मनातले काही - ३

Submitted by बेफ़िकीर on 17 September, 2015 - 23:55

मित्रा,

काल तुझ्या सोळा वर्षाच्या मुलाला तुझ्या घराबाहेरच दोन समवयस्क सुंदर मुलींची आरामात बोलताना पाहिले आणि मला आठवली माझी आई!

मी असा दोन मुलींशी घराबाहेर बोलत आहे हे समजले असते तर तिने घाईघाईत त्या मुलींना घरात बोलावले असते. त्यांना बसवून, नांवे विचारून , कुटुंबीय, राहण्याची जागा अशी सगळी चौकशी करून काहीतरी खायला करायला घेतले असते.

त्या नाही नाही म्हणत असतानाही त्यांना पोहे, उपमा, शिरा असले काहीतरी खायला लावले असते. वर चहा दिला असता. आमच्या गप्पांमध्ये जोरदार व्यत्यय आणून स्वतः बनवलेले वॉलपीसेस, लोकरीच्या गोष्टी दाखवल्या असत्या. पेटी वाजवून दाखवली असती. प्रत्येकीच्या घरी द्यायला एकेक वॉल पीस दिला असता. आईला घेऊन ये म्हणाली असती. आणि त्या निघून गेल्यावर मला म्हणाली असती 'चला, भरपूर वेळ गेला आज, बसा अभ्यासाला आता'!

निघून गेलेल्या मैत्रिणींच्या मनावर 'ह्याची आई कित्ती छान आहे' हे इंप्रेशन कायमचे ठसले असते.

मला त्या मैत्रिणींबरोबर काहीही बोलता आले नसते. त्यांच्या जागी मित्र असते तर आईने असेच मित्रांनाही घरात बसवून खुष करायचे वरचेच प्रकार केले असते फक्त त्यात वॉलपीसेस, पेटी, लोकरीच्या गोष्टी हे नसते आले.

निघून गेलेल्या मित्रांच्या मनावर 'ह्याची आई कसली भारी आहे' हेच इंप्रेशन राहिले असते.

माझ्यातही काही, कदाचित तिनेच केलेल्या संस्कारांमुळेही का असेनात, नगण्य का असेनात, पण एक स्वतंत्र चांगुलपणा असू शकेल हे कधी दाखवून द्यायची संधीच यायची नाही.

इतक्या प्रचंड पझेसिव्हनेसच्या पार्श्वभूमीतून आलेला मी, आज जेव्हा तुझ्या मुलासारख्या मुलांना पाहतो तेव्हा असे वाटते की तुझ्यासारखे पालक तेव्हा आपल्याला मिळाले असते तर आपल्या सगळ्या पिढीतच फरक पडला असता नाही? लिंगभेदाची अदृश्य पण 'ये दीवार टुटती क्यों नही' वाली भिंत उभी राहिली नसती.

आज पन्नाशीला पोचलेले मित्र व्हॉट्स अ‍ॅपवरून उत्तान मदनिकांची छायाचित्रे एकमेकांना पाठवण्यात आणि पाहण्यात कदाचित रस दाखवतही नसते. कदाचित अनेक संसारांमध्ये समानतेची बीजे बावीस वर्शांपूर्वीच पेरली गेली असती.

कदाचित!

हे सगळे जरतरचे झाले. पण निदान त्याला आणि त्याच्या पिढीला जे हवे ते करूदेत. त्यांच्यावर थोडासा विश्वास आहे इतके त्यांना कळले की मुले आपसूक स्वतःहून जबाबदारीने आणि चांगली वागतील असे वाटते.

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी..१७ सप्टेंबर चे हे मनातले..इतके मागे कसे पडले?????? नको होतं मागच्या पानांवर जायला हे..

इट्स जस्ट सो अमेझिंग!!!!!!! ग्रेट !!! आय ओपनर आहे!!

बेफी..१७ सप्टेंबर चे हे मनातले..इतके मागे कसे पडले?????? नको होतं मागच्या पानांवर जायला हे..

इट्स जस्ट सो अमेझिंग!!!!!!! ग्रेट !!! आय ओपनर आहे!! +१