उडाली हो!

Submitted by निनाद on 17 October, 2015 - 20:46

डिस्क उडाली असे ऐकले की घाबरायला होते!

आपल्याला हार्ड डिस्क फेल होणे हा मोठा धक्का असतो.
यात बहुदा आपले फोटो आणि व्हिडियो जातात, जाऊ शकतात म्हणून जास्त मानसिक त्रास असतो. शिवाय काही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे असतील तर ते पण जातात.
यामुळे अर्थातच या तबकडीशी आपली भावनीक जवळीक असते! Happy
त्यात रिसर्च पेपर आणि त्याचा डाटा बॅकअप वगैरे असतील तर अक्षरश: हार्टफेलच व्हायचे बाकी असते.

सर्व प्रथम - मी काही यातला एक्स्पर्ट वगैरे नाही!
अनुभवाने जे काही लक्षात आले ते लिहितो आहे.
पहिले सत्य असे आहे की. कोणतीही डिस्क घ्या - ती एक दिवस फेल होणारच आहे.

डेटा रिकव्हरी महाग असू शकते. म्हणून दुकानात जाण्यापुर्वी काही गोष्टी घरी करून पाहण्यासारख्या आहेत.

डिस्क फेल होण्यात प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
१. हार्डवेयर फेल्युअर
२. सॉफ्टवेयर फेल्युअर

या लेखात आपण प्रामुख्याने हार्डवेयर फेल्युअर वरचे सोपे घरगुती उपाय काय आहेत हे पाहू.
हार्डवेयर फेल्युअर मध्ये बहुतेक वेळेला डेटा मिळणे हा चमत्कार असतो.
पण सॉफ्टवेयर फेल्युअर मध्ये मात्र बरेच वेळा डेटा रिकव्हरी होऊ शकते.

काय असते ही हार्ड डिस्क?
या डिस्कच्या चौकोनी खोक्यात एक गोल चकती असते. या चकतीवर एक पातळ रासायनिक थर असतो. यावर लेखनिक हेडच्या माध्यमातून माहिती (डेटा) लिहिली जाते. हे लेखनिक हेडस व्हॉईस कॉइलच्या मदतीने हलवले जातात.
लेखनिक हेडस डिस्कवर तरंगते असतात. टेकत नाहीत! पण काही कारणाने जसे डिस्क आदळणे वगैरे झाले तर यांची ठेवण बिघडते. एकदा हे बिघडले आणि ते चकतीला टेकलेले असताना डिस्क चालू केली तर चकतीवरचा पातळ थर खरवडला जातो.
हे १००% हार्डवेयर फेल्युअर! तुमचा डेटा उडतो - म्हणजे अक्षरश: धूळ होउन उडून जातो.
हे प्रकार सहसा होत नाहीत. पण होतात हे ही खरे.
याशिवाय डिस्कचा बोर्ड बिघडणे, मोटर नादुरुस्त होणे वगैरे प्रकार यात मोडतात.

बोर्ड बिघडला तर डिस्क सारखीच दुसरी डिस्क शोधायची आणि त्याचा बोर्ड बसवून पाहायचा. हे काम तूलनेने सोपे असते. चार स्क्रू काढायचे आणि बोर्ड बदलायचा चार स्क्रू लावायचे. पण हे बोर्ड एकसारखे नसतात!
आपल्या डिस्कवर जो निर्मिती दिनांक असेल त्याच्या अगदी जवळ जाणारी डिस्क मिळाली तर हे जमू शकते. कारण डिस्क बनवणारे कायम सुधारणा करत राहतात. आणि त्यामुळे त्यातले कंट्रोलर्स बदलते असतात. प्रणाली बदलती असते. त्यांचे कार्यही बदलते असते.
मोटर बिघडली असेल तर डेटा विसरलेला चांगला कारण चकती आणि हेडस यांची ठेवण परत जुळवणे जवळपास अशक्य असते. कारण लेखनिक हेडसना त्यांचे सिलिंडर्स सापडले तरच ते डिस्कवरची माहिती वाचू शकतात.
असो.

पहिल्यांदा डिस्क फेल होते आहे असे लक्षात आले की त्याक्षणी आपला बॅकअप घ्या!
हे कसे लक्षात येते तर, डिस्क उशीरा रिप्लाय देते आहे, खुप वेळ लागतो आहे, वगैरे प्रकार सुरू होतात. म्हणजे कदाचित चकतीवर न वाचता येण्याजोगे भाग तयार होत आहेत. हे बॅड सेक्टर्स आहेत. डिस्क वाचायचा प्रयत्न करते आहे पण योग्य तो भाग सापडत नाही म्हणून अजून प्रयत्न करते आहे. म्हणून वेळ लागतो आहे.
हे डिस्क फेल होण्यात आहे, याचे हे पहिले लक्षण आहे.

डिस्क अगदीच गेली म्हणजे संगणकाला सापडेनाशी तर तेव्हा आपण विविध प्रकारे जोडायचा प्रयत्न करतो.
एक्सटर्नल असेल तर वायर बदल वगैरे प्रकार करून पाहतो.

हे करा, पण करण्याआधी,
- आपल्याकडे पुरेसा वेळ आहे
- आपण नक्की काय बॅकअप घेणार आहोत याची यादी स्पष्ट आहे
- बॅकअप घ्यायला दुसरी डिस्क हाताशी आहे
- नवीन डिस्क मध्ये पुरेशी जागा आहे
या गोष्टी नक्की करून घ्या.

मगच डिस्कवर प्रयोग करा. कारण डिस्क जर संगणकाला जोडली गेली तर कदाचित ही शेवटची वेळ असू शकते फेल डिस्क चालण्याची!
संधी मिळाली तर घेण्याची पुर्ण तयारी ठेवा.

डिस्क जोडली आणि नाही चालली तर,
- उभी ठेउन पाहा
- तिरपी ठेऊन पाहा
- उलटी ठेउन पाहा
कधी कधी या गोष्टींनी चालून जाते. आपला डेटा मिळून जातो.

तापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे. डिस्क अगदी गार वातावरणात चालवून पाहा काही प्रसंगी डिस्क चालतातही. तुम्ही उष्ण वातावरणात राहात असाल तर हे नक्की करून पाहा. पण यासाठी डिस्क फ्रिजमध्ये वगैरे ठेऊ नका. कारण त्यात बाष्प गेले तर आहे ते ही हातचे जाईल. पण एसीच्या अगदी ब्लोअर जवळ आणून जास्तीत जास्त गार करा आणि मग जोडा.
कधी कधी चालून जाते. आपला डेटा मिळू शकतो.

अजूनही डिस्कचा डेटा नाही मिळाला तर वरचे सर्व प्रकार
निरनिराळ्या ऑपरेटींग सिस्टिम्सवर डिस्क जोडून करा.
म्हणजे लिनक्स, मॅक, विंडोज वगैरे. कधी कधी डिस्क जोडली जाते. लगोलग डेटा घेउन टाका.

नाही झाले तर डिस्क संगणकाला जोडून ठेवा २४ तास वाट पाहा
कधी कधी आपोआप जोडली जाते. पण गार वातावरणात असेल असे पाहा! नाहीतर तापून उडायची...

सगळ्यात महत्वाचे बॅकअप बॅकअप बॅकअप!
नियमित बॅकअप घ्या.
डिस्क घेताना सुमारे सहा माहिन्याच्या अंतराने दोन घ्या.
म्हणजे बॅकअप डिस्कचाही बॅकअप घेत राहता येईल.
सहा महिन्याचा फरक म्हणजे त्यातल्या त्यात एकाच वेळी दोन्ही फेल होण्याची शक्यता कमी करणे.

याशिवाय माझ्या काही ओळखीतील लोकांनी डेटादेवाची आरती, डिस्कदेवीची आरती, चकती स्तोत्र पारायण, संगणक महती साप्ताह, संगणकचालन जप, डिस्क देवाला घेऊन जाणे, अखंड मदिरा अभिषेक (स्वतःला) वगैरे प्रकारचे उपाय केले आहेत.
तुम्हीही करू शकता, पण हे कितपत यशस्वी झाले याची कल्पना नाही. Happy

सॉफ्टवेयर फेल्युअर वर परत कधी तरी...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिस्क जोडली आणि नाही चालली तर,
- उभी ठेउन पाहा
- तिरपी ठेऊन पाहा
- उलटी ठेउन पाहा
कधी कधी या गोष्टींनी चालून जाते.
<<
हाहाहा
बजाज मधे होता का तुम्ही ? Wink

मस्त माहिती. सॉफ्टवेयर फेल्युअरचे पण लवकर लिहा.

आता जे onedrive वगैरे ओनलाइन साठवण ( cloud storage ) आणण्याचा जोरदार प्रयत्न कंपन्या करत आहेत त्याप्रमाणे डिस्कच्यावरचे ओझे कमी केले तर ?त्यातही इतर काही धोके आहेत का?
लेख फारच आवडला.शेवटच्या आरत्या वगैरे जोरका झटका हलकासा लगे.

अवांतर हार्ड डिस्क गंडली हा कॉलेजमधला शब्द होता Happy तेव्हा अर्धेअधिक संगणक उघडेच बसले असायचे ... म्हणजे मदरबोर्ड, हार्डडिस्क वगैरे वगैरे काबिनेटच्या बाहेर आराम करत राहायचे! नॉर्मल हार्डडिस्कलाही पोर्टेबल करून वापरायचे दिवस होते ते Wink

गये वो दिन!

srd,

त्यात फेल्युअरचा धोका नाही कारण कंपनीला आपण आपला डेटा बॅकअप करून ठेवायचे पैसे देत असतात. नोर्मली, ते इंटरनेटहून तुम्हाला तुमचा डेटा उपलब्ध करून देतात, आणि टेप बॅकअप घेऊन ठेवत असतात. ह्यामुळे जरी सर्व्हर गंडले तरी डेटा उपलब्ध करून देता येऊ शकतात.

शिवाय स्टोरेजच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रती तयार करून ठेवलेल्या असतात, त्यामुळे उपलब्धता खूप जास्त असते.

जनरली अश्या पद्धतीवर क्लाउड आणि ऑनलाईन स्टोरेज चालत असल्याने फेल्युअरचा धोका कमी आहे. पण,

पण, इतर ऑनलाईन गोष्टींना असलेले धोके इथेही लागू होऊ शकतात. हैकिंग होणे होऊन डेटा चोरीला जाणे आदी प्रकार होउ शकतात.

डिस्क डिटेक्ट होत नसेल तर अनेवेळा याचे कारण करप्ट झालेले USB ड्रायव्हर्स असु शकते.
असे असेल तर ती हार्ड डिस्क दुसर्‍या संगणकावर डिटेक्ट होईल, तुमच्या नाही. असे असेल अथवा तुमच्या कडे चेक करायला दुसरा संगणक नसेल तर USB ड्राव्हर्स uninstall आणि re-install केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो.

यासाठी आधी जोडलेली सर्व USB उपकरणे काढा. My Computer वर Right Click करुन Properties निवडा.
तेथुन Device Manager मध्ये जा. (अथवा Control Panel मध्ये, System आणि तिथुन Device Manager).
Universal Serial Bus Controller मध्ये दिसणारे सर्व USB Hubs आणि Controllers uninstall करा.
ते झाल्यावर, Device Manager मध्येच सगळ्यात वर तुमच्या संगणकाचे नाव दिसते त्यावर click करा.
मग Action मेनुवर click करुन "Scan for hardware changes" वर click करा.

Windows आता unistall केलेले सगळे USB ports , Found new hardware म्हणुन re-install करते.
ते re-install झाले की मग हार्ड डिस्क परत लावुन बघा, डिटेक्ट होऊ शकते.

स्वानुभवावर आधारित लेख दिसतोय Wink

बायकोसमोर हार्ड डिस्क चे पसारे काढू नका नाही तर तिची हा डि सरकेल हे लिहायचे राहिले का Wink Lol

मानवा, सॉफ्टवेअर फेल्युअर बद्दल ते नंतर लिहिन म्हटलेत.
शिवाय, 'हार्ड डिस्क' बद्दल सुरू आहे. पोर्टेबल डिस्कबद्दल नाही. Happy

हा हा हा
बजाज मध्ये नव्हतो हा कधी.
पण बजाज तिरपी करून चालू केली आहे बरेचदा Happy

Thank you Srd.
तुम्हाला उत्तर मिळाले आहेच खाली.
पण मला स्वतःला क्लाऊडमध्ये माझा बॅक अप ठेवायला योग्य वाटत नाही.

अनिरुद्ध_वैद्य - उघड्या डिस्कना हात लावताना स्थितिज विद्युतभाराने त्या बिघडतात. त्यामुळे शक्यतो ओपन डिस्क उघड्यावर न ठेवणे चांगले.

साती टपल्या हळू मारा बरं का. नाजुक प्रकार असतो आहे. Happy

मानव पृथ्वीकर खुप छान माहिती आणि उपाय.
उपाय महत्वाचा आहे. नक्कीच करून पाहिला पाहिजे.

धन्यवाद अनिरुद्ध.पुर्वी एक फिलिप्सचा टेप रेकॅार्डर घेतला होता तो म्हणे कंप्युटरला जोडता येतो आणि कॅापी घेता येते.ते उपकरण ( अथवा तशाप्रकारचे ) आताच्या हाइस्पिड डेटाला साठवू शकेल का?

डेटा पुर्वी कागदाला भोके पाडून साठवत असत.
मग चुंबकीय रुपात साठवला जात असे. सुमारे ८० ते ९० च्या दशकात असलेली फ्लॉपी हे त्याचे उदाहरण.
पण त्या आधीही टेप ड्राइव्हज अस्तित्वात होते.

टेप ड्राइव्ह त्यामानाने बर्यापैकी सुरक्षित उपाय आहे.
हा ही चुंबकीय बॅकअप आहे. एलटिओ फॉरमॅट मधे आलेल्या ड्राइव्हज सध्या या जगावर राज्य करत आहेत.
मला वाटते याचे टेप फक्त एचपी आणि आयबीएम बनवते.
यात टेप स्वच्छ ठेवणे आणि टेप वाचणार्र्या रिडरचे हेड स्वच्छ राखणे हे दोन महत्त्वाचे भाग आहेत.
पण दीर्घ कालीन उपाय म्हणून चांगला आहे.

तसे डिव्हिडी बर्न करून ठेवणे हा उपायही आहेच. Happy

निनाद, मस्त धागा. वाचतेय. माझी एक हार्ड डिस्क उडून पडली आहे. वरीलप्रमाणे काही करता आलं तर बघते.

डिस्क प्लास्टीकच्या पिशवीत गच्च गुंडाळून फ्रीझरमधे ठेवण्याचा उपाय कधी काळी वाचनात आला होता. कधी करुन पाहिला नाहीये म्हणा. Happy

डिस्क जर बायोसमधे डिटेक्ट होत नसेल तर सारख्याच डिस्कचा बोर्ड लावुन पाहु शकतो. त्यानेही जर डीटेक्ट नाही झाला, तर ९९.९९% वेळेस डिस्क फेकुन देण्याच्या लायकीची हा मागिल १५ वर्षांचा अनुभव. बॅकप हा प्रकार सुरुवातीला भक्तीभावाने केला जातो. नंतर मात्र हळुहळुत्यात खंड पडत जातो. क्लाऊड बॅकप हा एक चांगला पर्याय आहे. Sync Softwares वापरुन ठराविक काळाने बॅकप घेतल्यास उत्तम.