दुरावा….. भाग १.

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 8 October, 2015 - 08:09

वर्ल्ड कपची हवा निवळली होती, पण त्यादिवशी घडलेला तो प्रसंग आजही त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. सेमी फायनल च्या दोन दिवसापूर्वीच त्याचं संभाषण...

"या वेळेस पण वर्ल्ड कप आपलाच ... इंडिया च आणणार ...जीतेगा भाई जीतेगा " लंच ब्रेकमध्ये त्या चार पाच जणांमध्ये संभाषण रंगात आल होत. क्षणभरासाठी ऑफिसच मरगळलेल वातावरण क्रिकेटवरील प्रेमामुळे प्रफुल्लीत झाल होत. तितक्यात ती आली ... "ह्म्म्म्म... होपफुली " या तिच्या उत्तराने सार जल्लोषमय वातावरण निवळल. तरीही कोणीतरी सावरण्याचा प्रयत्न केला, "सचिनला मिस करतोय यार पण..." ती पुन्हा उत्तरली , "मी सुद्धा" एका क्षणात चिडचिड उमटली, "तुला ग काय माहिती क्रिकेट बद्दल...?” "आणि तुला रे काय माहित माझ्याबद्दल? म्हणजे अस कस गृहीत धरलस तू कि मला काहीच माहित नाही क्रिकेटबद्दल ते...?" तिच्या बोलण्याचा रोख असा अचानक बदलल्याने तो क्षणभर गोंधळला. हा विषय देखील हिने आपल्यातल्या वैयक्तिक (पर्सनल) नात्यावर घेतला कि काय ? काहीच कळत नव्हत आणि नेहमी प्रमाणेच याही वेळेला तिने स्पष्टीकरण देण टाळल होत. असच चालू होत त्यांच्या ब्रेक अप नंतर... कुठलाही विषय निघू देत ती दुहेरी बोलून जास्तीत जास्त प्रयत्न करत होती त्याला जाणीव व्हावी त्यांच्या ब्रेक अप ची.

ती त्याच्या आयुष्यातूनहि लांब निघून गेली होती पण तरीही होती त्याच्या आठवणीत. खूप व्यस्त असायचा तो पण तरीही .. सार्याच गोड आठवणी आणि फक्त एक कटू आठवण, एक कटू दिवस ... त्यांच्या ब्रेक अपचा दिवस. ज्या एका दिवसाने त्यांच्या पाच वर्षाच्या गोड आठवणी पार मातीमोल केल्या होत्या. आणि आज तिने त्याच्या केबिनमध्ये येउन दिलेल्या रेसिग्नेशन लेटर मुळे त्याच आठवणी तो परत आठवत बसला होता. जणू काही काय गमावलं आणि काय कमावलं याचा न संपणारा हिशोब तो मांडत होता. नात तुटतंय याची कल्पना आली होती त्याला आणि तिलाही.. पण मग ते सावरण्याचा प्रयत्न जेव्हा तिने केला तेव्हा त्याने बेफिकीरपणे उडवून लावलं होत.. का? चुकल होत काहीतरी... पण नक्की काय आणि कुणाच?

आठवणींचा चलचित्र पाहण्यात तो बुडून गेला...

त्यांची पहिली भेट .. पाच वर्षापूर्वींची.

सचिनला इंटरव्यू साठी कॉल आला होता. बसने जाव लागणार होत, बसची नक्की वेळ ठाऊक नव्हती पण एक गेली, तर दुसरी अर्धा तास तरी येणार नव्हती एवढी माहिती त्याला कळवण्यात आली होती . दही साखर आईने भरवली त्याला आणि तो थोडा घाईतच निघाला. बस स्टॉपवर पोहोचणार तोच समोरून बस जाताना दिसली, असा धावत सुटला तो .. चढत्या बसमध्ये चढला घाईतच, ड्रायव्हर ला मनात शिव्या हासडत. गर्दी नव्हती फारशी पण बस रिकामीही नव्हती अगदी एखाद दुसरी सीट मोकळी होती… तो एका सीटवर जाऊन बसला. शेजारी बसलेल्या माणसाकडे तिरक्या नजरेने पहिले ,वयस्कर होते. ते आवराआवरी करताना दिसले. वर्तमानपत्र त्यांनी ब्यागेत ठेवले आणि आता पुढच्या स्टॉपवर ते उतरतील याचा अंदाज त्याला आला. झालेही तसेच, ते उठले. सचिन बाजूला खिडकीकडे सरकला. बस पुढच्या स्टॉपवर थांबली. पुढे आणखीन एक स्टॉप गेला. बस थांबली आणि चालू झाली आणि परत थांबली. स्टॉप येउन गेला तरी अशी थोडीशी पुढे जाऊन हि बस मध्येच कशी थांबवली या विचारात असतानाच समोरील दरवाजातून एक सुंदर नाजूक मुलगी चढली, भिरभिरत्या नजरेने पहिले लेडीज सीट न्याहाळली पण जागा नव्हती त्यामुळे नेमकी याच्या बाजूच्या रिकाम्या सीटवर येउन बसली. "आजकाल सुंदर मुलींसाठी बस रस्त्यावरच थांबते काय- स्टॉपच्या पुढे ?" तो तिच्याकडे बघतच म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहिलं, "गुड ट्राय... पण मला माहित नाही" संभाषण पुढे चालू झाल.

सचिन - ओssss, हेल्लो .. गुड ट्राय काय ? तुझ्याशी बोलायचा बहाणा म्हणून नाही विचारलं मी. मी ते सहज बोलून गेलो. तुझ्यासाठी थांबली बस, ती हि स्टॉपच्या पुढे ? मग ? मी हि दोन स्टॉप आधी चढलो तुझ्या, साइड मिरर मधून दिसलो असेन ना त्या ड्रायव्हरला मागून धावत येताना तरी नाही थांबवली. चालत्या बस मध्ये चढलो मी. म्हणून म्हटलं नियम वेगळे लागू होतात कि काय सगळ्यांना?
ती - बस चे नियम मला विचारण्यापेक्षा कंडक्टर ला विचार ना .. ते बघ आले विचारू ? ( त्याने नकारार्थी मन हलवली .) ती हसली, "काय तू? आता कुठे गेला तुझा ताव?" तिने तिकीट घेतलं. लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट. त्यालाही तिथेच उतरायचं होत.
तो - अग ए, तावात नाही बोललो काहीच जे खर होत तेच म्हणालो. तुझ्याशी बोलत होतो न मग कंडक्टर ला कशाला मध्येच विचारायचं ? त्यांचा काही भरवसा नाही, सरळ उत्तर देतील का ते अशा प्रश्नांवर?
ती - मग असे चुकीचे प्रश्न विचारायचेच कशाला? मान्य कर तो "ट्राय"च होता.
तो - अस काही नाहीये.
ती - हो? ठीक आहे.
तो - सॉरी पण ट्राय वगैरे नाही त्या ड्रायव्हरचा राग नकळत त्या प्रश्नातून व्यक्त केला. खास बस थांबवली त्याने, सारे नियम धाब्यावर मारून. तुला बघून.
ती - काही वेळा डोळे तेवढच पाहतात जेवढी नजर जाते. (त्याच्या चेहर्याला न्याहाळत) तुला काहीच कळाल नाही. हो न?
तो – हो; म्हणजे, नाही कळाल.
ती - (हसून) त्या समोर ज्येष्ठ नागरिकांच्या सीटवर बसलेल्या आजी दिसताहेत का ?
तो - हो ... मग त्यांचं काय ?
ती - त्यांनी हात दाखवला होता बस थांबावी म्हणून . त्यांच्या मागेच मी होते, फक्त त्यांना धाप लागली होती म्हणून त्यांनी मला आधी चढायला सांगितलं बसमध्ये. बस माझ्यासाठी नाही तर त्या आजींसाठी थांबवली गेली. पण तुमच्यासारख्या तरूणांच लक्ष त्यांच्याकडे कुठे जाणार?
तो - ओह्ह्ह .. सॉरी.. ए पण अस काही नाही की ... म्हणजे .. तू आधी आलीस .. म्हणून ..पण तस नाही काहीच. (त्याला स्वतःची बाजू कशी सावरावी तेच कळत नव्हत.)
ती - काही नको बोलूस. होत अस कधी कधी.
ती एवढच म्हणाली आणि डोळे मिटून सीटच्या मागील दांड्यावर डोक ठेऊन झोपून गेली. (अर्थात शांत बसली)
तो- (मनामध्ये) आता हिच्याशी आणखीन बोलण्याचा प्रयत्न केला तर हिला नक्कीच वाटेल आपण तिच्याशी बोलता याव म्हणून विषय वाढवत आहोत.

तोही गप्प बसून खिडकी बाहेर न्याहाळत राहिला.

३५-४० मिनिटानंतर त्यांचा स्टॉप आला. तसे ते दोघे उतरले. तो चार हात लांबूनच तिच्या मागे चालला होता. "उगाच म्हणेल नाहीतर मला "फॉलो" करतो म्हणून." पण आता त्याला थोड टेन्शन आल होत इंटरव्य्हुच. मित्रांकडून त्याने सगळी माहिती काढली होती आणि ज्या ठिकाणी जायचं होत ते ऑफिसही त्याला ठाऊक होत, आता प्रश्न एकच होता तो म्हणजे "ती हि त्याच दिशेने का जातेय ?" आणि त्याच दिशेने नव्हे ती तर त्याच ऑफिसमध्ये शिरली जिथे तो जाणार होता. जी प्रोसिजर तो फॉलो करणार होता तीच ते सार करत होती. रिसेप्शन वर दोघे एकसाथ पोहोचले , "HR डीपार्टमेंट प्लीज " शेवटी तोही पुढे आला , "इंटरव्यू ? " दोघांना हसत उत्तर मिळाल , "स्ट्रेट.. लेफ्ट साइड. मिसेस. बापट" तिने त्याच्याकडे वळून पाहिलं ... "ओह्ह.. तू हि ? ओके. बेस्ट लक ." तो म्हणाला, "तुलाही " दोघेही एकाच ठिकाणी इंटरव्यू साठी आले होते. त्यांच्या आधी चौघे जण तिथे बसले होते. मनात घालमेल सुरु होती. बसमधली ओळख असूनही आता काय बोलाव दोघानाही सुचत नव्हत. आधीच्या चौघांकडे बघून तर "आपण फारच साधे बनून आले आहोत" अस त्याला वाटत होत. तिच्याही मनात तसच काहीस होत. साधा पंजाबी ड्रेस ती घालून आली होती. नटून नाही पण एक हलक्या रंगाची लिप्सटिक आणि पावडर आणि कपाळावर एक टिकली. अगदी मराठी लुक. शेवटी न राहवून तिनेच बोलायला सुरुवात केली, "दिसण्यापेक्षा बोलण आणि रेझ्युमेवरील माहिती वर जॉब देतात ना?"
"हो तर. नुसते लुक्स असून काय फायदा? काबिलीयत भी चाहिये ना... " खर तर तो तिला समजावता समजावता स्वतःच्या मनाचीही समजूत घालत होता.
"BE POSITIVE... मिस ..? "
"मधुरा. तू ? "
"मी सचिन"
पुढे एक रिटन टेस्ट त्यांनी दिली आणि मग पर्सनल इंटरव्यू. कस असेल? काय होईल? हा जॉब मिळण किती गरजेच आहे? वगैरे प्रश्नांमध्ये दोघे अडकले होते, फारसे बोलले नाहीत ते पुढे .

"मिस. मधुरा?" ती उठली. तिला आत बोलावलं होत. ती गेली. २५ -३० मिनिटांनी बाहेर आली आणि त्याला म्हणाली, "मस्त आहेत त्या. बिनधास्त राहा." तो हसला आणि ती निघून गेली. थोड्या वेळाने त्याचाही इंटरव्ह्यू झाला . छान झाला. खुशीतच तोही बाहेर पडला. "ती असेल का? अजूनही? भेटेल का पुन्हा बस स्टॉपवर?" प्रश्नांच्या संभ्रमातच तो स्टॉपवर पोहोचला. ती कुठेच दिसत नव्हती. "आपण असे अचानक का हिरमुसलो? एवढ काय त्यात? " तो बसची वाट पाहत बसला. घरी पोहोचला पण विचारातून “ती” काही केल्या जात नव्हती . लव्ह @ फर्स्ट साईट वगैरे त्याला कधी पटल नव्हत पण ती पुन्हा भेटावी अस नक्कीच वाटत होत.

इथे मधुराही एकटीच हसत होती. "किती खेचली मी त्याची? श्या. पण जाऊदेत. थांबायला हव होत का मी त्याच्यासाठी? नाही. किती वेळ लागला असता काय माहित? आणि काय करणार होते? त्याचा इंटरव्ह्यू कसा गेला असेल? एकच वेकेंसी होती कि...? भेटेल तो पुन्हा ? " प्रश्न तिलाही पडले होते पण सिलेक्शन बाबत नंतर फोन करून कळवणार होते. प्रेम नसाव ते, पण उत्सुकता नक्कीच होती.

तीन दिवसांनी सचिनला फोन आला. आपण सिलेक्ट झालो ..नोकरी मिळाली आपल्याला. घरी सगळ्यांना सांगितलं. खुशीने आकाश ठेंगण झाल होत पण दुसर्याच क्षणी नवीन प्रश्न उपस्तिथ झाले, "मधुरा? ती असेल का सोबत?" पण जॉईन होण्यासाठी ९ दिवस बाकी होते. आणि तोपर्यंतची धाकधूक त्याला आजही जाणवत होती.

९ दिवस संपले आणि जॉइन होण्याचा दिवस उजाडला.. बसमध्ये नकळत तिच्या स्टॉपवर त्याने तिची वाट पाहीली. पुढे मध्येच बस थांबावी असही वाटल पण तस काहीच झाल नाही. तरीही फ्रेश चेहरा ठेवला, कारण, पहिला दिवस नोकरीचा आणि ‘ती’ असण्याचे चान्सेस संपले नव्हते. तो ऑफिसमध्ये पोहोचला. काही फॉरम्यालीटीज आणि त्याच्या सिनिअर्स ने त्याला कामाला लावला देखील. ती नव्हती आणि कामामध्ये स्वतःला त्याने बुडवून घेतलं. शेवटी प्रश्न करिअरचा होता. बाकी नोकरी बाबत तो खुश होता फक्त पहीली ओळख शेवटची ठरली म्हणून खट्टू झाला होता.

क्रमश:

...........मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users