अंत नसलेल्या कथा- ५

Submitted by साजिरा on 31 August, 2015 - 02:13

तानीमावशीचं असं कळल्यावर श्रीपुमामा जणू विझल्यागत झाला. तीन दिवस झाले तरी पूर्वपदावर येण्याची चिन्हं दिसेनात. त्याच्या चेहर्‍यापेक्षा गालफडं मोठी दिसू लागली, आणि आधीच फाटका असलेल्या कपड्याचं पायपुसणं करून खूप दिवस वापरल्यावर विरून जातं तसा तो केविलवाणा दिसू लागला. झोपला तरी वरून कुणीतरी टाकल्यागत, आणि नाईलाज होऊन हलण्याचं बळ संपल्यागत तो पडून राहू लागला. हे तीन-चार दिवस मी शेजारच्या पाराची सावली उशाला घेऊन पहुडल्यागत नुसताच बसून-पडून होतो. तानीमावशी मला सगळीकडे दिसत होती. डुलकी आली तरी उधाण येऊन हसत सुटलेल्या तानीमावशीचा भास होई आणि मग लख्ख जाग येई. रात्रंदिवस अंधारा-उजेडाच्या आरपार बघत मला ती गुबगुबीत ऊबदार खोबर्‍यासारखी कैरी दिसत असे. तिच्या तिखट मीठ लावल्यानंतरच्या वासाच्या भासाने जणू मला खुळावून सोडलं होतं. पोटभर खाऊन सुस्तावलो, तरी या भासाने मला पुन्हा कडकडून भूक लागत होती. बकासूरासारखा मी चार-पाच वेळेला जेवत होतो, आणि मला खाऊ घालणं एवढं एकच कर्तव्य उरून राहिल्यागत श्रीपुमामा मला भक्तीभावाने जेऊ-खाऊ घालत होता. माझ्या दोन खाण्याच्या वेळांमधला काळ पुन्हा तसाच- कुणीतरी फेकून दिल्यागत पडून राहत होता, आणि मी तानीमावशीच्या असंख्य गोष्टी आठवत पारावर बसून राहत होतो. तिच्यावर मी लिहिलेल्या निबंधाचे इकडे येताना मोटारीतून फेकून दिलेले ते ताव मास्तरांना मिळाले असतील का, आणि वाचल्यावर त्यांना काय वाटलं असेल याचा विचार करत. मला आता खरंतर निबंधात लिहिलेल्याच्या कितीतरी पट जास्त गोष्टी आठवून वारूळातून असंख्य मुंग्या बाहेर निघून इकडे तिकडे सैरावैरा पळून सारी जमीन काळी होऊन रवरवत हलताना दिसावी तसं माझ्या डोक्याचं होऊन जात होतं.

एक नवा आणि मोठा निबंध लिहिला पाहिजे, पण त्याला बरेच ताव लागतील, ते कोण घेऊन देईल आणि मग तो लिहिला तरी दाखवायचा कुणाला याचा विचार करत मी गप्प राहत होतो.

चौथ्या दिवशी झोपेतून श्रीपुमामा ढास लागून घाबराघुबरा होऊन उठला आणि मला मिठीत घेऊन केविलवाणं रडू लागला. 'कमळी स्वप्नात आली होती पोरा--' काहीतरी भयंकर घडलेलं एकदाचं सांगून टाकण्याची घाई झाल्यागत तो म्हणाला, 'तुझ्यामध्ये आता कुणाकुणाचा जीव अडकला आहे- याची यादी बघूनच मला बावरल्यागत होतं.. कसं करायचं तुझं- याचा मोठा घोर लागून राहिला आहे बघ. मी असा फाटका-विरला माणूस. आयुष्यभर माझंच काही धड झालं नाही माझ्या हातून, पण आता तुझं जरा काही नीट नाही झालं तर सुम्मी-कमळी-तानीचे आत्मे मला माफ करत नाहीत बघ.' त्याचा चेहरा बघून मला काहीच समजेना. मी त्याच्या चेहर्‍याकडे बघत होतो खरा, पण तो माझ्या आरपार पलीकडे काही दिसल्यागत लहान बाळाच्या नजरेने बघत होता.

मग अचानक चटका लागल्यागत त्याने माझे हात झटकले आणि पुन्हा कोपर्‍यात जाऊन खुरमांडी घालून बसला. मला त्याची खरं तर दयाच येऊ लागली होती. तुटलेली चप्पल पुन्हा पुन्हा जोडत खूप सामान वाहून नेताना पाय ओढत तो चाले, तेव्हा मला वाटायचा- त्यापेक्षा कितीतरी गरीब आता तो दिसत होता. आता तर त्याला चपलेचं तर सोडाच, पण रोजच्या जेवायखायचंही भान राहिलं नव्हतं. आताही तसं गुडघ्यांत डोकं घालून तो किती घटका बसला होता देव जाणे, पण मग पुन्हा तसाच चटका बसल्यागत तो पुन्हा उठला, आणि 'इथंच थांब, खाऊन घे, मी येतोच घटकाभरात' असं बजावून पायांची हाडं ओढत त्याला न शोभणार्‍या लगबगीने निघून गेला.

एव्हाना सूर्य कलून निवल्यागत झालेला आणि माझी पारावरची जागा आता पुन्हा छान तानीमावशीच्या कैरीसारखीच ऊबदार झालेली. मी तिथं बसून पाय हलवत पुन्हा तानीमावशीच्या निबंधाचा विचार करू लागलो. अनेक वाक्ये आठवत होती, आणि कोंबडीच्या पिलांगत पुन्हा इकडे तिकडे सुटून जात होती. लिहायसाठी तावांचं काहीतरी लवकर जमलं तर बरं होईल, असं डोक्यात आलं आणि तेवढ्यात बैलगाडीचा आवाज आला म्हणून मी वळून बघितलं, तर श्रीपुमामासोबत त्याच्यासारखाच, विरल्यागत दिसणारा एक माणूस आला होता, आणि दोघं मिळून त्याची कपडे शिवायची मशिन हलवत होते. मेलेलं ढोर बैलगाडीत भरताना त्याच्या शिंगांचा खाटखाट आवाज यावा तसाच आवाज ती मशिन हलवताना येत होता. शर्थीनं ती गाडीत चढवल्यावर बर्‍याच दिवसाच्या धापा टाकायच्या राहून गेलं असल्यागत ते दोघे धपापू लागले. आपला भाता प्राणपणाने फुलवत श्रीपुमामा क्षणभर माझ्याकडे बघत राहिला, आणि मग घाम पुसत आजारी-हरलेल्या आणि चिरक्या आवाजात स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला- '..नाहीतरी इथं तिचं काही काम राहिलं नव्हतं. आजवर केलं खरं काम शिवायचं, पण ते एकंदर फाटकंच म्हणायचं बघ! इथं पडून राहून ती नि मी एकमेकांचं सरणं बघत राहायचं म्हणजे काय खरं नव्हे. मला आता काही कणसं लागणार नाहीत खरं, आणि तीही पडून राहून बिचारी गंजली असती, त्यापेक्षा नवीन ठिकाणी तेलपाणी तरी होईल तिला. आणि जाताना तुझं दोन आणे कल्याण करून गेली ती, तरी भरून पावलो बघ..'

श्रीपुमामा नंतर बरंच काही पुटपुटत होता, पण मला ते मला फारसं कळलं नाही. दुसर्‍या दिवशी सदाप्पाच्या दुकानात त्याने मला नवे कपडे घेतले. नवं दप्तर, पाटी पेन्सिल आणि किडूकमिडूक गोष्टी घेतल्या. सारं झाल्यावर लग्नाचा बाजार झाल्यागत थकल्यागत पण समाधानाने त्या सार्‍या वस्तूंकडे पाहत राहिला. 'इतके कपडे शिवले बघ आयुष्यात..' तो माझे नवे कपडे ताम्हणात देव घेतल्यागत हातात घेऊन कुरवाळत म्हणाला, '..पण असा छान वास आला नाही कधी त्यांना. गरीबाघरचे असल्यागत सदा मलूल, बेरंगी आणि चुरगळ सारी. असा श्रीमंती कडक थाट आणि लख्ख उजळ रूप कधी नव्हेच बघ ते..'

रस्त्याने चालत असतानाही तो सतत पुटपुटत होता- आता ही एक नवीनच सवय त्याला लागली एवढ्यात. घरी आल्यावर त्याने सारं आवरून घेतलं. माझंही सारं आवरलं. आवरायला तसं काय फार नव्हतंच. नवीन वस्तू त्यातल्या जास्त काळजी घेत जोजवल्यागत करत त्याने नीट बोचक्यात बांधल्या- इतकंच. मग थकल्यागत थोडं बसून राहिला. डोळ्यांची खापरं झाल्यागत मातकट निस्तेज नजरेने घराला न्याहाळत राहिला. मग आढ्याकडे नजर लावत म्हणाला, 'चल आता, निघू. रावबाजीशी बोललो आहे काल मी. आता तेच आपलं घर. या घरात पुन्हा माझी हाडं गोळा होऊन आली तर चालेल एकवेळ. पण तुला पुन्हा इथं यायला नाही लागलं, तर या मोडल्यातुटल्या आयुष्यात खूप कमावलं असं म्हणेन मी..'
***

कितीतरी युगे आपण पायी चालतो आहोत, असं मला वाटू लागलं होतं. म्हणजे तसा मी मजेत चाललो होतो आजूबाजूला बघत, पण बोचकी उचलत ठेवत रस्ता पायाच्या बोटांनी कधी चाचपत तर कधी भोसकत चालणारा श्रीपुमामा बघून मला कधी एकदा रावबाजींचं घर येतंय असं झालं. हे नाव बाजीराव नसून असं उलटं का आहे, असं मी एकदा मामाला विचारलं देखील. तर तो म्हणाला, 'तसं सारं उलटंच आहे पोरा. पण गरीबाला असं काही म्हणायचा अधिकार नसतो ते सोड. या माझ्या आत्तेभावाच्या दारी अशी मजूरी करायला कधी जायला लागेल, असं मला कधी वाटलं नव्हतं. पण आता झालं की नाही उलटंसुलटं? पण ते एक देवाची इच्छा म्हणून सोडून द्यायचं ठरवलं बघ. तुझं शिकणं बिनधोक चालू राहावं आणि तू लवकर मोठा व्हावास एवढंच काय ते आता सरळपणे व्हायला हवं.'

मग कवठाची उंचच उंच तीन-चार झाडं दिसल्यावर आणि त्यांच्या कुशीतनं थोडं वळून पुढे आल्यावर एकदाचं ते रावबाजींचं घर दिसलं. एखाद्या भल्यामोठ्या शेतकरी कुटुंबाचं असतं तसंच ते दिसत होतं. श्रीपुमामा धास्ती घेतल्यागत मला सारखा सूचना करत होता; आणि अंगण, शेजारचं खळं, घराच्या पाठीमागे आडोशाला केलेलं मोठ्ठं स्वयंपाकघर, आणि त्यापलीकडचं शिवार हे सारं डोळे मोठे करून साठवण्याचा प्रयत्न करत ठेचकाळत मी चालत होतो.

श्रीपुमामानं पडवीत बोचकी ठेवली आणि आणि त्यांच्याशेजारी तसाच उकिडवा बसला. मलाही खुणेनं शेजारी बस म्हणून सांगितलं. मग ओसरीतून बाहेर येताना दिसले तेच रावबाजी असं ताडून मी बघत राहिलो.

ते आले तसा कसला तरी भपकारा आल्यागत झालं. लाल डोळ्यांनी ते श्रीपुमामाला झोपेत बरळल्यागत मला न समजणारं काय काय सांगत होते, आणि मी आजूबाजूला आणि घराच्या आतमध्ये जमेल तेवढं बघून घेत होतो. मला तिथंच सोडून ते दोघे बाहेर गेले. रावबाजींनी श्रीपुमामाचा दंड पकडला तेव्हा श्रीपुमामा आणखी लहानखुरा दिसू लागला. पाय ओढत चालण्याची त्याची पद्धत आणखीच मुद्दाम दिसल्यागत खुपू लागली. हाकेच्या अंतरावरच्या विहिरीजवळच्या एका झोपडीजवळ ते दोघे गेले तेव्हा तर मला श्रीपुमामा शोधून काढावा लागत होता.

मी ओसरीतून हळूच आत शिरलो. उजव्या डाव्या बाजूला दोन दोन खोल्या दिसत होत्या आणि प्रत्येक दरवाजातून त्याचा स्वतःचा असल्यागत एक वास येत होता. मग पुढे सरळ माजघराकडे आणि मग डावीकडे वळून पुन्हा बाहेरच्या स्वयंपाकघराकडे जाता येत असावं. कसला तरी खरखरण्याचा आवाज आला म्हणून मी उजवीकडे वळून बघितलं तर बारीक अंधारा बोळ. जेमतेम एका माणसाला जाता येईल असा. चार पावलं टाकल्यावर मला कळलं, तिथंही शेवटी एक खोली आहे. अंदाज घेऊन चौकटीत उभा राहिलो, तर खोलीत अंधार मावत नाही म्हणून बाहेर यायचा प्रयत्न करत असल्यागत वाटत होता.

काय वाटलं असेल, पण मी बोलावलेलं असल्यागत आत गेलोच. खोलीत बरंच सामान असावं असं अंधुकसं दिसत होतं. खरं तर अख्खी खोलीच चित्र काढल्यानंतर मग लहर फिरल्यागत उरलेल्या रंगांत काळा रंग मिसळून फासून टाकल्यागत दिसत होती. काहीतरी घाण वासांच्यामध्येच काहीतरी हवंहवंसं असल्यागत वाटत होतं, आणि त्याचा मवाळ ऊबदार वासही सोबतच नाकाला झोंबत असल्यागत भास होत होता. कसलासा शिळा, कडू, कुजका आणि तरीही गोडसा वास तिथं भरून राहिला होता.

असं फिरत असतानाच मला एक खाट असल्याचं तिथं जाणवलं, आणि काजवे चमकल्यागत त्यापुढची जाणीव मला झाली- ती म्हणजे एक म्हातारी तिथं झोपली होती. मी न राहवून थोडं वाकून बघितलं, आणि इतक्या अंधारातही तिचे ते डोळे मला दोन कंदिलांगत दिसले. कुठूनतरी हात आला आणि मला कसलासा खरखरीत स्पर्श झाला.. मी जिवाच्या आकांताने उठून किंचाळलो खरा, पण तो आवाज खोलीच्या बाहेर तरी गेला असेल की नाही कुणास ठाऊक. धडपडत बाहेर येताना मला अवचित जाणवलं- आई किंवा तानीमावशी खूप जख्ख म्हातार्‍या झाल्या असत्या तर त्यांच्या हाताचा स्पर्श असा झाला असता कदाचित. तसा हात आईचा अंमळ लवकरच झाला असता खरं तर. तानीमावशीचा व्हायला वेळ लागला असता- पण ती तर गेलीच. अक्षरशः पुसून टाकल्यागत. तानीमावशी आठवली तशी कैरी देखील आठवली, मग येताना नुकतीच दिसलेली अन वाकेस्तोवर लगडलेली कवठाची झाडंही.

अजून काय काय आठवलं, ते सांगताच येणार नाही, पण आई आणि तानीमावशीच्या मृत्यूचं सावट जणू एकत्र येऊन त्या बोळात साचून राहिलं होतं, आणि मला भिववत होतं. मी हवालदिल होऊन तिथून जडावलेले पाय कशातूनतरी सोडवून घेण्याचा प्रयत्न करत लगबगीने बाहेर पडलो. उजेडाची चौकट दिसल्यावर त्या चौकटीत कुणी मुलगी अचानक सूर्यागत उगवली असंही मला जाणवलं, आणि अलीकडे चार पावलं मी थबकून उभा राहिलो.

'चिंताण्णाने सांगितलं काल मला तुझ्याबद्दल-' वेणीतून वांडपणे बाहेर सुटून निघालेल्या आणि पाठच्या प्रकाशामुळे रूपेरी भासणार्‍या केसांच्या कमानीतल्या चेहर्‍यातून किनरा आवाज निघाला, 'चल आपण केळींकडे जाऊ. आम्ही कालच एक छान घर बांधलंय. परसात वाटाणे आणे तुरीच्या शेंगा लावल्यात. आणखी म्हणजे आम्ही आता अभ्यासही तिथंच करणार आहोत. आणखी म्हणजे तिथं दिवा लावायलाही सांगितलंय आमच्या अप्पांना. पण खरंच लावला तर खरी गंमत. दाखवत्ये तुला, चल-'
***

मग घरातून बाहेर पडताना कुठून कुठून उगवल्यासारखे त्या घरातले लोक दिसत राहिले. असं मोठं कुटुंब मी कधी बघितलंच नव्हतं, त्यामुळे मला जरा बावरल्यागतच झालं. कुणी माझ्याकडे हसून बघत होतं, तर कुणी रोजच येणारं एखादं कंटाळवाणं माणूस असल्यागत. मला श्रीपुमामाने नंतर सांगितलं- रावबाजींचं अख्खं एकत्र कुटुंब इथं राहतं. रावबाजी सर्वात मोठे, चिंताण्णा आणि अप्पा हे धाकटे भाऊ. नानी, विमलताई नि कपामावशी- या त्यांच्या बायका.

आणि या सार्‍यांची मुलं.

शिवाय ती म्हातारी म्हणजे ताराज्जी. रावबाजींची आई.

मागल्या दाराने आम्ही बाहेर पडलो, तोपर्यंत आम्ही एकमेकांची नावं विचारून घेतली होती. तिचं नाव राजी. मला ते ऐकायला फारच गोड नाव वाटलं. मग मी समोर बघितलं, तर समोर भाजीपाल्याचे वाफे दिसत होते आणि त्यापुढे लांबपर्यंत पसरलेलं शेत. राजीच्या मागे मी चालत राहिलो. शेताचा एक तुकडा पार केल्यानंतर आम्ही डावीकडे वळलो आणि मला थेट केळीची बागच दिसली. मला एकदम गोड सुवासिक हवेची लहर अंगावरून गेल्यागत वाटलं. हिरवागार गोडवा खांद्यावर घेऊन आभाळाकडे बघत गाणी म्हणत उभं असल्यागत ती केळींची रांग दिसत होती. खूप लख्ख चंद्रप्रकाश असलेल्या रात्री कधीतरी रस्त्याने पळताना वर बघितल्यावर चंद्रही माझ्यासोबत पळताना दिसतो, तेव्हा ऊचंबळून येऊन वर हात आणि चेहरा करून मी आणखीच जोरात पळतो- ते मला आता आठवलं.

मी जवळ गेलो तेव्हा त्या केळीच्या रांगांकडे बघतच राहिलो. असे केळीचे घडचे घड झाडाला लगडलेले मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो. शेकडो शोभिवंत झुंबरं टांगल्यागत तो शेताचा तुकडा दिसत होता. काही झाडांवरच्या घडांना तर माझा हातही पुरत होता. मी त्या घडाला झोका देण्याचा प्रयत्न केला, तर एकदा कधीतरी मास्तरांच्या सहलीत चर्चची घंटा हलवताना जसं वाटलं तसं मला वाटलं. आभाळाकडे बघून हसत गाणी म्हणल्यागत चेहरा करून इतका अगडबंब भार पेलणार्‍या त्या झाडाचं मला कौतुकच वाटलं.

त्या तुलनेत आंब्याचं झाड केवढं मोठ्ठं.. अन फळं ही एवढीशी. आणि येताना ती भलीमोठी प्रचंड कवठाची झाडं दिसली होती, तीही तशीच. टिकल्यांएवढी फळं घेऊन उगाच तोर्‍यात उभी असल्यागत.

आणि केळींच्या शेजारी विहीर आहे - हेही मला फारच आवडलं. उगाच आंब्याच्या, कवठाच्या, किंवा पेरूच्याही, झाडांशेजारी विहीर असलेली काय फार याच्याइतकी शोभली नसती. त्यात आणखी एक छान म्हणजे- विहिरीवर जायला ओटा बांधला होता, आणि तिथं गेल्यावर केळीचा मांडव वरच्या मजल्यावर चढून कसा दिसला असता, ते बघता येत होतं. तिथंच खाली बसून वाकून बघितलं, की मांडवाखालची हिरवीगच्च श्रीमंती बघून भर उन्हात एकदम नदीत उडी टाकून सारं काही थंडगार करून घेतल्यागत वाटत होतं.

राजी देव्हार्‍यातल्या घंटीसारखा आवाज करत सारखी बोलत होती, आणि मला तिच्या नवीन बांधलेल्या घराबद्दल सांगत होती- त्यामुळेही ती केळीची बाग आवडली असेल- सांगता येत नाही. तिचं घर बघितल्याशिवाय मला काही बोलता येत नव्हतं, पण मी गप्प असल्याने तिचं सारं बोलणं केळीच्या घडा-झाडांकडून आल्यागत मला ऐकू येत होतं. विहिरीभोवती बांधून काढलेला उंचवटा ओलांडून आम्ही पलीकडे उतरून गेलो, तर केळीच्या बागेचा तुकडा संपला होता, तिथं मला ते घर दिसलं- दोन वीत उंचीचं, लाल मातीचं. मातीच्या भिंतींत उभ्या आडव्या काड्या टाकून खिडक्या केलेल्या. दारं आणि चौकटी तिच्या अप्पाने तयार करून दिल्या- असं तिनं सांगितलं. शिवाय वाळक्या गवताच्या छोट्या पेंड्या करून शाकारलेलं छप्परही.

मला तिनं तिथंच खाली बसवलं, आणि स्वतः समाधानाने चमकत्या डोळ्यांनी तिच्या त्या घराकडे पाहू लागली. मी वाकून दरवाजाच्या आत काय दिसतं का ते पाहू लागलो, तर ती हसून म्हणाली, 'हॅट! ते काय राहायला वगैरे नाही. तेच खेळताना आपल्यासोबत राहतं इतकंच. तसंही मोठ्ठं झालं की आयुष्यभर घरं बांधून राहायचंच आहे ना..'

या घरासोबत आपण नक्की काय खेळणार असं मी विचारणार होतो, पण ती सारखं बोलतच होती. म्हणजे बडबड अशी नाही, कारण मला ते तिचं तसं छान आवाजातलं छान बोलणं आवडलंच. पण तिला असं सलग छान बोलायला कसं सूचतं याचं मला थोडं नवलच वाटत राहिलं. पण मी गप्पच राहिलो. तसंही जास्त प्रश्न विचारण्याइतकी काय ओळख आमची अजून नव्हती. मग तिच्याच बोलण्यातून कळलं- मी घाबरलो होतो, तशी तीही तिच्या त्या ताराज्जीला खूप घाबरते. म्हणजे तशी ती सध्या आजारी आहे, पण चांगली असते, तेव्हा ती तिच्या आईला, काकूला खूप शिव्या देत असते दिवसभर. रावबाजी, चिंताण्णा आणि अप्पा देखील तिला जरा घाबरतातच. रावबाजींची दोन्ही मुलं खूप दांडगटपणा करतात, आणि हे मातीचं घर तोडून टाकायची त्यांनी धमकी दिली आहे. त्यांची आई- तिचं नाव नानी- ती मात्र तिला जीव लावते. आणि नेमकं तेच त्या मुलांना- हंपू आणि गोपुला आवडत नाही. विमलकाकुला एक खूप लहान बाळ आहे, त्याचं हातपाय लालगुलाबी आहेत, पण तिला हात लावायला मात्र अजून भिती वाटते. हंपू-बाबा रानटीपणा करून त्या बाळाला ओढतात, आणि त्यावरून विमलकाकु अनेकदा कशी रडकुंडीस येते वगैरे.

राजीच्या चेहर्‍याभोवतीच्या वेणीतून सुटून निघालेल्या आणि तिच्या बोलण्यासरशी सतत हलणार्‍या अन उडणार्‍या केसांकडे मी बघत हे सारं ऐकत होतो. तेवढ्यात श्रीपुमामाची हाक आलीच. मग आम्ही दोघं सारं बोलणं संपल्यागत गुपचूप बांधावरून चालत पडवीत आलो, तेव्हा श्रीपुमामा उकिडवा बसून रावबाजींशी बोलत होता. मला त्यातलं थोडंफार अर्धवट कळलेलं इतकंच, की इथल्या मुलांसोबत माझीही शाळा होईल आणि ती नीट व्हावी म्हणून इथं श्रीपुमामा वाटेल ते काम करणार होता. रावबाजींची गप्प बसून तिसरीकडेच पाहत होते, मध्येच एखाद्या प्राण्याने काढावा तसा गुरगुरण्याचा आवाज काढत होते.

बराच वेळ श्रीपुमामा तसाच बसून होता. मग रावबाजी उठले, आणि बाहेर कुठंतरी निघून गेले. श्रीपुमामा नाईलाज झाल्यागत भुईवर तळवे रेटून उठला, आणि माझा हात पकडत म्हणाला- चल. मग आम्ही पडवीतून बाहेर पडून सरळ निघालो आणि हाकेचं अंतर होईल इतकं चालून एका झोपडीत शिरलो. इथं आधी गुरांना ठेवत असत, किंवा मग धान्य साठवणीची जागा असावी. बोचकी खाली टाकत श्रीपुमामा धापा टाकत खाली बसला. आणि मी बाहेर येऊन आजूबाजूला बघितलं.

समोर बघितल्यावर केळींच्या बागेचा तो तुकडा दिसत होता. उजवीकडे रावबाजींची पडवी, आणि मागच्या बाजूच्या स्वयंपाकघराचा काही भाग दिसत होता. या दोघांच्या मध्ये, आणखी थोडं पलीकडे कवठाच्या झाडांच्या फांद्यां बुडायला निघालेल्या सूर्याला तोलून धरण्यासाठीच जणू तिरक्या झाल्यागत दिसत होत्या. इथल्या या झोपडीपेक्षा श्रीपुमामाचं घर यापेक्षा बरं होतं खरं, पण तिथं अशी गोड वासाची हवा, नक्षीदार पानांच्या हजारो कमानी उभ्या करून दिमाख दाखवणार्‍या केळी, आणि पिवळ्या प्रकाशात हलून वार्‍यासोबत आवाज करणार्‍या कवठाच्या फांद्यांच्या जाळ्या नव्हत्या. शिवाय अशा संध्याकाळच्या उन्हात छान सोनेरी दिसणारे अन वेणीतून सुटून चेहर्‍याभोवती कमान झालेले केस बघून हसू यावं असंही कुणी नव्हतं..
***

शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले आणि राजीचं आणि माझं छानच जमलं होतं. एकंदरित श्रीपुमामाने ती मशिनची ब्याद विकून टाकून एका परीने बरंच केलं असं मला वाटू लागलं होतं. एकतर त्याला अंधारात ते शिवायचं कामच आजकाल जमायचं नाही. काही शिवलं तरी काहीतरीच अजागळपणा करून ठेवायचा. बारीक डोळे करून बघण्याची सवय त्याला या कामामुळेच लागली असावी. त्याच्या त्या अंधार्‍या घरात भुतागत राहण्यापेक्षा हे कितीतरी बरं होतं. इथं गुरांचं आणि खळ्यातली कामं त्याला बघावी लागत, आणि एकदा करून आला, की घटकाभरच्या धापा टाकणं ठरलेलं. पण तरी ते बरंच बरं म्हणायचं. शिवाय इथं नानी होत्या, राजी होती, विमलकाकुचं लालचुटूक रंगाचं छान बाळ होतं आणि अजून कितीतरी लोक. आणि माझा श्रीपुमामा तर माझ्यासोबत होताच होता. चिंताण्णानं अजून राजीच्या त्या छोट्या मातीच्या घरात दिवा बिवा लावून दिला नव्हता, पण असंही रात्री तिथं आम्ही जात नव्हतोच, त्यामुळे ते काय फार महत्वाचं नाही- असं राजीच म्हणाली नंतर.

अजून एक म्हणजे सकाळी झोपेतून उठलं की बाहेर बघितल्यावर केळीचा तो तुकडा नक्की सोनेरी आहे की हिरवा-पिवळा, असा गोंधळ व्हायचा- हे एक मस्त होतं. कैरीचं झाड शोधशोधूनही सापडलं नाही, पण विहीर, कवठं, रावबाजींची पडवी, राजी आणि केळीचा तो हिरवा-पिवळा तुकडा यांचा असा इतका छान नकाशा अजून कुठे जमून आला नसता.
***

'कच्चं केळं कसं लागतं रे श्रीपुमामा?' मी एकदा विचारलं तेव्हा श्रीपुमामा एकदम जागा झाला. तसा तो झोपत असायचा की नाही कुणास ठाऊक. पण कधीही हाक मारली की अस्साच जागा झाल्यागत भानावर यायचा. आताही उजाडून कितीतरी वेळ झाला होता, अन पडवीशेजारच्या गोठ्यात जाऊन तो बरीच कामंही करून आला होता. ते सारं झाल्यावर धापा टाकायसाठी खास जागा असल्यागत पुन्हा खोपटात येऊन उन्हाकडे बारीक डोळे करून बघत उकिडवा बसून होता. प्रश्न समजून घ्यायचा असल्यागत तो माझ्याकडे चार क्षणभर बघत राहिला, आणि मग हात वर उडवत म्हणाला, 'काय की रे! कच्ची काय नि पक्की काय- मी केळीच फार काही खाल्लेली आठवत नाहीत बघ. पण पिकलेल्यापेक्षा फार काय बरं लागत नसणार हे खात्रीनं सांगतो-'

मग एकदा धारवाडला जाऊन एका पाहुण्यांकडे कशी अमृतागत चव असलेली केळी खाल्ली होती- हे तो सांगू लागला. अमृत कसं लागतं असं विचारल्यावर तो पुन्हा गोंधळला, मग बर्‍याच वेळाने म्हणाला, '-आता असं आहे बघ, शिवणमशिनीच्या अंगाला रोजचेरोज तेलपाणी-पूसपास नि नवंकोरं रेशमी कापडचोपड लावलं तर तिला कसं वाटेल सांग बघू-' आता मला मशिनीचा इथं काय संबंध असणार, ते काही समजलंच नाही म्हणून मी त्याचा नाद सोडून बाहेर आलो, आणि केळीच्या नक्षीदार तुकड्याकडे बघत बसलो. मला वाटलं- हे असं इतकं विचारत कशाला बसायला हवं आहे. इथं एक-अर्ध्या हाकेवर हजारो केळी झुंबरागत लटकत आपली वाट बघत उभी आहेत. आपणच बघावं एखादं त्यातलं तोडून खाऊन.

मी दुपारी पडवीवर गेलो तेव्हा तिथं खूप माणसं बसली होती, म्हणून गोठ्याकडून स्वयंपाकघराच्या दिशेने गेलो, तर रस्त्यातच नानी दिसल्या. कशानं तरी रडल्या असल्यागत त्यांचे डोळे लालभडक दिसत होते. पण चेहरा मात्र देवीची मूर्ती दिसते तसा शांत आणि दुधाच्या सायीगत दिसत होता. माझ्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला आणि म्हणाल्या, 'राजीसोबत आता जा उद्यापासून शाळेला. अप्पाने बोलून ठेवलं आहे म्हणे शाळेत. दप्तर-कपडे आहेत ना?' मी मान डोलावली. मग त्या म्हणाल्या, 'चूलीपाशी जा. कवठाची चटणी खा थोडी. विमलला सांगत्ये-'

मी पुन्हा मान डोलावून गोठ्याला वळसा घालून उजवीकडे वळणार तेवढ्यात कोपर्‍यातल्या मोठ्या दगडाकडे माझं लक्ष गेलं आणि घसा बंद झाल्यागत मला वाटलं. ताराज्जी डोक्यावर पदर घेऊन तिथं बसली होती, आणि इतक्या उजेडातही तिचे दोन्ही डोळे तस्सेच दोन कंदिल लावल्यागत दिसत होते. तिच्या इतक्या सुरकुत्या आणि चेहर्‍यावरच्या हालचालींमधून ते हसते आहे की रागाने डोळे वटारून बघते आहे, तेच मला समजत नव्हतं. मी कसाबसा चुलीशी पोचलो, तर राजीही तिथं विमलकाकुसमोर बसून जेवत होती. कवठाची चटणी अंमळ आंबटच लागली, पण संपू नये असंही वाटत होतं खरं. खाऊन झाल्यावर राजी म्हणाली- चल केळीतल्या घराकडे जाऊ या- तर अगदी मनातलं बोलल्याप्रमाणे मी चटकन मान हलवली.

विहिरीकडे जाताना मी तिला विचारलं, 'कच्चं केळं कधी तू खाल्लं आहेस का?' तर खालचा ओठ क्षणभर दाबत ती म्हणाली, 'तुरट लागतं फार. त्यापेक्षा कच्चं कवठ बरं असं म्हण बघ.' तुरट म्हणजे कसं- ते मला नक्की कळेना. मी म्हणालो, 'आपण झाडावरच्या घडातलं एखादं केळं तोडून ते खाऊन बघितलं तर?' तर ती एकदम चालता चालता थांबलीच. म्हणाली, 'कच्चं केळं तोडू नये- आजी म्हणते. पाप लागतं. वाईट होतं काहीतरी. देवाकडून त्याचा प्रसाद हिसकावल्यागत होतं म्हणे.' मी केळींकडे पाहिलं तर केवढी तरी वजनाची केळ्यांची अजस्त्र झुंबरं पेलत कितीतरी झाडं ताठ उभी होती. आता इतक्यातलं एकही केळं तोडलं तरी वाईट?

मी न राहवून म्हणालो, 'कच्ची कैरी तर किती सुंदर लागते म्हणे. तिखटमीठासोबत. कैरी पण अश्शीच हिरवीगार असते बघ. केळं वाईट कसं लागेल?' तर श्रीपुमामासारखीच चार क्षणभर टक लावून बघत आणि मग बारीक डोळे करत ती म्हणाली, 'खरं म्हणतोस? एकदा बघू या का तोडून खरंच..?' मी काही न बोलता केळींच्या त्या कवायती नक्षीकडे बघत राहिलो. मग तीच म्हणाली- 'तिथं त्या आपल्या घराजवळ जाऊन थांब, मी गुपचूप तिखट मीठ आणत्ये. कुणाला सांगायचं मात्र नाही हां- लक्षात ठेव.' डोक्याभोवतीच्या केसांची सोनेरी कमान झुलवत उडवत ती पळत गेली, अन मी तिथंच विहिरीजवळ बसून राहिलो.

थोड्यावेळ्याने ती आली तेव्हा ओच्यातल्या कागदाच्या पुडीत लपवून आणलेला तिखटमीठाचा ऐवज तिने दाखवला तेव्हा आम्ही दोघे समाधानाने हसलो. मग बागेतल्या पाण्यासाठी केलेल्या वाफ्यांच्या उंचवट्यांकडे नीट लक्ष देत आम्ही थोडे आत गेलो. इथून आता पडवी आणि स्वयंपाकघराकडून कुणी बघत असतं, तरी काहीही दिसलं नसतं. एका भारीच उंच झालेल्या झाडाला लागलेल्या केळ्यांच्या एका घडाकडे आम्ही मोर्चा वळवला आणि अंदाज घेऊन एकेक केळं चाचपू लागलो. सारीच केळी हाताला भयंकर कडक अलगत होती. सर्वात खालचं, म्हणजे घडाच्या बोंडाजवळचं केळं मी ओढणार तेवढ्यात राजी म्हणाली- ते फारच लहान आहे, आपण जरा मोठं बघू या. अख्खा घड दाटीवाटी करून बाहेर येण्याच्या प्रयत्न करत असल्यागत हिरव्यागार अन दगडासारख्या कडक केळ्यांनी भरला होता. तिनं मधल्या एका केळ्याला हात घालून ओढण्याचा प्रयत्न केला, ती तोल जाऊन धप्पकन वाफ्याच्या बांधापाशी पडलीच. हे इतकं सोपं नाही, हे लक्षात आलं तेव्हा दोघांनी मिळून ते केळं उपटण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला. पण ते बेटं भारीच चिवट निघालं. हनुवटीवर बोट ठेऊन खूप गहन विचार केल्यागत करून राजी म्हणाली, 'मला माहिती आहे, असं घडातून एकच केळं काढणं अवघड असतं. पिकलेल्या घडातून सुद्धा. हे तर कच्चंजाम आहे.' कच्चंजाम हा शब्द त्या केळ्याला अगदी बरोब्बर होता असा मी विचार करत होतो, तेवढ्यात ती पुढे म्हणाली, 'हे बघ- हा अख्खा घड तू अगदीच घट्ट पकडून ठेव. हलता कामा नये अजिबात. मी पिळून त्या एकाच केळ्याला बाहेर काढते- हां?' मला हे पटलं. आणखी बराच वेळ झटापट केल्यानंतर तिने तो घड घट्ट पकडावा आणि मी ते एकटं केळं पिळे देऊन देऊन बाहेर काढावं- असं ठरलं. त्यानंतरही बराच वेळ त्या केळ्याने आमची चांगलीच परीक्षा पाहिली, आणि त्या भल्यामोठ्या झाडाला जोरदार हिसका बसून ते एक हिरवं केळं माझ्या हाती येऊन मी दाणदिशी खाली मातीत कोसळलो. मी पडता पडता वरती बघितलं तर कुठच्या तरी माश्यांनी झाडाच्या आजूबाजूला रागाला आल्यागत जोरदर पळापळ सुरू केली होती..!

'गांधीलमाश्या आहेत त्या.. पळ!' राजी खच्चून ओरडली, तसा भान येऊन मी मातीतून उठलो. मी वाफ्यांतून बाहेर पडण्याच्या रस्ता शोधण्याच्या प्रयत्नात एकदोनदा पडलो, पण विहिरी शेजारच्या उंचवट्याच्या दिशेने पळायला सुरूवात केली, आणि बाहेर आलो. मी पुन्हा वर बघितलं तर डिवचल्यागत माशा सार्‍या आभाळाभरून उडत असल्यागत दिसत होत्या. राजी पार पुढे पळून गेली होती, आणि तिच्या चपळाईचं नवल करत बांधावरून तोल साधत नीट पळायचा प्रयत्न करत असताना मला जाणवलं- माशा पाठलाग करत आहेत. शेवटी कानाच्या अगदी जवळ त्या माशांचा भयंकर आवाज येऊ लागला तेव्हा मी घाबरलो. दोन्ही हात हवेत फिरव- असं काहीसं दुरून राजी ओरडत होती, आणि त्याच वेळेला ढगांचा भितीदायक आवाज आल्यागत वाटलं, आणि पाठोपाठ कानाची पाळी बेदम दुखावल्याची जाणीव मला झाली. अंगात आल्यागत भितीची लहर माझ्या शरीरभर फिरली आणि मी किंकाळी फोडली. जीवाच्या आकांताने तसाच पडवीच्या दिशेने ओरडत सुटलो, आणि अंगणात लोळण घेतली. असलं जहरी दुखणं पहिल्यांदाच माझ्या वाट्याला आलं होतं. साप कसा चावतो, आणि तेव्हा आपल्याला काय वाटतं असा प्रश्न मी एकदा श्रीपुमामाला विचारलेला; पण तेव्हा धसका बसल्यागत चेहरा करून हवेत हात उडवत तो नेहेमीप्रमाणे बारीक डोळे करून उकिडवा बसला होता- हे मला आता आठवलं.

मी शुद्धीवर होतो की नाही कुणास ठाऊक, पण माझ्या कानाला नि गालाला खरखरीत हात लागले, तेव्हा दचकून जागा झाल्यागत उठून बसलो, तर कसलीशी काळीकरडी मातीचा चिखल ताराज्जी माझ्या कानाला लावत होती. तिच्या चेहर्‍यावरच्या खूप सुरकुत्या आणि तेच ते दोन कंदिल टांगल्यागत दिसणारे डोळे यांतून ती हसत होती की काय ते नीट कळत नव्हतं. जात्यात भरडताना आवाज यावा तशा आवाजात ती म्हणाली- कशाला रे बाबांनो त्यांच्या वाटणीच्या झाडाला हात लावायला गेलात?
***

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी कवठांजवळ बसून केळींकडे पाहत राजीसोबत बोलत बसलो होतो तेव्हा कानाची सूज उतरली होती खरी, पण थोडंसं अजूनही दुखत होतं. कालच्या त्या भयंकर दंशाची पुन्हापुन्हा आठवण येऊन मी शहारत होतो, आणि आता ते मातीचं छोटं घर सुद्धा बघायला तिकडे जाऊ या नको- असं मी तिला सांगत होतो.

राजी मात्र फारसं बोलत नव्हती, आणि मी पुन्हा पुन्हा विचारलं, तेव्हा ती म्हणाली- सकाळी घरात खूप भांडणं झाली, ती कशावरून होती काही कळत नव्हतं, मात्र रावबाजी नि अप्पा दोघे एकमेकांवर खूप ओरडत होते. मग मध्येच चिंताण्णा पडला. त्यातच कशावरून तरी विमलकाकु आणि राजीची आई- दोघी रडू लागल्या. पुन्हा कशावरून तरी बोलणं वाढलं, आणि चिंताण्णाने विमलकाकुला मारलंच.

उग्र दिसणारा हा चिंताण्णा बघितल्यासरशीच मला तसा फारसा आवडला नव्हता. तो काही मला वाईट साईट वगैरे बोलत नव्हता, पण त्याच्याकडे बघितल्यावर मला सारखी भाऊरावांची आठवण येई. आता त्याने कुणाला तरी मारलं- हे ऐकून तो अगदी भाऊरावांसारखाच आहे- हे माझ्या मनात पक्कं झालं. पण राजीला मात्र तो खूप आवडतो असं तिच्या बोलण्यावरून वाटायचं.

अंधार पडल्यावर आम्ही घरात जायला निघालो, तेव्हा पडवीवरून एकदम मोठ्या आवाजातला आरडाओरडा ऐकू आला. राजी धावत आत गेली, आणि मी बाहेर उभा राहून बघू लागलो, तर रावबाजी एकदम भिती वाटण्याजोगेच दिसत होते. त्यांनी अप्पांचा अंगरखा पकडलेला आणि दोघं अक्षरशः झोकांड्या देत होते. तशातच ताराज्जी बुडावर खुरडत बाहेर आली, आणि तिच्या त्याच खरखरीत आवाजात ओरडत डोळ्यांचे कंदिल भलेमोठे आणि भितीदायक करत हातवारे करत ओरडू लागली. मग चिंताण्णाही या सार्‍यांत येऊन आरडाओरडा करू लागला आणि एकच गोंधळ उडाला. मध्येच तोल जाऊन कुणीतरी ताराज्जीच्या अंगावरच पडलं. भयंकर दुखल्यागत ओरडत, 'माझे तुकडे करा. गोठ्यातल्या गुरांचीही आडवंउभं कापून वाटणी करा-' असं बरळू लागली. नक्की काय होतं आहे, नि कोण काय बोलतं आहे- याचा अंदाज घेत मी घाबरून बाहेर अंधारात उभा होतो. तेवढ्यात श्रीपुमामाचा हात खांद्यावर पडला, आणि त्याने खोपट्यात जाण्याची मानेनेच केली. या सार्‍या ओरड्यात राजीचा आवाज येत होता हे आठवून, आणि न राहवून मी त्याला विचारलं, 'का रे मामा हे असे ओरडत भांडताहेत?' तर खाली बघून पोक काढून चालताना तो श्वास थकल्यागत आवाज काढत मान हलवून म्हणाला, 'मोठ्यांच्या भानगडी रे. करायच्यात काय आपल्याला. चल भात खाऊन घे आता.'
***

त्यानंतर काही दिवसांनी ताराज्जी गेली. म्हणजे एक दिवस झोपली ती उठलीच नाही म्हणे. आम्ही दर्शनाला गेलो, अन तिथंच बसून राहिलो. अवचित श्रीपुमामा डोळे टिपताना दिसला, तेव्हा मला कळलंच- त्याला आई आणि तानीमावशीच्या आठवणी येत असणार. मी पुन्हा वळून समोर पाहिलं, तेव्हा झोपलेली ताराज्जी अगदीच छोटी- जेमतेम माझ्याएवढीच दिसत होती. तिचे मोठे डोळे मात्र बंद असूनही अजूनही तसेच दिवे पेटल्यागत दिसत होते. तिचा पहिल्यांदा झालेला, अंगावर काटा आणणारा तो खरखरीत स्पर्श मला आठवला, मग 'गांधीलमाश्यांच्या वाटणीचं केळीचं झाड' आठवलं, आणि मग तिनं माझ्या कानशीलावर लावलेला तो काळाकरडा चिखलही. मी हळूच राजीकडे पाहिलं तर आज्जीच्या चेहर्‍याकडे एकटक बघत ती शांत बसून होती.

इतक्या गर्दीत मला एकदम सुनंसुनं वाटू लागलं, मग तिथून उठून खोपटात येऊन बसलो. दूरवर केळींच्या आरपार बघताना माझ्या मनात आलं- आई नि तानीमावशी म्हातार्‍या न होताच गेल्या, नि सुम्मी तर कितीतरी कमी वयात. सुम्मी शेवटी कशी दिसत होती, ते बघायला हवं होतं. मला बघितल्यावर कदाचित काकणं किणकिणवत चटकन उठून ती 'मला इथून घेऊन जा रे-' असं म्हणालीही असती, कुणी सांगावं.
***

नंतर त्या पडवीला अगदीच अवकळा आल्यागत झाली. मुंग्यांची रांग लागल्यागत इतकी माणसं ये-जा करत होती त्या दहा बारा दिवसांत त्या दरवाजातून, पण ताराज्जीचा पहिला स्पर्श वाटला होता, त्याहीपेक्षा अभद्र नि भितीदायक ते घर मला दिसू लागलं. नाही म्हणायला नानी माया करत असायच्या नि राजी माझी आजवर कुणीच झालं नसेल इतकी जवळची मैत्रीण झाली होती- या गोष्टींची मला सावली बनून राहिल्यागत सोबत होती. अजून एक म्हणजे श्रीपुमामाला आता अजून काळीज जाळणं आपल्यापोटी करायला लागू नये- असं मला सारखं वाटत होतं.

काही दिवसांनंतर दरवाजातली मुंग्यांगत दिसणारी रीघ कमी झाली, पण ते घर आणखीच भकास दिसू लागलं. यात भर म्हणून दिवसागणिक होणारी भांडणं वाढू लागली. बरेचदा रात्री मी जेवून झोपलो, की रावबाजींच्या घरातून येणार्‍या आवाजाने मला जाग येत असे. सार्‍यांचे आवाज अगदी चढे- आणि त्या गोंधळात कोण काय बोलतं आहे काही कळत नसे. बाजूला बघितलं की श्रीपुमामा उकिडवा बसून खोकत छाती चोळत बसलेला दिसायचा. एकदा न राहवून या भांडणांबद्दल त्याला विचारलं तर स्वतःशी बोलल्यागत म्हणाला- 'काही नाही पोरा, वाळवी लागल्यागत झालं आहे ते घर. आता त्यांना वाटणीचे वेध लागलेत. खरं, तीही सरळपणे होती तर काय हवं होतं? इतकं सारं रेखल्यागत आणि तालेवार आहे खरं, पण अशा ठिकाणी अवदसा दबा धरून बसलेलीच असते बघ. अशीच एक अवदसा सुम्मीच्या घरात दडली होती, आणि शेवटी तिने जीवच घेतला बिचारीचा..'

आताशा श्रीपुमामा मोठ्या घरी जास्त थांबत नसे. गोठ्यातली नि खळ्याची कामं आवरली, की छातीचा पिंजरा हाताने दाबत हाश्शहुश्श करायला खोपटातच येत असे. नानींनी चहा वगैरे दिला तर तिथंच अंगणात किंवा पडवीत उकिडवा बसून पीत असे. पण नानींमुळेच, आणि राजीमुळेही असेल कदाचित- माझ्या तिकडे वेळ घालवण्याबद्दल तो कधी काही बोलला नाही.

एक दिवस मात्र मोठ्या घरातली भांडणं भयंकर वाढली. भयंकर आवाजाने हादरून गेल्यागत श्रीपुमामा घाईघाईने तिकडे निघाला. थोड्यावेळात न राहवून मीही तिकडे गेलो, तेव्हा फाटक्या चिरक्या आवाजात श्रीपुमामा रावबाजी, चिंताण्णा, अप्पा अशी सार्‍यांचीच समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता. मी पडवीपाशी पोचतो न पोचतो, तेवढ्यात कसल्याशा तिरमिरीत अप्पाने उठून श्रीपुमामाला ढकललंच, आणि म्हणाला, 'फाटक्या टिनपाटा, तू आहेस कोण इथं मध्यस्थी करायला?' कागदाच्या बोळ्यागत श्रीपुमामा कोपर्‍यात फेकला गेला. उठून तोंड पुसत कसंनुसं म्हणाला, 'कोण रस्त्यावरचं कशाला तुमच्यात येऊन काहीतरी सांगेल! फाटका असलो तरी लांबचा का असेना- नात्यातला भाऊ आहे तुमचा..'

हे ऐकल्यावर रावबाजी रावणागत चाल करून आले. कशाबशा उभं राहिलेल्या श्रीपुमामाला थोबाडीत वाजवत म्हणाले, 'भाऊ? म्हणून चिंत्याला केळीच्या व्यवहारात मदत केलीस? बागेतली केळी गुपचूप गाडीत भरून बाजारात न्यायला तूच मदत केलीस ना?'

त्या एका जोरदार फटक्याने श्रीपुमामा पार धूळ झाल्यागत पुन्हा जमिनीवर आडवा झाला. मला आता भिती वाटून रडू येऊ लागलं होतं. मी कसंबसं पुढं होऊन श्रीपुमामाचा हात धरला. एक हात जमिनीवर रेटत आणि एका हाताने माझा आधार घेत तो अर्धवट उठला खरा, पण पुन्हा चक्कर खाल्ल्यागत जमिनीवर कोसळला. तो थोडावेळ तसाच पडून राहत धापा खाऊ लागला, मग हळुहळू सारा जीव गोळा करत तो पुन्हा उठला. मला हाताशी धरत तो पडवीच्या पायर्‍या उतरला आणि खोपटाकडे जाऊ लागला. अंगणात गेल्यावर मी मागे वळून बघितलं, तर रावबाजी दातओठ खात अजूनही लाल डोळे करून श्रीपुमामाकडेच बघत होते. मला वाटलं- असंच उलटं फिरून चाल करून जावं, आणि रावबाजींना आडवं करून त्यांची पार धूळ करून टाकावी.

मी पलीकडे बघितलं- तर नानी खाली मान घालून बसल्या होत्या, आणि राजी एकटक माझ्याकडे बघत होती. इतक्या दुरूनही आज पहिल्यांदाच मला तिच्या डोळ्यांत दिवे पेटल्यागत दिसले. ते दिवे तिच्या चेहर्‍यापेक्षा मोठे होतात की काय असा भासही क्षणभर झाला. पण मी आवंढा गिळला आणि अपमान झाल्याची बोचही त्या दिव्यांसोबत आणि डोळ्यांत आलेल्या पाण्यासोबत जिरूनच गेली.

खोपटात येऊन रात्रभर श्रीपुमामा बसून राहिला. मी अनावर होऊन केव्हा झोपलो ते कळलंच नाही, आणि ओरड्याच्या भासाने आणि श्रीपुमामाच्या धापा टाकण्याच्या आवाजाने कितीतरी वेळा जाग आली. गुंगी येऊन मी तसाच पुन्हा झोपून गेलो. सकाळी जाग आल्यावर सवयीने बाहेर बघितलं तर केळीच्या तुकड्याचा तोच हिरवा-पिवळा-सोनेरी, जादूचा रंग. क्षणात भान येऊन बाजूला बघितलं, तर श्रीपुमामा तसाच बसलेला. माझी चाहूल लागून तो उठला आणि पडवीकडे जाऊ लागला. मी बघत राहिलो. नेहमीप्रमाणे गोठ्यात न जाता तो सरळ घरात गेला, आणि मग थोड्यावेळातच बाहेर पडून खाली मान घालून चालत राहिला, मग माझ्याशेजारी येऊन बसून राहिला. 'काय झालं श्रीपुमामा?' म्हणत त्याच्या वेड्यावाकड्या वाढलेल्या दाढीला लावत मी विचारलं. मग कर्तव्य केल्यागत हसून तो म्हणाला, 'काही नाही, चोरीलबाडीचा जुलूम सहन होत नाही, आणि जातो म्हणून सांगायला गेलो होतो. पण तिथं वाटणीची तयारी होते आहे. लहान पोरं भातुकल्या वाटून घेतात तसं वस्तू वाटणं चाललं आहे. तीन वेगळी घरं होणार म्हणे, आजच, लगेच- घटकाभराच्या आत. कवठाच्या शेजारच्या चार्‍याच्या घरात, आणि या इथं खोपटात तात्पुरते दोघे राहणार आहेत म्हणे- नवी दोन घरं बांधून होईस्तो. जातो म्हणून सांगायची वेळच आली नाही बघ. आपलंही इथल्या वाटणीचं संपलं. आता आवरू आपणही, चल..'

मला जरा बधिर झाल्यागतच वाटलं, पण मग कसाबसा बाहेर आलो. एकदा पडवीकडे आणि मग केळींकडे बघितलं. मग मंत्र पडल्यागत पळत विहिरीवर गेलो. उंचवटा ओलांडून हिरव्या तुकड्यात घुसलो. तिथं बघितलं- ते दोन वीत उंचीचं मातीचं घर कुणीतरी त्यावर नाचल्यागत मोडून पडलं होतं. थोडं आत शिरून चोरून बघितल्यागत वरती बघितलं- आतमधल्या त्या उंच झाडावरचं मधाचं पोळं अजूनही तिथंच लटकत होतं. मला माश्यांची भिती वाटली खरी, पण तिथून हलावंसं वाटेना. आयुष्यातलं शेवटचं काम असल्यागत माशा त्या पोळ्यावर काम करत असल्यागत दिसत होत्या. इच्छा नसल्यागत मग कानशीलं चोळत पुन्हा तसल्याच चोरपावलांनी मी बाहेर आलो.

किती वेळ गेला कुणास ठाऊक, पण परत आलो तेव्हा श्रीपुमामाने बोचकी बांधलेली होती. आम्ही बाहेर पडलो. पडवीच्या अलीकडेच उजव्या हाताला एक शीडं होतं आणि तिथून एक बारीक पायवाट मुख्य रस्त्याला जात होती. तिथं कोपर्‍यावर श्रीपुमामा थांबला. समोर स्वयंपाकघराच्या बाहेर आलेल्या नानी दिसत होत्या. श्रीपुमामाने किंचित मान झुकवून त्यांचा निरोप घेतल्यागत केलं. मी नानींकडे बघितलं, तर त्या आता एखाद्या पुतळ्यागत दिसत होत्या. श्रीपुमामाने मला पुढे ढकललं, मग मी रस्ता वाढून ठेवल्यागत चालू लागलो. मी पुन्हापुन्हा मागे वळून पाहिलं, पण आता कुणी दिसत नव्हतं. माझं दप्तर मी पाठीवर टाकलं नि श्रीपुमामासारखी खाली मान घालून मग मी पुढे चालू लागलो. कवठाजवळचं वळण येताच माझी मान आपोआप व्हायची असल्यागत वर झाली. पूर्ण वळण घेतल्यावर कवठाच्या खाली उभी असलेली राजी मला दिसली. मी थांबलो आणि श्रीपुमामाने शिकवलेलं असल्यागत हसलो. भान येऊन रस्त्याकडे बघितलं तेव्हा श्रीपुमामा बराच पुढे निघून गेला होता. मग धापा टाकत त्याच्याजवळ पोचलो. जरा वेळाने कधीच विचारलं नसल्यागत नि कित्येक वर्षांपासून राहून गेलं असल्यागत मी त्याला विचारलं- 'कच्चं केळं कसं लागतं रे श्रीपुमामा? आणि तिखटमीठासोबत खाल्लं तर?'

श्रीपुमामा माझ्याकडे बघत राहिला. मग दप्तर खाली ठेऊन छातीचा पिंजरा उडून चालला असल्यागत मी दोन्ही हातांनी पकडला, आणि शेवटचंच खोकून घ्यायचं असल्यागत डोळ्यांत भरपूर पाणी येईस्तोवर खोकत राहिलो.

***
***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय.. त्या निमित्ताने आधीच्या ४ कथाही वाचून आलो. सगळ्याच आवडल्या.

हो, 'तूती' आणि 'कैरी' चा सिक्वेल म्हणता येईल.
सुख हा आभास, आणि वेदना-दु:ख हेच अंतिम सत्य, आणि म्हणून सुंदर- याची पदोपदी जाणीव करून देणार्‍या जीएंच्या शैलीचं अनुकरण ही दुरापास्त आणि कल्पनेच्या पलीकडली गोष्ट. तूती-कैरीचं दु:ख आणि वेदना अशाच चिरंतन आणि पुन्हा पुन्हा मोहात पाडणार्‍या. त्यामुळे 'कैरी' नंतरचं लिहायचा प्रयत्न करून बघितला..

वाचकांना धन्यवाद.. Happy

अप्रतिम!
खूपच सुंदर लिहीलंय.
जीएंनीच हा पुढचा भाग लिहिल्यासारखे वाटले.

मला पण त्या मुलाचे पुढे काय होते ही कायम उत्सुकता होती. पहिले चार भागांची लिंक इथे देता येइल का? हार्ट ब्रेकिंग आहे अगदी.

"काय झाले असेल त्यानंतर....." अशी हुरहूर काही कथा मनी लावून जातात आणि कथेच्या यशस्वीततेचे ते एक प्रमाण होय. कथानकाने मनी घर केलेले असते आणि पात्रांनी त्यांचा हळवेपणा आपल्या सोबतीला ठेवलेला असल्याने नकळत त्यांच्याविषयी मनी प्रीती तर दाटून राहतेच शिवाय आता याचे वा हिचे पुढे काय होईल ? ही कल्पना पुस्तकाचे पान बंद करून ठेवल्यानंतरही आपल्याला सोडून जात नाही. अशी अवस्था फक्त त्या कथा करतात ज्याच्यातील पात्र जणू थेट आपल्याशी संवाद साधत आहे. त्याच्या सुखासोबत तर वाचक असतोच पण दु:खापासूनही तो दूर नाही जाऊ शकत.

जी.ए.कुलकर्णी यांच्या "कवठे", "प्रदक्षिणा", "पडदा", "तुती", "कैरी" अशा काही कथा आहेत की यातील व्यक्तिचित्रणाच्या निमित्ताने जी.ए. कौटुंबिक नात्यांची दाट अशी ओढ प्रकट करण्याची शैली विशेष रुपाने आपल्याला स्पर्श करून जाते. बाल्यावस्थेत अनुभवास येणारी निरागस, विशुद्ध भावजीवनाची त्यांना प्रौढपणी वाटत असलेली ओढ ज्याला समजावून घ्यायची असेल त्याने किमान "तुती" आणि "कैरी" या कथा अग्रक्रमाने वाचाव्यात.

साजिरा याना मनोमनी या दोन्ही कथा किती भिडल्या आहेत ते त्यानी तो "मी" बालनायक तानीमावशीच्या गावातून श्रीपुमामाकडे परत आल्यानंतर (आणि मावशीच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतरच्या दिवसापुढील आयुष्य जगताना) जे काही भोगले ते जणू काही प्रत्यक्ष अनुभवले आणि त्यानी आपल्या प्रतिभेने "काय झाले असेल त्यापुढे..." या कल्पनेचा पाठपुरावा अगदी त्याच रस्त्यावरून केला आणि त्यात ते खूप यशस्वी झाले हे त्यांचे लिखाण प्रभावीपणाने सिद्ध करते. जी.ए.कुलकर्णी वाचन करणे वेगळे आणि त्यांच्या शैलीला स्वतःच्या लेखनासाठी आपलेसे करणे वेगळे. खूप कमी लोक हे धाडस करू शकतील. खुद्द साजिराही आपण जी.ए.यांच्यासारखे लिहिले आहे असा दावा करणार नाहीत; पण हेही खरेच की त्याना त्या मार्गावरून जाण्याची इच्छा झाली कारण ते खर्‍या अर्थाने जी.ए.प्रेमी आहेत. ग्रामीण भागातील एका कुटुंबातील सुखदु:खे चितारणार्‍या "कैरी" तील "मी" ह्या बालकाच्या आत्मनिवेदनातून त्याच्या नजरेने टिपलेले भावविश्व आणि त्या अनुषंगाने आलेले अनुभव साजिरा यानी अतिशय बालसुलभ निरागसतेने नोंदविले आहेत. त्याच्या अवतीभवती घडणार्‍या सर्वच घटनामागील अर्थ आणि कारण त्याला कळत असतो अशातला भाग नाही. पण वाचकाला नेमके काय घडत आहे आणि त्याचे परिणाम पुढे काय होणार आहेत हे श्रीपुमामाच्या शोचनीय जीवन वाटचालीवरून समजत जाते आणि ते साजिरा यानी यथार्थपणे नोंदविले आहे.

"मी" च्या या कथेतील निसर्गसुलभ भावविश्व राजीच्या संगतीने फुलत चालण्याचे संकेत मिळत आहेत आणि ही एक शुभ घटना होऊ शकली असती कथानकाच्या दृष्टीने. तरीही इथेही नशीबाने 'मी' याला असह्य वाटू शकणारा फटका दिला आहे आणि श्रीपुमामासमवेत थेट गावच सोडावे लागत आहे....एक सुंदर फूल पूर्ण फुलण्यापूर्वीच अस्तित्वहीन झाले आहे. "'कच्चं केळ कसं लागतं रे श्रीपुमामा? आणि तिखटमीठासोबत खाल्लं तर?'..." हा त्याचा प्रश्न उत्तराशिवायच राहाणार आहे.... जीवनात केळ मिळेल वा ना मिळेल पण त्यासोबत तिखटमीठ मिळेलच असेही नाही...हाच नियतीचा धडा.

साजिर्‍या, नितांत सुंदर.
अशक्य भारी रित्या लीलया पेललंयस हे शिवधनुष्य

अनेकानेक धन्यवाद

परत एकदा वाचलं.फार मस्त लिहिलंय.जी ए असते आणि त्यांनी कैरी चा पुढचा भाग लिहिला असता तर असाच लिहिला असता.
ही लेखनशैली, कल्पनाशक्ती जमणं साठी तुम्हाला एक साष्टांग व्हर्च्युअल नमस्कार.

छान कल्पना आहे .पण गत चा अती वापर केलाय. प्रत्येक वाक्यात त्याच्यागत, याच्यागत...!!
त्याने रसभंग होतो.

श्रीपुमामा माझ्याकडे बघत राहिला. मग दप्तर खाली ठेऊन छातीचा पिंजरा उडून चालला असल्यागत मी दोन्ही हातांनी पकडला, आणि शेवटचंच खोकून घ्यायचं असल्यागत डोळ्यांत भरपूर पाणी येईस्तोवर खोकत राहिलो.>>>>..त्याला काही झाले का ???