कथासाखळी - वरदान

Submitted by संयोजक on 22 September, 2015 - 01:53

कथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.

===========================================================================

तुम आ गए हो नूर आ गया है
नहीं तो चिरागों से लौ जा रही थी
..
घराच्या बेलच्या सहा-सात ट्यून्स्‌पैकी नेमकी हीच ट्यून चंद्रकांताच्याच एंट्रीला कशी काय वाजते, याचं दीपाला नेहमी नवल वाटायचं. चंद्रकांता आली, टकटक आवाज करणार्‍या चपला कोपर्‍यात काढताकाढताच सरकवल्या. खांद्यावरची पर्स तिथेच भिंतीला लावून ठेवली. ओढणी काढून त्यावर पांघरली. चटचटा आत शिरत म्हणाली,
"आजच्या भाजीचं नाव काय ताई?"
दीपा म्हणाली, "ओट्यावर काढून ठेवलीये. आज तीन पोळ्या कमी कर."
"का? बाहेर जाणारेत वाटतं संध्याकाळी? मग भाजी पन कमी लागंन ना?"
"नाही, भाजी नेहमीसारखीच कर. आज बंटीच्या बाबांना दुपारी गरम फुलके करून देईन म्हणते."
"वा! जरा कंदीमंदी घरच्या लक्ष्मीचा हात लागला ओट्याला तं अन्नपूर्णा प्रसन्न होत आसंन", कणीक मळता मळता तोंडभरून हसत चंद्रकांताने कमेंट पास केली. दीपा कसंनुसं हसत बंटीला उठवायला गेली.

बंटी शाळेत आणि बंटीचे बाबा आवरून अॉफिसला निघाले. चंद्रकांताचा स्वयंपाक आटपला होता. केसांना फायनल टचप करून ओढणी सारखी करत तीही निघाली. दीपा जणू त्या सगळ्यांनाच 'बाय' करायला दारात आली होती. सगळे गेल्यावर दार लावून घेतलं. जरा सोफ्यावर बसून अंग टाकणार तोच तिला एका घमघमत्या सुगंधानं वेढून टाकलं. नेहमीच्या पर्फ्यूमचा, टाल्कम पावडरचा, आफ्टरशेव्ह लोशनचा किंवा साबणाचाही सुवास नव्हता तो. स्वयंपाकघरात गोडाधोडाचा स्वयंपाक करताना जसा एक स्वादिष्ट, रुचकर दरवळ घरभरून राहतो तसा सुगंध होता तो. शेकडो धूप एकदम लावल्यावर जसं स्वर्गीय वातावरण निर्माण होईल तसं दीपाचं घर ढगासारखं हलकं, पांढरंशुभ्र दिसायला लागलं. भिंतींचे रंग, त्यावरच्या फ्रेम्स्, नेहमीच्या ओळखीच्या वस्तूंवर कुणीतरी जाडसर कापसाची दुलई टाकली आहे, असं वाटत होतं. हे सगळं स्वप्न आहे की सत्य, असा विचार करत असतानाच दीपाला स्वयंपाकघरात प्रखर प्रकाश भरून राहिला अाहे, असं दिसलं. तसा उजेड तर तिने दुपारी बाराच्या उन्हातही पाहिला नव्हता. आश्चर्यानं संमोहित झाल्यासारखी ती स्वयंपाकघराच्या दिशेनं ओढली गेली.

स्वयंपाकघराच्या दारात दीपाचे पाय जागीच थिजले. समोरचं दृश्य पाहून तिला भोवळच आली. हे असं न भूतो न भविष्यति आपल्याच बाबतीत, आपल्याच घरात का, हा पहिला विचार सवयीनं तिच्या मनात शिरला. तिच्यासमोर त्या प्रकाशात एक अत्यंत तेजस्वी अशी स्त्री उभी होती. सोन्याच्या वर्खाचा लाल शालू नेसून, दागिने लेऊन ती प्रसन्नवदना स्त्री एखादी देवीच दिसत होती. तिच्या केसांत रत्नांची फुलं होती. हातांत माणकांच्या बांगड्या. गळ्यातल्या हिरेमोत्यांच्या सरींचाच तो पांढरा शुभ्र प्रकाश होता. तिची कांती दुधासारखी गोरीपान आणि सायीसारखी मऊसूत होती.त्यावर कपाळावर केशराच्या काडीने रेखलेली चंद्रकोर आणि मुखावर तृप्तीची झळाळी! ते दैवी रूप पाहून दीपाने नकळत हात जोडले. तशी ती देवी हसून उत्तरली ,
"ये बाळ! अशी स्तिमित होऊ नकोस. मी देवी अन्नपूर्णा. तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. "
दीपाने देवीच्या चरणकमलांवर मस्तक ठेवलं. देवीनं तिला उठवून आपल्या वत्सल स्पर्शानं गोंजारलं.
"मी तुला तीन वर देऊ शकते. पण एका वेळी एकच. " आपल्या केसांतलं एक रत्नजडीत फूल तिला देत देवी पुढे म्हणाली, " हे फूल ओंजळीत घेऊन डोळे मिटून माझी प्रार्थना केलीस की, मी वर देण्यास प्रकट होईन. मात्र माझं हे रूप फक्त तुलाच दिसेल बरं! वरदानांची अट एवढीच की दुसरा वर मागितलास की पहिल्याचा प्रभाव संपुष्टात येईल. तेव्हा नीट विचार करून वर माग. तथास्तु!"
इतकं बोलून देवी अंतर्धान पावली. तो लख्ख उजेडही हळूहळू कमी झाला. घरावरची कापसाची दुलईही अदृश्य होत गेली. घर पूर्वीसारखे दिसू लागले. पण तो विलक्षण दैवी सुगंध मात्र दीपाच्या विचारचक्रासारखा रेंगाळत राहिला.

=========================================================================

नियमावली:

१) कथेचा शेवट अतिरंजीत चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे गोष्ट. सिंडरेलाची सुरवात आवडली, पण त्यापुढे सगळेच अवांतर झालेय.

(मग तुच लिही की सुसंगत म्हणुन मला टोकु नका, मला फक्त वाचता येते, लिहिता येत नाही Happy )

कृपया इथे अवांतर लिहू नका. मैत्रेयीच्या "कोण असेल!" ने संपलेल्या पोस्टपासून पुढे सुरू करा बरं! Happy

Pages