द लास्ट पोस्ट

Submitted by सोन्याबापू on 5 September, 2015 - 23:53

कारगिल सेक्टर च्या माधोमध एक जागा. एका दगडावर मी सुन्न पण शांत बसलो होतो. रिज कॅप्चर झाली होती अन शेजारी माझी राइफल पड़ली होती. तिच्यातही बेटी एकच गोळी उरली होती. तासाभरापूर्वी तुंबळ रणकंदन माजले होते इथे, आरडाओरडा विरश्रीयुक्त युद्धघोष सगळ्याचीच रेलचेल. जरासे बधीर वाटत होते, तरीही शांतता अन त्या शांततेत कानात घुमणारा कुईंsssss असा आवाज लक्षात येत होता. कदाचित मी त्या आर पी जी अन गोळ्यांच्या आवाजाने बधीर झालो होतो, असेल बुआ, ह्या धामधुमीत माझे लाडके मार्लबोरो लाइट्स चे पाकीट कुठे पडले कोणास ठाऊक! त्या परिस्थितीत सुद्धा मी ते जपून सेल्फ राशनिंग करून वाचवले होते. मरू दे आता जायचेच आहे न तेव्हा बायको न दिलेली लिस्ट घ्यायचीच आहे पठानकोट कैंटीन मधुन तेव्हा घेऊ.
अरे वा रेंफोर्समेंट आली वाटते, बारीक डोळे बारकी चण, अरेच्या ही तर आमचीच 3 गोरखा ओहो!!! सख्खे भाऊ दिसावे तसला आनंद. हा पहा थोडा वयस्करसा सूबेदार मेजर शिवसिंह छेत्री, ह्याला साक्षात "इनसाइक्लोपीडिया ऑफ़ बैटल" म्हणायला हरकत नाही बरका. त्याच्या मागे कोण हा तर वीरकुमार थापा अजुन कोण लेफ्टनंट मनोज नायडू, जिवंत वाचलाच बेट्या! असो चला आता लिंकअप करावे म्हणुन मी राइफल ला हात घातला तर उचलताच येईना राइफल! अंगात विलक्षण ग्लानी होती! ओरडावे म्हणले तर आवाज फूटत नव्हता. युद्धज्वर ओसरला की होते असे शरीर सुन्न पड़ते. आमचा टाइगर काय बरे गमतीशीर म्हणायचा ह्या अवस्थेला ? हा "पोस्ट बैटल ऑर्गैस्मिक फेज" हा हा हा हा . पण आता उठायला हवे होते.
ज़रा उठून उभा राहिलो, हात पाय ताणले ते बरे वाटत होते अन मुख्य म्हणजे बॅगपॅक चा काही भार जाणवत नव्हता! मागच्या 2 महिन्यात ती पाठीवरुन उतरली नव्हती, सवय झाली असेल. मी आता उभा राहून आजुबाजुला पाहिले ते 9 प्रेत पडलेली, पाय थरथरायला लागले तसे मी मटकन बसलो, अहो मी ही माणुसच न! कालवर सोबत लढणार पोरे अशी दिसली की कशी होणार अवस्था? समोर पाहता जवान एक एक पार्थिव उचलायला लागले ओह हा कोण? अरे रे जंगबहादुर लिंबु, देवा देवा हा तर तुषार गुरुंग लेकाचा नकला मस्त करायचा आता संध्याकाळ टाइगर च्या गप्पा ऐकत मेस ला बोरिंग होणार साला फौजी वर्दी जितकी चांगली तितका हा वियोग वाईट असतो, पलीकडे कोण आहे बरे? ओह हा तर अमरपाल तमांग ह्याच्या हातचे मटन मोमो म्हणजे वाह!!.
"हरामखोरहो, का रे का सोडताय मला! यु ब्लडी फूल! ओ.आर. अपने साबजी को अकेला छोड़ कर के जा रहे हो मकरो" माझ्या डोळ्यामधुन धारा सुरु झाल्या. सैनिक रडत नसतो. मिथ आहे साली, आम्ही क्वचित रडतो अन बहुतकरून असे साथी सोडुन गेल्यावर धायमोकलुन ही रडतो उशीत तोंड खुपसुन. अजुन कोण कोण आहे पहावे म्हणून सूबेदार मेजर च्या मागोमाग गेलो तर त्याने एक ओणवे पडलेले शरीर पाहताच तो थांबला अन ओरडला "सिपाही विष्णु जंग और लांस नायक कमलेश भूटिया इधर आओ"
ते प्रेत सुलटे करता करता त्यांना काय दिसले माहिती नाही पण ती विशीतली दोन पोरे टपटप आसवे गाळु लागली, अन गलितगात्र होऊन रडु लागली, म्हणून कुतुहला ने मी समोर गेलो ते मलाच धक्का बसला
नाव : लेफ्टनंट "क्ष"
तो मीच होतो....
सुन्न पडलेले डोके मला आवरता येत नव्हते, अरे मी मी मेलोय कुठे! मला दिसते आहे की सगळे; पण शरीर मा...झेच आ आ आहे की हे. थोड्यावेळात धक्का ओसरता मी सावरलो अन मनात विचार केला "च्यायला नेमकी कुठे काशी झाली?"
रडत रडत मला(!) पोरे स्ट्रैचर वर ठेवत होती, विष्णु तर सतत रडत होता "मेरे साब मेरे साब, अब मैं क्या मुह दिखाऊंगा आंटी जी को भाभीजी को" हळू हळू पुर्ण कैंटर बॉडी न भरला तेव्हा मी एकटा मैदानात राहिलो म्हणून मी सुद्धा कैंटर मधे शिरलो अन माझ्याच बॉडी वर बसुन राहिलो, आमची वरात बेस ला येताच पुर्ण बेस अन साक्षात् कोर कमांडर कैंटर ला एस्कॉर्ट करत सलूट करत होता, अवघड़लो न राव मी, 71 मधे झेंडे गाडलेला माझा बॉस मला माझ्या कलेवराला सलूट करत होता.
मग माझे शरीर साग्रसंगीत कास्केट मधे ठेवले गेले, माझ्या शेजारी माझे 8 भाऊ! चंडीगढ़ एयर बेस ला येताच आम्हाला विमानात बसवले इल्युशियन 76 होते बहुतेक! मरू दे आपल्याला काय बिन एयरहॉस्टेस ची फ्लाइट! मजल दर मजल करता करता आमचा कैंटर शेवटी गावाजवळ पोचला माझ्या. तसे तो थांबवला गेला त्याला लोकांनी झेंडूच्या फुलांनी सजवला होता, समोर बॅनर वगैरे जय्यत एकदम, हळूहळू मी घरी पोचलो अन कारगिल ला होतो तितकाच गलितगात्र झालो.
अनामिका माझी प्रियतमा अनामिका भकास चेहर्‍याने बसलेली होती, बाबा बाहेर खुर्चीत बसले होते, आई च्या डोळ्याला खळ नव्हती अन तिच्या मांडीवर असलेला माझा विश्वास, बाहेर अनामिकेच्या ऑफिस मधले सहकारी अन धाकट्या भावाची मित्रमंडळी उभी होती अन हजारो हजार अनोळखी माणसे, भाऊ वडिलांच्या मागे उभा. होता होता तयारी झाली अन माझ्या शरीरावर तिरंगा पसरला गेला, अहाहा विलक्षण उबदार होता तो!. मुक्तिधाम ला पोचलो तेव्हा मी तिथेच घुटमळत होतो थोडा अस्वस्थ होतो, आता काय होणार माझे? पुढे शरीरावरचा तिरंगा काढला तसे अजुन चूळबुळ व्हायला लागली माझी, भावाने अन वडिलांनी अग्नी दिला. हवेत मोजून 21 राउंड्स सुटले अन बिगुल वाजू लागला.
बिगुल ची धुन "लास्ट पोस्ट" कॉमनवेल्थ देशांत शहीद शिपायाच्या अंत्यसंस्कारात वाजवतात ती, लास्ट पोस्ट चा अर्थ? "डेड कॉमरेड, तू शरीराने वारला आहेस मनाने नाही तुझा आत्मा अजुन ड्यूटी ला आहे. तुझी ड्यूटी तुला साद घालते आहे. चल उठ, अन आपली पोस्ट कायम ची सांभाळ. तुला स्वर्गात जायचे असले तर तुझ्या स्वर्गात जा" माझा स्वर्ग? काय आहे काय माझा स्वर्ग? माझा स्वर्ग पॉइंट 1234 कारगिल सेक्टर नॉर्थन कमांड इंडियन आर्मी हा होता.
लास्ट पोस्ट चा बिगुल संपला तसे confusion संपले होते, अंगावर नवी वर्दी जाणवत होती, मला पिंडदान मुक्ति सप्तस्वर्ग नको होता ते श्रद्धेचा भाग म्हणुन घरचे करू देत. लास्ट पोस्ट च्या पोस्टिंग ऑर्डर्स घेऊन मी मात्र निघालो होतो.

कारगिल 1234 पोस्ट ला मी आहे आजही! कायम सतत अहोरात्र उभा, कारण तोच आहे माझा स्वर्ग

तीच आहे माझी

लास्ट पोस्ट.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतरनाक लिहिलंय.

रच्याकने मटा मधे खालची बातमी वाचली आणि लगेचच योगायोगाने तुमची ही कथा दिसली Sad
"दहा दहशतवाद्यांना मारुन जवान शहिद"
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/brave-army-commando-who-ki...

,

_/\_

काय बोलू?

कारगिल 1234 पोस्ट ला मी आहे आजही! कायम सतत अहोरात्र उभा, कारण तोच आहे माझा स्वर्ग>>> अंगावर काटा आला.

नेहमीच डिफेन्समधल्या कुणाला तरी विचारावंसं वाटतं. इथे तुम्हालाच विचारते..... एक अतीसामान्य नागरिक म्हणून काय करु तुम्हा लोकांसाठी? डोंगराएवढे ऋण तर कधीच नाही फेडता येणार.

सल्यूट, आणखी काय करू शकतो
शेवटाला पुन्हा काटा आणलात हो
नि:शब्द!!
>>>>>
+१

आता बराच वेळ बैचेनी जाणवत रहाणार! ती माणसं ग्रेटच असतात.

<<नेहमीच डिफेन्समधल्या कुणाला तरी विचारावंसं वाटतं. इथे तुम्हालाच विचारते..... एक अतीसामान्य नागरिक म्हणून काय करु तुम्हा लोकांसाठी? डोंगराएवढे ऋण तर कधीच नाही फेडता येणार.>> +१००

अश्विनी के,
ईथे असणार्‍या सगळ्यांच्याच मनातले लिहिलय तुम्ही

Pages