अंधांनासुद्धा अनुभवता येईल असे चित्रप्रदर्शन - निमंत्रण

Submitted by गायत्री१३ on 16 September, 2015 - 02:43

चिंतामणि हसबनीस - भारत सरकारच्या डिप्लोमा इन फाइन आर्ट्स या पदविका अभ्यासक्रमात विशेष गुणवत्ता मिळवलेला चित्रकार. त्यांच्या प्रतिभेतून उमटलेला एक अतिशय अनोखा आविष्कार आपल्याला पहायला मिळणार आहे. अंधांनासुद्धा अनुभवता येतील अशा त्यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन नेहरु सेंटर, वरळी येथे भरवले जाणार आहे. २९ सप्टेंबर २०१५ ते ५ ऑक्टोबर २०१५ या दिवशी सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० या वेळत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. तुम्हा सगळ्यांना या प्रदर्शनासाठी आग्रहाचे निमंत्रण.

या प्रदर्शनाविषयी त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर
"जोपर्यंत चांगला विचार आणि आशय व्यक्त होणारी चित्र आपण काढत नाही, तोपर्यंत चित्र प्रदर्शन करायचं नाही असा मी निश्चय केला होता. शोध सुरू होता, पण मनासारखा चित्रविषय सुचत नव्हता. एके दिवशी एका अंध मुलीला अतिशय रहदारीचा रस्ता एकटीने क्रॉस करताना पाहिलं आणि मनात एक विचार चमकून गेला. चित्रकला या दृककला प्रकाराच्या मूळ संकल्पनेला धक्का देणारं असं विलक्षण काहीतरी मला गवसू पहात होतं. संगीत आपण कानांनी ऐकतो तर चित्र डोळ्यांनी पहातो. म्हणजे अंधांनी चित्र पाहूच नयेत का? असा विचार आला आणि मग ठरवलं आपण अशी चित्र काढायची की ज्या चित्रांचा अनुभव अंधांनाही घेता येईल.

चाचपडत का होईना चित्र काढायला सुरवात तर केली. प्रत्यक्ष काम सुरू केल्यावर डोळस माणसातलं अंधत्व प्रकर्षानी नजरेसमोर येऊ लागलं, तर दुसर्‍या बाजूला, अंधांची दिसत नसताना त्याहीपलिकडचं पाहण्याची क्षमता जाणवू लागली. जगात वावरताना डोळे असूनही कधी अनावधानानं, कधी अज्ञानानं तर कधी,जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपणच आपल्या मर्यादा अधोरेखित केल्याचं जाणवत राहिलं आणि अंधांच्या बाबतीत शारीरिक मर्यादा असल्यामुळे डोळ्यांनी दिसत नसतानासुद्धा त्याही पलिकडचं पहाण्याची त्यांची क्षमता जाणवत राहिली. डोळस व्यक्तींच्या मर्यादा आणि अंध व्यक्क्तींच्या क्षमता - माझ्या परीनं मी त्यांना नावं देउन टकली 'मूर्त' आणि 'अमूर्त'. नकळत पिकासोचं एक वाक्य आठवून गेलं 'Painting is a blind man's profession.Painter is painting not what he sees, but what he feels!'. 'मूर्त' आणि 'अमूर्त' यांच्यातील अमूर्त सीमारेषेच्या ताणावर डोळसांच्या बरोबरीनं अंध व्यक्तीदेखील पाहू शकतील अशी चित्र तयार होऊ लागली.

प्रत्यक्ष चित्र पहाताना पूर्णपणे वेगळ्या पातळ्यांवरून चित्र अनुभवणार्‍या माझ्या या दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना चित्र अधिक चांगल्या प्रकारे पहाता यावीत, या दृष्टीनं काही तांत्रिक गोष्टींचा अंतर्भाव या प्रदर्शनात केला जाणार आहे. चित्रातील आशय चित्रात ब्रेल लिपीत लिहिला आहे. हा ब्रेल लिपीतील मजकूर चित्रात बाधा तर आणत नाहीच, उलट, त्यामुळे चित्राच्या सौंदर्यात भरच पडली आहे. चित्रातील आशय audio स्वरूपात ऐकता येइल अशी उपकरणं देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशा या सुविधांमुळे चित्र पहाणार्‍या माझ्या दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांच्या क्षमता आणि मर्यादा यांच्या कक्षा सकारत्मकरित्या रुंदावतील असा मला विश्वास वाटतो.

पूर्णपणे वेगळ्या पातळ्यांवरून चित्र अनुभवणार्‍या या दोन्ही प्रेक्षकांचा एकमेकांशी झालेला संवाद निश्चितच आनंददायी असेल आणि हा संवादच मला जास्त महत्वाचा वाटतो कारण या संवादातूनच काहीतरी चांगलं घडेल या बद्दल मी आशादायी आहे. या नव्या प्रयोगामुळे काय साध्य होईल?
- अंधांसाठी एक नवे दालन खुले होईल.
- हे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या शोधक आणि सर्वसमावेशक मनोवृत्तीचे एक उदाहरण ठरेल.
- आजच्या अत्यंत तणावपूर्वक वातावरणात अंधांचा, अपंगांचा तसेच आबालवृद्धांचा समाजातील वावर वाढला तर समाजाची मानसिकता बदलू शकेल.
- अंधांकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे, याची जाणीव प्रदर्शन पहायला येणार्‍या समंजस व्यक्तींना झाल्याशिवाय रहाणार नाही.
- अंधांच्या मदतीसाठी करावयाच्या कामांसाठी नवीन देणगीदार मिळू शकतील.

मूर्त आणि अमूर्ताचं हे संमेलन अमृताचं होईल.

चित्रविक्रीतून येणार्‍या उत्पन्नातून काही रक्कम अंधमित्रांसाठी वापरली जाइल, यासाठी मी वचनब्द्ध आहे.

Watch my paintings with Closed Eyes & Open Minds!"

ClosedEyesOpenMinds.jpg

सर्वांनी प्रदर्शनाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि प्रदर्शनाला नक्की या.
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गायत्री१३, आयशप्पत, असा पण काही प्रकार असतो होय? चकित झालोय. उपक्रमास शुभेच्छा! Happy
आ.न.,
-गा.पै.

अभिनव उपक्रम! मूलभूत शंका: ही चित्रकला का शिल्पकला. चित्रे सहसा द्विमितीय असतात ना? त्रिमितीत गेली तर शिल्प आणि चार मितीत गेली तर सिनेमा असे ढोबळमानाने म्हणणे चूक ठरेल का??

ईंटरेस्टींग ! अभिनंदन, शुभेच्छा Happy

सीमंतिनी यांना आलेली शंका माझ्याही मनात आलीच, उत्तर मनानेच दिले Happy