अग्नी तृणांनी झाकितात याचें आश्चर्य वाटते..

Submitted by सेनापती... on 3 September, 2015 - 14:52

छत्रपती शिवजी महाराजांनी ३ एप्रिल १६७९ रोजी लिहिलेले हे पत्र औरंगजेबाला लिहिलेले बहूदा शेवटचे पत्र असावे. ह्या पत्रात ते जिझिया कराकरिता औरंगजेबाचा तीव्र शब्दात निषेध करतात आणि पुर्वीच्या पादशहांची, खास करुन अकबराची आठवण करुन देतात. 'पादशहाचे घरी दारिद्र्याचा वास जाहला', 'या प्रकारचे करण्यातच पुरुषार्थ पादशहा समजतात', 'गरीब मुंग्या चिलटासारख्या आहेत त्यांस उपद्रव करण्यात मोठेपणा नाही.' असेही बजावतात.

*********************************************************************************

आम्ही इकडे आल्यावर पादशाई खजिना रिकामा जाहला आणि सारें द्रव्य खर्चं जाहालें. याकरितां हिंदू लोकांपासून जेजिया पट्टीचे द्रव्य उत्पन्न करुन पादशाईचा क्रम चालविला असे ऐकण्यात आले. त्यास पुर्वी अकबर पादशहा यांणी बावन वर्षे पादशाई केली. यामूळे एकंदर हिंदू लोकांचे धर्म वगैरे चांगले चालले व ते धर्म स्थापनेविषयी मदत ठेवीत होते. सबब जगद्गुरु अशी त्यांची किर्ती जाहली व त्यांस हरएक स्थळी यश येत होते. पुढे नरोदिन झ्यांगीर पादशहा यांणी बेवीस वर्षे ईश्वरी लक्ष्य ठेवून पादशाई केली. नंतर स्वर्गास पोहोचले. उपरांत शहाजहान साहेब किराण पादशहा यांणी बत्तीस वर्षे पादशाई करुन किर्ती मिळवली. जो पुरुष जिवण्त असता लौकिकवान व मागे ज्याची किर्ती त्याजलां अचल लक्ष्मी प्राप्त जाहली असे आहें. जेजियापट्टी घेण्यास ते समर्थ होते परंतु सारे लहान मोठे जन ईश्वराचे आहेत असे जाणुन त्यांणी कोणावर जुलुम केला नाही. याकरितां सर्वांचे मूखी त्यांची स्तूती आहे. ज्यासी जशी नेत तसी त्यास बरकत. त्या पादशहांची दृष्टी प्रजेचे कल्याणावर होती.

आपले कारकिर्दीस किती एक किल्ले व मुलुख गेले. बाकी राहिले तेही जातात. रयत लोक खराब लोक्त व सौदागर लोक पुकारा करितातं की हर एक महालाचे उत्पन्न लाखात एक हजार येणें कठिण जाहले आहे. पादशहाचे घरी दारिद्र्याचा वास जाहला. तेंव्हा पदरचे मंडळींची अवस्था कळतच आहे की कितीएक लोकांस पोतास मिळत नाही. त्यांसवर जेजियापट्टी म्हणुन हिंदु लोकांवर आपण कर बसविला. तो मुलगा झाला म्हणजे दहा रूपये आणि मुलगी झाली म्हणजे पाच रुपये असा चक बसविला. या प्रकारचे करण्यातच पुरुषार्थ पादशहा समजतात व तैमुर पादशहाचे नाव बुडवतात असे जाहले आहे. कुराणात इश्वर जगाचा व मुसलमानाचाच आहे येविसी वाईट अगर चांगले हे दोन्ही ईश्वराने निर्माण केले आहे हे रद्द करुन महेजतीस यवन लोक बांग देतात व देवालयात हिंदु लोक घंटा वाजवितात. याकरिता कोणाचे धर्मावर दोष ठेविल्यास ईश्वराने लिहिले ते रद्द करण्यासारखें होतें, न्यायाचे मार्गाने जेजियापट्टीचा फायदा केवळ गैर. ज्यावर जुलुम जाहला त्यांणे खेद करुन 'हाय हाय' म्हणोन मुखाने धुर काढिल्यास त्या धुराने जितके लवकर जळेल तितके अग्नी जलदीने जळतां इसमास जाळणार नाही ऐसे आहे. यासवर हिंदू लोकांस पिडा करण्यातच धर्म आहे असे मनात आले असल्यास राजा राजसिंग याजकरुन जेजियपट्टी अगोदर घ्यावी मग इकडुन देण्यास कठिण नाही. परंते गरीब मुंग्या चिलटासारख्या आहेत त्यांस उपद्रव करण्यात मोठेपणा नाही. पदरची मंडळी अग्नी तृणांनी झाकितात याचें आश्चर्य वाटते. राज्याचा सुर्य उद्यचळापासुन तेजस्वी असो.

मायबोलीवर पूर्वप्रकाशित इतर ऐतिहासिक पत्रे :
ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?
तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे..
हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे
सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...
बदअमलाबद्दल कड़क शासन...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेनापती, पत्र इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

काही शंका-
शिवाजी महाराजांना १६७४ ला राज्याभिषेक झाला ना?
त्यानंतरही शिवाजी महाराजांना किंवा मराठी रयतेला औरंगजेबाला कर का द्यावा लागत असे?

<<राजा राजसिंग याजकरुन जेजियपट्टी अगोदर घ्यावी मग इकडुन देण्यास कठिण नाही>>
या वाक्यावरून शिवाजीराजांवरपण औरंगजेबाने जिझिया कराचे दडपण आणले आणि जो पर्यंत राजसिंग (म्हणजे मिर्झाराजे जयसिंग का?) देत नाहीत तोपर्यंत आम्ही पण देणार नाही असा प्रतिवाद शिवाजीराजांनी केलेला दिसतोय

<<राज्याचा सुर्य उद्यचळापासुन तेजस्वी असो.>>
हे वाक्य केवळ 'डिप्लोमॅटिक प्लेजंटरी आहे ना?'

सेनापती, पत्रातील काही वाक्यांना काही विशेष अर्थ असावा असे दिसतेय. जसे वर सातीने ज्या शंका उपस्थित केल्यात त्या व्यतिरिक्त अजुनही काही वाक्यांचे गर्भित अर्थ असू शकतात. थोडा विस्तृत लेख वाचायला आवडेल.

या पत्रामागची पाश्र्वभुमी समजावुन घेणं महत्वाचं आहे. पत्रामधील मुळ मुद्धा (जिझिया कर) महाराजांनी काबीज केलेल्या मुलखाचा आहे कि इतर भागाचा, हा संशोधनाचा विषय आहे...

या वाक्यावरून शिवाजीराजांवरपण औरंगजेबाने जिझिया कराचे दडपण आणले आणि जो पर्यंत राजसिंग (म्हणजे मिर्झाराजे जयसिंग का?) देत नाहीत तोपर्यंत आम्ही पण देणार नाही असा प्रतिवाद शिवाजीराजांनी केलेला दिसतोय.

>>

साती,

पत्रात महाराज औरंगजेबाच्या राज्यातील हिंदू लोकांची बाजू घेऊन युक्तिवाद करत आहेत हे स्पष्ट आहे. (जर नसेल तर मला परत मराठी क्लास लावावा लागेल) त्यामुळे इकडून म्हणजे ज्या बाजूच्या वतीने बोलतोय ती बाजू असे मला वाटते.

<<राज्याचा सुर्य उद्यचळापासुन तेजस्वी असो.>>
हे वाक्य केवळ 'डिप्लोमॅटिक प्लेजंटरी आहे ना?'

>>> अर्थात, होय. त्यास साखरपेरणी असेही म्हणता येईल. महाराज आणि त्यांचे कर्मचारी प्रचंड तरबेज होते ह्यात Happy

अवांतर:

मिर्झा राजा, महाराज आग्र्याहून परतले, तेव्हाच विष पिऊन मेला. मेला की त्याचा खून पाडला गेला हे अज्ञात आहे. इथे उल्लेखलेला राजसिंह हा बहुधा मेवार की मारवाड मधला राजा होता. हे राजे जसे ब्रिटीशकालीन भारतात संस्थानिक होते तसले औरंगजेबाचे मांडलिक राजे होते. मुघल साम्राज्याच्या प्रशासकीय अधिकाराच्या भूभागात त्यांचा प्रदेश येत नसे. मुघल प्रशासकीय भाग वेगळे आणि मांडलिक राजांचे प्रशासकीय विभाग वेगळे. जिझिया हा बहुधा मुघल प्रशासकीय विभागातून घेतला गेला असेल, असं मला वाटते. जिझिया कर म्हणजेच शरिया लागू झाली असून तुम्ही इतर धर्माच्या नागरिकांना राज्यात राहायचे असेल तर हा कर द्यावा लागेल अन्यथा मुसलमान व्हावे लागेल. जेव्हा राजसत्ता धर्मसत्तेच्या हातात हात मिळवते तेव्हा त्यास धर्मांध राजाच म्हणावं लागेल, नुसता इतर राजांसारखा राजा नाही Wink

अर्थात वेगळेही असेल, पण महाराजांच्या राज्यात कोणीही मुघलांना जिझिया दिली गेली नाही कारण ते एक स्वतंत्र राज्य होते.

अनिरुद्ध,
<<पत्रात महाराज औरंगजेबाच्या राज्यातील हिंदू लोकांची बाजू घेऊन युक्तिवाद करत आहेत हे स्पष्ट आहे.>>

हे स्पष्ट आहे का हेच मला कन्फर्म करायचे आहे.
माझं काही इतिहासाचं इतकं वाचन नाही.

मात्र स्वतःच्या राज्यातल्या लोकांना कर द्यावा लागत नसतानाही ,औरंगजेबाच्या राज्यातल्या लोकांना कर द्यावा लागतोय म्हणून जर शिवरायांनी त्याला चार शब्द सुनावले असतील तर ही गोष्ट शिवरायांविषयी माझ्या मनात असलेल्या आदरात आणखी भर पाडेल.

साती, मराठ्यांनी डिसेंबर १६६९ मध्ये मुघलांशी केलेला पुरंदरचा तह मोडला. त्यानंतर मराठ्यांनी मुघलांना कसलाच कर दिलेला नाही. उलट लूट मारुन दिलेला पैसा दामदुप्पट वसुल केला.

राजा राजसिंग मेवाडचा राजा होता. त्याच्याबद्दल फार माहिती माझ्या वाचनात आलेली नाही. बहुसंख्य राजपूत राजांप्रमाणे तो देखील मुघलांचा मांडलिक होता.

शेवटचे वाक्य म्हणजे मास्टरस्ट्रोक आहे. Happy पस्चिम महाराष्ट्रातल्या एका राजाने राजाभिषेक करुन घेतला आणि आता तो मुघल साम्राज्याच्या भविष्याला शुभेच्छा देतोय हे औरंगजेबाला पचनी पडले नसेल. आपण विसरता कामा नये की औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेची तयारी १६८० मध्येच सुरु झाली म्हणजे या पत्रानंतर काही दिवसात / महिन्यात.

स्वतःच्या राज्यातल्या लोकांना कर द्यावा लागत नसतानाही ,औरंगजेबाच्या राज्यातल्या लोकांना कर द्यावा लागतोय म्हणून

>>> दिल्लीची पातशाही मांडीखाली दाबायची ज्याची महत्वाकांक्षा होती, सिंधू ते कावेरी पावेतो आपले राज्य असावे असे ज्याचे मनी होते त्या राजाने व्यक्त केलेला हा निषेध आहे. आपल्या राज्यात नसलेल्या हिंदु जनतेची देखील त्यांस काळजी होती हेच यातुन दिसुन येते.

हे पत्र दिल्याबद्दल धन्यवाद Happy

अकबर,जहांगीर आणि शहाजहां यांची महाराजांनी स्तुती केलेली दिसते, ती वक्रोक्तीपूर्ण आहे की खरोखर??

विठ्ठल

जो माणूस दिल्लीची पातशाही आपल्या मांडीखाली दाबू इच्छितो तो खरोखर स्तुती करीत असेल असे वाटत नाही. त्यांनी स्तुती केली त्याला कारण म्हणजे त्यांचे स्वधर्मिय औरंगजेबाच्या राज्यात या कराखाली भरडले जात होते.

तेंव्हा त्याच्या पितरांची स्तुती करून या करातून सुटका मिळवता आली तर पाहावी हाच उद्देश असणार बहुतेक!

तथापि, राजांनी औरंगजेबाला थेट आव्हान दिलेले असल्यामुळे त्याने या पत्राकडे दुर्लक्षच केले असणार.

सेना
औरंगजेबाने या पत्राला काही जबाब दिला असल्याची काही माहिती आहे का? जाणून घेण्यास आवडेल!

अकबर,जहांगीर आणि शहाजहां यांची महाराजांनी स्तुती केलेली दिसते, ती वक्रोक्तीपूर्ण आहे की खरोखर?? >>

गोड बोलून काम काढणे आहे. अरे हे बघ, तुझ्या पूर्वजाने देखील कर रद्द केला, त्याचे दाखले आहेत हे.

शिवाजी हे साधे व्यक्तीमत्व आपल्याला वाटते का? जस्ट क्युरियस?

त्यांच्या मनात मोगलाई बद्दल अपरंपार भक्तीभाव असता तर भूषणला त्यांनी कडेलोट नसते केले का?

>>>>> तर ही गोष्ट शिवरायांविषयी माझ्या मनात असलेल्या आदरात आणखी भर पाडेल. <<<<
होय, अन त्यागोष्टीमुळे तर अधिकच निश्चित होईल की राजे निव्वळ स्वतःच्या अंमलाखालील हिंदूचे हित बघत नव्हते तर आसेतुहिमालय अस्तित्वातील हिंदूंचे हित बघत होते !

सेनापती, समयोचित सुयोग्यवेळेस लेख आला हो तुमचा.. छान लेख.

साती, होय ते पत्र सत्यच आहे आणि त्यांना खरोखरीच मुघलांच्या आधीन असेलल्या हिंदूंविषयी कळकळ होती. आणि त्यांनी ती सत्ता झुगारून द्यावी ह्यासाठी प्रयत्नही भरपूर केलेत. असेही ऐकिवात आहे की मिर्झा जयसिंघास त्यांनी फितवायचा प्रयत्न केला. जर तो यशस्वी झाला असता तर मुघल सत्ता खाडकन उखडल्या गेली असती, पण मिर्झांची स्वामीनिष्ठा स्वातंत्र्यपेक्षा मोठी ठरली Wink शेवटी त्यांच्याच वंशजाने म्हणजे दुसर्या जयसिंगाने जोखड फेकलेच आणि स्वतंत्र झाला.

बाकी महाराजा छत्रसालना त्यांनी मदत दिली आणि मुघलसत्तेविरुद्ध उभे केले.

विठ्ठल,

ती अर्थात वक्रोक्तीपूर्ण आहे. गोड बोलून काम होतेका ते बघणे आणि नंतर निरुपाय झाला की हल्ला चढवणे ही नीती होती. आदिलशहाने जिंजीला शहाजीराजांना कैद केले असतांना असेच शाहजहानला गोड बोलून आपल्या बाजूला वळवले आणि त्याच्याकरवी आदिलशहावर दबाव टाकून शहाजीराजांना सोडवले होते.

अफझलखानास वाईच्या सपाट प्रदेशातून जावळीच्या जंगलात बोलवले हा त्यांचा सर्वात मोठा विजय होता. नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहेच.

होय, अन त्यागोष्टीमुळे तर अधिकच निश्चित होईल की राजे निव्वळ स्वतःच्या अंमलाखालील हिंदूचे हित बघत नव्हते तर आसेतुहिमालय अस्तित्वातील हिंदूंचे हित बघत होते !
<<
लिंबूभौ,
घाईगडबडीत औरंग्याला आसेतुहिमाचलचा राजा करून टाकलात पहा तुम्ही Wink

उत्तम

औरंगजेब मराठी वाचायचा? की त्याला लिहिलेल्या फारसी पत्राचा हा त्या काळच्या मराठी मधला तर्जुमा आहे?