फुलपाखरं आणि चांदणी...

Submitted by मी मुक्ता.. on 16 October, 2015 - 03:32

जग चालतंच असतं
मागील पानावरुन पुढे..
चांदणीला फुलपाखरं पहिल्यांदा दिसतात तेव्हा..
पण चांदणीचं मात्र विश्व बदलून जातं..
हसत राहते लुकलुकत,
फुलपाखरं पाहता पाहता...
कोवळ्या फुलांत भिरभिरणारी फुलपाखरं..
निश्राप मनस्वीपणे लळा लावणारी फुलपाखरं...
नियती ठाऊक असतेच चांदणीला,
अगदी पहिल्यापासून..
अन् म्हणूनच फुलपाखरांचं तिला अप्रूपही जास्त..
फुलांनाही नसेल एवढं..
चांदणी निरखत राहते फुलपाखरांना कौतुकाने..
तो असह्य पण अटळ क्षण येईपर्यंत..
जग चालत राहतं..
काळाच्या ओघात फुलं प्रौढ बनतात... पोक्त नजरेसारखी..
आणि फुलपाखरं उडून जातात.. नजरेतल्या सुगंधासारखी...
फुलपाखरं उडून जातात तेव्हाही,
जग चालत राहतं..
मागील पानावरुन पुढे..
फुलंही गुंतून जातात त्यांच्या पोक्त व्यवहारात..
ती चांदणी मात्र विझून जाते गर्द काळोखात,
कायमची...
फुलपाखरं उडून जातात तेव्हा...
-------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users