परीकथा - निसर्गपरी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 September, 2015 - 01:26

एका छोट्याश्या गावात श्रावणी आणि राधा नावाच्या दोन बहिणी राहत होत्या. श्रावणी १० वर्षांची तर राधा तिची छोटी बहीण शेंडेफळ. त्यांच्या दारासमोर छोटीशी बाग होती. श्रावणी आणि राधा आपल्या आई-बाबांसोबत रोज झाडांना पाणी घालताना, त्यांची मशागत करताना सोबत असायच्या. मध्ये मध्ये त्या स्वतःही काही झाडांना पाइप घेऊन पाणी घालायच्या. श्रावणी कुंडीत, झाडाजवळ पाण्याचा पाइप आणून द्यायची तर चिमुकली राधा पाण्याची धार कुंडीत, झाडाला टाकायची असे दृश्य बर्‍याचदा असे. आई बी किंवा रोपे लावत असताना आईने केलेल्या छोट्या खड्यात बी टाकायचे काम दोघी करायच्या. झाडावर येणार्‍या पक्षांना फळे खाताना पाहताना दोघींना गंमत वाटायची. पक्षांचा तो अधिकार आहे हे आई-बाबा नेहमी त्या दोघींना सांगायच्या म्हणून त्याही कधीच त्या पक्षांना हाकलवायच्या नाहीत उलट आपल्या घरातील काही दाणे त्या आपल्या अंगणात येणार्‍या पक्षांना द्यायच्या. हे रोजच्या रोज घडत असताना नेहमी आकाशात विहार करणार्‍या परीताईचे लक्ष जायचे. ही होती निसर्गापरी. एक दिवस दोघी बागेत खेळत असताना अचानक निसर्गापरी त्यांच्या समोर आली. झगा आणि पंख ह्यावरून ही गोष्टीतली परीताई आहे हे पाहून दोघींना आनंद झाला. परीने दोघींना जवळ घेतले आणि म्हणाली मी रोज तुम्हाला आकाशातून पाहत असते तुम्ही दोघी एकत्र झाडांची सेवा करता, पक्षांना खाऊ देता. निसर्गासोबत मैत्री करणारी मूल मला खूप खूप आवडतात. मी की नाही आज तुम्हाला गमतीशीर ठिकाणी फिरायला नेणार आहे. हे ऐकून दोघीही खूप खूश झाल्या. दोघी उड्या मारून टाळ्या वाजवू लागल्या. श्रावणीने विचारले पण परीताई आम्ही कशा येणार वर आम्हाला पंख नाहीत तुझ्यासारखे. परीताईने लगेच मंत्र पुटपुटला आणि तिच्या हातात एक छोटीशी हिरवी झाडाची फांदी आली. ती फांदी तिने श्रावणी आणि राधावर ओवाळून म्हटले "निसर्ग मैत्रिणींना पंख दे छडी"त्या बरोबर दोघींनाही पंख आले. परीताईने दोघींना दोन हातात धरले आणि ती त्यांना घेऊन उडू लागली. उडता उडता त्यांना मध्येच वेगवेगळे पक्षी आपल्या भोवती उडताना दिसत होते. जर उंच गेल्यावर गार गार हवा येऊ लागली. . अजून उंच गेल्यावर मऊ मऊ ढगांच्या स्पर्शाने त्यांना गंमत वाटू लागली.काही क्षणातच त्यांना चमचमत्या चांदण्या दिसू लागल्या. अय्या इथे तर दिवसा पण चांदण्या आहेत करून श्रावणी जोरात आश्चर्याने ओरडलीच. राधाने पण आश्चर्य व्यक्त करत टाळ्या वाजवल्या. सगळ्या लखलखत्या चांदण्यांमध्ये चंद्रकोराच्या आकारात चांदोबा गालावर गोड हसू आणून श्रावणी आणि राधा कडे पाहत होता. चांदोबाला एवढ्या जवळ पाहून तर दोघी इतक्या आनंदी झाल्या की त्यांनी परीताईला मिठीच मारली. आता परीताईने चंद्र चांदण्यांचे दर्शन घडवून पुन्हा आपले प्रस्थान खालच्या दिशेने चालू केले. जमिनीवर त्या हळू हळू येऊ लागल्या तसे खाली झरझर चालणारी नदी दिसू लागली. त्या तिघी नदीकिनारी आल्या आणि एकदम गार गार, प्रसन्न वाटू लागले. परीताई म्हणाली. बाळांनो तुम्ही आता दमल्या असाल नदीचे थोडे पाणी त्या. परीताईने त्यांना एका पानाचा द्रोण तयार करून दिला. त्या द्रोणाच्या साहाय्याने दोघी पाणी पिऊन शांत झाल्या. नदीच्या पलीकडच्या परिसरात रंगिबिरंगी फुले दिसू लागली. नकळत दोघींचे पाय त्या फुलांच्या दिशेने चालू लागले. जरा पुढे जाऊन पाहिले तर सारा परिसर फुलांच्या सुगंधाने प्रफुल्लित झाला होता. फुलांवर विविधरंगी फुलपाखरे बागडत होती. श्रावणी राधाला भान हरपल्यासारखे झाले होते. राधा फुलांचा सुगंध घेत होती, श्रावणी हळुवार फुलांना ओंजळीवर घेऊन निरखत होती. एवढी फुले होती पण दोघींनीही फुले तोडली नाहीत, त्यांना इजा केली नाही. परीताईने विचारले काय मुलींनो कसे वाटले. श्रावणी म्हणाली परीताई हे आम्ही स्वप्न तर नाही ना पाहत? परीताई हसली आणि म्हणाली तुम्हाला अजून गंमत दाखवायची आहे चला. असे म्हणत परीताईने पुढे नेले तर तिथे वृक्ष वेलींचे रान होते. त्यांच्या स्वागताला गोंडस प्राणी येऊ लागले. ससा, हरण यांना तिघींनीही कुरवाळून मुकप्राण्यांना ममतेचा स्पर्श दिला. पूर्णं परिसर हिरवा गार आणि सगळ्या झाडांना फळे लागली होती. मोठे मोठे केळींचे पिवळे घड, केशरी आंबे, लाल चुटुक सफरचंद, नारिंगी रंगातली संत्रं, पिवळी धम्मक मोसंबी, हिरवी पाणीदार द्राक्ष, मोठमोठी कलिंगडे वेगवेगळी फळे प्रत्येक झाडाला हाताला लागतील अशी लगडली होती. मध्ये मध्ये रंगिबिरंगी पक्षी ह्या फळांचा आस्वाद घेताना मोहक दिसत होते. दोघी अजून खूश झाल्या ह्या वेगळ्याच दुनियेत दोघीपण निसर्गाच्या अद्भुत किमयेचा अनुभव घेत होत्या. परीताई म्हणाली सांगितले चला आपण आता आपण फळे खाऊया. जा श्रावणी मनमुराद हवी तेवढी फळे काढून घे तुम्हा दोघींना. श्रावणीने काही ठरावीक दोघींच्या आवडीची फळे झाडावरून तोडली. ती तोडताना सुखद आनंद तिच्या डोळ्यांमध्ये तरळत होता. तिने फळे आणून एका झाडाच्या पानावर ठेवली व परीताईलाही आपल्या बरोबर फळे खाण्याचा दोघींनी आग्रह केला. तिघींनी मिळून मनमुराद फळे खाल्ली. फळे खाता खाता त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या. संध्याकाळ होत आहे हे पाहून परीताईने दोघींना निघण्याची सूचना केली. दोघींनाही आता घरची ओढ लागली होती. कधी एकदा हे सगळं घरी जाऊन घरातील सगळ्यांना सांगतोय अस दोघींना झाले होते. आनंदाने त्या पुन्हा परतीच्या दिशेने पंख हालवत निघाल्या व परीताईने त्यांना त्यांच्या अंगणात आणून सोडले. जाताना परीताई म्हणाली. बाळांनो तुम्ही निसर्गाची देखभाल करता, निसर्गाला नुकसान होईल असे काही करत नाही, निसर्गावर प्रेम करता म्हणून आज तुम्हाला ही अद्भुत दुनिया मी पाहायला नेली. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही सांगा की निसर्गाला जपा, त्याचे संवर्धन करा मग निसर्गापरी खूश होईल आणि सगळे ऋतू समतोल बरसवेल. पीक-पाणी चांगल्या रितीने मिळेल आणि हो निसर्गापरी श्रावणीच्या स्वप्नात जशी आली तशी त्यांच्याही स्वप्नात येऊन अद्भुत निसर्गरम्य दुनियेत सुद्धा नेईल म्हणून सांगा बरं का. चला आता मी निघते टाटा.

(आजच्या महाराष्ट्र टाईम्स च्या मुंबई टाईम्स पुरवणीत प्रकाशीत.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू कित्ती गोड ग!!! श्रावणी, राधा आणि सगळी गोष्ट च डोळ्यासमोर उभी राहिली.

छान आहे गोष्ट
अश्या गोष्टींचा मुलांवर चांगला परिणाम होतो.
माझ्या शेजारची बाई आमच्या झाडांची पाने त्यांच्या आंगनात पडुन कचरा होतो झाडे तोडा म्हणुन ओरडायची
तेंव्हा तिच्या छोट्या मुलांनी तिला झाडे तोडायची नसतात म्हणुन समजावले होते.
आता ती शांत आहे.

मस्तय जागू ताई .
आज सकळीच चाळली .
नाव वाचून वाटलच की तुझी आहे , मुलीन्ची नाव वाचून तर खात्रीच पटली Happy .

मस्तच गं Happy
किती गोड वाटली वाचायला.

सुट्ट्यांमधे माझ्या गावी आम्ही जमतो तेंव्हा चिल्ल्या पिल्ल्य्यांना ही गोष्ट एकदा तरी नक्की सांगेन Happy

अश्विनी, सामी, स्वस्ति, टीना धन्यवाद.

सकुरा खरच जे लहानांना कळत ते कधी कधी मोठ्यांना कळत नाहि.

मामी हो ग दोघीही खुष.

रिया नक्की सांग. आणि मला त्याचा रिप्लाय पण दे नक्की.

जागूताई, मस्त कथा!

काल मायबोलीवर वाचता आली नव्हती. पण महाराष्ट्र टाईम्सची पुरवणी रात्री उशिरा वाचत असताना ही गोड कथा वाचली.

Pages