नवस - लघुकथा

Submitted by जव्हेरगंज on 5 September, 2015 - 07:50

होडी तशी बारीकचं होती. नदीसारखीच.
पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता.
हातात मटणाचा प्रसाद होता.
आभाळात घारी सावज शोधण्यात भटकत होत्या.
बारकी पोरं त्यांचाकडं बघण्यातच दंग होती.
ईवलूशी होडी पण वस्ताद कस लावुन वल्हत होता.
संथ संथ होडी काठाला लागली.
देवळात भक्तगणांची गर्दी होती.
मऊशार वाळुतनं वाट काढत नाना देवळात शिरला.
मंदाक्कापण सोबतीला होती.
आज नानानं बोकड कापलं होतं.
म्हसोबाला. कुणी त्याला खंडोबा पण म्हणायचं.
आख्खी वाडी आली होती.दुरदूरची नातीगोतीही जमलेली.
दिगंबर सोडून.
पोरीचं लगीन जमाव म्हणुन मंदाक्कानं नवस केलता. कामाच्या व्यापात अजुन फेडला नव्हता.
ट्रेक्टरवाला दिगंबर नानाचा जावई झाला.
अंगानं जरा रोडावलेला. पण पोरगा कष्टाळू होता. चेहऱ्यावर माजुरडीशी झाक होतीच.

मंदाक्काची लेक तशी काळीकुट्ट.मिचमिची.
हसल्यावर तर अजुन भेसूर दिसायची.
सुलक्षणा. सुली म्हणायचे सगळे तिला.
लगीन होऊन चार महिन्यातच घरी आली.टाकलेली.
नाना हिरमुसला होता.लेकीच्या काळजीनं दिनरात झुरत होता.
खंडोबाला प्रसाद वहाताना नाना लेकिचं सुख मागत होता.

दिवस टाळ्यावर आला.मंदाक्काकडं बघत नाना पुन्हा होडीकडं निघाला.
वस्तादही घामेजलेला.
आभाळातल्या घारी पाण्याभोवती पिंगत होत्या.
संथ संथ होडी पुन्हा काठाला लागली.
मऊशार वाळुतनं वाट काढत नाना पाण्याबाहेर आला.
दुरूनच येणारा फटफटीवरचा जावई दिसला.
मंदाक्का पदर घेत घेतच चेहऱ्यावर नाजुक हसली.
नानाचा जिवात जीव आला. शेवटी त्याला त्याचा म्हसूबा पावला होता.
आभाळात घारी वेगानं सुर मारीत होत्या.
पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता.
फटफटी वरून उतरताच दिगुला नानानं नमस्कार घातला.
दारूचा उग्र भपकारा त्याच्या अंगावर आला.
दिग्या नानाशी भांड भांड भांडला.
काळ्याठिक्कर सुलीशी संसार नाही करायचा म्हणाला.
नाना समजुन उमजुन गयावया करत राहीला.
सूलीची सोडचिठ्ठी फेकुन दिग्या तराट निघुन गेला.
म्हसुबा आज त्याची परीक्षा बघत होता.
आभाळात घारींचा खेळ रंगात आला होता.
पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वेल. आयडी छान आहे. काही दिवसांपुर्वी हाच शब्द सुचत नव्हता.
बादवे,
कथेत जसं सुचलं तसं लिहीलं.
स्टाईल वगैरे असं काही ठरवलेलं नव्हतं.