दुर्गा जसराज आणि ग्लायकोडीन वीकेंड

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

ती पत्रे यायला कधी सुरुवात झाली तो जानेवारीचा शेवटचा वीकेंड होता. पण त्याला त्या नावाने कोणी ओळखत नाही. त्या वीकेंडला एक नाव आहे, 'दुर्गा जसराजचा वीकेंड'. ही घटना अशा विचित्र प्रकारे लक्षात रहायला कारणही तसेच विचित्र आहे.
पंडित जसराजांच्या ८०व्या वाढदिवशी एक प्रकाशचित्र काही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले. पंडितजींची मुलगी, दुर्गा, त्यांना चमच्याने औषध देताना... केक भरवताना नव्हे, तर ग्लायकोडीन देताना. म्हणजे ते औषध ग्लायकोडीन आहे हे त्या छायाचित्राच्या खाली स्पष्ट करण्यात आले होते. या प्रकाशचित्रावरून मोठा गदारोळ झाला. 'असे चित्र वाढदिवशी छापायची काय गरज होती, हे चित्र औचित्यपूर्ण नव्हते' इथपासून ते 'ही ग्लायकोडीनची जाहिरात वाटते, जसराज कुटुंबियांनी असे चित्र काढूच कसे दिले' इथपर्यंत आणि मग अर्थातच 'या चित्रावरून एवढा गदारोळ करण्याची गरजच काय, ग्लायकोडीनसारख्या प्रस्थापित औषधाला जाहिरातीची गरज नाही, असे वाद उकरून काढून पंडितजींच्या ज्येष्ठतेचा व योग्यतेचा अपमान केला गेला आहे' असे सर्व तर्‍हेचे आक्षेप व प्रत्याक्षेप घेतले गेले. वाढदिवस होता शुक्रवारी, शनिवारी हे छापून आले आणि नंतरचा पूर्ण आठवडा हे प्रकरण गाजत राहिले.
खुद्द जसराज कुटुंबियांचे यावरचे मत हे शेवटपर्यंत कळले नाही. हा गदारोळ सुरू झाल्यावर दोनेक दिवसांनी पत्रकार त्यांच्याकडे परत गेले होते, परंतु त्यांना काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही... किंवा मिळाली ती 'नो कॉमेन्ट्स' एवढीच अन् तीही त्यांच्या स्वीय सहायकाकडून. दुसरी गोष्ट म्हणजे एक विशिष्ट लेख... जो एकाच व्यक्तीने लिहिला होता आणि अनेक प्रमुख वर्तमानपत्रांत पुढच्या शुक्रवारी प्रसिद्ध झाला होता. लेखकाचा मुख्य मुद्दा हा होता की पंडितजींना औषध घ्यावे लागत आहे, तेही खोकल्याचे... आवाजाशी जवळून संबंध असणारा हा विकार. त्यामुळे पंडितजींच्या संदर्भात याला खरेतर महत्त्व दिले गेले पाहिजे. पण याकडे आपण पुरेसे लक्ष दिलेले नाहीये, असा मुद्दा त्या लेखकाने उपस्थित केला होता. लेखकाने लेखाचा शेवट एका प्रश्नाने केला होता, 'तुम्ही कधी तुमच्या वडिलांना ग्लायकोडीन दिले आहे का ?'
अनेकजणांच्या मते या लेखापासून स्फूर्ती घेऊनच त्या वीकेंडला पत्रे यायला सुरुवात झाली, तर काहीजणांच्या मते ती पत्रे आधीच्याच वीकेंडापासून यायला लागली होती आणि हा लेख त्या पत्रांपासून स्फूर्ती घेऊन लिहिला होता. कोंबडी आधी की अंडे आधी प्रकारचा हा वाद चित्रपटाच्या उपकथानकासारखा मूळ वादाला जोडून चघळला गेला. पण सत्य हे की पत्रे यायला सुरुवात झाली.
एक पोस्टकार्ड ज्यावर तुमचं नावपत्ता काही नाही, फक्त एकच ओळ लिहिलेली 'तुम्ही कधी तुमच्या वडिलांना ग्लायकोडीन दिले आहे का ?'... बस्स ! एवढेच. मग ते आपल्यासाठीच आहे हे कसे कळले ? कारण ते पाहिल्या पाहिल्या मनात निर्माण होते ती एक भावना, नव्हे, खात्रीच की हे कार्ड आपल्यासाठीच आहे. हे कसे होते ? माहिती नाही आणि आता ते कधी कळेल असे वाटतही नाही. पण ही अगम्य खात्री निर्माण होते खरी. पत्रपेटीत डझनावारी कार्डे... दररोज... पोस्टाने तर येत नाहीत, मग कोण टाकतं ? माहिती नाही. पोस्टाने जेव्हा हात झटकले तेव्हा लोकांनी २४ तास पत्रपेट्यांवर लक्ष ठेवण्याचा प्रयोग केला, पण तरीही पेटी उघडल्यावर पत्रे हजर. जिथे ती कार्डे येतात कशी याचाच आगापिछा लागेना, तिथे ती कोण लिहीत आहे याच्या शोधातून तर काहीच, अगदी काहीच निष्पन्न झाले नाही.
या पत्रांचा आणि त्या लेखाचा संबंध लक्षात यायला वेळ लागला नाही. पण लेखकाचा शोध व्यर्थ ठरला. लेखक (की लेखिका ?) गायब झाला होता. हे प्रकरण रंगात येतंय ने येतंय तोच काही हुशार पत्रकारांनी आणखी एक शोध लावला, ते प्रकाशचित्र प्रसिद्ध झाल्याच्या वीकेंडापासून दुर्गा जसराज गायब होत्या. आता तर जणू त्या पत्रांच्या उगमस्थानावर शिक्कामोर्तब झाले.
"तुम्ही 'त्या' वीकेंडाला काय करत होतात?"
"त्या म्हणजे... ?"
"अहो, तोच हो, दुर्गा जसराजवाला."... 'दुर्गा जसराजच्या वीकेंड' प्रचलित व्हायला फार काळ लागलाच नाही. पण दुर्गा जसराज कधीच सापडल्या नाहीत, तो लेखकही नाही. त्यांचे व त्या पत्रांचा संबंध काय, मुळात तो आहे की नाही हे कधीच कोणाला कळले नाही.
आतापावेतो दुसरा अध्याय सुरू झाला होता. "हे 'त्यां'चे काम आहे" हा नेहमीचा यशस्वी आरोप प्रत्येकाने प्रत्येकावर केला, 'हे थांबव नाहीतर महागात जाईल' ही धमकी प्रत्येकाने प्रत्येकाला आणि प्रत्येक देशाने प्रत्येक देशाला दिली (हो, पत्रांना देशभाषा असे कुठलेच बंधन नव्हते). सरकारे पडली, नवीन सरकारे आली, तीही काहीच करू शकली नाहीत. पत्रे येत राहिली. विज्ञानाने आव्हान स्वीकारले, 'न भूतो न भविष्यति' असा भव्य आंतरराष्ट्रीय प्रकल्प तातडीने सुरू केला गेला. पत्रे येत राहिली. धर्म, श्रद्धा, अध्यात्म यांना साकडे घालून झाले, 'न भूतो न भविष्यति' असे भव्य सामूहिक, आंतरधर्मीय प्रयत्न केले गेले. पत्रे येत राहिली. देश, धर्म, जातपात, वर्ण, गरीब-श्रीमंत असे सर्व भेद विसरून काही काळ सर्व जग एकत्र झाले... सुमंगल, उदात्त, पवित्र विचारांनी वातावरण काही काळ भारून गेले... 'अशा चांगुलपणातून नक्कीच काहीतरी चांगले बाहेर येईल' अशा आशेने जग भारावून गेले. पत्रे येतच राहिली.
लोकांनी अर्थातच दुर्लक्षही केले, सुरुवातीला सवय म्हणून, सर्वात सोपा उपाय म्हणून... आणि शेवटी मग दुसरा उपायच राहिला नाही म्हणून. अगदी अटीतटीचे दुर्लक्ष. पण इतक्या सहजासहजी सुटणारा हा प्रश्न नव्हताच. दुर्लक्ष करायचे म्हटले तरी आता आपोआपच विचार होऊ लागला, 'तुम्ही कधी तुमच्या वडिलांना ग्लायकोडीन दिले आहे का ? या प्रश्नाचा खरा अर्थ तरी काय ? यातून काही सुचवायचे आहे का ? कोण पाठवतंय ? मानव की परग्रहवासी ? की ही सैतानाची करणी आहे का ? त्याहूनही वाईट, ही देवाचीच करणी असेल तर...' या आणि असल्या विचारांनी मनात ठाण मांडून बसायला सुरुवात केली. कुठल्याही मार्गांनी ती माहिती काढता येत नाहीये. कुठल्याच. त्यात तो प्रश्न. त्याचा अर्थ काय ? हा एकत्रित प्रहार कल्पनातीत होता... करोडो अश्रद्ध श्रद्धाळू झाले, करोडो श्रद्धाळू अश्रद्ध झाले... आणि इथे तिसरा अध्याय सुरू झाला... शेवटचा.
एका क्षणात आपल्या हतबलतेची तीव्र जाणीव होणे नवीन नाही. ती जाणीव सतत निरंतर टोचत रहाणे हेही नवीन नाही. एका क्षणात तुमची आख्खी विचारपद्धती बदलणे हे नवीन नाही. एका क्षणात तुमचे विश्वासस्थान, श्रद्धा बदलणे हेही नवीन नाही... पण हे जेव्हा संपूर्ण जगातल्या प्रत्येकाच्या बाबतीत एकाच वेळी झाले तर ? तेच झाले. एका क्षणात माणसाच्या आशेचा चुराडा झाला. माणसं आतून तुटली. 'सिस्टीम फेल गेली.' जिथे नांगर टाकायचा ती ठिकाणेच बदलली, बदलत राहिली... माणसाने भविष्याचा विचार सोडला. प्रजननदर कमी कमी होऊ लागला. तो आजही कमीच होतो आहे, जरी सरकार काहीही सांगत असले तरी. आमच्या जातीला आता जगण्यात रस राहिला नाही. काही महिन्यांपूर्वी टपालपेट्या काढण्यात आल्या. त्यानंतर टपालसेवा बंद करण्यात आली. पत्रे थांबली. पण तो आनंदाचा धक्का बसतोय न बसतोय तोच इमेल यायला सुरुवात झाली... यापुढे काय घडणार आहे हे स्पष्टच आहे. आम्ही आता सरकारमान्य अराजकात जगत आहोत. आजकाल मी नेटवरच असतो बहुतेक काळ... मला आलेल्या मेल्स सगळ्यांना फॉरवर्ड करत राहतो. जशी की ही मेल... 'तुम्ही कधी तुमच्या वडिलांना ग्लायकोडीन दिले आहे का ?'
.
.
थोडी पार्श्वभूमी : काही दिवसांपूर्वी पुपुवर मी 'वीकेंड आला. दुर्गा जसराज छान दिसतात' असे एक पोस्ट टाकले होते. वीकेंड खराच आला होता आणि दुर्गा जसराज आणि पंडितजींचे प्रकाशचित्र त्याच दिवशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते, निमित्त होते त्यांच्या ८०व्या वाढदिवसाचे. त्यावर श्रद्धाने 'वीकेंड आणि दुर्गा जसराज अशी एक नवकथा होऊ शकते' असे पोस्ट टाकले. त्याच्याच पुढे 'ग्लायकोडीन'चाही उल्लेख झाला (तो नक्की कशामुळे हे मात्र आता आठवत नाही). तेव्हा विचार सुरू झाला आणि ही कथा पाडली. 'पत्रे येणे' हे सूत्र मी एका कथेवरुन घेतले आहे, जी काही वर्षांपूर्वी एका मासिकात वाचली होती. ती मूळ कथा कोणाची हे मात्र आता आठवत नाही, पण मासिकात सुरुवातीलाच होती असे अंधुकसे आठवते. कोणाला ती मूळ कथा, तिचा लेखक हे आठवले तर कृपया कळवावे.
अमुक एक विषय आला आहे त्यावर आता काहीही करुन कथा लिहायचीच असा निश्चय करून सरसावून ही कथा लिहिली आहे अन् तेही उधार घेतलेल्या संकल्पनेचा वापर करून. असे करणे रोचक वाटले म्हणून केले एवढेच.
सूचना : ही एक काल्पनिक कथा आहे. यातील काही नावे आणि घटना यांचा उल्लेख हा पूर्णतः नैमित्तिक आहे. त्या उल्लेखातून लेखकाला या व्यक्तींबद्दल काहीही सुचवायचे नाही.

विषय: 
प्रकार: 

स्लार्ट्या, 'तुला भरपूर मोकळा वेळ आहे काय?' अशा नविन पत्रांचा पाऊस (पत्रांचा उन्हाळा किंवा हिवाळा का नसतो?) लवकरच पडेल. Happy

~~~~~~~~~~~~
हल्ली मांजरापेक्षाही माणसेच जास्ती आडवी जातात. Happy
~~~~~~~~~~~~

Happy

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

च्या मारी बिस्कीट...
ग्लायकोडीनच्या ऐवजी आलं घालून च्या प्यायला दिला पाहिजे.. घसा लवकर साफ होईल.. आणि मग पत्र लिहायला अजून उत्साह येईल...

केप्या... पत्रांचा शिशिर पडला तर चालेल का?
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

अर्र! मला वाटलं की राम सेनेला पाठवण्यात येणार्‍या unmentionables वरून सुचली की काय ही कथा !
त्यावर पण एक पाडून टाका कथा, हा का नी ना का ...

तरी बरं स्लार्टी कविता नाही करत ते! Proud खंडकाव्यच लिहिली असती ह्याने..

हे भारीच. मी वाचलं नव्हतं आधी. पण तुम्ही कधी तुमच्या वडिलांना ग्लायकोडीन दिले आहे का ? Happy