कृष्णपिसे

Submitted by गंगा on 31 August, 2015 - 16:48

रुणझुण रुणझुण नादत पैंजण , पैलतटावर निळसर साजण गं
निजले गोकुळ मागे ठेऊन चेहऱ्यावरती घुंगट घेऊन गं
चालले यमुनेकडे अंतर हे अधीरे, जळतसे,छळतसे मज कसे कृष्णपिसे गहिरे ….

हे एक नितांत सुंदर गाण ऐकल आणि वाटलं कि आपल्या मनाची अशी वेडी राधा कधी बर होईल ?
जी राधा निघाली आहे आपल्या सावळ्या कृष्णसाख्याकडे. निद्राधीन गोकुळाला मागे ठेऊन, पैंजणाचा हलकेच नाद करत निघाली अहे. खरंच भगवंतापर्यंत पोहोचण्याची विलक्षण ओढ ज्याला लागली तोच खरा जागा असतो. संसारी लोकांमध्ये संसारी असण्याचा घुंगट घेऊन जणू वावरत असतो तो. आपल्यासारख्या निद्रिस्त गोकुळाला मागे ठेऊन तो निघतो.… रुणझुणत्या अंतर्नादात…. मनाची राधा नकळत नेते सावळ्याकडे…पैलतीरावर पोहोचण्याची मग इतकी घाई होते कि तिकडे नेणारी वाट सुधा कधी एकदा संपते आहे अस वाटू लागत … राधा ज्याच्यावर गहिर प्रेम करते तो निळा सावळा साद घालत असतो….
साध प्रेम नाही बर हे, गहिर आहे … खूप खोल…गूढ… आत्म्याला भिडणार प्रेम…
इतक प्रेम आहे म्हणून वाट चालायला सुरुवात केली, तरी वाट खूप अवघड आहे बर…

झरझर येउन पदरा पकडून हसतो मज हा वारा,
अडविती लाटा अवघ्या वाटा पाउस कोसळणारा …

मनातल विचारांचं वादळ सारख मागे ओढत आपल्याला … संसार सागराच्या लाटा वाट अडवू पहतात… विकारांचा पाउस कोसळत असतो नुसता …पण ….

कुणी अडवावे , कोणास भ्यावे श्रीहरी सावरणारा …
जायचे पोचायचे इतके मज ठावे , हो जरी पळभरी, पण तरी मी त्याचे व्हवे……

प्रत्यक्ष श्रीहरी उभा आहे सावरण्यासाठी, फक्त त्याच होण्यासाठी जायचं आहे आपल्याला… क्षणभर जरी 'त्याच' होता आलं कि मुक्ती मिळालीच…. त्या क्षणासाठी वाट चालायची अहे….

या तीरावर ज्या बेड्या आहेत संसाराच्या त्या केवळ देहाला बांधणाऱ्या आहेत … मनाची राधा तर फक्त त्या तीरावरच्या निळसर साजणाकडेच धाव घेते अहे. शतजन्मांची तहान शांत करू शकेल असा केवळ श्रीहरीचा पदस्पर्श अहे… मनाच्या या राधेला कृष्णाच्या बासरीचा सूर व्हायचं आहे जणू …. ऐलतीरावर अस्तित्वच नको आहे या राधेला… कृष्णमय होऊन जायचं तिला …

या तीरावर जरी अंगावर पाश मला छळणारे , त्या तीरावर दिसते लाघव निळसर मोहवणारे
एका स्पर्शी शतजन्मांची तहान शांतवणारे …
एकदा येउदे कानी ती मुरली, खूण ही या तीरी ना जरी माझीही उरली ……

माझ्या मनाची अशी राधा कधी बर होईल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users