"एकटीने" ...

Submitted by ekmuktati on 25 October, 2015 - 05:08

"एकटीने" ...
एकटीने दुरचा प्रवास करणं, नाटक सिनेमाला जाण, रेस्तरॉमधे जाऊन हव्या त्या पदार्थांचा फडशा पाडणं, फार कशाला जवळच्या टपरीवर जाऊन एक स्पेशल मारणं...कोशातून बाहेर आणतात आपल्याला. 'सोबती'च्या 'सुरक्षा कवचा'तून बाहेर काढतात. आपल्याला वाटत सोबतीची सवय मोडली की जमेल अस एकटं राहण. एकटं पडण आणि एकटं राहण पसंत करणं यांतला फरक आत्मसात करायलाही वेळ लागतो खरतर. पण एकटीने हवं ते करायला सुरुवात केल्याशिवाय सोबतीची सवय...किंवा गरज मोडत नसते.

नुकताच एकटीने नाटक पाहण्याचा अनुभव घेतला आणि जाणवलं ; ITS NOT A BIG DEAL! खरंच इतकी काही मोठी गोष्ट नाहीए ती. सुरुवात कटिंग पासून झाली होती, म्हणजे आपल्याला असणारी चहाची गरज आणि इतरांची गरज याचा ताळमेळ साधत बसण्याची अनाठायी कसरत नकोशी झाली आणि अनावधानानेच सोबतीपेक्षा चहा महत्वाचा झाला. पुढे प्रवास केला आणि मग जाणवलं सोबतींमध्ये रमण्यापेक्षाही इतर बऱ्याच गोष्टी असतात अनुभवण्यासारख्या. भीती वाटते कधीतरी, मग ‘धाडस’ वगैरे सारखं काहीतरी दाखवून निभावून नेतो आपण. आणि मग तो एक मापदंड बनतो. कुठल्या पातळीपर्यंत आपली धाडस-क्षमता गेली आहे याचा.

कधी रस्त्यावरच्या भांडणात पडतो आपण; तेव्हा तिर्हाइत पुरुषाने “बरं झालं तू मधे पडलीस, कसंयना लेडिजचा matter (नवरा-बायकोच भांडण ज्यात नवरा त्या बाईला मारतोय हा matter!) असला की आम्ही (पुरुष) मध्ये पडलो तर बर नाय दिसत” असं म्हणेपर्यंत आपल्यालाही कळत नाही की बाह्यदर्शी आपण समाजाच्या ‘स्त्री’ संकल्पनेच्या अपेक्षित धाडस-क्षमतेहून जास्त काही केले आहे. एकटं राहील की खरं कळत आपल्यातल्या आत्मविश्वासाची मुळं कुठंवर खोल गेली आहेत.

सुरुवातीला हे सारं नेणिवेतून जाणीवेत येइपर्यंत आपण काही विशेष करतोय हे लक्षात येत नाही. मग पुढे इतरांच्या नजरांमधून कधी काळजी, कधी हेवा, कधी आश्चर्य, कधी दया (की बापरे! बिचारी....एकटी) हे आपल्याला दिसू लागतं. बाकी सारं आपल्याला हसण्यावारी नेता आलं तरी लोकांना आपला हेवा वाटतो हे पाहून कधी आपला अहम सुखावतो. 'ग ची बाधा' होऊ लागते. आपल्याला कोणाची गरज नाही असंही कधी वाटू शकतं. अर्थातच Aristotle ने जे ‘MAN’ विषयी मांडलं ते खरंतर सर्व HUMANS ला लागू आहे. Womenसुद्धा सामाजिक प्राणीच असतात ना.

आपण सारे अशी बेटे आहोत जी वरवर पाहता विभक्त दिसतात पण पाण्याखाली सर्व एकमेकांशी सलंग्नच असतात. त्यामुळे इतरांची गरज नाही ही धारणा फार काळ टिकत नाही. 'ग ची बाधा' गेली हे कसं समजावं? तर एरवी एकटे जाण्यास तयार असणारे आपण खरंच कंटाळा आला / एकटे वाटत असेल / किंवा उगाचच सोबत हवी वाटत असेल तेव्हा विनासायास जवळच्या व्यक्तींना ‘सोबत येणार का?’ अशी विचारणा करू शकतो. शिवाय समोरच्या व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्यही देतो.

एकटं राहणं पसंतीस पडू लागलं म्हणजे ‘अगदी माणूसघाणी झाली ही तर’ असं म्हणणं किती बाळबोध होईल हे तर सांगायला नकोच. तरी स्वातंत्र्याची खरी चव चाखायाची तर सर्वच मानसिक बेड्या तोडायला हव्यात हे याच एकटं राहण्यातून कळतं. यामुळे निव्वळ आपलंच स्वातंत्र्य टिकतं असं नाही,तर एरवी फक्त आपल्याला हवं म्हणून समोरच्या व्यक्तीने तिचा वेळ आपल्याला देण्याची जी नकळत सक्ति आपण त्यांच्यावर करतो त्यापासून त्यांचीही मुक्तता होते.

आपल्यावरच्या प्रेमापोटी ते येतात सोबत किंवा आपण देतो त्यांना सोबत वगैरे युक्तिवाद हे प्रेमाची अजून अद्याक्षरे गिरावणार्यांचे युक्तिवाद वाटतात. आपली खरी सोबत करणारी माणसे आपल्याला कधीच अधू बनवत नाहीत.आपल्याला त्यांच्यावर किंवा इतरांवर अवलंबून रहावं लागेल अशी मानसिकता तयार होऊ देत नाहीत.खरी सोबत किंवा प्रेम करणारी माणसं ही आपल्याही नकळत आपल्याला आपल्या स्वतःसोबत जगायला शिकवतात.जगाने पाठ फिरवली म्हणून ‘एकला चलो रे’चा झेंडा हाती घेण्याची वेळ येते काहींवर;पण सुदैवाने तशी वेळ आली नसली तरी एखादा प्रयोग म्हणून 'आपण' स्त्रियांनी तसेच मुलींनी अश्या ‘एकटी’च्या सफरीचा अनुभव घ्यायलाच हवा.

ता.क़.- इथे इतकं स्त्री-विशिष्ट बोलण्यास कारण की पुरुषांना व मुलांना ही संधी बाहेरून सहज मिळते. त्याचा लाभ घेणं जितके पुरुषांना सुकर आहे तितके स्त्रियांना नाही. उदाहरणार्थ-सुरक्षिततेचा मुद्दा.

-प्राजक्ता.
http://ekmuktati.blogspot.in/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा.. पण इथे (मायबोलीवर)..
"पुढील मजकूर वाचा.. अबक या माझ्या ब्लॉगवर . धन्यवाद."
अशी पद्धत नाहीये. कृपया असा पायंडा पाडू नका.
इथे लिखाण द्यायचे असल्यास ते संपुर्ण द्या.
आणि खाली तुमच्या ब्लॉगची लींक दिली तर चालेल (असे मला वाटते. याबाबत मायबोलीचे काय धोरण आहे ते मला माहित नाही).

जेवढा इथे दिलाय तेवढा लेख आवडला. उरलेला लेख मी तुमच्या ब्लॉगवर येऊन वाचणार नाही कारण त्याने चुकिचा पायंडा पडेल असं मला वाटतं. धन्यवाद.

पियू, अनुमोदन!

अजुन एक मला खटकणारी गोष्ट म्हणजे काही नवीन लेखक मंडळी भराभरा आपले लेखन इथे पोस्ट करतात. पण इथल्या एकाही लेखावर स्वत: कधीच प्रतिसाद देत नाहीत!

छान लेख आहे.
या एकटीच्या सफरीचा अनुभव स्त्रीयांच्याच नव्हे तर समाजाच्या अंगवळणी पडायला हवा.

पियू आणि वत्सला, काय म्हणताहेत त्याकडे लक्ष द्या प्लीज एक मुक्त ती.. मायबोली हा एक मोठा समूह आहे, इथे तूम्ही अर्धवट पोस्ट टाकून, प्रतिसाद मिळतील अशी अपेक्षा का ठेवता. इथे अनेक जण, अनेक विषयावर लिहित असतात. त्यांना प्रतिसाद द्या, त्यावर जी चर्चा होते त्यात भाग घ्या. आपली ओळख या अशा वावरातूनच इथल्या सभासदांना होईल.

पियू, अनुमोदन!
+७८६
मायबोलीच्या व्यासपीठाचा असा वापर करणे, इथून लोकांना आपल्या ब्लॉगवर नेणे हे चूक की बरोबर हे ठरवणे खरे तर मायबोली प्रशासनाच्या अखत्यारीतील प्रश्न आहे.
पण एक वाचक म्हणून हे मला वाचकफ्रेंडली वाटत नाही. की अर्धे इथे वाचा आणि मग त्या लिंकवर जाऊन पुढचे वाचा, मग त्यावर प्रतिसाद टंकायला वा चर्चा करायला पुन्हा ईथे या. हे गैरसोयीचे आहे.

.

अजुन एक मला खटकणारी गोष्ट म्हणजे काही नवीन लेखक मंडळी भराभरा आपले लेखन इथे पोस्ट करतात. पण इथल्या एकाही लेखावर स्वत: कधीच प्रतिसाद देत नाहीत!
>
याबाबत अंशता असहमत. मायबोली हे एखाद्या लेखकासाठी वाचकांपर्यंत पोहोचायचे व्यासपीठ असू शकते. पण त्याबदल्यात त्यानेही एक वाचक म्हणून ईतर लेखकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे गरजेचे नाही.
असे मला वाटते

असो,
लेख पुर्ण न वाचल्याने तुर्तास पुर्ण प्रतिसाद नाही देऊ शकत, पण जेवढे वाचले त्यावरून ..
येस्स! हॉटेलात कधी एकटीच मुलगी चहा कॉफी पिताना दिसते तेव्हा अरे ही एकटीच का आलीय असा विचार उगाचच्या उगाच मनात येतोच..

चांगली चर्चा होतेय.
मी नवीन आहे मायबोलीवर, आणि पियू यांच्या पूर्ण लेखन इथे टाकावे या मताशी सहमत आहे.
दिनेश यांची सूचना पण चांगली आहे.
आणि वत्सला यांच्या मताशी ऋन्मेश प्रमाणे अंशतः सहमत आहे.
इतर लेखन वाचलेच पाहिजे हे गरजेचे नाही. पण वाचल्यास शक्यतोवर प्रतिसाद मात्र द्यावा असे वाटते.

नमस्कार...
प्रथमतः सर्वांचे धन्यवाद. आपण दिलेल्या सुचनांचे यापुढे नक्कीच पालन केले जाईल. कोणताही वाईट पायंडा पाडण्याची इच्छा नाही.
ब्लॉग ही नवीन आहे आणि मायबोलीवर माझे सदस्यत्व जुने असले तरी अगदीच पहिल्यांदा काहीतरी शेयर करण्यासाठी सरसावले होते. यापुढे नवीन चूका करेन. पण चुकेची पुनरावृत्ती होणार नाही .
__/\__
पुनश्च आभार. Happy

लेख चांगला आहे. असा अनुभव निश्चितच एक आत्मविश्वास आणू शकतो यात शंकाच नाही.
इथे पूर्ण लेख टाकल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद प्राजक्ता,
आता पुर्ण लेख वाचता येतोय. मुद्दा योग्य आहे पण हळू हळू यात बदल होतोच आहे तरी सुरक्षिततेचा मुद्दा निकालात निघणे गरजेचे आहे.

दुसरे म्हणजे. मायबोलीवर लिहिलेला लेख आधी इतरत्र प्रसिद्ध झाला असेल तर तसा उल्लेख करण्याची पद्धत आहे.
( जे तूम्ही केलेच आहेत ) म्हणजे ज्यांना तिथले इतर लेखन वाचायचे आहे, ते तिथे जाऊ शकतात. इतरत्र प्रसिद्ध झालेल्या लेखनाच्या लिंक्स ( दुवे ) देण्याची सोय कानोकानी वर आहे.

बर्‍यापैकी पटलं.
मला हा एकटा कॉम्प्लेक्स खूप होता. विशेषतः कधी एकटं जेवावं किंवा खावं लागलं कुठे तर.
पण तो कमी केला. आता एकटी असले तर मुद्दाम औंध ला दुर्गा ला जाऊन कॉफी पिते. लोक विचीत्र नजरा देत नाहीत(कदाचित दहा पंधरा वर्षापूर्वी दिल्या असत्या.) फक्त आधी 'पार्सल घेणार ना' असे विचारतात Happy

एकटं असणं आणि मित्रमंडळीत असणं या दोन्हीमध्ये तितकीच पण वेगळी मजा असते.
जी व्यक्ती या दोन्ही गोष्टी एन्जॉय करू शकते ती नेहमीच comfortable असते.
एक प्रकारचं यिन आणि यँग.