हैद्राबाद मुक्तीसंग्राम

Submitted by palas on 17 September, 2015 - 04:03

हे लेखन कै. नरहर कुरुंदकर, श्री. नरेन्द्र चपळगांवकर आणि श्री. राजीव भोसीकर ह्यांच्या लिखाणावर आधारीत आहे............... मराठवाडा मुक्ती संग्रामची ओळख मायबोलीकरांना होण्यासाठी हा प्रपंच.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला .
या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही.
निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.
हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन १७ सप्टेंबर रोजी तब्बल ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. ६७ वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता. या संग्रामाच्या उज्ज्वल आणि लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्मू घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास ११ महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली. निजामाचा धूर्त डाव होता की, १५ ऑगस्ट १९४७पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषित करायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे ‘हैदराबाद’ होते. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. घाबरलेला निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला. निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. या लष्करी कारवाईला ‘पोलीस ऍक्शन’ असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली. तत्कालीन हैदराबाद संस्थानामध्ये वर्षानुवर्षे मराठवाड्यात राहणारा तेलंगण प्रांत आता आंध्र प्रदेशपासून स्वतंत्र आहे. मराठवाडा, विदर्भ किंवा तेलंगणसारखे स्वतंत्र राज्य कधीच मागणार नाही. मात्र आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्‍चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ?

१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला....६७ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.........!

हैद्राबाद आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आजच्याच दिवशी, ६७ वर्षांपुर्वी, जनरल चाैधरींनी संस्थानाचा ताबा घेतला. आॅपरेशन पोलो यशस्वी झाले. आपण स्वतंत्र झालो, भारतात एकरूप झालो व भारत परीपुर्ण झाला.

ह्या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनीकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभेच्छा!

ओघवते लिहिलेत आवडले

विदर्भातला मी पण आमचे आजोबा सुद्धा ह्या संग्रामात सहभागी होते अन औरंगाबाद जेल ला होते काही महीने

फ़क्त
मराठवाडा, विदर्भ किंवा तेलंगणसारखे स्वतंत्र राज्य कधीच मागणार नाही.

ह्या वाक्याचा कार्यकारणभाव कळला नाही अजिबात, वेगळ्या राज्याची मागणी हा गुन्हा नाही न? वाक्यात ह्या चळवळी काहीतरी आगाऊपणा असल्यासारखे वाटले फ़क्त (ते तसे नसेलही) जे जाणवले ते उघडपणे अन प्रमाणिकपणे मांडले आहे इतकेच लेखन उच्च आहेच ह्याचा पुनरुच्चार करतो

_/\_

palas , ही पोस्ट तुम्ही स्वतः लिहिली आहे का? मला काही वाक्यांचा फक्त बदल असलेली सेम पोस्ट व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर फॉर्वर्ड आली. ती पोस्ट बरीच जुनी असल्याने त्यात फक्त ६७ ऐवजी ६४ वर्ष लिहिले होते. अशीच एक पोस्ट फेसबुकवर पण एका ग्रूपात बघितली. जर ही पोस्ट तुम्ही लिहिली असेल तर मी दोन्ही ठिकाणी तुमचा उल्लेख करू शकेन.

अल्पना,

नाही. हे लिखाण सर्वस्वी माझे नाही. काही बदल आणि काही additions मी केले आहेत. पण पुर्ण पोस्ट माझी नाही. लेखकाचा उगम मला सापडला नाही. ह्या विचाराचे गोत्र मात्र कुरुंदकरांच्या भुमीकेतुन उगम पावले आहे. हिच भुमीका पुढे चपळगांवकर आणि भोसिकरांनी विस्तृत केली. म्हणुनच मी मुळ लेखकांच्या नावाचा उल्लेख सुरवातीला केला आहे. ह्यातला एक उतारा कुरुंदकरांच्या 'हैद्राबादचा स्वातंत्रलढा' ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत श्री दं. पा. जोशी ह्यांनी चर्चीला आहे.

ह्या विषयाची मायबोलीकरांना ओळख व्हावी ह्या हेतुनी हा लेख दिला आहे.

चांगला लेख!
आता या भागातच रहाते पण कर्नाटकात.
आमचे सहा जिल्हे हैद्राबादला जोडून आहेत.
एच के रिजन किंवा गुलबर्गा डिव्हीजन म्हणतात.
पाण्याचे दुर्भिक्ष असलेला हा भारतातला दोन क्रमांकाचा भाग.
इथेही आर्टीकल ३७१ आहे हा भाग सुधारावा म्हणून पण अजून म्हणावं तसं इम्प्लिमेंटेशन नाही.

निजामशाहीच्या खाणाखुणा तर इतस्ततः इतक्या आहेत की लोकांना घराचे पाये खणताना मोहरांचे हंडे मिळतात.
Wink

त्यामुळे बर्‍याच जागांवर खोदकाम करायला/घरे बांधायला बंदी आहे.

आज इकडे सकाळी ध्वजवंदन आणि संध्याकाळी सगळ्या सरकारी ईमारतींवर सरकारी रोषणाई, सकाळी शोभायात्रा असा माहौल असतो.

छान लिहले आहे. संकलित असले तरी अनेकांना ह्या मुक्तीसंग्राम चळवळीची थोडक्यात माहिती मिळेल असे आहे. धन्यवाद.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवसाच्या शुभेच्छा!!

हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाचा आज अमृत महोत्सव. ह्या लढ्याला आज ७५ वर्ष पूर्ण होत आहे. हैद्राबाद संस्थान निझाम राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अनेकांनी कडवी झुंज देत प्राणांची आहुती दिली. त्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली.

आमची बँक स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ही निझामाची बँक .
१५ ऑगस्ट १९४८ ला संघटनेनी बँकेत ध्वजारोहण करायचे असे ठरवले, पण परवानगी नाकारण्यात आली. संघटनेचा उद्देश लक्षात घेऊन बँकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी बी. राजय्या आदल्या दिवशी रात्रीपासुन एका झाडावर लपुन बसला व त्याने सकाळी सुर्योदयाला ध्वज फडकावला.
त्याची व तत्कालीन संघटनेची नेतेमंडळी ह्यांची निष्ठा व देशप्रेम याची आठवण आम्हाला आजही करुन दिली जाते.
आजच्या दिवशी त्या लोकांच स्मरण करणे फार आवश्यक आहे.
(माबो वरील माझीच जुनी पोस्ट )

छान आठवण. पण रात्रभर झाडावर झोपण्याऐवजी, घरी झोपून मग सूर्योदयापूर्वी झाडावर का चढला नाही? असा विचार डोक्यात आला.