नवरात्र कोकणातलं...

Submitted by मनीमोहोर on 24 October, 2015 - 11:00

कोकणात गौरी गणपतिचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो पण आमच्याकडे नवरात्र गणपती पेक्षा ही जास्त उत्साहाने साजरे केले जाते. त्याच काय आहे .... आम्ही रहायला कोकणात पण आमची कुलदेवता आहे लांब मराठवाड्यात.... अंबाजोगाईची श्रीयोगेश्वरी. आमच्या आधीच्या पिढ्या आर्थिक टंचाई आणि प्रवासाची अपुरी साधन यामुळे कुलदेवतेच्या दर्शनाला कधी जाऊ नाही शकल्या म्हणून मग लाड, कौतुक उत्सव सगळं घरातल्या देवीचचं करायची प्रथा घातली गेली असेल. या वर्षी नवरात्रात कोकणात गेले होते. तो अनुभव इतका सुंदर होता की इथे शेअर केल्याशिवाय रहावत नाहीये.

नवरात्राच्या तयारीची सुरवात एक दीड महीना आधीच अभिषेकाला लागणार्‍या तिळाच्या फुलांची आणि झेंडुच्या फुलांची रोपं लावुऩ होते कारण नवरात्रात या दोन्ही फुलांचं महत्व आहे. नवरात्राच्या दोन दिवस आधी देव्हारा , त्या वरची मांडवी आणि देवघराची साफ़ सफाई केली जाते. आमचा देव्हारा खूप जुना आहे १८४५ सालातला. देव्हार्‍यावरच्या पितळी पट्टीवर देव्हारा घडवणार्‍याचं नाव, माझ्या आजे सासर्‍यांचं नाव आणि हे साल ( वर्ष ) कोरलेलं आहे.शिसवी लाकडापासुन बनवलेला आणि कोरीव कामाने नटलेला हा देव्हारा थोडासा जरी पुसला तरी अजुन ही अगदी चमकायला लागतो. देव्हार्‍यावरची मांडवी ही आंब्याचे टाळे, सुपारीची शिपटं, असोला नारळ, कुर्डुच्या फुलांचे तुरे यांनी सुशोभित करतात. नवरात्रात झेंडुच्या फुलांची माळ मांडवीच्या ज्या हुकाला लावली जाते तो हुक ही मजबूत आहे ना याची खातरजमा केली जाते. देव्हार्‍यावर विजेच्या दिव्याच्या लुकलकणार्‍या माळा सोडल्या जातात. देव्हार्‍यातल्या देवाना उजाळा दिला जातो. पूजेची उपकरणी, नऊ दिवस अखंड तेवणारी समई घासुन पुसुन लख्ख केली जातात. उत्सवमुर्ती देवीचे दागिने ही उत्सवासाठी उजळले जातात. आमच्याकडे नऊ ही दिवस ब्राह्मण, सवाष्ण जेवायला असतात. त्यांना ही सुपारी देऊन अगत्याने निमंत्रण दिले जाते. स्वयंपाक घरात ही प्रसाद तयार करणे, इतर पूर्व तयारी करणे अशी धामधुम चालु असते. घरात एकंदरच चैतन्यमय उत्साह असतो.

पहिल्या दिवशी पहाटे उठुन , स्नान करुन मगच पुजेसाठी आगरातुन फुलं आणली जातात. पाच सहा प्रकारच्या जास्वंदी , तगर, कर्दळ , गोकर्ण , सोनचाफा , सोनटक्का , प्राजक्त , गुलाब, दु्र्वा , तुळस, बेलपत्र यांनी परडी भरुन जाते आणि देवघरात यांचा संमिश्र सुवास दरवळायला लागुन वातावरण एकदम प्रसन्न होतं .

From mayboli

From mayboli

कुर्डु
From mayboli

सहस्र कुर्डु तुरे

From mayboli

पहिल्या दिवशी जो पूजा करेल तोच पुढे संपूर्णा पर्यंत पूजा करतो. याला घटी बसणे असे म्हणतात. सकाळी गुरुजी येऊन देवीची पोडषोपचारे पूजा ,अभिषेक, देवीचे सहस्रनाम पठण , ( त्यावेळेस तिळाची किंवा कुर्डु ची फुलं प्रत्येक नावागणिक वहातात) नंदादीप प्रज्वलन , झेंडूची माळ लावणे , आरती इ. कार्यक्रम होतात आणि नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. समईच्या शांत प्रकाशात देवीपुढे नतमस्तक होताना तिची कृपा आपल्यावर नेहमीच राहिल या विचाराने खूप आश्वस्त वाटतं.

दुपारी ब्राह्मण, सव्वाष्ण , घरातली मंडळी, प्रसादासाठी आलेली पाहुणे मंडळी यांची माजघरात पंगत मांडली जाते. निगुतीने वाढप केलेली केळीची पानं पंगतीची शोभा वाढवितात. हसत खेळत जेवणं होतात. नऊ ही दिवस कांदा लसूण विरहीत स्वयंपाक असतो. पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी रस-वडे, घारगे आणि लाल भोपळयाची भाजी, पंचमीला तांदळाच पक्वान्न जसं की मोदक किंवा घावन घाटलं, अष्टमीला पुरण हे ठरलेल असतं. इतर दिवशी मग खीर , केशरीभात ,श्रीखंड- पुरी असं काही ही करतात.

संध्याकाळी परत स्नान करुन सोवळयाने देवीची सायंपूजा करतात आणि त्या नंतर सगळयांच्याच लाडक्या आरतीच्या कार्यक्रमाला सुरवात होते. आरती साठी झांजा तर असतातच पण आमच्याकडे पेटी, तबला आणि मृदंग ही असतात जोडीला. घरातलीच मुलं वाजवतात. त्यामुळे आरत्या खुप रंगतात. नेहमीच्या आरत्या तर म्हणतोच पण एक खुप जुनं आरत्यांच पुस्तक आहे आमच्याकडे त्यातल्या ही आरत्या म्हणतो. त्यापैकी " अरे माझ्या गोपाळकृष्णा" ही कृष्णाची, " महालक्ष्मी करवीरक्षेत्री ज्योतिरुप आहे " ही महालक्ष्मीची आणि " जाहले भजन आता नमीतो तव चरणा" हे निरोपगीत माझ्या विशेष आवडीचे. आरत्यांना एक मेंबर अगदी न चुकता हजर असतो तो म्हणजे आमचा जॉनी. मुलांनी झांजा वाजवाय्ला सुरवात केली की हा ओटी आणि माजघर याच्या उंबरठ्यावर पुढचे दोन पाय टेकवून जो बसणार तो आरत्या संपल्या कीच उठणार.

ललिता पंचमीच्या दिवशी नेवैद्य संध्याकाळी असतो. संध्याकाळी ललितेच्या प्रतिमेची सत्यनारायणाच्या पूजेसारखी पूजा असते. चौरंगावर कलश मांडुन त्यावर ताम्हनात ४८ सुपार्‍या आणि ललितेची प्रतिमा ठेवतात आणि तिची षोडशोपचारे पूजा करतात. या पूजेसाठी इतर पूजा साहित्या बरोबर ४८ दुर्वांच्या जुड्या आणि ४८ प्रकारची पत्री लागते. आमच्या आगरातच यातील पुष्कळशी झाडं आहेत. या दिवशी संध्याकाळी सहा साडेसहालाच पंगत बसते.

अशा तर्‍हेने नऊ दिवस कसे जातात आणि संपूर्णाचा दिवस कधी येतो ते कळत ही नाही . संपुर्ण नवमीला असते. ते कधी दसर्‍याच्या दिवशी तर कधी त्याच्या आदल्या दिवशी येते . ह्या वर्षी दसर्‍याच्या आदल्या दिवशी संपूर्ण झाले. उत्तर पुजा झाली की नवरात्र समाप्ती होते.

पण तरीही दसर्‍यामुळे उत्साह टिकुन असतो. दसर्‍याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही घरच्या वहानांसाठी , दाराला लावण्यासाठी, लहान मुलांच्या सायकलींसाठी वगैरे घरीच केले हार. ते रात्री काठीला टांगुन खळ्यात ठेवले होते, रात्री त्यावर दव पडल्यामुळे ते दुसर्‍या दिवशी ही छान टवटवीत राहिले होते.

From mayboli

दसर्‍याच्या दिवशी वहानांची , सायकलींची, पीसीची वगैरे पूजा केली जातेच पण आमचा प्रमुख व्यवसाय शेती आणि बागायती. शेतीच्या अवजारांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला दसर्‍या सारखा दुसरा उत्तम मुहुर्त कोणता ? म्हणुन त्या दिवशी कुदळी , फावडी, विळे, कोयते वगैरे सर्व अवजारं घासुन पुसुन एका खोलीत मांडली जातात आणि त्यांचे ही मनोभावे पूजन केले जाते. हा फोटो.

From mayboli

दसर्‍याच्या दिवशी काढलेली रांगोळी

From mayboli

संध्याकाळी घरातले सगळे पुरुष आणि मुलगे सीमोल्लंघनासाठी बाहेर पडतात. गावच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन गावच्या सीमेवर असलेल्या आपट्याच्या पानांचं सोनं घरी आणतात . ते प्रथम देवाला वाहुन मग घरातल्या सर्वांना देतात आणि मग हा उत्सव संपतो.
असा हा दहा दिवसांचा सण उत्साहात साजरा होतो. पण उत्सव संपला की एक प्रकारचं रितेपण येतं, आणि का ते कळत नाही पण एक प्रकारची हुरहुर मात्र लागतेच...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महालक्ष्मीची आत्ता नाहीये पण कृष्णाची आहे , ती सुद्धा फोटोच आहे प्लिज चालवून घ्या . ह्या आरतीची चाल टिपिकल आरतीच्या चाली सारखी नसून शांत वाटणारी, मनाला समाधान देणारी आहे .

भाऊ बरोबर . कोकणातली जीवनशैली निसर्गाच्या हातात हात घालून जाणारी आहे . पंचवीस तीस वर्षांपूर्वी ती अधिकच तशी होती आता एकंदरीतच बदललेल्या तंत्रज्ञाना मुळे प्लॅस्टिक च्या अपरिहार्य वापरामुळे थोडी बदलली आहे

ममो, नेहमीप्रमाणेच प्रसन्न करणारं लिखाण. ़का कोण जाणे गेल्या वर्षी नाही वाचनात आल हा लेख. हा लेख वर आणल्याबद्दल नाव यांना धन्यवाद .

लेखन आवडल. एक प्रश्न आहे....
"नवरात्राच्या तयारीची सुरवात एक दीड महीना आधीच अभिषेकाला लागणार्‍या तिळाच्या फुलांची आणि झेंडुच्या फुलांची रोपं लावुऩ होते कारण नवरात्रात या दोन्ही फुलांचं महत्व आहे. "
हे लिहल्याप्रमाणे तिळाची फुल दिड महिन्यात येतात का?, कारण आम्ही सहा महिने आधी ही तयारी करायचो तेव्हा कुठे वेळेला थोडी- थोडी फुले मिळायची. एक दोन वेळा ह्या बिया लावायला उशीर झाल तर दसरा झाल्यावर बहर आला होता फुलांचा.

नवरात्रीत कधीच कोकणात गेले नाही... Sad
लेख वाचून मस्त वाटलं

कुर्डुच्या फुलांचे तुरे यांनी सुशोभित करतात.>>
हे झाड लहान असताना त्याची भाजी करतात अस ऐकलं आहे.

दक्षिणा,शोभा, निर्झरा , कऊ धन्यवाद.

निर्झरा , हे तीळ म्हणजे आपले नेहमीचे proper पांढरे तीळ नसतात . खर नाव खुरसणी का असच काहीतरी आहे . आमच पण गणित चुकत कधी कधी , फुल आधी तरी येऊन जातात किंवा यायचीच असतात . पण त्यावर ही सोल्युशन असतंच , तिळाची नसली तर कुर्डु चे तुरे पण चालतात . ते रानात हवे तेवढे मिळतात ह्या दिवसात.

कऊ, हो.. केनीच्या आणि कुर्डुच्या पानाच्या भाजीचे उल्लेख आपल्या जुन्या कहाण्यात पण आहेत . मी नाही आत्तापर्यंत टेस्ट केलेय कधी

।। रंगी रंगला उत्सव ।।
नमस्कार,
कार्तिक महिना जवळ आला की कोकण पट्ट्यात वेध लागतात ते उत्सवांचे. गावोगावी असलेली मंदिरं आणि चालणारे उत्सव म्हणजे आमचा जिव्हाळ्याचा विषय. काकडाआरतीने दिवसाची सुरुवात, मग मंदिरात धार्मिक कार्य, दुपारी प्रसादाचं जेवण, संध्याकाळी आरत्या म्हणजे अगदी तबला पेटी घेऊन तासंतास चालणाऱ्या बरं, मग भोवत्या, भोवरा मग असेल तर कीर्तन किंवा प्रवचन असा भरगच्च कार्यक्रम असं बहुतांश उत्सवांच स्वरूप. खरंतर आपल्या दैनंदिन व्यस्त आयुष्यात वर्षातून काही दिवस एकमेकांना भेटता यावं, गप्पा गोष्टी व्हाव्यात, अध्यात्मिक वातावरणात माजा मस्ती व्हावी आणि नाती दृढ व्हावीत हा उत्सवांचा हेतू. आपल्यापैकी बऱ्याच जणांना लहानपणी दामटून हातात चकवा देऊन उभं केल्याचा, ठेका चुकल्यावर एक जोरदार चापटी खाल्ल्याचा, नाचताना पायावर पडलेल्या पायांच भान विसरून घामाघूनहोईपर्यंत नाचल्याचा आणि 'तुला नाचता येत नाही तू आत नाच' अस सांगितल्यावर अपमानकारक वाटल्याचा अनुभव असेलच. आणि अशा संस्कारात वाढलेले आपण उत्सव जवळ आला की नकळत 'आवडी गंगाजळे' चे सूर कधी आळवून जातो कळतही नाही.
कालानुरूप उद्योग धंद्याच्या निमित्ताने परगावी विखुरले गेलो. सुट्ट्या काम सगळ्याचा तोल सांभाळत आपण उत्सवाला जातो सुद्धा, काही वेळा जमतही नाही. नाईलाजाने शरीराने इथे पण मनाने आपण मंदिराभोवती घुटमळत असतो. आणि म्हणूनच आपण सर्व हौशी मंडळींसाठी आणि ज्यांनी फक्त या साऱ्याबद्दल ऐकलं आहे त्या साऱ्यांसाठी उत्सव अनुभवता यावा, जुन्या आठवणी जाग्या व्हाव्या या साठी एक दिवस आरत्या, भोवरा आणि कोकणातल्या कलांसोबत मोदकाच्या जेवणाची मेजवानी आयोजित करण्याचे योजिले आहे.
दिनांक: 28 ऑक्टोबर, 2017
स्थळ: पुण्याई मंगल कार्यालय, पौड रोड, पुणे
कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच प्रदर्शित करू.
संपर्क:
उमेश नवाथे 9890075327
ऋषिकेश पळसुलेदेसाई 9403702734
व्यंकटेश करंबेळकर 9970922654
आदित्य पाध्ये 9890427342

खूप छान लेख

आमच्या गावातील ग्रामदेवता श्री जुगादेवी मंदिरातील नवरातौत्सव

IMG_20170926_112441.jpgIMG_20170926_112441.jpg

स्वामी जी उपक्रम चांगला आहे पण त्याची जाहिरात इथे ह्या धाग्यावर कशासाठी ?
चार तास झाले की एडिट पण नाही होऊ शकणार तेव्हा लगेच प्लिज एडिट करा . नवीन धागा काढा ना त्यासाठी .

माफ करा मनीमोहोर ताई
प्रासंगिक वाटले म्हणून टाकले
आता एडिट होत नाहीये
अन्य धागा काढीन
तसदीबद्दल क्षमस्व

धागा वर काढतेय.
वाचा आणि अनुभवा कोकणातलं नवरात्र

Pages