भूमिका

Submitted by यतिन-जाधव on 25 September, 2015 - 08:27

मोहित आज ऑफिसमधून नेहमीपेक्षा लवकर दुपारीच घरी आला, रोजच्याप्रमाणे आज त्याच्या चेहऱ्यावर कामाचा ताण-थकवा न जाणवता तो जरा प्रफुल्लीतच दिसत होता, त्याच उत्साहात आज त्याने दारावरची बेल सुद्धा नेहमीप्रमाणे न वाजवता अगदी विशिष्ठ प्रकारे वाजवली, आज घरी लवकर येत असल्याची कल्पनाही सकाळी निघतानाच त्याने अर्चनाला दिली होती त्यामुळे घरी अर्चनाकडूनही त्याचं तितक्याच उत्स्पुर्तपणे स्वागत होण्याची अपेक्षा तो मनाशी धरूनच ऑफिसमधून निघाला होता, खरंतर दूरची मावशी आजारी असून तिला पाहायला हॉस्पिटलला जात असल्याचा खोटाच बहाणा करून त्याने बॉसकडून मोठ्या मुश्किलीने लवकर घरी जाण्याची परवानगी मिळवली होती, पण दरवाजा उघडायला उशीर होत असल्याने मात्र त्याच्या जीवाची घालमेल चालली होती त्यामुळे त्याने आता बेल दाबूनच धरली होती, इतक्यात अर्चनाने दरवाजा उघडला, पण समोर अर्चनाचा अवतार पाहून त्याचा सगळा उत्साहच निघून गेला.

“ काय हे अर्चु, तू तयार नाही झालीस अजून ? ”
“ तयार, … कशासाठी ? ”
“ अगं असं काय करतेस, सकाळी आपलं ठरलं होत ना ? ”
“ काय तेss ? ”
“ आज मी लवकर घरी आल्यावर आपण बाहेर … सिनेमा … रात्री जेवुनच घरी यायचं ”
“ हो ठरलं होत रे पणss… जाऊदे हल्ली मला ना कशात उत्साहाच वाटत नाही ”
“ मग हे सकाळीच तस सांगायचं होत ना ? बॉसच्या विनवण्या करून कसंबसं कन्सेशन मिळवलं होतं मी ”
“ चिडू नकोस ना रे, मला तुला नाराज करायचं नव्हत, पण हल्ली ना मला बाहेर पडावसच वाटत नाही, दुपारी शेजारच्या काकू आल्या होत्या, त्या सांगत होत्या ”
“ जाऊ दे, मला त्या काकुंच काही सांगू नकोस ”
“ अरे पण ऐक ना त्या काय म्हणत होत्या, त्यांच्या जावेच्या शेजारी एक महाराज आलेयत, ते मुलं होण्यासाठी बरेच उपाय सुचवतात, ”
“ सोड ना मला तसल्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नाहीय, मला काही एक सांगू नकोस ”
“ अरे पण मी तुला सांगत नाहीय, विचारतेय की मी आज संध्याकाळी काकुंसोबत महाराजांकडे जाऊ का ? ”
“ अच्छा म्हणजे असा प्लान आधीच ठरलाय तर तुझा, तुला काय वाटेल ते कर ”
“ बरं मी आता थोड्याच वेळात निघतेय, वन्स राजला शाळेतून परस्पर ट्युशनला सोडून येणार आहेत त्या येतीलच इतक्यात, त्या आल्या की तुला चहा करून देतील, तू थोडं खावून घे, संध्याकाळी राजला आणायला जा, उशीर करू नकोस, येताना राजला चित्रकलेची वही घेऊन दे, संध्याकाळी त्याला बागेत खेळायला घेऊन जा … ”

अर्चनाची सूचनांची यादी संपतच नव्हती, मोहित अर्चनावर नाराज होवून आत आपल्या खोलीत निघून जातो आणि विचार करत बसतो, थोड्या वेळाने अर्चना पुन्हा तयार होवून निघताना मोहितला सांगायला येते, पुन्हा सूचना सुरु करते

“ मला यायला एखादवेळेस उशीर होवू शकतो, काकू आहेतच माझ्यासोबत, तरीही मी घराची किल्ली घेतलीय … ”

आता मात्र मोहितच्या संयमाचा बांध फुटतो, तो तिच्यावर जवळजवळ ओरडतोच,

“ बास झालं अर्चना आता, किती सूचना करशील, मी काय लहान मुल आहे एवढ्या सुचना करायला ?, जा तू निघ आता, उशीर होत असेल ना तुला ”

मोहितच्या बदललेल्या पवित्र्यामुळे अर्चना आता थोडी खजील होते आणि उगाचच लाडीगोडी करत जवळ येउन मोहितशी लगट करण्याचा प्रयत्न करते पण मोहित तिला दूर लोटतो.

“ चिडू नकोस ना मी आपल्या चांगल्यासाठीच जातेय ना, मग मला असा नाराज होवून निरोप नको ना देऊस, चल हस बघू आधी ”

मोहितदेखील आता सगळं विसरून तिला हसून निरोप देतो आणि पेपर वाचत पडतो, त्यात कधी डोळा लागला हे त्याचं त्यालाही कळत नाही.
झोपेतच कसल्याशा आवाजाने मोहितला आता हलकीशी जाग येते, तो डोळे किलकिले करून पाहतो तर सानवी दरवाजातून आत रुममध्ये येत असते, मोहित पुन्हा आपले डोळे पटकन मिटून घेतो, सानवीच्या ते लक्षात येतं, पण ती आपण काहीच पाहिलं नसल्यासारखं करून मोहितच्या बाजूला येउन बसते आणि वाकून त्याच्या कपाळाचा मुका घेते, मोहित आता खाडकन उठून बसतो आणि सानवीला सुनावतो,

“ हे काय चालवलंयस तू सानवी ? … अगं ”
“ काही नाई, घरात कोणीचं नाहीय माहितीय मला ”
“ म्हणून काय झालं ?... हे असं अचानक ”
“ अरे अचानकचं कधीतरी आपल्याला असा एकांत मिळतो ना?”
सानवी पुन्हा मोहितला मिठी मारण्याचा प्रयत्न करते, पण तो मात्र तिला दूर लोटतो.
“ भानावर ये सानवी, काय करतेयस ? ”
“ अरे मला माहितीय अर्चना आज काकूंबरोबर बाहेर जाणार आहे आणि तिला यायला रात्री उशीर होणार आहे ”
“ म्हणून काय झालं ? … हे असलं करण्याची ही वेळ आणि जागाही नाहीय, चुकून जरी कोणाला ”
“ होss तुला काय रे रोज रात्री हक्काचं सुख मिळतं ना, मी मात्र आज पर्यंत कित्येक रात्री कशा तळमळून काढल्यायत ते माझं मलाच माहित, तुला काय त्याचं ? ”
“ ते समजतो मी सगळं,पण तुला जे वाटतंय तसं आमच्यात खरंच काही घडत नाहीय”
“ खरतर आज आपण हक्काचे पती-पत्नी असलो असतो, पण एकमेकांच्या इतके जवळ असून देखील एकाच घरात राहूनसुद्धा अगदी परक्या सारख वावरणं नशिबी आलय आपल्या दोघांच्याही”
“ हो सगळं मान्य आहे मला ”
“ मान्य आहे ना मग चल आता लवकर, का ही आलेली संधी अशी वाया घालवतोयस? ”

सानवी मोहितला घट्ट मिठी मारते, तोही आता मिठी सोडवण्याचा फारसा प्रयत्न करत नाही, तरीही तो तिला समजावतो

“ पण मी काय म्हणतो, हे सगळं आत्ताच असं घाईघाईत उरकण्यापेक्षा आपण दोन-तीन दिवस बाहेर जाऊया ना”
“ पण आता ते कसं शक्य आहे आणि अर्चनाला काय सांगणार ? ”
“ मी ऑफिसच्या मिटींगच्या नावाने बाहेरगावी जायचा बहाणा बनवतो ”
“ पण माझं काय ? मी काय सांगून निघणार ? ”
“ तुला गावी तुझ्या मावशीला भेटायला दोन दिवस जायचय असा प्लान करू ”
“ आणि राज … त्याचं काय ? त्याची शाळा, त्याच सगळं ”
“ राजचं सगळं अर्चना आनंदाने करेल आणि तिला याचा जरा सुद्धा संशय येणार नाही ”
“ ते सगळं ठीक आहे रे पण तू आता अचानक आलेली ही अशी सोन्यासारखी संधी नको न वाया घालवुस ”

सानवी अगदीच हट्टाला पेटलीय म्हणताना मोहितचाही नाईलाज होतो आणि तोही तिला साथ देतो, दोघेही अगदी मनापासून एकरूप होतात, इतक्यात अर्चना स्वतःकडच्या चावीने दरवाजा उघडून आत येते आणि मोहित व सानवीला अगदी नको त्या अवस्थेत पाहते, मोठ्याने किंचाळते व तिथेच चक्कर येउन बेशुद्ध होते आणि खाली कोसळते.

आता मात्र मोहित सानवी दोघेही घाबरतात, पटकन स्वतःला सावरतात आणि अर्चनाला उचलून वर बेडवर झोपवतात, मोहित आता डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न करतो, सानवी त्याला फोन करण्यापासून रोखते आणि आपल्याला सानवीने ज्या अवस्थेत पाहिलंय त्यावरून आपली किती बदनामी होऊ शकते याची भीती त्याला दाखवते, त्यालाही ते पटतं, ते थोडावेळ तिची शुद्धीवर येण्याची वाट पहातात आणि अर्चनाच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची याबद्दल विचार करू लागतात. ............................................................क्रमश

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपूर्ण जाऊ दे. पण कोण कोणाची बायको आहे? अर्चना कोण आहे? सानवी कोण आहे? सानवी जर मोहीतची हक्का ची बायको आहे तर खरी बायको अर्चना कशी? मोहीत एवढी सफाई सानवीला का देतोय? ( लय प्रश्न आहेत, पण कथा वेगळीच जाणवली)