(बाप्पांचा) प्रसाद आणि मी

Submitted by पल्लवी अकोलकर on 28 September, 2015 - 02:15

प्रसादाला नाही कसं म्हणायचं?
असं करत करत, मागचे १०/१५ दिवस एकामागून एक, नुसते गोड पदार्थ पोटात चालले आहेत.
वजन तरी कसं कमी करावं माणसाने?
आज काय उकडीचे मोदक, उद्या काय तळणीचे...
फ्रिज मधे काही ठेवायला काढायला जावं, तर दार उघडल्या उघडल्या पहिले मेले ते मिठाईंचे बॉक्स दिसायला लागतात.
यात काय?
पेढ्यांचे मोदक, त्यात काय चॉकलेटचे मोदक...
खालच्या कप्प्यात काय दिसतंय?
अरे हो, ते तर पहिल्या दिवशी आणलेले केशर मोदक होते...
च्या मारी, अजुन नाही संपले?
आणि हा लाल बॉक्स कोणी आणला?
अरे हो, घरच्या गणपतीच्या दर्शनाला काका काकू आले होते ना तेव्हा दिसला होता त्यांच्या हातात हा बॉक्स.
बघू त्यात काय आहे?
अरे देवा!!!
आता एवढे मोतीचूर लाडू कोण खाणार? म्हणत एक लाडू तोंडात टाकायचा आणि आपण फ्रिज नेमका कशासाठी उघडला होता हे साफ विसरून जायचं.
आज काय गणपती बाप्पा विराजमान झाले, खा मोदक, उद्या काय गौरी आगमन झाले, खा करंज्या, परवा काय विसर्जन आहे, खा वाटली डाळ अगदी अनोळखी लोकांसमोर हात पुढे पुढे करुन तिथे त्या विसर्जनाच्या हौदावर...

बरं या मोदकांचे तरी किती प्रकार असावेत?
एकदा तर कोणी तरी चक्क पंचरंगी मोदक ठेवला माझ्या हातावर.
मग वेगळा दिसतोय म्हणून परत खाऊन बघणे आलेच...
अशी सगळी गंमत चाललीये नुसती.

बरं बर्‍याचदा एक खाऊन चव नीट समजत नाही ना...
म्हणून अजुन २/४ कसे खाल्ले जातात कळतही नाही.
आणि मग उभं रहायचं त्या वजन काट्यावर घाबरत घाबरत आणि किंचाळत बसायचं.
अशानं काय होणार त्या पोटाचं?
अशी एकामागून एक प्रलोभनं समोर दिसत असताना, बारीक तरी कसं व्हावं आमच्यासारख्या सामान्य माणसानं?

मग जाता येता, लोकं त्या वाढलेल्या पोटाकडे शंकेने बघत, कितवा? असं विचारणार.
तेव्हा केविलवाणं हसून ’’नाही नाही, तसं काही नाही’’ असं ओशाळवाणं हसत म्हणायचं.
मोदक काय, पेढे काय, पंचखाद्य काय, साटोर्‍या काय, पुरणपोळ्या काय, साखर खोबर्‍याची खिरापत काय....
ते कमी पडल्यासारखं, सगळ्यांचे अगदी सप्टेंबरमधेच तडफडणारे वाढदिवस काय...
देवा देवा देवा,
खरं तर हे ’केक प्रकरण’ डिसेंबर मधे खायला जास्त धमाल येते ना?
मग नेमकं याच अडीअडचणीच्या वेळी का खावे लागताय?

आता ’नाही’ तरी किती वेळा, कोणा कोणाला आणि कशा कशाला म्हणायचं तेच समजत नाही.
श्रावण सुरू झाल्यापासून हा असा नुसता धुमाकूळ सुरू होतो, आणि मग उद्यापासून नक्की चालायला जायचं, कमीत कमी १२ तरी सुर्यनमस्कार घालायचे, असं स्वत:ला आश्वासन देत आजचा दिवस आनंदात, खादाडी करत घालवायचा, हे समीकरण गेली कित्येक वर्षे सुरू आहे.
आणि मग २ दिवस झाले की, ”आज नाही जमत गं बाई, पहाटे फिरायला यायला” असा, मैत्रिणीला फोन फिरवून टाकायचा.

एकंदरीत, हे सगळं असं चाललेलं असताना, कसा काय तो वजन काटा हलणार?
फार तर उजवीबाजू कमी जास्त दाखवतो आपल्या समाधानासाठी, पण डाव्या बाजूला जरा सुद्धा धक्का नाही बसू देत.
जणू काय बिघडलाय की काय अशी शंका यावी.
आणि आता हे संपत नाही तोवर, नवरात्र, दिवाळी येतेच आहे.
म्हणजे थोडक्यात काय, तर ये सिलसिला चलताही रहेगा.
तेव्हा देवा गजानना, हे गणेशा, गणपती बाप्पा...
तू पुढच्या वर्षी लवकर ये रे, पण आत्ता वाचव रे बाबा मला या प्रलोभनातून.
By पल्लवी अकोलकर
https://www.facebook.com/PallaviAnecdotes

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users