सल …

Submitted by कविता क्षीरसागर on 28 October, 2015 - 12:42

सल ….

ऑफिस मधून बाहेर पडले . सकाळीच स्कूटी सर्विसिंगला दिली होती . आज रिक्षाने घरी जावे लागणार या विचाराने रिक्षासाठी मी रस्त्याच्या कडेला थांबले होते . (जेव्हा आपल्याला हवी असते तेव्हा सगळ्या रिक्षा कायम भरलेल्या कशा असतात? ) . काही वेळाने एक रिक्षा आली . मी हात दाखवला अन रिक्षात बसले. त्याने मीटर टाकत, मागे वळून मला विचारले ,"बहेनजी , कहा जाना है ? "

तो आवाज ऐकून मी एकदम चमकलेच. 'अरेच्या ! राझाकमिया इकडे कुठे ?' क्षणभर वाटून गेलं . मी नीट त्यांना पहिले तर ते राझाकमिया नव्हते . पण आवाजात विलक्षण साम्य होते .तो आवाज ऐकून माझं मन पाहता पाहता भूतकाळात गेलं .

काही महिन्यांपूर्वी आम्ही मुलांना घेऊन औरंगाबादला गेलो होतो . ऐनवेळी जायचे ठरल्याने हॉटेल बुकींग केलेले नव्हते. "औरंगाबाद सारख्या शहरात असून असून काय मोठी गर्दी असणार आहे ? तिथे गेल्यावर पाहू या हॉटेल " या विचाराने आम्ही दुपारी एक, दीडच्या सुमारास तिथे पोचलो . जवळपासची बरीच हॉटेल्स पालथी घातली पण जागा मिळेना . (मे महिन्याच्या सुट्टीचा हा परिणाम ). काही ठिकाणी मिळत होती पण ती आमच्या खिशाला परवडणारी नव्हती. काही परवडणारी होती पण तिथल्या रहाण्याच्या सोयी चांगल्या नव्हत्या . आम्ही आता चांगलेच कात्रीत सापडलो होतो . जागेच्या शोधात, भर उन्हात , मुलांना घेऊन इकडे तिकडे वणवणत होतो . एकमेकांवर आता नुसती चिडचिड चाललेली होती . शेवटी एका झाडाखाली मुलांना बसवून आता काय करायचे अशा विचारात असतानाच मागून आवाज आला ." बहेनजी , क्या मै आपकी कोई मदद कर सकता हु !" मी दचकून मागे पाहिले , तर एक मुसलमान माणूस माझ्याशी बोलत होता .

काळी पांढरी धूप छाव दाढी , पान खाऊन रंगलेले ओठ , उन्हाने रापलेला काळसर तांबूस चेहरा , डोक्यावर मळकट पांढरी विणलेली टोपी असा किडकिडीत अंगाचा साधारणपणे चाळीशीचा हा माणूस . त्याची रिक्षा होती .आमची मगाचपासून चाललेली धावपळ पाहून आम्हाला मदत करायला , अगदी देवासारखा धावून आला . पण तो ओळखीचा न पालखीचा , एकदम कसा विश्वास ठेवणार ?. मग त्याने त्याच्या ओळखीच्या हॉटेल्समध्ये आम्हाला न्यायचे . आम्हाला जर परवडले , पसंत पडले तरच आम्ही तिथे रूम घेऊ , असे आम्ही त्याला बजावले . त्याप्रमाणे चार दोन ठिकाणे पाहून एका हॉटेल मध्ये राहयचे आम्ही नक्की केले.

तोपर्यंतच्या एकूण रिक्षा प्रवासात , गप्पांच्या ओघात , त्याने आम्हाला कोणकोणती ठिकाणे पाह्यची आहेत , कुठे कुठे जायचे आहे ते विचारून त्या त्या ठिकाणची माहितीही पुरवली . आमच्या मुलांशी तर इतक्या प्रेमाने तो गप्पा मारत होता की जणू यांची केव्हाची ओळख आहे असे वाटावे . त्याच्या बोलघेवडेपणाचे मला कौतुक वाटले .
आम्हाला रहाण्यासाठी हॉटेल मिळवून दिल्यावर त्यानेच आमचा 'गाईड ' होत पुढल्या दोन दिवसांचा कार्यक्रमही आखला . आम्हालाही तो कार्यक्रम पसंत पडला . नाही तरी आम्हाला औरंगाबाद शहर अन परिसर पहायचाच होत. निदान हा आता ओळखीचा तरी झाला होता . तेव्हा याच्याच रिक्षाने जाता येईल या विचाराने आम्ही त्याच्या कार्यक्रमाला होकार दिला .

" देखिए बहेनजी , सुबह ठीक छे बजे आप सब तैय्यार रहिए . मै आपको अजंठा केव्ह्ज दिखाने ले जाऊंगा . रास्तेमेही दौलताबाद का किल भी आता है , वोह भी देख लेंगे . और मेरे होते हुए दुसरे गाईड की भी जरूरत नही . मै आपको सब कुछ बता दुंगा . आप चिंता मत करो. फिर कल हम …." त्याच्या तोंडाची टकळी काही थांबतच नव्हती . आम्हीही प्रवासाने अन या धावपळीने अगदी दमलो होतो. त्याच्याशी व्यवहाराची बोलणी करून झाल्यावर तो गेला .
दुसर्या दिवशी आम्ही आमचे अगदी वेळेत आवरले . हॉटेलच्या आवारात रझाक मियांची रिक्षा आलेली होतीच . पुढे दोन दिवसही आम्ही त्यांच्याच रिक्षाने वेरूळची लेणी अन आसपासची स्थळे पहिली . मुलांची आता रझाक मियांशी चांगलीच मैत्री झाली होती . अधून मधून ते मुलांना चोकलेटचा खुराक द्यायचे त्यामुळे तर मुले त्यांच्यावर खूपच खुश होती . दौलताबादचा किल्ला पाहताना मुलं थकली तेव्हा तर त्यांनी स्वतःहूनच मुलांना छान सांभाळले .

तीन चार दिवस कसे निघून गेले कळलेच नाही . आता फक्त पैठण तेवढं पहायचं राहिलं होतं . सारखा सारखा रझाक मियांच्या रिक्षाने प्रवास कशाला ? आता जर बस नाही तर दुसरे एखादे वाहन मिळते का ते पाहावे या दृष्टीने आम्ही चौकशी करत होतो . ते रझाक मियाना समजले अन ते हट्टच धरून बसले कि " ऐसा नही चलेगा . चाहिये तो थोडा पैसा काम दे दो मगर मै ही आपको ले के जाऊंगा . कल सुबह मै आपको लेने आ रहा हुं . मुझे ऑर कुछ सुनानाही नही है . " आमचा त्याच्यापुढे काही इलाजच चालेना . शेवटी हो ना करता करता त्यांच्याच रिक्षाने पैठणला जायचे ठरले ,
नेहमीप्रमाणे पहाटे सहाला आवरून गेटपाशी उभे राहिलो . थोड्याच वेळात त्यांची रिक्षा आली . त्यांच्याबरोबर एक दहा बारा वर्षाचा मुलगाही होता . " ये मेरा लडका है . युसुफ . इसको भी हमारे साथ ले के जाएंगे . रास्ते में इसके मामू का घर है वहा पे इसको छोडके हम आगे जाएंगे " त्याची ओळख करून देत ते आमच्याशी बोलत होते.
पण आजचे रझाक मिया काहीतरी वेगळेच वाटत होते . मफ़लर्ने चेहरा पूर्ण झाकलेला होता . डोळे तेवढे दिसत होते . ते सुद्धा लालसर वाटत होते . आमची नजर चुकवत आज ते बोलत होते .

रिक्षामध्ये मुलं परत झोपी गेली होती पण त्यांना उद्देशून रझाक मिया काहीतरी असंबद्ध बोलत होते . आम्हाला जर वेगळीच शंका येऊ लागली , रिक्षाचा वेग वाढू लागला तशी काळजात धडधड होऊ लागली . आता त्यांना रागाने काहीतरी बोलणार , इतक्यात रिक्षाने वेडे वाकडे वळण घेतले अन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली , आम्ही सर्वजण एकमेकांच्या अंगावर चांगलेच जोरात आदळलो . मुलं घाबरून ओरडू लागली , रडू लागली . या अपघाताच्या धक्कयाने आम्ही एकदम गांगरूनच गेलो . कसे बसे धडपडत एकेक करत त्या रिक्षातून आम्ही बाहेर पडलो . मुलांना कितपत लागलंय याचा आम्ही अंदाज घेत असतानाच युसूफची किंकाळी ऐकू आली . "अब्बाजान ! अब्बाजान !!" आम्ही तिकडे पहिले तर त्यांचा पाय गुडघ्यापासून खाली लोंबकळत होता . रस्त्याच्या कडेला असलेला मैलाचा दगड त्यांच्या पायात घुसला होता . अन त्यांच्या शेजारी युसुफ करुणपणे रडत होता " हाय रब्बा , अब मै क्या करू ? कितनी बार अम्मी ने आपको पिनेसे मना किया था , अब क्या होगा , अब्बाजान " असे म्हणत आपल्या बेशुद्ध पडलेल्या दारुड्या पित्याकडे पाहून हमसून हमसून रडत होता .

नशिबाने आम्हा कोणालाच फारसे गंभीर काही लागले नव्हते . थोडा मुका मार बसला होता, थोडे फार खरचटलेही होते सर्वांनाच पण समोरचे ते र्हुदयद्रावक दृश्य पाहून आम्ही पार हबकून गेलो होतो . आता आपण काय करावे याचेही भान नव्हते . सुन्न झालो होतो .

आजूबाजूचे लोक हळूहळू गोळा झाले . त्यात काही रिक्षावालेसुद्धा होते . त्यातील एक म्हणाला " तुम्हाला कुणाला काही फारसे लागले नाही न ! मग आता तुम्ही लवकरात लवकर इथून जा . तुम्ही "टुरीस्ट " आहात , तुम्हाला इथे अपघात स्थळी थांबायचे काही कारण नाही , यात तुमची काही चूक नाही . उगाच पोलिसांच्या भानगडीत अडकाल . आणि तो रझाक पक्का दारुड्या होता . बोलण त्याच इतकं मिठ्ठास की ऐकत राहावं पण दारू ढोसली की नुसता हैवान व्हायचा . बायका पोरांना मारायचा . काल बहुतेक भरपूर ढोसली असणार त्याने म्हणूनच त्याच्या अम्मीने युसुफला पाठवले असेल नजर थेवयल. जाऊदे . मी यांना चांगला ओळखतो . आम्ही बघतो पुढे काय करायचे याचे ते. तुम्ही नका काळजी करु. तुम्ही आता पहिले इथून निघा ."

जावे की न जावे या विचारात आम्ही तिथेच थांबलो होतो . आमचे संस्कारीत मन त्यांना अशा अवस्थेत सोडून जाऊ देत नव्हते . एवढ्यात त्या रिक्षावाल्याने आमच्या मुलांना आणि आम्हाला एका दुसर्या रिक्षात अक्षरशः बळेबळे कोंबले . माझा पायही चांगलाच सुजला होता . मी कडेला बसले होते त्यामुळे सगळे जण माझ्याच अंगावर आदळले होते . मुलंही घाबरून गेली होती. कोणीच काहीही न बोलता आमची रिक्षा परत हॉटेलवर निघाली होती .

नंतरच्या दिवसात आम्ही पैठण , शिर्डी वगैरे ठिकाणी गेलो खरे पण रझाक मिया अन त्यांचा लुळा पडलेला पाय काही केल्या डोळ्यासमोरून जातच नव्हता . युसुफचे ते करून रुदन अजून मनात रुतून बसलेय . त्यांना तसेच टाकून आम्ही तिथून पळ काढल्याचा "सल " मनात अजूनही ठसठसतोच आहे .

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम. त्या इतर रिक्षावाल्यांनी नेलं असेल त्यांना दवाखान्यात, ओळखत होते तर.
तुम्हीही हा विचार केला असेलच, पण सल रहातोच मनात.

.. एवढा चांगला माणुस, पण दारु अशी घात करते. Sad

अगदी खरं आहे मानवजी ….

ही कथा ७० % खरी व ३०% काल्पनिक आहे … पण रिक्षावाल्याच्या अपघात प्रसंग डोळ्यासमोर घडलेला …

कोणत्याही संवेदनशील माणसाला अपघात ग्रस्त माणसाला तसेच जखमी अवस्थेत सोडून पळपुटेपणाने तिथून
निघून जाताना जेवढा मनस्ताप होईल , आणि त्याचे स्वतःचेच मन त्याला जेवढे खात राहील तितकाच त्रास
मलाही तिथून जाताना झाला . आपण त्या माणसासाठी काहीही करू शकलो नाही ही खंत कायम राहील

त्याचे मित्र त्याला दवाखान्यात घेऊन नक्कीच गेले असतील , पण तो कायमचा अधू झाला असेल …
त्याच्या एका चुकीची शिक्षा त्याला व त्याच्या पूर्ण कुटुंबाला आता भोगावी लागेल …

अनोळखी शहरात असा प्रवास करू नये. कोणी कितीही चांगले ते त्याच्या घरी. दारूड्या माणसाची मला नाही दया येत. जरा विचार करा, तुमच्या पैकी कुणी जायबंदी झाले असते तर केवढ्याला पडले असते? पैठण इतकही जवळ नाही की ऑटोने जावे.

औरंगाबादला एमटीडीसी चे स्टेशन रोडला ऑफिस आहे, ते टॅक्सी करून देतात. मी मे त दोन तरून मुलींना (एक स्वतःची न एक बहिणीची) घेऊन अजिंठा, एलोरा, दौलताबाद इ.इ. दोन दिवसात केले - सुरक्षित टॅक्सी बुक करून, शिवाय गावतल्या मामाला त्या टॅक्सीचा नंबर ही दिला होता.

राग आला असेल तर क्षमस्व. पण राहवले नाहे. अन चांगल्या हेतूने लिहीले आहे.