किती उतरतात आणि कागदावर किती हा कळीचा विषय आहे.त्यात भरीसभर रविवारी सुट्टी नाही.मग सगळे जग घरी आणि आम्ही मात्र कामावर आणि सोमवारी सगळे जग कामावर आम्ही मात्र घरी ...रटाळवाणे आयुष्य म्हणजे नेमके काय?हे एव्हाना कळले होते. या सर्व व्यापातुन एक दिवस चक्क ऑफिसला दांडी मारून केलेल्या भीमाशंकर ट्रैकच्या आठवणी आपल्यासमोर ठेवत आहे.
नेटवर सर्च करत असताना एक दिवस भीमाशंकर ट्रैकविषयी कळले आणि त्यात 3500 फुट.महटल्यावर आमच्यातले ट्रेकिंगचे भुत काही स्वस्थ बसु देईना.यात्रीसह्याद्री ट्रेकर्स मुंबई यांनी हा ट्रैक आयोजित केला होता.बऱ्याच जणांना आवताणे निमंत्रणे पाठवुन झाली.परंतु काहीच प्रतिसाद आला नाही त्यामुळे थोड्याशा रागामध्ये तडकाफडकी भीमाशंकर ट्रैकसाठी नोंदणी करुन मोकळा झालो.ट्रैकच्या एक दिवस अगोदर माझा कॉलेजचा मित्र प्रीतम कातकर ट्रैकसाठी तयार असल्याचे कळले.संध्याकाळी त्याला जावून भेटलो आणि त्याची सुद्धा नोंदणी केली.
बोरीवलीतुन बसने रात्री 11 वाजता प्रवासाला सुरुवात झाली.प्रितेश पिसाळ आणि दत्ता हे दोन TeamLeader होते.त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आणि आम्ही मार्गस्थ झालो.बांद्रा,सायन,चेंबूर,वाशी,पनवेल या मार्गाने आम्ही Base Village खांडस गावात पोहोचेपर्यंत 3 वाजून गेले होते.गावामध्ये विश्रांतीसाठी घराची सोय करण्यात आली होती.बऱ्याच दिवसांनी गावच्या कौलारु घरात आरामात पहुडलो होतो मग काय कोकणातल्या माझ्या घराची आठवण आल्याशिवाय कशी राहील ! ट्रेकिंगसाठी बाहेर जाताना मी कधीही झोपत नाही चांगल्या ट्रेकर्सचे ते एक खास लक्षण आहे आणि ते माझ्यामध्ये अनुभवानेच आले आहे.बरोबर 5चा अलार्म वाजला आणि त्याच आठवणींच्या गर्तेतून बाहेर आलो. सर्व आवश्यक सामान घेवून व्यवस्थीत बॅग भरली. ट्रैकिंगची माझी आवडती रेड जर्सी,ट्रॅकपैंट,शूज आणि पाठीवर सैक घेवून सज्ज झालो.तोपर्यंत गरमागरम कांदापोहे घरातील काकानी नाश्त्यासाठी तयार केले होते.1 Plate कांदापोहे पोटात ढकलले आणि निघालो. घराच्या अंगणात पाऊल ठेवतो न ठेवतोय तोच पावसाने पहिली सलामी दिली.माझा आनंद तर गगनात मावेना.कारण काय तर आज मनमुराद भिजायला मिळणार याची खात्री पटली होती. 6वाजले होते सर्वजण वाटेला लागले.मध्येच पावसाची एक सर ओलीचिंब करून जात होती.
भिमाशंकरला जाण्याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत.1)शिडीघाट 2)गणेशघाट.
काठेवाडी गावातील पुलाच्या येथे वाहनतळ आहे.पुलाच्या उजवीकडे सरळ रस्ता जातो तो गणेशघाटाला मिळतो.आणि पुलाच्या समोर जी वाट जाते ती शिडीघाटाकडे जाते. सर्वसाधारणपणे मुंबईतील ट्रैकर्स क्लब शिडी घाटाने चढाई करून गणेश घाटाने उतरणे पसंत करतात.शिडी घाटाच्या सुरुवातीला एक विहीर लागते.तिथे गोलाकार उभे राहून नेहमीप्रमाणे ओळखपरेड झाली.आमचा एकुण 26 जणांचा ग्रुप होता.त्यातले 15 जण नवखे ट्रेकर्स.सह्याद्री म्हणजे काय चीज आहे हे कदाचित त्यांना ठावुक नसणार.त्यांचा अतिउत्साह आणि जोश बघुन मला हसु येत होतं.सर्व आवश्यक सूचना दिल्यानंतर आम्ही निघालो.सरळ पठारावर आल्यावर पहिल्या सह्यकड्याने दर्शन दिले. अजस्त्र ताशीव कातळकडा आणि त्यावरून पडणारे धबधबे ...अतिशय मनोहर दृश्य आठवणींच्या कैमेऱ्यात कायमचे कैद झाले.इथे एक मस्त ग्रुपफोटो घेण्यात आला.पुढे वाटेतच जोरदार आवाज करत वाहणारा ओढा नजरेस पडतो.इथे पाण्यात भिजण्याचा व फोटोग्राफीचा मोह काही केल्या आवरत नाही. पायवाट संपून आता सरळ जंगलात घुसलो.वादळी पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून वाटा बंद झालेल्या होत्या.दत्ता सर थोडेशेे बावचळल्यासारखे वाटले त्यांच्यावर बाकीच्या मेंबरची जबाबदारी होती त्यामुळे ते पाठी थांबले.आणि मी आणि माझा मित्र पुढे होऊन वाट शोधु लागलो.सोबत 2 कुत्रे होते त्यामुळे वाट शोधणे आणखी सोपे गेले.पहिल्या शिडीपर्यन्त 1.30 तासाची मजल आम्ही मारली होती. शिडीजवळच परत एक कातळकडा आणि त्यावरून कोसळणारा जलप्रपात ... तुम्ही कितीही मनाशी ठरवा पण या धबधब्याखाली पूर्ण समाधान होईपर्यन्त भिजल्याशिवाय शिडीला स्पर्श करणार नाही याची माझ्याकडे Gurantee आहे.
शिडी अत्यंत मजबूत अवस्थेत आहे पण 2 टप्पे असल्यामुळे एकावेळी एकच व्यक्ती चढू शकते.शिडी पार केल्यानंतर विसाव्यासाठी गुहेसारखी जागा आहे.आणि तोंडासमोरच प्रचंड आवाज करत कोसळणारा धबधबा..आणि बरोबर डाव्या हाताला पदरगडाचा मनमोहक देखावा आपले लक्ष वेधुन घेतो.
किरण भालेकर
IMG-20150720-WA0127.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण छान लिहीलय पण वरती दिनेशदा म्हणाले तसे भाग मोठे आणी जास्त फोटोवाले करत चला. एकसंध वाचायला जास्त आवडेल.
पुभाशु.