दुपारची झोप !

Submitted by kulu on 15 September, 2015 - 12:26

दु:ख राहे शून्य, जाहलो अनन्य,

घेता झालो धन्य , झोप दुपारची!!

असं कुणीतरी म्हटलेलंच आहे……………………………..कोणी म्हटलं नसेल तर आत्ताच मी म्हटलं असं समजा ! खर तर दुपारची झोप हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि नाजूक विषय! आज याविषयी लिहून मला काही ठराविक प्रकारच्या लोकांवर सूड उगवायचा आहे. पहिला प्रकार म्हणजे जे स्वतः दुपारी झोपत नाहीत आणि दुसरा प्रकार म्हणजे जे दुपारी झोपू शकत नाहीत म्हणून जे झोपतात त्यांना तुच्छ समजणारे जन!

दुपारची झोप हा प्रकार जाणून घेण्यासाठी लागणारी रसिकता (काही लोक त्याला आळस म्हणतात…हाय रे दुर्दैव….अशा लोकांचे!) फार कमी जणांकडे असते. म्हणजे “छे! दुपारी काय झोपायचं!” अस म्हणणारा माणूस एक तर अरसिक असतो किवा तो तुमच्यावर जळत असतो! बर, नुसती रसिकता असून चालत नाही, जिद्द आणि चिकाटी हवी, म्हणजे कामात कितीही व्यस्त असलो तरी दुपारी झोपणारच अशी भीष्मप्रतिज्ञा करण्याचे आणि ती पाळण्याचे सामर्थ्य हवे. भीष्मप्रतिज्ञा या शब्दाबद्दल कुणीही आक्षेप घेऊ नये, कारण भीष्मदेखील समस्त कौरव-पांडवाना सकाळी युद्धाचे लेसन्स देऊन दुपारी झोपत नसतील कशावरून?

या झोपेचे पण वेगवेगळे प्रकार असतात! काही लोक वामकुक्षी आणि दुपारची झोप यामध्ये गफलत करतात! वामकुक्षी म्हणजे दुपारी येणारी अगदीच सामान्य अशी डुलकी जी फार फार तर अर्धा तास टिकू शकते! पण दुपारची झोप हा प्रचंड आणि राजेशाही प्रकार आहे. मस्त सुट्टीचा दिवस, एक च्या दरम्यान झालेलं पोटभरून जेवण (त्यात जर मत्स्याहार असेल तर अहाहा), पेलाभर मठ्ठा आणि वाऱ्याची हलकी झुळूक, हातात पुस्तक. ….अस सगळं जमून आल्यावर दोन तीन तास जी समाधी लागते तिला दुपारचे झोप अस म्हणतात! त्यामुळे या झोपेला वामकुक्षी म्हणणे म्हणजे कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीची पुणेरी मिळमिळीत मिसळेशी तुलना करण्यासारखे आहे! पुणेरी लोकांनी वाईट वाटून घेऊ नये, कारण पुण्यातले दुकानदार म्हणजे दुपारच्या झोपेचे Brand Ambassador आहेत….का ते सांगायची गरज नाहीच! विषयांतर सोडून द्या! शाळेत असताना मी दुपारी झोपायचो, शिक्षकांच्या विरुद्ध दिशेला केलेल्या तोंडाला हातांच्या तळव्याचा टेकू द्यायचा आणि पुस्तकात तोंड खुपसल्याचे नाटक करून झोप काढायची! पण यासाठी साधना (साधना म्हणजे तपश्चर्या या अर्थी, “ती साधना काय सुंदर दिसते” अशी साधना नव्हे) हवी! जेव्हा शिक्षकांना आपण अशा अवस्थेत सापडतो तेव्हा साधना कमी पडल्याने निद्रादेवीचा कोप झाला असे खुशाल समजावे! उन्हाळ्यात फॅनखाली उघड्या फरशीवर पडल्यावर येणारी झोप वेगळी, पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज ऐकत येणारी झोप वेगळी, भर थंडीत चहा पिऊन रजाईत शिरून घ्यायची झोप वेगळी! ही सगळी त्या निद्रादेवीची विविध रूपे!

पट्टीचे गाणारे, पट्टीचे खाणारे असतात तसे पट्टीचे दुपारचे झोपणारे पण असतात माझ्यासारखे! (आणि बऱ्याचदा ह्या तिघांची पट्टी जुळते कारण तीन्ही ठिकाणी रसिकता लागते.) आम्हाला रात्रीचे जागरण चालेल पण दुपारचे जागरण म्हणजे काळ्या पाण्याचे शिक्षा! पण अशा आमच्यासारख्या लोकांचं सुख ज्यांना बघवत नाही असे लोक आम्हाला त्रास देतात. आणि बऱ्याचदा त्या स्त्रिया असतात. म्हणजे नवऱ्याने दुपारी झोपू नये म्हणून मुद्दाम दुपारी भिंतीवरची जळमटे काढणे (जेणेकरून एखादे जळमट नवऱ्याच्या नाकात जाऊन त्याला अशी शिंक यावी कि त्याला तर जाग यावीच पण आजूबाजूच्या घरात झोपलेल्या इतरेजनांच्या झोपेचं पण वाटोळ व्हावं), स्वच्छ असलेली भांडी जोरजोरात आवाज करत पुन्हा पुन्हा घासणे अशी कामे बायका करतात असे मी माझ्या काही विवाहित (बिचारे!) मित्रांकडून ऐकले आहे. आया सुद्धा महाबिलंदर असतात. पोराने दुपारी झोपू नये म्हणून बऱ्याच युक्त्या लढवतात. एकतर त्यांना आपल्या पोराचे वीक-पॉईण्ट्स माहीत असतात. मी दुपारी झोपायला लागलो कि माझी आई मुद्दाम गुलाबजामून (जाम कि जामून ह्यात जरा माझा गोंधळ आहे) तळायला घेणे, रसमलाई साठी रबडी तयार करणे अशा गोष्टी करते. वर आणि मला म्हणते “बाबू, तुला झोप आली असेल ना, झोप हो तू! ” म्हणजे इकडे झोप न तिकडे गुलाबजामून अशी विचित्र अवस्था होते माझी! बर काही लोक जे दुपारी झोपू शकत नाहीत ते अफवा उठवतात कि दुपारी झोपल्याने नैराश्य येते, पोटाचा घेर वाढतो, वगैरे..पण असं म्हणणाऱ्या किती तरी लोकांच्या वाढत्या पोटाचा घेर मी पहिला आहे. आणि ज्याला नैराश्य यायचच आहे त्याला काहीही कारण चालते अगदी “भारतात मंदी आली” ते “साबुच्या खिचडीत मीठ कमी पडलं” पर्यंत कुठल्याही करणावर नैराश्य येणारे लोक मी पाहिले आहेत! काही लोकांना तर त्यांच्या आयुष्यात सगळच ठीक सुरुय याच नैराश्य येत, कारण काय तर “काहीच कसं चुकीचं घडत नाहीय?” आता बोला!

उलट दुपारच्या झोपेमुळे उत्साह येतो, आनंद शोधण्याची वृत्ती वाढते. जेव्हा कामाला किंवा कॉलेजला जायचं म्हणून आपण सगळ आवरतो आणि अचानक जाण रद्द होऊन सुट्टी मिळते, त्यावेळी आज दुपारी झोपायला मिळणार या गोष्टीमुळे जो आनंद होतो तेवढा आनंद कोलंबसाला पण अमेरिका सापडल्यावर झाला नसेल (झाला असेलही कदाचित. इतके दिवस हलणाऱ्या बोटीवर काढल्यावर त्याला देखील दुपारी झोपायला शांत जागा सापडल्याचा आनंद झाला असेल!)

एका संशोधनानुसार दुपारी झोपणारे लोक न झोपणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आनंदी असतात. दुसऱ्या एका संशोधनातून याच्या विरुद्ध निष्कर्ष सिद्ध झाला आहे …पण मी मुळातच नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करतो त्यामुळे पहिल्या संशोधनावर माझा जास्त विश्वास आहे आणि दुसऱ्या संशोधनातले संशोधक अरसिक होते असा माझा दावा आहे! तरी या पहिल्या संशोधनाला ध्यानात घेऊन शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस या सर्व ठिकाणी Lunch Time नंतर दोन तासांची झोपेची सुट्टी असावी अशी माझी “अखिल भारतीय दुपारनिद्रा” संघटनेतर्फे मागणी आहे! त्यासाठी आम्ही संसदेसमोर लवकरच भव्य “जांभाई आंदोलन” करणार आहोत. ज्यामध्ये दुपारी २ ते ५ संसदेसमोर बसून मोठ्याने एकसाथ जांभया देणे हा कार्यक्रम आहे! नाहीतरी संसदेच्या आत बसून आपले मंत्री संत्री देखील हेच उद्योग करतात, त्यामुळे जांभयांची भाषा त्यांना लवकर कळेल! हल्ली आरोळ्या देऊन कोणी ऐकत नाही, जांभया देऊन तरी ऐकतात का ते बघू!

खूप लिहिलं! दुपारचे दोन वाजले आहेत! दुपारची झोप माझी वाट पाहत आहे…..हे निद्रादेवी तुझी अशीच अखंड कृपा माझ्यावर राहो…….ऽऽऽऽऽ!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पुणेरी त्यामुळे दुपारची झोप मस्टच. वीकांताला तर फोन बंद करून बेल बंद करून झोपते.
मध्यंतरी एके रविवारी कुत्रा आजारी असल्याची शंका आली व धावत पळत व्हेट कडे गेले. मग घरी आलयावर एक थालिपीठ व दही खाल्ले व दोन कुत्रे व मी अशी घनदाट झोप काढली की उ ठून
पाहिले तर साडे पाच वाजलेले!!!

दुपारी झोपणारे लोक कमी कटकटे, हॅपी गो लकी असतात का? असे वाट्ते तरी.

गेल्या आठवड्यात गणेश शतुर्थीला मोदक खाऊन दुपारी मस्त ताणून देताना ह्या लेखाची आठवण आली Proud

मस्त लिहिलंय Lol
पण मला कधीच दुपारी झोप लागत नाही Uhoh
आमच्या घरात कोणीच दुपारी झोपत नाही.
दुपारी झोपण्याची पद्धतच नाही म्हणे आमच्याकडे Uhoh

सर्वांचे खुप खुप आभार प्रतिसादांबद्दल! दुपारच्या झोपेचे इतके भोक्ते बघुन "प्रफुल्ल प्रफुल्ल हो गया है मेरा मन" Proud
दुपारी झोपणारे लोक कमी कटकटे, हॅपी गो लकी असतात का?>>>> अमा हो ! आपण सर्व तसेच आहोत की Proud

अहाहा, भारीच! 'दुपारची झोप' एवढं वाचूनही कसं पहुडल्यासारखं वाटलं Happy मस्त लिहिलंयस..
रविवार तर त्याशिवाय साजराच होऊ शकत नाही! मात्र सगळी ठरवलेली कामं आडवं होण्यापूर्वी तब्येतीत पूर्ण झालेली असली पाहिजेत, मग त्या झोपेची खुमारी वेगळीच.. उठल्यावर बहिणीच्या हातचा कड्डक चहा आयता हातात मिळणार असेल तर मग तर क्या कहने.. सार्थकच त्या झोपेचं Wink Wink

एक मजेशीर आठवण झाली. एकदा आम्ही काहीजण महाजनसर आणि गोळेसरांबरोबर चक्राताला गेलो होतो. पहाटेपासून पायपीट चालायची त्यामुळे दुपारी सरांसकट सगळे पेंगुळून विश्रांती घ्यायचे. आमच्या चमूत झरीन भरुचा नावाची मुलगी होती. ब-यापैकी मराठी यायचं तिला. तरी कुठे कुठे अडायचं. पहिल्याच दिवशी दुपारी जेवणं झाल्यावर महाजनसर म्हणाले मी जरा आडवा होतो आता. झरीनला काही समजलं नाही. मिश्किलपणे सर म्हणाले आय शॅल हॉरिझाँटलाईज फॉर समटाईम नाऊ Lol हे हॉरिझाँटलायजेशन पूर्ण सहलभर आणि नंतरही जाम हिट्ट झालेलं तेव्हा Happy सरांनी तिला 'पडतो'चं फॉलिंगसुद्धा सांगितलेलं Happy Happy

माझं सगळं लवकर आणि गडबडीचं असतं. महणून सक्काळी पावणे पाच पाच च्या दरम्यान उठते. घर लायनीवर लावून, स्वैपाक वगैरे करून ह्पीस ८.३० शार्प मग साडे बारा एक ला एनर्जी लेव्हल डिप
होतेच. अंदाजे डबा खाल्ल्यावर १५-२० मिनिटाने झापड येते. मग१० - १५ मिनिटे झोपतेच् मी.
मग २ वाजता चहा कॉफी करून परत काम चालू. पावसाळी दुपारी तर फार मस्त झोप येते . माझे
एक लाडके दोहर आहे त्यात शिरून मस्त मिड् डे पेपर वाचत वाचत झोपायचे हा वीकांताचा आयटम अस्तोच.

दुपारी झोपणारे लोक कमी कटकटे, हॅपी गो लकी असतात का?
<<
दुपारी झोपायची सवय असली, अन झोप नाही मिळाली, की मग या लोकांचं काय होतं ते ठाऊकेय का? Wink

दुपारची झोप हा एकदम जिव्हाळ्याचा विषय मस्त लिहले

काहि लोका^ना दुपारचे जागरण सहन होत नाही Proud

मस्त लिहिले आहेस कुलु
मला पण खुप आवडते दुपारची झोप . दुपारी झोपले की रात्री झोप येत नाही हे माहिति असुन पण मी रवीवारची दुपारची झोपते...

हे बघितलंच नव्हतं Uhoh सर्वांचे खुप खुप आभार! Happy
दुपारच्या झोपेचे एवढे भक्त पाहुन आनंद झाला!
सई हॉरिझाँटलाईज फॉर समटाईम नाऊ>>>> बेस्श्ट Proud

दुपारची झोप अत्यंत प्रिय आहे. शाळा कॉलेजात असताना मी जीए दुपारी झोपायची ती संध्याकाळी सहालाच उठायची. तेही ताईने उठवल्यावर.
रात्री झोप आली नाही असं कधीच झालं नाही. Happy
ऑफिस आणि लग्नानंतर हे व्यसन बरच कमी होत गेलं. आता रविवार दुपारी एखादा तास झोप मिळाली तरी खुप आनंद होतो. फ्रेश आनंदी वाटतं.

मस्त Lol

दुपारची झोप अत्यंत प्रिय आहे. कमीतकमी पाऊण तास पाहिजे. पंधरा-वीस मिनिटंच झोप मिळणार असेल तर न झोपलेलंच बरं. तसंच दुपारी तीन-साडेतीन नंतर झोपलं तरी विचित्रच थकवा येतो त्यामुळे दुपारी कुठे बाहेर गेले आणि झोपायची वेळ टळून गेली तर मी घरी आल्यावर डायरेक्ट टंपाळभर चहाच पिते. दुपारी झोपलं, नाही झोपलं तरी चारचा चहा लागतोच.
दुपारी दोन तासांपेक्षा जास्त झोप फक्त जेटलॅग असताना लागते. भक्कम झोप असते ती. साडे-पाच सहाला सुद्धा डोळे उघडता उघडत नाहीत.

लेक आनंदाने उडीच मारतो माझी दुपारची झोप स्किप झाली तर !! पहिली दोन वर्ष सोडली तर तो दुपारी कधीच झोपलेला नाही ( थोडक्यात मांडीवर दामटून झोपवायचं वय गेल्यावर Wink )

विन्स्टन चर्चिल अनेक लोकांचा अनेक गोष्टींसाठी आदर्श आहे पण माझा एका जरा वेगळ्या गोष्टीसाठी आहे . ती गोष्ट म्हणजे झोप . चर्चिल रात्री उशिरापर्यंत काम करत असला तरी पुरेशी झोप घ्यायचा . आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे दुपारी पण हमखास झोपायचा . हिटलर लंडन जाळून काढत असताना , सिंगापूर जपानला शरण गेल तेंव्हा आणि फ्रांस जर्मनीला शरण गेल अशा समरप्रसंगी पण चर्चिलने आपली दुपारची झोप सोडली नाही . सर्वनाश होतो की काय अशी परिस्थिती असताना पण दुपारी झोपणाऱ्या चर्चिलच काळीज सिंहाच होत . मी काही चर्चिलइतका कर्तबगार नाही पण मी कधीच झोपेच्या बाबतीत तडजोड करत नाही . मला पडल्या पडल्या दहा मिनिटात झोप लागते . माझे झोपेवर निरातिशय प्रेम आहे . माझे मित्र आणि रसिका या प्रेमावरून मला चिडवतात . पण मी ते compliment म्हणून घेतो . पण माझ्या झोप प्रेमामागे मानसिक कारण आहे . झोप हा माझ्या आयुष्यात असलेल्या चिंता आणि संघर्ष यांच्यापासून दुर जाण्याचा escape route आहे . झोपायला गेल्यावर मी सगळ्या चिंता विसरतो . संघर्षाच्या काळात अनेकदा मोठे प्रॉब्लेम आ वासून समोर उभे असायचे . आता यातून मार्ग नाहीच अस वाटायला लागायचं . पण एक शांत मस्त झोप व्हायची आणि त्या प्रश्नाला भिडण्याच फ्रेश बळ मिळायचं . झोपेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत . सध्या कमी झोपून जास्तीत जास्त काम करणाऱ्या लोकांच glorification करण्याचे दिवस आहेत . मला खुपदा आपण थोड जास्त झोपलो म्हणजे काही तरी वाईट काम केलंय असा अपराधीभाव बाळगणारे लोक दिसतात तेंव्हा मी त्याच्याशी रिलेट करू शकत नाही . माझ्या ओळखीतले खुप लोक हल्ली झोपच लागत नाही आणि पुर्ण रात्र छताकडे डोळे लावून बघण्यात जाते अशी तक्रार करताना दिसतात त्याच्याशीही रिलेट करता येत नाही . आपल्या समाजात झोपेबद्दल एकूणच एक collective complex दिसतो . मी किती कमी तास झोपतो हे हिरीरीने सांगणारा वर्ग त्यातून तयार होतो . झोपेबद्दल असणारा अपराधगंड दूर होण्याची किमान आजच्या virtual आणि real जगात गांजलेल्या आमच्या पिढीला तर नक्कीच गरज आहे . परवा जागतीक निद्रा दिवस आला आणि गेला . त्यादिवशीच लिहायचं होत पण आळस आडवा आला . जाता जाता हे चर्चिलच अजरामर कोट -
"You must sleep some time between lunch and dinner, and no half-way
measures. Take off your clothes and get into bed. That's what I always
do. Don't think you will be doing less work because you sleep during
the day. That's a foolish notion held by people who have no
imagination. You will be able to accomplish more. You get two days in
one-well, at least one and a half, I'm sure. When the war started, I
had to sleep during the day because that was the only way I could cope
with my responsibilities."

चला, आता ऑफिशियल फायदे कळले ते बरं झालं! हाहा >>>>>> खरंच! धन्स सिंडेरेला!

बावरा मन अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण प्रतिसाद!
झोपायला गेल्यावर मी सगळ्या चिंता विसरतो >>>>>सध्या कमी झोपून जास्तीत जास्त काम करणाऱ्या लोकांच glorification करण्याचे दिवस आहेत>>>> आपल्या समाजात झोपेबद्दल एकूणच एक collective complex दिसतो . मी किती कमी तास झोपतो हे हिरीरीने सांगणारा वर्ग त्यातून तयार होतो . झोपेबद्दल असणारा अपराधगंड दूर होण्याची किमान आजच्या virtual आणि real जगात गांजलेल्या आमच्या पिढीला तर नक्कीच गरज आहे . >>>>>>>>>> अगदी खरं आहे. झोपेविषयी इतक्या काकुळतीने फार कमी लोक बोलतात, वाचुन बरं वाटलं की माझ्यासारखा विचार करणारी काही जणं आहेत!

नोकरी करणार्‍यांना हे सुख आठवड्यातुन एकदाच लाभत. या उलट व्यवसायानिमीत्त १२ तास काम कारणारे लोक घरी जेवायला येतात आणि अर्धा तास वामकूक्षी करतात. या मुळे त्यांची कार्यक्षमता वाढते अस म्हणतात.

अजुन एक अनुभव. रात्रीची झोप अर्धवट झाली तर चालेल. पण जर दुपारची झोप अर्धवट झाली तर कहर! म्हणजे पुढची आख्खी संध्याकाळ नासते!

पण जर दुपारची झोप अर्धवट झाली तर कहर! म्हणजे पुढची आख्खी संध्याकाळ नासते! >>> अगदी अगदी.

मी पण दुपार झोप फॅन क्लबमधे. Happy

Pages