औट घ़टकेचे पालकत्व

Submitted by आशुचँप on 4 September, 2015 - 04:14

गेल्या आठवड्यात आमच्याकडे नेहमी येणारी मांजरी बाळंतीण झाली. तिच्या नेहमीच्या जिन्याखालच्या जागी. आणि पिल्लेही गोंडस. पण एकदा असेच लक्षात आले की मांजरी हालचाल करत नाहीये. हलवून पाहिले तरी काहीच नाही. मग कळले की तिच्या तीन पिल्लांना आमच्या हवाली करून ती निघून गेलीये कायमची.
बापरे, हा अगदीच अवघड प्रकार होता. कारण पिल्ले अगदीच लहान होती. अंगावरच पिणारी. आता आईपाठोपाठ ती पण दगावण्याची शक्यता होती.

पोराने तर रडून धुमाकुळ घातला पिल्ले पण मरणार म्हणून. मग मात्र पटापटा निर्णय घेतले.

पहिले मांजरीला दूर नेऊन खड्ड्यात पुरून तिची विल्हेवाट लावली. मग पिल्लांना घरी आणले, एका मऊ गोधडीवर त्यांची सोय लावली. प्रश्न होता त्यांना दुध पाजण्याचा. व्हॉट्सअपवर सगळ्या ग्रुपवर विचारणा सुरु केली, इंटरनेट धुंडाळले आणि मग कापसाच्या बोळ्याने दुध पाजायचे ठरले. पिल्ले इतकी भेदरली होती की कपाटाखाली अंधाऱ्या कोपर्यात जाऊन बसलेली एकमेकांना बिलगून. कसेबसे त्यांना बाहेर काढले आणि एकेकाला पाजण्याचा कार्यक्रम सुरु केला.

पोरकेपणाची भावना किंवा नैसर्गिकरित्या येणारे शहाणपण म्हणा पण पिल्लांनाही चांगले सामंजस्य दाखवले आणि थोडे थोडे का होईना दुध पिऊन पुन्हा एकमेकांना चिकटून जाऊन बसले. म्हणलं ठीकाय, आता किमान ते मरणार तरी नाहीत.

मग एक मस्त खोका शोधला, त्यात मऊ मऊ गादी तयार केली. थोडे अंधारे वातावरण केले. थोडे आईसारखे वाटावे म्हणून पोराच्या खेळण्यातला एक वाघ पण दिला. ही ट्रीक भारी जमली. तिन्ही पिल्ले त्या खोट्या वाघाच्या अंगावर डोके ठेऊन झोपली.

संध्याकाळी पोरगे घरी आल्यावर त्याने पिल्लांचा ताबा घेतला. आणि त्याच्याच सल्ल्याने ताटलीत दुध देऊन पाहिले. काय आश्चर्य, गडबडगुंडा करत का होईना जिभेने लपालपा प्यायली. म्हणलं, फारच लवकर शिकतायत.

आणि मग तेव्हापासून सुरु झाले आमचे औट घटकेचे पालकत्व. पिल्लांनाही लवकरच ही अशी दाढी मिशीवाली आई मानवली आणि मी घरी आलो रे आलो की दुडुदुड धावत, पायाशी घोटाळत, अगदी आर्जवी स्वरात म्याऊ म्याऊ करत दुधाची मागणी सुरु व्हायची. आणि पिऊन झाले की मग छानपैकी अंगाच्या उबेत येऊन झोप काढायची. इतकी गोड झोपलेली असताना त्यांची झोपमोड करायची पण इच्छा व्हायची नाही.

फोन आला तरी दबक्या आवाजात बोलायचे आणि उठायचे तर मुळीच नाही. मस्त वाटायचे.

आधी एकतर घरभर शू आणि शी करत फिरायची. पण मग लवकरच त्यांना एका जागीच जाऊन करायची सवय लागली. त्याचा वास फारच तीव्र असायचा, मग घरच्यांचा ओरडा पडू नये म्हणून फिनाईलने फरशी पुसुन घेणे, आणि खोक्यातली पांघरूणे मशीनला लाऊन धुउन घेणे, वास जावा म्हणून कडक उन्हात वाळवून घालणे सगळे कौतुक सोहळे.

मग वाटले की ताटलीत नीट जमत नाहीये, मग मेडीकल मधून बाटली आणली. सुरुवातीला त्यांना प्रकार जमलाच नाही. मग दुधात बोट बुडवून ते चोखायला द्यायचे आणि मग पटकन बाटली पुढे करायची. या प्रकारात अगणीत वेळेला चाऊन घेतले. छानपैकी दात यायला लागले होते पोरांना आणि मग काय कचाकच चावायची.

पण तोही त्रास मजेमजेचा होता, आणि तो प्रकार मग तिघांनाही इतका आवडला की बास. नुसत्या मारामाऱ्या व्हायच्या. मग शेवटी अजून एक बाटली आणावी लागली आणि आळीपाळीने दुध द्यावे लागायचे. एकाचे काढून घेतले की ते गुरगुरत पुन्हा झडप घालायचे. त्यात दोन जास्त आक्रमक होते, त्यामुळे तिसऱ्याला वेगळ्या खोलीत नेऊन, दार लाऊन गुपचुप पाजावे लागायचे.

आणि या सगळ्यात माझा भाऊ, पोरगा तितक्यात कौतुकानी सगळे करायचे. त्यांची नावे पण ठेवली होती इन्ना, मिन्ना आणि डिक्का. ही पण ज्युनिअर चॅँपची आयडीया.

एकंदरीतच सगळ्या घरादाराला या लोकरीच्या गुंड्यांनी लळा लावला होता. पण त्यांना कायमस्वरूपी सांभाळणे शक्यच नव्हते. एकतर आता त्यांना सोफ्यावर आणि कॉटवर चढायचा छंद लागला होता, त्यातून दरवाजा उघडा दिसला की बाहेर पळायचे. मग त्यांना पकडून आणता आणता दमछाक व्हायची. घरभर, बेडरूम, किचन, देवघर कुठेही पळापळ चालायची, चालता चालता पायात यायची, चादरीच्या गुंडाळीत, उशीजवळ कुठेही सापडायची अचानक.

त्यामुळे शोध सुरु झाला नवीन घराचा. अनेकांना विचारल्यावर शेवटी एक कुटुंब तयार झाले तिघांनाही घेऊन जायला. त्याप्रमाणे गाडी घेऊन आले देखील.

अशी जीवापाड सांभाळलेली पोरे दुसऱ्याच्या ताब्यात देताना अक्षरश काळजावर दगड ठेवावा लागला. कितीतरी वेळेला त्यांना असे जवळ घेऊन माया केली, म्हणलं त्रास देऊ नका. काय माहीती त्यांच्या टपोऱ्या डोळ्यात काय भाव होते. आणखी काही दिवसांनी विसरून पण जातील. पण ती मात्र माझ्या मनात कायमच राहतील आणि हे औट घटकेचे पालकपण देखील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुचँप, तुमचे औट घटकेचे पालकत्व किती वात्सल्याने ओथंबलेले होते ते फोटोंमधून, लिहिण्यातून कळतंय. एक पिल्लू लोळत बाटलीतून दुदू पितंय तो फोटो मस्तच आलाय.

मस्त. ती विसरणार नाहीत तुमचा स्पर्श, तुमचा गंध. त्यांना पुन्हा भेट द्याल तेंव्हा तुमचा स्पर्श लगेच ओळखतील.

अहाहा! कित्ती गोग्गोड... अप्रतिम टिपलेत फोटो! खुप मस्त वाटलं रे असं पालकत्त्व बघुन Happy

छान! पुण्य कर्म केलत.
पिलांचे खेळ पाहणे तर फार सुखावनारे असते

खुप छान! फार पूर्वी म्हणजे ८०-८१ मधे आमच्या मांजरीची आणि नंतर तिच्या लेकीच्या पिलांची अशीच 'बडदास्त' ठेवली जायची. मग त्यांचा लळा लागायचा आणि तीनेक महिन्यांनी मग ताटातूट. Sad आमची 'काळू' तर ईतकी सोकावली होती की पिल्लं घातली की तीन-चार दिवसांनी त्यांना आमच्या हवाली करुन खुश्शाल फिरायला जायची. काही पिल्ल्लांचे फोटो असतीलही.

वा!! छानच!! कौतुकास्पद. पण पिल्लांची आई गेल्याचे बघून फार वाईट वाटले.

धाग्याचे नाव फार आवडले. मला वाटत ज्यांना आयुष्यात स्वतःची मुले मिळाली नाहीत त्यांनी असे पालकत्व कायम घ्यावे.

तुम्ही पिल्ले परत का केली? मोठी झाली की मग आपोआप जातातच की ती.

किती काळजीने केलेय त्या पिल्लान्च ! वाचताना सुद्धा त्या हळुवार्पणाची जाणीव होते. मस्त

चँपा, मला फोनायचस ना..... मस्त काळजी घेतलास पिल्लांची मित्रा.

एक दोन टिप्स टाकून ठेवतो, बघा उपयोगी येतायत का कधी.

१. आईपासून सेपरेट केल्यावर गोधडीखाली टिकटिक करणारं घड्याळ टाकून ठेवायच. हृदयाच्या धडधडीशी रीलेट करतात पिल्ल.

२. आई चाटून साफ करते पिल्लांना, आपण ल्यूकवॉर्म पाण्यात बुडवलेला किंचित खरखरीत कपडा वापरु शकतो स्पंजिंगसाठी. टेम्परेचर आणि स्पर्श ह्या दोघांशी साधर्म्य साधायचा प्रयत्न.

३. खाऊन झाल्यावर आई पिल्लाम्ची शी शू ची जागा चाटते, दॅट स्टिम्युलेटस देम तो रीलीज. ....

बाकी निसर्ग सगळ्याची काळजी घ्यायला समर्थ असतोच, आपण फक्त काळजीवाहू सरकार.

दंडवत तुम्हाला.

फोटो इतकेच लेखनही सुंदर.

मी असाच असेही पालकत्व नावाचा धागा काढला होता त्याची आठवण झाली. पण तुमचा धागा एकदम टचिंग आहे.

http://www.maayboli.com/node/38613

खूप छान. मी हे सर्व केलेले आहे.

गेल्या शनिवारीच माझ्या कुत्र्याला टॉन्सिल्स चा त्रास होत होता.
मग धावत पळत व्हेट कडे गेले आणि औष धे आणली. ती काही गिळू शकत नव्हती म्हणून अशक्त झाली होती. व्हेट म्हटली चिकन सूप पाजा. ते नेमके घरी नव्हते मग पहिले तिला थोडा चहा पाजला व चक्क मूग डाळ खिअडी केली मिक्सर मधून काढली. दोन थेंब तूप घातले व भरवली. ( बिन मसाले मिठाची) गपागप वाटीभर खाल्ली गेली. दोन दिवसात कुत्रा बॅक टू नॉर्मल.

त्या माउ मम्मी ला खाणे मिळाले नसल्याने मेली असेल बिचारी. पण तुम्ही परफेक्ट काळजी घेतली आहे. किटन्स फारच गोड आहेत.

किती गोड फोटो आले आहेत आणि तुम्ही पालकत्व चांगलंच निभावलं आहे.. आमच्या बरोबर हा आनंद वाटल्याबदल आभार!

आशु, कित्ती गोड आहेत रे पिल्ल. आणि तू खरच फार फार काळजी घेतलीस त्यांची. औटघटिका असलं तरी समयोचित पालकत्व आहे हे. फारच सुंदर

लोकरीचे गुंडे खरंच मस्त! फोटो झक्कास!

आणि तुमचं कौतुक पिल्लांची इतकी मनापासून काळजी घेतल्याबद्दल.

चॅम्पा, तुझे आणि कुटुंबियांचे खुप कौतुक. मस्त काळजी घेतलीस.
माझी इच्छा असली तरी मला पाळिव प्राण्यांना हात लावणे जमणार नाही.
मस्त प्रचि. पिल्ले खुप खुप गोड आहेत.

Pages