सरत्या महिन्याचं एक पान (Movie Review - Calendar Girls)

Submitted by रसप on 28 September, 2015 - 00:08

सीबीआयच्या प्रादेशिक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मोठ्या केबिनमध्ये दहा-पंधरा आरोपी उभे आहेत. मान खाली, दोन्ही हाताची 'विश्राम' स्थितीत जुळणी आणि स्तब्ध. वरिष्ठ अधिकारी खुर्चीत बसला आहे आणि त्याच्या बाजूला त्याचा एक कनिष्ठ अधिकारी उभा आहे. टेबलाच्या दुसऱ्या बाजूला खुर्चीत एक महिला बसली आहे आणि त्या महिलेला काही फोटो, कॉल रेकॉर्ड्स वगैरे दाखवून, तो उभा असलेला अधिकारी प्रश्न विचारतो आहे. आजूबाजूचे लोक 'आता काय होणार' ह्या विचाराने ग्रस्त.

हे दृश्य पाहत असताना मला क्षणभर भास झाला की हे सीबीआयचं कार्यालय नसून एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं कार्यालय आहे व उभा असलेला अधिकारी एक शिक्षक आहे, जो काही द्वाड मुलांना मोठ्या सरांकडे घेऊन आला आहे आणि आता एकेकाला फैलावर घेतलं जात आहे.
असेच अजून काही पोरकट प्रसंग, बाष्कळ योगायोग वगैरे 'कॅलेण्डर गर्ल्स' मध्ये येत राहतात. अर्थात, हे सगळं किंवा अश्या प्रक्रारचं बरंच काही आपण अनेक चित्रपटांत 'सिनेमॅटिक लिबर्टी' म्हणून चालू देत असतो. कोर्ट सीन्सची अतिरंजित, हास्यास्पद चित्रीकरणं तर कित्येक होऊन गेली असतील. ऑब्जेक्शन माय लॉर्ड (सर्रास 'मिलॉर्ड' म्हटलं जाणं), ठहरिये जजसाहब, जो भी कहूँगा सच कहूँगा.., गवाहों के हालात.. ह्या सगळ्याच्या पारायणांची परंपराच आपण जपलेली आहे. त्यामुळे उपरोक्त सीबीआय चौकशीचं दृश्य अगदीच अशक्य व अतर्क्य असं नाहीच. मात्र, जेव्हा 'मधुर भांडारकर' हे दाखवत असतात, तेव्हा परिमाणं बदलायला हवीत. केवळ ह्यासाठी नाही की, भांडारकर आजच्या काळातल्या उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. तर ह्यासाठीही की, 'कॅलेण्डर गर्ल्स'ची कहाणी त्यांच्यासाठी नवीन नव्हती. फॅशन दुनिया, चित्रपट विश्व आणि कॉर्पोरेट जगत ह्यांच्या 'इनसाईड स्टोरीज' ते हिरोईन, फॅशन, कॉर्पोरेट, पेज थ्री वगैरेसारख्या चित्रपटांतून मांडत आले आहेत. ह्या साऱ्याचा राजकारणाशी संबंध आणि ह्या सगळ्यांतलं अंतर्गत राजकारणसुद्धा त्यांनी नेहमीच दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा तीच कहाणी मांडताना अधिक सफाई व नाविन्य ह्याची अपेक्षा रास्त ठरते आणि ती पूर्ण होत नाही.

पारोमा (सतरूपा पाईन), नाझनीन (अवनी मोदी), मयूरी (रुही सिंग), शॅरन (कायरा दत्त) आणि नंदिता (आकांक्षा पुरी) ह्या पाच तरुणींची एका बहुचर्चित, प्रसिद्ध हॉट अ‍ॅण्ड सेक्सी 'कॅलेण्डर'वर झळकण्यासाठी निवड होते. नाझनीन ही मूळची पाकिस्तानी, पण लंडनस्थित, तर बाकी मुली भारताच्याच विविध भागांतून असतात. कुणी घरच्यांचा विरोध पत्करून, कुणी अनेक स्वप्नं डोळ्यांत साठवून, कुणी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, कुणी आत्मसन्मानाच्या आग्रहाखातर आपापलं पूर्वायुष्य व शहर सोडून मुंबईत येतात. 'कॅलेण्डर'चं शूट होतं. ते 'कॅलेण्डर' नेहमीप्रमाणेच खूप गाजतं. मॉडेलिंगच्या क्षेत्रातलं हे एक मोठं पाउल त्यांनी टाकलेलं असतं आणि पाचही मुलींसाठी एका नव्या जगाचे दरवाजे उघडतात. पण ह्या नव्या जगाच्या नव्या समस्या असतात. ह्या समस्यांना त्या कश्या सामोऱ्या जातात. त्यांवर मात करतात का ? की त्यांची वाताहात होते ? आपापली स्वप्नं त्या साकार करतात का ? सन्मान मिळवतात का ? ह्याची कहाणी म्हणजे 'कॅलेण्डर गर्ल्स'.

पूर्वार्धात, पाच जणींच्या पाच कहाण्या आलटून पालटून येत राहतात. उत्तरार्धांत त्यांच्या त्या कहाण्यांत परस्पर संबंध जुळत जातो. मात्र तोपर्यंत हे सादरीकरण ठोकळेबाज आहे, ह्या मतापर्यंत आपण पोहोचलेले असतोच. सतत वेगवेगळ्या दृश्यांत मधुर भांडारकरांच्या पूर्वीच्या चित्रपटांचा भास होत राहतो. ह्या दुर्दैवी तुलनेत 'कॅलेण्डर गर्ल्स' खूपच कमी पडतो. भांडारकर भांडारकरांना भारी पडतात, हरवतात.

तब्बल पाच जणींच्या कहाण्या दाखवण्याची काही आवश्यकता होती का, हाही एक प्रश्न पडतो. दोन-तीन जणींच्या कहाण्या दाखवून अधिक परिणाम साधता येऊ शकला असता. सुरुवातीच्या काही सुमार प्रदर्शनातून अशी भीती वाटते की एकदम पाच नवे चेहरे समोर आणणं, जरा अंगाशीच येणार आहे. पण हळूहळू बेसुमार अंगप्रदर्शन व काही चटपटीत, गरमागरम दृश्यं ह्यांच्यापुढे जाऊन पाचही अभिनेत्र्या थोड्या-फार प्रमाणात आपापल्या भूमिकेशी एकरूप होतात. सरतेशेवटी कायरा दत्त आणि अवनी मोदी चांगल्या कामासाठी लक्षात राहतात, तर आकांक्षा पुरी वाईट कामासाठी.

बराच काळ लक्षात राहील, असं संगीत हे मधुर भांडारकरांच्या चित्रपटाचं लक्षण कधीच नव्हतं. ते इथेही नाहीच. गाडीमधून उतरल्यावर लगेच आपल्या रस्त्याला लागावं आणि गाडीला पूर्णपणे विसरून जावं, असं हे संगीत आहे. गाणं संपतं त्या क्षणापासून आपण ते विसरून जातो. गाणी चालू असताना, त्यांच्या तथाकथित सुरावटींत इतर काही तथाकथित सुरावटींचा भास होत राहतो. सुमारपणाचीही सुमार नक्कल करू शकल्याबद्दल संगीतकार मित ब्रदर्स आणि अमाल मलिकचं अभिनंदन.

कॅमेरावर्क, छायाचित्रण हा सगळ्यात मोठा कच्चा दुवा असावा. एका दृश्यात, एक अभिनेत्री काचेच्या ग्लासातून पाणी पीत असते. तेव्हा क्षणभरासाठी तिचे दात त्या पाण्यात सोडलेल्या कवळीसारखे दिसतात ! 'आता ही मुंबई आहे बरं का?' हे सांगण्यासाठी समुद्र, वांद्रे-वरळी सी लिंक, इमारती वगैरे दाखवताना कॅमेरा केवळ औपचारिकता पूर्ण करतो, इतकी ती दृश्यं सपक झाली आहेत.

एका चित्रपटात अनेक कहाण्यांची सांगड घालताना संकलक चातुर्य व कौशल्य दाखवू शकतो. तसं तर काही होत नाहीच. उलटपक्षी केवळ ठिगळं जोडली जातात. कात्री लावायला हवी होती, असे काही प्रसंग चित्रपटांत नाहीत. पण आपसांतली वीण अधिक घट्ट होऊ शकली असतीच.

'कॅलेण्डर गर्ल्स' फार सहजपणे एक सपशेल हाराकिरी होऊ शकला असता. तुकड्या-तुकड्यांमध्ये तशी ताकदही होती. मात्र त्याचा एकत्रित परिणाम इतपत आहे की, पडद्यावरचा सगळा पसारा सोडून उठून जावंसं वाटत नाही. ह्या किरकोळ अनुभूतीने एका उत्तम दिग्दर्शकाला समाधान मिळणार असेल, तर मिळो. मात्र एका उत्तम प्रेक्षकाला मात्र ते मिळत नाहीच. महिना संपल्यावर कॅलेण्डरचं पान बदललं जातं. त्याच निर्विकारपणे अनेक चित्रपटांना चित्रपट संपल्यावर तो मागे सोडून पुढे जात असतो. अश्या संयमी प्रेक्षकाला मधुर भांडारकरांसारख्यांकडून एक विशिष्ट अपेक्षा असते. ह्याचा विचार करून आता तेच ते विषय न हाताळता काही नाविन्य आणायचा प्रयत्न त्यांनी करायला हवा. अन्यथा कॅलेण्डरच्या सरल्या महिन्याच्या पानाप्रमाणे मागे सोडलेल्या अनेक चित्रपटांबरोबरच एका चांगल्या दिग्दर्शकालाही प्रेक्षक मागे सोडून देतील.

रेटिंग - * *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये २७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

94323568 - Copy.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुर भांडारकर कडून हल्ली तश्याही फारश्या अपेक्षा मी नाही ठेवत.
अगदीच रामगोपाल वर्मा त्याचा झाला नाहीये ईतकेच.
तरी किती वेळा त्याच त्याच धाटणीचे आणि सो कॉलड रिअल वर्ल्ड दाखवणारे चित्रपट बघायचे.
एकतर कित्येक चित्रपट रिलेटही होत नाहीत.

ऋन्मेऽऽष !!
खरयं भांडारकर सगळ्या ठिकाणची काळी बाजू का दाखवितात हे न उलगडणारं कोडं आहे Wink
पेज ३ आणि सत्ता हे मला त्यांचे सग़ळ्यात जास्त आवडलेले पिक्चर आहेत. चांदनी बार पण चांगला होता पण भडक होता फार, मे बी विषय तसा असल्याने असेल. बाकी कॉरपोरेट, फॅशन, हिरवीण बोअर झालेत फार... धन्यवाद रणजित ह्या रिव्ह्यु साठी !! काय काय दिव्य पिक्चर पहावे लागतात तुम्हाला Lol

मला मधुर भांडारकरांचे सिनेमे आवडतात.
त्यामुळे हा सिनेमा कसाही असला तरिही पाहणारच आहे. Happy

पण तु परिक्षण मस्त लिहिले आहेस, सिनेमा पहायला जाताना डोके बाजुला काढून जाईन.

कॅलेंडर गर्ल्सचीच नव्हे तर बॉइजचीही वास्तव कहाणी मधे वाचली होती.. हा चित्रपट त्या वास्तवाला स्पर्श करतोय असे वाटत नाही या लेखावरून.. शेवटी काय मधुर भाऊ आव छानच आणतो..

पेज ३ आणि कॉरपोरेट आवडला होता. फॅशन ओके होता.

हा नवीन शिणुमा फॅशन पेक्षा काही वेगळा असेल वाटत नाही.

भांडारकर सगळ्या ठिकाणची काळी बाजूच का दाखवितात हे न उलगडणारं कोडं आहे
>>
ग्लॅमरस लोकांच्या रंगीन दुनियेला काळी बाजूही असते हे आपल्यातुपल्या सामान्य लोकांना दाखवायला असावे.

लोकांना सुपर्रस्टारची चमकधमक दिसते पण सुपर्रस्टारपदाचा मुकुट किती काटेरी असतो हे जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे

रसप...
काल वक्र तुंड महाकाय पाहिला....
काय पहायच हा प्रश्न तेव्हा होता....
शेवटी सारे प्रश्नच आहेत..

आणि का पाहिला हा प्रश्न अजुन पडलाय...