नशेची धुंदी

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 16 September, 2015 - 07:39

लाइफ़ लाइन मधील देशाचे भवितव्य.

मुंबईची लाइफ़ लाइन रेल्वे. खर तर मुंबईची शोभाच हि रेल्वे. रेल्वे चा प्रवास नाही अनुभवला तर कसली मुंबई पाहिली? अशा या ट्रेनच्या प्रवासाच मला खूप कौतुक, तरी ट्रेनच्या प्रशासनाच कौतुक करण थोड अवघडच जात. अशी हि ट्रेन आणि तिच्याशी जोडली गेलेली ७५% हून अधिक मुंबईकरांची नाळ. खूप अनुभव आले या प्रवासातून. दररोज एक नित्य नवीन अनुभव आणि असे हे अनुभव प्रत्येक लोकल प्रवाशाच्या गाठीला असलेले. प्रत्येक दिवसाचा एक आणि त्यातून शिकलेला नवीन अनुभव अस बरंच काही दिलय या प्रवासाने. हैराणहि खूप झालोय. कधी रुळावरून घसरलेले डबे तर कधी तुटलेली तार, पावसाचा प्रलयपूर्वक मारा तर कधी अतिरेक्यांच्या बॉम्बचा हल्ला अन सगळच सुरळीत असताना, एखाद्याने ट्रेन खाली येउन स्वतःचा घेतलेला जीव... हि ट्रेन उशिरा पोहोचवायला कारणे काही कमी नाहीत पण ती आम्हाला आमच्या इच्छित ठिकाणी पोहोचवते एवढ मात्र नक्की. कधी निश्चित वेळेवर तर कधी अनिश्चित वेळेवर.

काल तर लेडीज स्पेशल ट्रेन मध्ये दरवाज्याच्या खांबाला लटकून जीव मुठीत घेऊन आणि गणरायाची प्रार्थना करत प्रवास पार पडला. लेडीज स्पेशल मध्ये माझी आणि माझ्यासारख्याच इतर जणींची हि दयनीय अवस्था झाली असताना त्यांनतर येणाऱ्या ट्रेन मध्ये पुरुष यात्री कसे चढतील ? हा विचार मनात येताच अंगावरून सरकन काटाही उभा राहिला. खरय ...अगदी जीवावर उदार होऊन आम्ही मुंबईकर हा प्रवास करतो. सकाळी घरातून निघतो पण संध्याकाळी खरच परत धडधाकट परतू का? याच उत्तर आमच्याजवळ नसत. "किती धावपळ करतेस? त्यापेक्षा लवकर उठून आवरायचं ना " या सल्ल्यावर आमच्या घड्याळाचा अलार्म हा देखील लोकल ट्रेनच्या वेळेनुसार ठरलेला असतो हे कस बर पटवून द्यायचं? मग फक्त हसण्यावारी त्याचा प्रस्ताव उडवून देण्यात आम्ही धन्यता मानतो, कारण दुसरा पर्याय नसतो किंवा असला तरी तो पचनी पडणारा नसतो.

त्यादिवशी आलेला हा अनुभवही ट्रेन मधल्या प्रवासाचाच. संध्याकाळी ऑफिसमधून निघालेले अगदी धावत पळत प्ल्याट्फोर्म वर जाताना एका जोडप्याला धक्का मारला खरतर जाणूनबुजूनच. कारण प्ल्याट्फोर्म ला समुद्रकिनारा समजून अगदी वाळूत पाय घासडत चालल्याप्रमाणे, आजूबाजूंच्या लोकांची तमा न बाळगता ते आपल्याच विश्वातून चालत होते. त्यांना खर्या विश्वात आणण्याचं सामाजिक कार्य केल मी अन माझ्या जागी येउन उभी राहिले. घामाच्या धारा वाहत असतानाच " Railway platform वर पंखे कशाला असतात हे देवाला आणि प्रशासनाला तरी ठाऊक आहे की नाही त्यांच त्यांनाच माहीत. हे पंखे फक्त शोभा वाढवतात. कधी कधी फक्त स्वतः भोवती फिरत खोटी आश्वासन देतात. खोटेपणा वाढलाय या निर्जीव जीवांचा सुद्धा " असा काही बाही विचार करत होते. ट्रेन आली आणि चढले. शनिवार होता आणि त्यात बर्याच जणांना "रमजान ईद" ची सुट्टी होती. ट्रेन बर्यापैकी रिकामी होती. कधीतरी मिळणारी window Seat पकडली आणि पुस्तक काढून वाचायला घेतलं. ट्रेन सुरु झाली आणि हवेच्या झोताबरोबर कसला तरी वास नाकात जाऊन अगदी घुसमट व्हायला लागली. धडधड वाढली आणि मी खोकायला सुरुवात केली. हा प्रवास रोजचा असल्याने वास बाहेरून येत नाही हे लक्षात आल. तो वास धुम्रपान या प्रकारातला देखील नव्हता. माझी अवस्था बघून ट्रेन मध्ये बांगड्या विकणारी बाई जवळ आली आणि म्हणाली, "ताई उठ जा इधर से. वोह दो बच्चे उस डोअर पे अफू या गांजा पी रहे है | इस साइड आके बैठ जा |" मी त्या अवस्थेतही तिच्याकडे बघत राहिले... बच्चे पण बोलतेय आणि अफू-गांजा पण म्हणतेय ... नक्की काय सांगायचं आहे हे समजाव म्हणून मी उठून उभी राहिले. पुढच्या दाराजवळ गेले आणि तिथेच थबकले. एक आठ-दहा वर्षांचा मुलगा अन त्याच्या सोबत एक १५-१६ वर्षांचा मुलगा असे ते दोघ नशेत चूर असलेले दिसले. ज्या ट्रेन मध्ये धुम्रपानाला सक्त मनाई आहे तिथे हे आरामात फुंकत बसले होते. काही बोलायला जाणार तर त्या मुलांनी माझ्याकडे जी नजर फिरवली त्या नजरेने क्षणभर मीच दचकले. इतर जणींना त्याचं काय पडल नव्हत ... ती बांगड्या विकणारी बाईचं म्हणाली, "पोलिस कि धमकी दो गे तोभी मतलब नहीं... दो दंन्डे खायेंगे और वापस यही करेंगे. खानेकी प्यास मिटने के लिये ये सस्ता इलाज काफी है नशे का .... " तिच्या या ज्ञानाने तर पुढे काही बोलवतच नव्हत. हे होणार का उद्याच्या देशाचे भवितव्य.? नवीन पिढी... ? पुढे शेवटच स्टेशन येण्याआधी गाडी मध्ये थांबली अन हे दोघे मध्येच उडी मारत समोरच्या ट्रेनला चुकवत कुठल्याशा झोपडीत शिरले सुद्धा. आज त्यांच्या पोटात भूक नव्हती. डोळ्यातील निरागसतेच्या जागी नशा होती... आणि मी स्टेशनला उतरून पुढे माझ्या मुक्कामाकडे चालू देखील लागले होते... डोक्यात त्यांच्या नशेची धुंदी चढवून.....

मयुरी चवाथे-शिंदे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोलिसही काणाडोळाच करतात. त्यांच्या वाटेला न जाणे हे उत्तम, नशेच्या मूळे त्यांच्या अंगात बळ आलेले असते, काहिही करू शकतात ते.

आज त्यांच्या पोटात भूक नव्हती. डोळ्यातील निरागसतेच्या जागी नशा होती.>>>>> Sad Sad Sad

मी हार्बर लाइननी प्रवास करंत असल्यामुळे तुम्ही लिहिलेल्याप्रमाणे अनुभव फारच वेळा घेतला आहे.

कनवटीला बरे पैसे जमल्याबरोबर मुंबई सोडली.

तसच असाव बहुतेक अनुजी (जे ऐकल त्यावरूनच सांगतेय.) ; कारण हे पार्ट्यांमध्ये विकल जाणार ड्रग नाही.

अफू, गांजा.. स्वस्तच पडत असावा.

खाण्याची भुक नशेने भागते ही नशेकरता काढलेली पळवाट असावी.
अरे काम करा कमवा आणि खा.
भयानक आहे सगळ.

नशेबद्दल काही करु शकत नाही पण लोकल वाल्यांचे, विरार चर्चगेट किंवा दादर डोंबीवली ऑफिस टाईमचे हाल ऐकले की आम्ही पुणेकर हिंजवडीच्या ३ किलोमीटर ट्रॅफिक ब्लॉक बद्दल उगीच रडतो असे वाटते.

अनु Happy
ट्रॅफिक बद्दल वेगळ रड आहे इथे. पण कदाचित तो भाग वेगळाच आणि बहुतेकदा ती गर्दीही वेगळी.