मनातले काही - २

Submitted by बेफ़िकीर on 15 September, 2015 - 10:17

आमच्या येथे अनेक जागा रिकाम्या आहेत. कृपया नाव, गाव, शैक्षणिक पात्रता, कौटुंबिक पार्श्वभूमी, जात, धर्म, अनुभव, ट्रॅक रेकॉर्ड, पगाराची अपेक्षा ह्यातील काहीही माहिती न देता अर्ज करा. नुसता अर्ज केलात तर नोकरी मिळेल. अर्ज करण्याची इच्छा हीच तुमची पात्रता असेल. पगार म्हणून दररोज पोतेभरून समाधान घरी घेऊन जाता येईल. आरक्षणाची गरज भासणार नाही असे काम आहे.

आमचा पत्ता - ग्रह पृथ्वी

कंपनी - मानवजात

अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या जागा:

१. कुटुंबियांना खळखळवून हसवणारा

२. वाहतुकीत हसून, हात हलवून दुसर्‍याला पुढे जाऊ देणारा

३. कोणत्याही रांगेत घुसणार्‍यांना क्षमा करणारा

४. लहान मुलांना मनोरंजक आणि संवेदनशील बनवणार्‍या गोष्टी सांगून झोपवणारा

५. सायकलचा प्रसार करणारा

६. अर्थपूर्ण आणि सुश्राव्य गाणीच ऐकणारा व ऐकवणारा

७. दिवसातून एकदा तरी कोणालातरी क्षमा करणारा

८. जोडीदाराला हलकी टप्पल मारून 'किती राबशील' म्हणणारा

९. ज्येष्ठांना वृद्धाश्रमातून परत स्वगृही आणणारा

१०. रोज एका नव्या अनोळखी माणसाला बघून हसून हात करणारा

११. हसरा चेहरा ठेवू शकणारा

१२. रोज कोणाही एकाला निर्हेतुकपणे आनंदी करू शकणारा

१३. आयुष्य लाईटली घेणारा व घेण्यास मोफत शिकवणारा

१४, आठवड्यातून एकदा तरी घळघळून रडू शकणारा

१५. गरिबाच्या मुलासाठी दोनशे रुपयाचे फटाके आणणारा

१६. 'मी इतके इतके पाणी वाचवले आज' असे म्हणून घरातच हसत उड्या मारणारा

१७. 'ऑल इज वेल' अशी अफवा रोज व्हॉट्स अ‍ॅप वरून व्हायरल करणारा

१८. काल, आज आणि उद्या ह्या तीन गोष्टींचा विचार न करणारा

ह्यातील तुम्हाला काहीही जमत असेल तर नोकरी हमखास! वय, लिंग, जात, धर्म, शैक्षणिक पात्रता, अनुभव ह्यापैकी कोणतीही अट नाही.

ह्यातील काहीही जमत नसेल तर......

......तुम्ही आधीच आहातच की आमच्यात!
============================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच..
यापैकी २, १०,११ आणि १२ हे क्वालिफिकेशन असलेले एक जेष्ठ मोजुन १० सेकंदासाठी भेटले काल..
खुप खुप गर्दी ने परेशान झालेलो मी , ताई आणि गाथा माझी भाची तुळशीबागेजवळ असलेल्या सम्राट दुकानातुन बाहेर पडलो तर गाडी काढताना हे तिथुन जात असलेले गाडीच्या नंबर प्लेट कडे बघत तोंडभर आश्चर्य आणि हसु आणत म्हणाले,
" MH 29 म्हणजे यवतमाळ न गं.."
मी हो म्हणताच , " अरे व्वा, विदर्भातले तुम्ही इतक्या दुर आलात..मस्तच.." असं म्हणत हात दाखवत निघुन गेले..
त्या गर्दी , भांडण या सर्वातुन निर्हेतुक संवाद साधुन तोंडभर हसुन त्यांनी आम्हाला विदा केलं..
क्षणिक दिलासा.. तोंडावर तोंडदेखल हसु सर्वच ठेवतात..मी सुद्धा..पण एखाद्या व्यक्तीचा हसरा चेहरा आपल्याला प्रसन्न करुन जातो अशांमधे ते जेष्ठ गृहस्थ नक्कीच होते..

छान लेख.

क्र. 10 आणि 14 मात्र पटले नाही.. साॅरी.

बाकी नेहमीप्रमाणे लेख आवडला.

हायला! जवळपास असाच तर आहे मी Happy

१. कुटुंबियांना खळखळवून हसवणारा
जे माझ्या क्लोज असतात, अर्थातच कुटुंबीय त्यांना तर हमखास हसवतोच. कारण त्यांच्या हसण्यावरच माझा आनंद अवलंबून आहे हे पक्के ठाऊक आहे मला.

२. वाहतुकीत हसून, हात हलवून दुसर्‍याला पुढे जाऊ देणारा
मी आणि माझी गफ्रेंड कुठे जात असू तर बेशिस्त वाहतूक बघून तिची चिडचीड होते, अगदी चालतानाही कोणी ठोंब्यासारखा मध्येच थबकून उभा राहिला आणि त्याच्यामुळे आमचा चालण्याच्या वेगाला खीळ बसली की तो बावळट वेंधळा वगैरे ठरतो. पण मी मात्र तिला थोपटत, समजवत, स्वत:ला त्याच्या जागी ठेऊन बघ म्हणत हलक्यात घेतो.

३. कोणत्याही रांगेत घुसणार्‍यांना क्षमा करणारा
रांगेत उभा राहताना मी कधीच गणित करत नाही की किती जण पुढे आहेत आणि किती वेळ लागणार आहे. कोण मध्ये घुसतेय की नाही याकडे लक्षही देत नाही. काय एवढा फरक पडणार असतो, थोडाफार अतिरीक्त वेळ लागतो ईतकेच. आणि असे काय करायचे आहे मला तो वेळ वाचवून. माझे आयुष्य कुठल्या घड्याळ्याच्या काट्यावर बांधलेले नाही, ना मला ते तसे जगायला आवडते.

४. लहान मुलांना मनोरंजक आणि संवेदनशील बनवणार्‍या गोष्टी सांगून झोपवणारा
लहान मुलांना पकवायला आणि स्टोर्‍या बनवून सांगायला तर मला फार्र आवडते Happy

५. सायकलचा प्रसार करणारा
मला सायकल चालवता येत नाही.
पण स्वत: चालायला खूप आवडते.
मी कॉलेजला असताना कधी कधी लेक्चर बंक करून एकटाच चाली चाली करत कुठे कुठे भटकायचो., सिरीअसली.

६. अर्थपूर्ण आणि सुश्राव्य गाणीच ऐकणारा व ऐकवणारा
अर्थपूर्ण आणि सुश्राव्य हे व्यक्तीसापेक्ष धरूया, पण गाणे ऐकत निवांत पडण्यापेक्षा संगीताच्या तालावर काम करायला मला जास्त आवडते. जसे संगीत असेल तसा उत्साह त्या कामात आपसूक येतो.

७. दिवसातून एकदा तरी कोणालातरी क्षमा करणारा
कोणाचा राग येणे हेच माझ्या स्वभावात येत नाही तिथे क्षमा करण्या न करण्याचा प्रश्नच येत नाही.

८. जोडीदाराला हलकी टप्पल मारून 'किती राबशील' म्हणणारा
जोडीदार असाच असावा ज्याच्यासाठी स्वत: राबावेसे वाटावे आणि तो थोडासा राबला तरी त्याचे अपार कौतुक वाटावे.

९. ज्येष्ठांना वृद्धाश्रमातून परत स्वगृही आणणारा
आपल्या आईवडीलांना त्यांच्या मर्जीविरुद्ध वृद्धाश्रमातच काय तर आपल्यापासून दूर ठेवणार्‍यांचे गणित देखील मला समजत नाही.

१०. रोज एका नव्या अनोळखी माणसाला बघून हसून हात करणारा
हे अगदी जसेच्या तसे नाही जमत. कारण लाजराबुजरा स्वभाव. मात्र प्रत्येक अनोळखी माणसाबद्दल प्रथमदर्शनी सकारात्मकच मत बनवायचे हा माझा फंडा आहे.

११. हसरा चेहरा ठेवू शकणारा
मन नेहमी आनंदीत आणि उल्हासित असते. चेहर्‍यावर दिसो न दिसो. मात्र अध्येमध्ये उगाचच काहीबाही आठवून हसत राहायची सवय आहे. कोणी विचारले का हसतोयस रे, तर माझा चेहराच हसरा आहे हा ठरलेला डायलॉग.

१२. रोज कोणाही एकाला निर्हेतुकपणे आनंदी करू शकणारा
आनंद देण्यात आनंद शोधणे हा आनंद मिळवायचा सर्वात सोपा मार्ग आहे. कारण यात आपला आनंद आपल्या हातात असतो, कोणावर अवलंबून नसतो.

१३. आयुष्य लाईटली घेणारा व घेण्यास मोफत शिकवणारा
आयुष्य कसे घ्यावे द्यावे जगावे हे लोकांना शिकवणे हा तर माझा छंद आहे. Happy

१४, आठवड्यातून एकदा तरी घळघळून रडू शकणारा
टचकन!
टच्चकन पाणी येते डोळ्यात.
माझ्यामते संवेदनशील मनच आयुष्य अनुभवू शकते.

१५. गरिबाच्या मुलासाठी दोनशे रुपयाचे फटाके आणणारा
अगदी असेच नाही. पण द्यावेसे वाटले की देतो. दोन दोनशे दोन हजार आकडा बघत नाही. पण द्यावेशे नाही वाटले तर भिकार्‍यासाठी एक रुपयाही खिशातून निघत नाही.
कोणाला किती गरज आहे हे मी त्याच्या नजरेत बघतो आणि त्यानुसार ठरवतो.

१६. 'मी इतके इतके पाणी वाचवले आज' असे म्हणून घरातच हसत उड्या मारणारा
सुट्टीच्या दिवशी आंघोळीलाही सुट्टी देत, घेतो अशी मजा नेहमीच Happy

१७. 'ऑल इज वेल' अशी अफवा रोज व्हॉट्स अ‍ॅप वरून व्हायरल करणारा
येस्स! नेहमी स्वत:बद्दल कौतुकाने बोलतो. आपल्या आसपास जे घडतेय त्यात चांगलेचुंगलेच शोधतो.

१८. काल, आज आणि उद्या ह्या तीन गोष्टींचा विचार न करणारा
जे विचार तरतरी देतात तेच करतो. जे टेंशन देतात ते स्वत:च माझ्यापासून दूर राहतात. Happy