पुढच्यास ठेच

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 20 September, 2015 - 07:21

मोजक्या शब्दामध्ये मोठा आशय व्यक्त करणाऱ्या म्हणी आणि वाक्प्रचार यांचा मोठा खजिना मराठी भाषेत आहे. त्यातील "पुढच्यास ठेच, मागचा शहाणा" ही म्हण तर ग्राहकांनी ब्रीद वाक्य म्हणून लक्षात ठेवण्यासारखी आहे. वस्तू आणि सेवा खरेदी करताना बाजारपेठेत ग्राहकाला फसवणूक, अडवणूक, नाडणूक अशा स्वरूपाच्या ठेचा पदोपदी लागण्याचा धोका असतो. असे ठेचा लागलेले ग्राहक मुं. ग्रा. पं. सारख्या संघटनांकडे मार्गदर्शनासाठी येतात. अशा ग्राहकांच्या अनुभवावरून शहाणे होऊन आपल्याला ठेच लागण्याचा धोका टाळता येतो. या दृष्टीने आपण 'ठेच लागलेल्या' काही ग्राहकांचे अनुभव पाहणार आहोत.

मुंबईतील एक गृहिणी काही कारणाने पुण्याला गेली असता ग्यासच्या जुन्या शेगडीच्या बदल्यात (काही रक्कम भरून ) नव्या मॉडेलची शेगडी मिळण्याची योजना तिला समजली. तिला ती शेगडी आवडली. परंतु जुनी शेगडी मुंबईला असल्यामुळे ती लगेचच परत करणे शक्य नव्हते. तरीही जुनी शेगडी नंतर परत करण्याची सवलत दुकानदाराने देऊ केल्याने आवश्यक ती रक्कम भरून तिने शेगडी खरेदी केली. मात्र शेगडी वापरण्यास सुरुवात करताच बटणातून जाळ येऊ लागल्यामुळे तिने ती शेगडी वापरणे बंद केले. आणि तसे दुकानदारास कळवले. त्याने शेगडी आणून दाखवण्यास सांगितले. मुंबईतील कंपनीच्या दुरुस्तीकेंद्राचा पत्ता तो देईना. शेवटी मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्याच्या सूचनेनुसार तिने भारतीय मानक संस्थेच्या (ब्युरो ऑफ इंडियन स्टन्डर्डस) मुंबई येथील कार्यालयाकडे तक्रार केली. कारण शेगडीवर ISI चिन्ह होते. विशेष म्हणजे मानक संस्थेच्या अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेच्या घरी जाऊन शेगडीची तपासणी केली व ती सदोष असल्याचा अहवाल दिला. परंतु उत्पादक कंपनी दिल्लीची असल्याने दिल्ली कार्यालयाकडे प्रकरण सोपवले. या कार्यालयाकडे बराच पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी कारवाई केली व त्यांच्या आदेश नुसार कंपनीकडून जवळजवळ एक वर्षाच्या सव्यापसव्यानंतर तक्रारदार महिलेस नवीन निर्दोष शेगडी मिळाली. या काळात तिला भरपूर त्रास व मनस्ताप झाला असणार.

मुळात ही तक्रार का उद्भवली याचा विचार केला असता तिने खरेदी करण्यापूर्वी आवश्यक सावधगिरी बाळगली नव्हती हे लक्षात येते. एकतर नव्या शेगडीची लेखी हमी तिला मिळालेली नव्हती. अर्थात शेगडी सदोष निघाली तर मुंबईत ती दुरुस्त करून बदलून मिळेल किंवा नाही हा मुद्दाच तिच्या लक्षात आला नव्हता. इतकेच नव्हे तर जुनी शेगडी सवडीने परत करण्याची सवलत दुकानदार आपल्यासारख्या अनोळखी ग्राहकाला का देत आहेत असा प्रश्नही तिला पडला नव्हता. मात्र नंतर तिने मुंबईच्या बाजारात चौकशी केली असता त्याच शेगडीची किंमत तिने दिलेल्या किंमती पेक्षा कमी होती हे तिला समजले. शिवाय त्यात जुनी शेगडी परत करण्याची अटही नव्हती हे महत्वाचे.

अशा तऱ्हेच्या अवजड वस्तूची परगावी खरेदी करणे ही तिची दुसरी चूक होती. वस्तू नेण्याआणण्याची गैरसोय त्यात आहेच शिवाय तक्रार उद्भवल्यानंतर तिचा पाठपुरावा करण्यातही अडचणी येतात. मुख्यत: वस्तू सदोष आहे हे विक्रेत्याला पटवून देण्यासाठी वस्तू प्रत्यक्ष नेउन दाखवणे गैरसोयीचे होते. प्रस्तुत तक्रारीबाबत तर उत्पादक दिल्लीचा, वितरक पुण्याचा, व ग्राहक मुंबईचा अशा त्रिस्थळी यात्रे मुळे तक्रार निवारण करणे अवघड गेले. काही विजेच्या उपकरणांच्या बाबतीत तर हमी काळात (warranty period ) वस्तूची दुरुस्ती इ. हमीचे फायदे, वस्तू जेथून खरेदी केली त्या नगरपालिकेच्या हद्दीतच मिळतील अशी अट असते. या दृष्टीने स्थानिक वितरकाकडून खरेदी करणे सोयीचे असते.

मुंबई ग्राहक पंचायती कडे आलेल्या अन्य २/३ तक्रारी तर अशा होत्या की तक्रारदार ग्राहकानी पर्यटनासाठी राजस्थान कोलकाता अशा दूरच्या ठिकाणी , तेथे स्वस्त मिळतात म्हणून रजया, शाली, साड्या अशा वस्तूंची हजारो रुपयांची खरेदी केली होती. विक्रेत्यांनी माल नंतर पार्सल ने पाठवावयाचा होता. त्यापैकी एका ग्राहकाला मालच मिळाला नाही. तर दुसऱ्याला मिळालेला माल दाखविलेल्या नमुन्यापेक्षा निराळा होता. या तक्रारींचा पाठपुरावा करण्यात फारच अडचणी होत्या. हे सर्व टाळता आले नसते का? अनोळखी ठिकाणी केलेली स्वस्तातील खरेदी शेवटी फारच महागात पडू शकते, हा धोका लक्षात घेऊन अशी खरेदी करणे टाळले पाहिजे.

वरील सर्व तक्रारींमधील ग्राहकांना लागली तशी ठेच लागू नये म्हणून शक्यतो स्थानिक वितरक/विक्रेत्याकडून खरेदी करावी ही खूणगाठ वाचकांनी मनाशी बांधायला हरकत नाही.

(पूर्व प्रसिद्धी http://punemgp.blogspot.in )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम लेख.

अत्यंत उपयोगी लेख लिहित आहात. या सर्व माहितीबद्दल धन्यवाद.

अ‍ॅडमीन, या सर्व लेखांची लेखमाला करता येईल का?

अत्यंत उपयुक्त माहीती.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

अ‍ॅडमीन, या सर्व लेखांची लेखमाला करता येईल का?
<<
+१