इंद्रायणी काठी...

Submitted by Charudutt Ramti... on 1 September, 2015 - 07:14

इंद्रायणी काठी...

ह्या ईंद्राणी मुखर्जी ने चांगलच छळल राव. म्हणजे आधी, पहिल्या नवर्याला छळल. मग दुसर्या नवर्याला. मग पहिल्या नवर्याच्या दुसर्या बायकोपासून झालेल्या पहिल्या मुलाला छळल. त्या नंतर तिसर्या नवर्याच्या दुसर्या मुलीलाही छळल. ते झाल्यावर काही दिवस दुसरा नवरा सोडून गेल्यावर आणि तिसरा नवरा मिळत नव्हता तो पर्यंत ज्या माणसा सोबत राहत होती त्या माणसाच्या पहिल्या बायकोला पण छळल. आणि आता सगळ्यांना छळून झाल्यावर, अख्या देशाला छळतीय. अहो असे एखादे कॅरक्टर जर सुभाष घई ने किंवा संजय लीला भन्साळीने एखाद्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या गळी उतरवायचा प्रयत्न केला असता ना, तरी इंटर्वल च्या आधी पहिल्याच हाफ मधे लोकांनी “च्यामारी येडा बनवतो नुसता” अस म्हणत माव्याच्या पिंक मारत थिएटर बाहेरच लाखोली वाहिली असती. संस्कार भारती पुरस्कृत अखिल भारतीय नारी संघटन वगेरे 'मंच' पुढे येऊन भारतीय नारीस अश्या ‘हीन’ प्रकारे दाखवल्या बद्दल एखाद्या मल्टिपलेक्स वर 'पोळपाट-लाटणे' मोर्चा काढून 'शो' खाली उतरवाय लावला असता. त्यावर न्यायालयात केस झाली असती. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वर फैरी झाडल्या असत्या. पण आता ह्या इंद्रायणी, सॉरी इंद्रायणी नाही ईंद्राणी. तिच्या नावात 'यमा'तला 'य' बहुदा सायलेंट आहे, असो तर या बाईंनी जे जे काही म्हणून आमच्या समोर वाढून ठेवलय ते “कल्पेने परी सत्य...” वगेरे असल्या काही उक्त्या असतात ना त्या कॅटॅगरी एकदम फिट्ट बसणारे !
ह्या इंद्राणी बाईन्नि समाजाच्या काही फंडमेंटल गोष्टींनाच हात घातला आहे एकदम. लिव-इन-रीलेशनशिप मुळे लग्न संस्थाच मोडीत निघेल असला काही तरी फालतू बागुलबुआ करणार्या संस्कृती रक्षकांना ह्या बाईंनी दाखवून दिले आहे की, लग्न झालेल असूनही लिव इन रीलेशन शिप सांभाळता येते ( आणि व्हाइस-व्हरसा सुद्धा ! ) फक्त तुमची इच्छा पाहिजे. ह्या बाईन्नी पीटर, मिखाईल, शीना, राहुल, विधी, सिद्धार्थ ही त्यांच्या घरातली नावे अक्षरषा: प्रत्येक घरटी अजरामर करून टाकली आहेत तेही फक्त एका आठवड्या भरात. पीटर, मिखाईल, शीना, राहुल, विधी, सिद्धार्थ हे एक मेकांचे नक्की कोण याचा मात्र काही थांग पत्ता लागत नाही. तालुक्याच्या ठिकाणी एस-टी स्टॅंड च्या मागे मुतारीवर 'ग्रामविकास खात' कस “नारूचा रोगी दाखवा आणि शंभर रुपये मिळवा" अशी जाहिरात करते तश्याच धर्तीवर “ईंद्राणी चे नातलग ओळखा आणि शंभर रुपये मिळावा” अशी एखादी जाहिरात सीआयडी वाल्यांनीही करायला हरकत नाही. ही मिखाईल, पीटर, विधी, शीना वगरे मंडळी राखी पोर्णिमा, पाडवा आणि भाऊबीज वगरे सण साजरा करताना ताटात ओवाळणी टाकण्यापूर्वी 'आपण हिचे नक्की कोण - हे एकदा अफीडेव्हीट चेक करून मगच ठरवत असतील की काय?’ अशीच शंका येते कधी कधी.
आतल्या वर्तुळात अशी बातमी आहे की ईंद्राणी बाईन्ची चारच लग्न झाली कारण दोन ठिकाणी पदर जुळाला नाही आणि एक ठिकाणी देण्या घेण्याच जमल नाही अस म्हणतात. खर खोट देवच जाणे. चार-एक वर्षांनपूर्वी ईंद्राणी बाईंनी वटसावित्रीचा उपास धरला होता, 'जन्मोजन्मी हाच नवरा मिळूदे' म्हणत तर ह्या तिघां-चौघांना चांगलच कापर भरल होत आणि चौघातल्या दोघांना बीपी 180/110 इतक शूट झाल म्हणून केईएम ला अड्मिट कराव लगाल होत अस म्हणतात. बाकीचे दोघे मनान घट्टच म्हणायचे.
खर म्हणजे कोणताही न्यूज चॅनेल लावला तरी तिच्याच लग्नाची कॅसेट सुरू असायला हे ईंद्राणी-शीना-मुखर्जी खून प्रकरण म्हणजे काही एखादा राष्ट्रीय प्रश्न नव्हे. कोणत्या तरी वाहयात चरित्र्य असलेल्या बाई च्या हातून झालेला तो एक अक्षम्य प्रमाद आहे. ईंद्राणीच्या बाल्यावस्थेत तिच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारा मुळे तिचे वागणे कदाचित पराकोटीचे विक्शिप्त असेलही. पण ज्या तर्हेने मीडिया ने हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर नेले आहे ते पाहता न्यूज चॅनेल पाहणार्या प्रेक्षकांची अवस्था मात्र सध्या 'इंद्रायणी काठी लागली समाधी' अशी झालेली आहे !

चारुद्त्त रामतीर्थकर.
पुणे ( १ सप्टेबर २०१५ )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय आहे हे नक्की लफडे.. सगळ्या व्हॉटसपमेसेजमध्ये आपले हेच..

पहिल्या नवर्‍याचीदुसरी बायको पासूनझालेला तिसरा मुलगा वगैरे वगैरे..

पुढे मी वाचतच नाही.. आताही तेच झाले.. पुढे कदाचित ईंटरेस्टींग असेलही.. पण..

कोणीतरी मला हे नवरा बायको क्रमांक वगळता थोडक्यात सिम्प्लिसिटीमध्ये समजावेल का हे प्रकरण?

तालुक्याच्या ठिकाणी एस-टी स्टॅंड च्या मागे मुतारीवर 'ग्रामविकास खात' कस “नारूचा रोगी दाखवा आणि शंभर रुपये मिळवा" अशी जाहिरात करते तश्याच धर्तीवर “ईंद्राणी चे नातलग ओळखा आणि शंभर रुपये मिळावा” अशी एखादी जाहिरात सीआयडी वाल्यांनीही करायला हरकत नाही.
>>>>>

Rofl Rofl

MNC त असून? हा संबंध समजला नाही.
बरेच बातम्या व्हॉट्सपवर समजतात.
अध्येमध्ये साधारण दर दिवसाआड मोबाईलवर न्यूजहंट अ‍ॅप्लिकेशन चाळून घेतो.
पण हेडलाईन बघत ठरवत जातो डिटेल वाचायचे की नाही.
हि बातमी वाचली न वाचल्याने काही फरक पडणार नाही असे वाटल्याने स्किपली.

तालुक्याच्या ठिकाणी एस-टी
स्टॅंड च्या मागे मुतारीवर
'ग्रामविकास खात' कस “नारूचा
रोगी दाखवा आणि शंभर रुपये
मिळवा" अशी जाहिरात करते
तश्याच धर्तीवर “ईंद्राणी चे नातलग
ओळखा आणि शंभर रुपये मिळावा”
अशी एखादी जाहिरात
सीआयडी वाल्यांनीही करायला
हरकत नाही.
>>>>>+1