माझ्या दुराग्रहाने होते सदैव माती

Submitted by बेफ़िकीर on 5 September, 2015 - 12:53

माझ्या दुराग्रहाने होते सदैव माती
सारे तरी कितीदा सांभाळणार नाती

त्यांना कुठे रजेची एन्कॅशमेन्ट मिळते
संसार बायका ज्या करतात एकहाती

बदनाम मानताना औदार्य ठेव थोडे
पश्चात रोज माझ्या तू ऐकशील ख्याती

घरपण घरास देणे इतकेच काम आता
सारी मधाळ वचने गेली बुडीत खाती

हा जात पाळणारा, तो जात काढणारा
येथील माणसांच्या ह्या फक्त दोन जाती

बेहोष एवढा हा केला कुणी जमाना
सारेच नाचती पण कोणी न गीत गाती

स्वप्नामधे कुणाच्या कोणीच येत नाही
आल्या कितीक राती, गेल्या कितीक राती

दिसतात आज जेथे, नसतात त्या उद्याला
नाते तुझे नि माझे, भटक्या जणू जमाती

गडगंज दौलंतींची चिंता नका करू रे
व्हा 'बेफिकीर' ज्याच्या, काही नसेल हाती

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>बेहोष एवढा हा केला कुणी जमाना
सारेच नाचती पण कोणी न गीत गाती>>>डोळ्यांपुढे चित्रच उभे करुन गेला हा शेर...व्वा!

>>> स्वप्नामधे कुणाच्या कोणीच येत नाही
आल्या कितीक राती, गेल्या कितीक राती>>>सहज सल...सुरेख!

>>> दिसतात आज जेथे, नसतात त्या उद्याला
नाते तुझे नि माझे, भटक्या जणू जमाती>>>अप्रतिम!

गझल छान आहे

बेहोष एवढा हा केला कुणी जमाना
सारेच नाचती पण कोणी न गीत गाती

खूप जास्त भावलं